टाटा कुटुंबातील 'या' कम्युनिस्ट सदस्याचे महात्मा गांधीशी उडाले होते खटके, ब्रिटनचे खासदारही होते

शापुरजी सकलतवाला हे टाटा समूहाची स्थापना करणाऱ्या जमशेटजी नसरवानजी टाटा यांचे भाचे होते

फोटो स्रोत, Picryl

फोटो कॅप्शन, शापुरजी सकलतवाला हे टाटा समूहाची स्थापना करणाऱ्या जमशेटजी नसरवानजी टाटा यांचे भाचे होते
    • Author, शर्लिन मोलन
    • Role, बीबीसी न्यूज

रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा उद्योग समूह आणि टाटा कुटुंबाविषयी मोठ्या प्रमाणात चर्चा होते आहे. टाटांच्या कुटुंबातील आणि टाटा उद्योगसमूहातील वेगवेगळ्या कालखंडात भरीव योगदान देणाऱ्या अनेकांच्या कार्याची यानिमित्तानं पुन्हा एकदा दखल घेतली जाते आहे.

मात्र, त्याचवेळी टाटा कुटुंबातील एक सदस्य असाही आहे की, ज्याच्या कार्याकडं, देशासाठी दिलेल्या योगदानाकडं बहुतांश वेळा दुर्लक्षच झाले आहे. ती व्यक्ती म्हणजे शापुरजी सकलतवाला. ते कोण होते? आणि त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान काय आहे? याचा आढावा घेणारा हा लेख.

शापुरजी सकलतवाला (Shapurji Saklatvala) हे नाव एऱ्हवी तुम्ही फारसं ऐकलं नसण्याची शक्यता आहे. इतिहासाच्या पुस्तकांमधून देखील ते बहुसंख्य लोकांना परिचित असतील असं नाही.

टाटांच्या कुटुंबातील असंख्य कर्तृत्ववान व्यक्तींपैकी एक असलेल्या या व्यक्तिमत्वाकडे तसं दुर्लक्षच झालं आहे.

मात्र इतिहासातील चांगल्या कथांसारखी ही कापूस व्यापाऱ्याच्या मुलाची रंजक कथा आहे. हा मुलगा भारतातील सर्वात श्रीमंत घराण्यांपैकी एक टाटा परिवारातील एक सदस्य होता.

त्यांचं आयुष्य म्हणजे एक अविरत सुरू असलेला संघर्ष, अवहेलना आणि चिकाटीनं केलेले प्रयत्न होते, असंच प्रत्येक वळणावर दिसतं. त्यांच्या वाट्याला त्यांच्या श्रीमंत भावंडांचं आडनावही आलं नव्हतं आणि नशीबही आलं नव्हतं.

भावंडांप्रमाणं ते टाटा समूहात कार्यरतही झाले नाहीत. टाटा समूह आज जगातील सर्वात मोठ्या उद्योग समूहांपैकी एक आहे. टाटा समूहाचा विस्तार फक्त भारतातच नाही तर जगातील अनेक देशांमध्ये झाला आहे.

आज जॅग्वार लँड रोवर आणि टेटली टी सारखे जगप्रसिद्ध ब्रिटिश ब्रँड टाटा समूहाच्या मालकीचे आहेत.

पण या टाटा समूहात एखाद्या महत्त्वाच्या पदाची जबाबदारी सांभाळण्याऐवजी ते एक स्पष्टवक्ते आणि प्रभावशाली राजकारणी बनले.

त्यांनी ब्रिटिशांच्या वसाहतवादी साम्राज्याच्या केंद्रातून म्हणजे ब्रिटिश संसदेतून भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केले. आपल्या विचारांसाठी अगदी महात्मा गांधीजींशीही संघर्ष केला.

शापुरजी सकलतवाला यांचा जन्म एका व्यापारी कुटुंबात झाला. मात्र तरीही आपली भावंडे किंवा नातेवाईकांपेक्षा अत्यंत वेगळी वाट त्यांनी कशी धरली? ब्रिटनमधील पहिला आशियाई खासदार होण्यासाठी ते कसे मार्गस्थ झाले?

या सर्व प्रश्नांची उत्तरं सकलातवाला यांचं त्यांच्या स्वत:च्या कुटुंबाशी असलेल्या नात्याइतकीच गुंतागुंतीची आहेत.

सकलतवाला यांचं बालपण आणि कौटुंबिक तणाव

शापुरजी सकलतवाला हे कापूस व्यापारी दोराबजी आणि जेरबाई यांचे चिरंजीव होते. जेरबाई म्हणजे टाटा समूहाची स्थापना करणाऱ्या जमशेटजी नसरवानजी टाटा यांची धाकटी बहीण .

शापुरजी सकलतवाला 14 वर्षांचे असताना, त्यांचं कुटुंब मुंबईत (तेव्हाचं बॉम्बे) इस्प्लेनेड हाऊसमध्ये जेरबाई यांच्या भावाकडे वास्तव्यास आले होते. जमशेटजी त्यांच्या कुटुंबासह तेव्हा इस्प्लेनेड हाऊसमध्ये राहत होते.

शापुरजी सकलतवाला लहान असतानाच त्यांचे आईवडील विभक्त झाले होते. त्यामुळे जमशेटजी हेच त्यांच्या आयुष्यातील वडीलधारी व्यक्ती होते. सकलतवाला यांना जमशेटजी वडिलांसमानच होते.

"जमशेटजी यांना शापुरजी फार आवडायचे. शापुरजींच्या लहानपणापासूनच जमशेटजींना त्यांच्यातील प्रचंड क्षमतांची जाणीव झाली होती. त्यामुळेच त्यांनी शापुरजींकडे खूप लक्ष दिलं. तसंच एक लहान मुलगा म्हणून आणि एक माणूस म्हणून शापुरजींच्या क्षमतांवर त्यांचा प्रचंड विश्वास होता," असं सकलतवाला यांची मुलगी सेहरी त्यांच्या वडिलांच्या 'द फिफ्थ कमांडमेंट' या चरित्रात लिहितात.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

मात्र सकलतवालांवरील जमशेटजी यांच्या प्रेमामुळं, तसंच सकलतवालांकडे त्यांनी अधिक लक्ष दिल्यामुळं एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली. जमशेटजी यांचा मोठा मुलगा दोराब नाराज झाला. खासकरून त्याच्या मनात शापुरजींविषयी राग, द्वेष निर्माण झाला.

"याचा परिणाम असा झाला की लहानपणी आणि मोठे झाल्यावरही शापुरजी आणि दोराब दोघेही एकमेकांच्या विरोधात असायचे. त्यांच्या नात्यातील हा दुरावा कधीच दूर झाला नाही,"असं सेहरी लिहितात.

याची परिणती अशी झाली की, दोराब यांनी त्यांच्या कौटुंबिक व्यवसायातील सकलतवाला यांची भूमिका कमी करत नेली. एकप्रकारे त्यांना या व्यवसायाबाहेरच काढलं. त्यामुळं सकलतवाला यांना वेगळ्या वाटेकडं मार्गस्थ व्हावं लागलं.

प्लेगमुळे झालेल्या विनाशाचा सखोल परिणाम

कुटुंबातील अंतर्गत बेबनाव, नात्यांमधील तणाव या गोष्टींचा सकलतवाला यांच्यावर परिणाम झालाच. मात्र याव्यतिरिक्त 1890च्या दशकाच्या शेवटी प्लेगमुळे मुंबईत झालेल्या विनाशाचा देखील त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला.

या काळात त्यांनी पाहिलं की, कसं या साथीच्या रोगामुळे त्यांच्या कुटुंबासारख्या समाजातील उच्चभ्रू, श्रीमंत वर्गापेक्षा गरीब आणि कामगार वर्ग अधिक भरडला गेला.

गरिबांना या रोगराईचा मोठा फटका बसला. जीवित असो की आर्थिक गरिबांची मोठी हानी झाली. त्या तुलनेत सधन, श्रीमंत, वरच्या स्तरातील वर्ग मात्र तुलनात्मकरित्या सुरक्षित राहिला.

त्यावेळेस सकलतवाला महाविद्यालयात शिकत होते. त्यांना वाल्डेमार हाफकिन या रशियन वैज्ञानिकाबरोबर जवळून काम करण्याची संधी मिळाली.

हाफकिन यांना त्यांच्या क्रांतीकारक आणि झारशाहीविरोधी राजकारणामुळे रशियातून पलायन करावं लागलं होतं.

ग्रेट ब्रिटनच्या कम्युनिस्ट पार्टीचे खासदार शापुरजी सकलतवाला (डावीकडे) आणि वॉल्टन न्यूबोल्ड (उजवीकडे)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, ग्रेट ब्रिटनच्या कम्युनिस्ट पार्टीचे खासदार शापुरजी सकलतवाला (डावीकडे) आणि वॉल्टन न्यूबोल्ड (उजवीकडे)

हाफकिन यांनी प्लेगशी लढण्यासाठी एक लस विकसित केली. सकलतवाला यांनी घरोघरी जाऊन लोकांना ही लस घेण्याविषयी पटवून देण्याचा प्रयत्न केला, लोकांना राजी केलं.

"हाफकिन आणि सकलतवाला या दोघांच्या दृष्टीकोनात बरच साम्य होतं. साहजिकच आदर्शवादी वृद्ध वैज्ञानिक आणि समाजाची कणव असलेला तरुण विद्यार्थी यांच्यातील घनिष्ठ सहवासामुळे शापुरजींच्या विचारांना, जीवनविषयक दृष्टीला आकार घेण्यास आणि ताकदीनं तयार होण्यास मदत झाली असावी, यात शंका नाही," असं सेहरी त्यांच्या पुस्तकात लिहितात.

सकलतवाला यांच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी आणखी एक गोष्ट म्हणजे त्यांचं सॅली मार्श यांच्याबरोबरचं नातं. सकलतवाला यांची सॅली यांच्याशी ओळख झाली तेव्हा त्या रेस्टॉरंटमध्ये वेटर होत्या.

प्रेम, लग्न आणि कामगार वर्गासाठीचं राजकारण

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

1907 साली सकलतवालांनी सॅली मार्श यांच्याशी लग्न केलं. सॅली यांच्या आईवडिलांना 12 अपत्ये होती. यातील त्या चौथ्या होत्या. त्या प्रौढ होण्याआधीच त्यांच्या वडिलांचं निधन झालं होतं. याचा विपरित परिणाम मार्श कुटुंबावर झाला होता.

त्यांना मोठ्या आर्थिक अडचणींना तोंड द्यावं लागलं होतं. मार्श कुटुंबाचं आयुष्य खडतर होतं. घरातील गरजांची पूर्तता करण्यासाठी कुटुंबातील प्रत्येकालाच प्रचंड मेहनत करावी लागत होती.

सधन कुटुंबातील असूनही सकलतवाला सॅली मार्श यांच्याकडं ओढले गेले. ते सॅलीच्या प्रेमात पडले. त्यांच्या प्रेमसंबंधांच्या काळात सॅली यांच्यामुळे सकलतवाला यांना ब्रिटनमधील कामगार किंवा मजूर वर्ग ज्या हालअपेष्टांना तोंड देत होता ते पाहण्यास मिळालं.

सेहरी लिहितात की, त्यांचे वडील शाळा आणि महाविद्यालयात शिकत असताना जेसुई पाद्री (Jesuit priests)आणि भिक्षूणींच्या हाताखाली शिकले होते. त्यामुळे त्यांच्या वडिलांवर जेसुई पाद्री आणि भिक्षूणींच्या नि:स्वार्थ जीवनाचा प्रभाव पडला होता.

त्यामुळेच 1905 मध्ये युकेमध्ये गेल्यानंतर सकलतवाला गरीब आणि उपेक्षितांसाठी काम करण्याच्या उद्देशानं त्यांनी राजकारणाची वाट धरली आणि त्यात स्वत:ला झोकून दिलं.

मुंबईतील टाटांचं घर, एसप्लेनेड हाऊसचा फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुंबईतील टाटांचं घर, एसप्लेनेड हाऊसचा फोटो

1909 मध्ये ते युकेमधील लेबर पार्टीत सहभागी झाले. त्यानंतर 12 वर्षांनी ते कम्युनिस्ट पक्षात सामील झाले.

भारत आणि ब्रिटनमधील कामगार वर्गाच्या हक्कांविषयी त्यांना प्रचंड तळमळ होती. त्याबद्दल त्यांना खूप काळजी वाटायची. त्याचबरोबर समाजवाद आणि साम्राज्यवाद किंवा भांडवलशाहीबद्दलची त्यांची स्वत:ची मतं होती.

सकलतवाला यांना ठामपणे वाटत होतं की, समाजातील गरीबी फक्त समाजवादामुळंच दूर होऊ शकतं आणि प्रशासनात लोकांना अधिकार मिळू शकतात, त्यांचं म्हणणं ऐकलं जाऊ शकतं. कोणत्याही साम्राज्यवादी राजवटीमुळं ही गोष्ट घडणार नाही.

सकलतवाला यांच्या भाषणांना लोकांकडून चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यामुळं लवकरच ते लोकप्रिय झाले. 1922 मध्ये ते ब्रिटिश संसदेत खासदार म्हणून निवडून गेले. जवळपास सात वर्षे ते खासदार होते.

या कालावधीत भारताच्या स्वांतत्र्यांसाठी त्यांनी अत्यंत आक्रमक आणि जोरदार भूमिका घेतली. याबाबतचे त्यांचे विचार इतके कट्टर, आक्रमक होते की कॉन्झर्वेटिव्ह पक्षाच्या एका ब्रिटिश-भारतीय खासदारानं सकलतवालांना "मूलतत्त्ववादी कम्युनिस्ट" ठरवलं.

भारतातील कम्युनिस्ट पार्टी आणि स्वातंत्र्यलढ्यासाठीचा संघर्ष

खासदार असतानाच सकलतवाला यांनी भारतातही अनेकवेळा भेट दिली. भारतात देखील त्यांनी भाषणं दिली. यात त्यांनी कामगार वर्गाला आणि तरुण राष्ट्रवाद्यांना भारताच्या स्वातंत्र्यलढ्याला ठाम पाठिंबा देण्याची शपथ घेण्यासाठी आवाहन केलं.

इतकंच नाही तर भारतात ज्या ज्या ठिकाणी त्यांनी भेट दिली तिथे भारताच्या कम्युनिस्ट पार्टीचं संघटन उभारण्यास आणि पक्षाची बांधणी करण्यास मदत देखील केली.

सकलतवाला यांच्या साम्यवादासंदर्भातील अत्यंत तीव्रतेनं आणि आक्रमकपणे मांडलेल्या विचारांचा महात्मा गांधीजींच्या अहिंसक मार्ग अवलंबण्याच्या विचाराशी मतभेद असल्यानं त्यांच्यात अनेकदा खटके उडाले.

गांधीजींचा अहिंसक मार्ग आणि साम्यवाद या दोहोंचा एक सामाईक शत्रू होता, तो म्हणजे ब्रिटिश साम्राज्य. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासंदर्भात कोणता मार्ग अवलंबावा याबद्दल दोन्ही दृष्टीकोन वेगवेगळे असल्यानं हा संघर्ष होत होता.

सकलतवाला यांनी यासंदर्भात गांधीजींना पत्रं देखील लिहिली होती. त्यातील एका पत्रात ते त्यांनी लिहिलं होतं, "प्रिय कॉम्रेड गांधी, आपापली मतं मुक्तपणे योग्यरित्या व्यक्त करू देण्यासाठी एकमेकांना कठोरपणे वागण्याची परवानगी देण्याइतपत आपण दोघेही अनियमित किंवा अनाकलनीय आहोत."

1933 मध्ये हाईड पार्क इथं सकलतवाला भाषण देत असतानाचा फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, 1933 मध्ये हाईड पार्क इथं सकलतवाला भाषण देत असतानाचा फोटो

पत्रात पुढे लिहितांना त्यांनी गांधीजींच्या असहकार चळवळी बद्दल त्यांना वाटणाऱ्या अस्वस्थतेबद्दल आणि लोक त्यांना "महात्मा" म्हणतात याविषयी त्यांनी प्रामाणिकपणे आणि रोखठोकपणे मतं मांडली.

महात्मा गांधी आणि सकलतवाला या दोघांमध्ये कधीही एकमत झालं नाही. मात्र तरीही त्यांचं एकमेकांशी असलेलं वर्तन मात्र सौहार्दपूर्णच राहिलं. भारतातून ब्रिटिश साम्राज्य उलथवून टाकण्याच्या समान ध्येयासाठी ते एकत्र आले होते.

सकलतवाला यांच्या भारतातील जहाल भाषणांमुळे ब्रिटिश अधिकारी अस्वस्थ झाले होते. त्यामुळे 1927 मध्ये त्यांच्या भारतात येण्यावर बंदी घालण्यात आली.

1929 मध्ये त्यांनी खासदारकी देखील गमावली. ते पुन्हा संसदेत जाऊ शकले नाहीत. मात्र आपल्या मायभूमीसाठी, भारताच्या स्वातंत्र्यासाठीचा लढा त्यांनी सुरूच ठेवला.

1936 ला लंडनमध्येच मृत्यू होईपर्यंत सकलतवाला हे ब्रिटनच्या राजकारणातील आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्यातील एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व होतं.

नियतीचा न्याय पाहा, तरुणपणी कुटुंबापासून दुरावलेले सकलतवाला मृत्यूनंतर मात्र एकप्रकारे कुटुंबांशी पुन्हा जोडले गेले.

त्यांच्यावरील अंत्यसंस्कारानंतर त्यांची राख लंडनमधील स्मशानभूमीत त्यांचे आईवडील आणि जमशेटजी टाटा यांच्या थडग्या शेजारीच दफन करण्यात आली. एकप्रकारे ते पुन्हा एकदा टाटा घराण्याशी आणि टाटांच्या वारशाशी जोडले गेले होते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.