'पीक हाती आलं होतं, आता वाळवंट दिसतंय,' अतिवृष्टीने शेतजमिनी खरडून गेलेल्या शेतकऱ्यांची गोष्ट

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC
जमीन खरडून गेलेली शेती पुन्हा लागवडीयोग्य होण्यासाठी 47 हजार रुपये प्रति हेक्टरी थेट मदत केली जाईल तसेच तीन लाख रुपये मनरेगा मधून दिले जातील, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 7 ऑक्टोबर रोजी केली आहे.
दोन्ही मिळून, खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी एकूण साडे तीन लाख रुपये मदत मिळणार असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले आहे.
राज्यात यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. यामध्ये 29 जिल्हे प्रभावित झाले आहेत.
त्यामुळे, नुकसानग्रस्त भागातील बळीराजाला पुन्हा उभे करण्यासाठी 31 हजार 628 कोटींच्या मदतीचे पॅकेज देत असल्याची घोषणा 07 ऑक्टोबर रोजी मुख्यमंत्र्यांनी केली.
जाहीर करण्यात आलेली मदत दिवाळीपूर्वी देण्याचा प्रयत्न राहणार असून ही आतापर्यंतची सर्वात मोठी आर्थिक मदत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
या घोषणेआधी, बीबीसी मराठीने सोयगाव तालुक्यात जाऊन हा रिपोर्ट केला आहे.
"18 तारखेला इथं डोंगरावर ढगफुटी झाली. पहिल्या दिवशी एकच वावर वाहून गेलं तर आम्हाला काहीच वाटलं नाही. दुसऱ्या दिवशी पूर्ण वाहून गेलं. सगळी दगडं आली. सगळं गेलं. काहीच राहिलं नाही शेतात. शेतामधूनच पाणी वाहतंय. तिकडून शेत होतं आणि इथून शेत होतं मधून पाणी येतंय ते."
शेतातलं पाणी पाहून डोळ्यांना धारा लागलेल्या सीमा पिंगळे त्यांचं शेत कसं वाहून गेलं हे सांगताना थांबत नव्हत्या.
"असं वाटतंय वाळवंट आहे. एखाद्या वाळवंटासारखी जमीन झालीय," अंकुश पांडे या 36 वर्षीय शेतकऱ्यालाही खरडून गेलेली शतजमीन दाखवताना रडू आवरलं नाही.
छत्रपती संभाजीनगर आणि जळगावच्या सीमेवर असलेल्या सोयगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टीनंतर शेतजमिनी खरडून वाहून गेल्याचं चित्र आहे.
इथे अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शेतमाल तर सोडाच पण काळी मातीही पूर्ण वाहून गेली आहे. आता शेतात फक्त आणि फक्त दगड उरलेत.
शेतकऱ्यांवर कोसळेलल्या या संकटामुळं भविष्यात त्यांचं काय होणार हाही प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचाच आढावा घेत, सोयगाव तालुक्यातील काही गावांमधून केलेला हा रिपोर्ट.
'दगड सोडून काहीच शिल्लक नाही'
सोयगाव तालुक्यात जोगेश्वरी धरण आहे. या धरणाजवळच्या काही गावांमध्ये 18 सप्टेंबर रोजी मुसळधार पाऊस झाला. पाऊस म्हणजे अगदी ढगफुटीच झाल्याचं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.
सीमा पिंगळे यांच्या कुटुंबीयांचं पाच एकरचं शेत इथल्या घोसला गावात आहे. दहा जणांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचं ते एकमेव साधन होतं.
पण पावसानंतर शेतात पिकलेला कापूस तर सोडाच, शेतजमीनही शिल्लक राहिलेली नाही. शेतजमिनीवर जिकडे तिकडे फक्त दगड दिसत आहेत.
इतकंच काय तर शेतजमीन दुंभगली असून त्याच्यामधून अजूनही पाणी वाहत आहे, असं त्या सांगतात.

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC
गावातल्या दहा ते बारा शेतकऱ्यांच्या शेतात हीच परिस्थिती असल्याचं गावकऱ्यांनी सांगितलं.
सीमा पिंगळे यांनी यावर्षी शेतात चाळीस ते पन्नास क्विंटल कापूस घेतला असता. पण एक क्विंटलही कापूस निघणं कठीण आहे, असं त्या म्हणाल्या. त्या आता शेतमजुरीसाठी दुसऱ्याच्या शेतात कामाला जात आहेत.
सीमा पिंगळे सांगतात की, "चाळीस पन्नास क्विंटल कापूस निघत होता दरवर्षी, पण यावर्षी आपल्याला एक क्विंटलचीही आशा नाही. आम्ही आता रोजंदारीवर कामाला जातोय. 200 रुपये रोजावर जातोय बाया. माणसांना तर काही काम नाही. त्याच्यावरच आम्ही घर ढकलतोय."

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC
आसपासच्या शेतातील अनेक महिला शेतकरी आमच्याशी संवाद साधण्यासाठी जमल्या.
आम्ही कर्ज काढून शेती करत होतो. शेतमालाच्या उत्पन्नावरच कर्ज फेडू शकतो. यावर मुलांचं शिक्षण आणि घर चालत होतं. आता शेतच राहिलं नाही तर काय करायचं? असं महिला शेतकरी हतबल होऊन सांगत होत्या.
सुवर्णा गावंडे यांचंही याच घोसला गावात शेत आहे. त्या म्हणाल्या की, शेत कसं काय तयार करणार? आमच्यात आता ताकदच नाही ना तयार करायला. कर्ज घेतलं आहे. आम्ही व्याजाने पैसे घेतले आहेत. बियाणं, सगळं केलं. शिक्षण सुरू आहे मुलांचं."
'बाळाप्रमाणे शेती पिकवली पण...'
घोसला गावापासून जवळ असलेल्या कडेवडगाव आणि नीमखेडी या गावातील शेतकऱ्यांचीही आमची भेट झाली.
36 वर्षीय अंकुश पांडे पत्नी सरला यांच्यासोबत कडेवडगाव इथं शेती करतात. चार एकर शेतीवर त्यांनी कापूस पिकवला होता.
मे महिन्यापासून दररोज फक्त शेत आणि शेत एवढंच काम केलं असं ते सांगतात. पण त्यांच्या शेतीचा काही भाग पूर्ण खरडून निघाल्याचं त्यांनी दाखवलं.
शेतजमिनीवर जिथे काही भागात पिकलेला कापूस पावसाच्या पाण्यात खराब झाल्याचं चित्र दिसलं तर तिथेच सलग जमिनीच्या काही एकर भागावर फक्त दगड आणि खडक शिल्लक होता. ही जमीन दाखवताना अंकुश पांडे यांना अक्षरश: रडू कोसळलं.

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC
बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "मे महिन्यापासून शेताला लहान बाळासारखं मोठं करतोय. आम्हाला असं वाटलं पण नव्हतं की, शेती अशी वाहून जाईल. आचनाक पाऊस आला आणि ढगफुटी झाली भयंकर.
बोललं जात नाही माझ्याकडून. हे शेत आहे माझं. हा विषय इतका गंभीर आहे की, आम्हाला जेवणाचीसुद्धा इच्छा होत नाही."
ते पुढे सांगतात की, "आमचं पीक कर्ज थकलेलं आहे. वाटत होतं यंदा फेडून टाकू. कर्जाचं काय आता तर खायचंच काय? तालुक्याच्या ठिकाणी मुलगी पाचवीला शिकायला टाकली आहे. आम्हाला माहिती असतं तर गावातच टाकली असती. आता शाळेतून नाव काढायचा विचार सुरू आहे."
शेतकऱ्यांचं हे काढणीला आलेलं पीक होतं. म्हणजे अगदी तोंडाशी आलेला घास. जिथे शेतमाल विकून कर्ज फेडता आलं असतं, मुलांचं शिक्षण सुरू राहिलं असतं, अगदी तोंडवर आलेली दिवाळी सुद्धा साजरी झाली असती. पण तिथे आता शेतमालाऐवजी केवळ दगडांची जमीन शिल्लक राहिलीय.

अंकुश पांडे यांच्या शेताजवळच उषा आणि गजानन पाटील यांची जवळपास 10 एकर शेती आहे. आम्ही पोहचलो त्यावेळी पाण्यातून वाचलेली कपाशी काढण्याचं काम सुरू होतं. पण हे केवळ काही भागात. कारण उर्वरित भाग उषा पाटील यांनी आम्हाला दाखवला त्यावर केवळ दगड आणि खडक दिसत होते.
ते दाखवत असलेल्या जमिनी पाहून इथे काही दिवसांपूर्वी शेत होतं यावर विश्वास बसणं कठीण अशी दृश्य दिसली.
उषा पाटील यांचा मुलगा पुणे येथे हॉटेल मॅनेजमेंटचं शिक्षण घेत आहे. त्याची फीस भरण्यासाठी काही दिवसांपूर्वीच पोत गहाण ठेवल्याचं त्या सांगतात.
शेतातला माल आला की, गहाण ठेवलेलं सोनं परत मिळवता येईल असं त्यांचं नियोजन होतं. पण त्यावेळी त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती की शेतमाल तर सोडाच पण शेतजमीन सुद्धा आधीसारखी राहणार नाही.
शेत दाखवत त्या म्हणाल्या, "माझं हे शेत होतं. इथे कपाशी लावली होती आम्ही. इतकं पाणी आलं पूर्ण शेती खरडून गेलीय. कर्ज घेतलं होतं बाहेरून. आमच्यावर खूप कर्ज आहे.
आमचं सगळं वाहून गेलं. माझा मुलगा लांब टाकलेला आहे शिकायला. मी पोत गहाण ठेवली आणि फी भरली. शेतावरच होतं सगळं काही. काही राहिलंच नाही तर काय शिकवणार आम्ही मुलं."
'आता फक्त आत्महत्या करायची राहिली'
राज्यात ठिकठिकाणी अतिवृष्टीमुळे झालेलं शेतमालाचं नुकसान एकाबाजूला पण शेतजमीनच जर वाहून गेली किंवा खरडून गेली तर शेतकऱ्याने काय करावं? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.
या परिस्थितीत शेतकरी केवळ सरकारकडे मदतीची आस लावून बसले आहेत. पण मदतही अद्याप मिळत नसल्याने ते सरकारलाही आता प्रश्न विचारत आहेत.
सरला पांडे सांगतात, "पावसानं शेतात डायरेक्ट खडक दिसू लागला. काय भेटतंय शेतकऱ्याला. ते खुर्चीवर बसून. ते सुगट पहायला तयार नाही की, खरोखर काय झालंय. मतदानाच्या वेळेत कसे येत असतात."

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC
उषा पाटील यांनीही सरकारकडे तत्काळ मदतीची मागणी केली आहे. "इथे यायलाच कोणी तयार नाही. आमदारताई आल्या पाहून गेल्या. त्याचं पुढे काहीच नाही. आमची शेती तत्काळमध्ये सुधरवून द्या. जेवढी नुकसान झाली तेवढी भरपाई करून द्या." असं त्या म्हणाल्या.
याबाबत आम्ही आमदार संजना जाधव यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला. आल्यावर तीही याठिकाणी देऊ.
सीमा पिंगळे सांगतात की, "नोंद केली आहे. पाहून करू म्हणाले. पण कधी करणार जीव गेल्यावर. आता फक्त आत्महत्या करायची राहिली आहे. सगळं झालंय."
छत्रपती संभाजी नगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी काही दिवसांपूर्वी सोयगाव तालुक्यातील या गावांना भेट दिल्याचं सांगितलं.
बीबीसी मराठीशी बोलताना मंत्री संजय शिरसाठ म्हणाले की, "सोयगावला जमीन तर खरडून गेलीच आहे परंतु त्यानंतर पीक यायला उशीर लागणार आहे. ते पुढचे चार पाच वर्ष शेती करू शकणार नाही अशी परिस्थिती आहे.
ती शेत जमीन उपजाऊ होणार नाही. ते करायला भरीव मदत लागणार आहे. आम्ही सरकार म्हणून तर मदत करतोच आहोत. मी स्वतः मुख्यमंत्र्यांना परिस्थिती सांगितली आहे. डिपीसी मार्फतही मदत करतो आहोत."
शेत जमीन खरडून जाणं म्हणजे नेमकं काय?
मराठवाडा आणि इतर अनेक भागात अतिवृष्टीनंतर शेतकऱ्यांची जमीन वाहून गेल्याचं चित्र आहे. अनेक शेतकरी ही परिस्थिती समोर आणत आहेत.
यासंदर्भात मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे म्हणाले की , "सोयगाव तालुक्यातील बनोटी गाव त्याच्या आजूबाजूची गावं ही प्रातिनिधीक स्वरुपात आहेत. जी उपजाऊ जमीन तयार होण्यासाठी शेकडो वर्ष लागतात ते फर्टाईल सॉईलच वाहून गेलेलं आहे.
एका अर्थाने आमचं सॉईल स्ट्रक्चरच बदललेलं आहे. रब्बी हंगामात पीक कसं घ्यायचं. यामुळे आता आपल्याला फार दूरगामी विचार करावा लागेल.
यापुढे अशी परिस्थिती उद्भवू नये, उपजाऊ जमीन पुन्हा तयार करायची असेल तर मीशन मोडवर काही कार्यक्रम हाती घ्यावी लागतील."

तर याबाबत बोलताना राज्य कृषी मूल्य आयोगाचे माजी सल्लागार उदय देवळणकर म्हणाले की, "जलशास्त्राच्या नियमानुसार जिथे उतारावरून पाणी वाहतं. उतार दुप्पट होतो. वाहणाऱ्या पाण्याचा वेग आठ पट वाढते. माती घेऊन जाण्याची क्षमता 32 पट वाढते. न्यूटनच्या जडत्वाच्या नियमानुसार त्याची शक्ती आणि वेग वाढतो, त्याला फ्लॅशफ्लड म्हणतात."
सरकार काय मदत करणार?
सोयगावमध्ये शेतकऱ्यांच्या या परिस्थितीबाबत आम्ही सोयगावच्या तहसीलदार मनिषा मेने यांच्याशी बोललो.
त्यांनी सांगितलं की, "या भागात खरडून गेलेल्या शेतजमिनींचे पंचनामे आम्ही वेगळे केले आहेत. शेतीचं नुकसान आणि खरडून गेलेल्या जमिनींचं नुकसान अशी दोन्हीची भरपाई नियमानुसार दिली जाणार आहे.
तसंच या भागात जोगेश्वरी धरण आणि नाल्याचं पात्र लहान असल्याने सुद्धा अतिवृष्टीनंतर ते ओव्हरफ्लो होतं हा सुद्धा प्रश्न आहे." असंही त्यांनी स्पष्ट केलं.

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC
राज्यात अतिवृष्टीनंतर शेतातलं पाणी गेल्यानंतर शेतीचं नुकसान आता स्पष्ट दिसू लागलं आहे. शेतीत झालेल्या नुकसानीसाठी ठिकठिकाणी पंचनामे केले जात असून मदत दिली जात असल्याचं राज्य सरकारने स्पष्ट केलं आहे.
परंतु ज्याठिकाणी शेतजमीनचं वाहून गेलीय किंवा खरडून निघाली आहे अशावेळेला शेतकऱ्यांसाठी नेमकी काय उपाययोजना केली जाणार हे पहावं लागेल.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











