'लेकरांना कसं पोसायचं, डोक्यावर असलेलं कर्ज कसं फेडायचं?'; आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील महिला काय म्हणत आहेत?

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC
"अंदाजच नव्हता असं काही करणार ते. हिंमतवार होते ते. इतलं कर्ज बी झालं पण हिंमत होती त्यांना. तीन तीन लेकरांवरबी जीव होता, माझ्यामधीबी जीव होता त्यांना, कसं काय असं केलं काही समजतच नाही."
30 वर्षांच्या छाया बंजारा यांना पतीच्या जाण्याबाबत हे सांगताना रडू कोसळलं.
छाया यांचे पती जगदीश बंजारा यांनी 24 सप्टेंबर रोजी आत्महत्या केल्याचं समोर आलं.
सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसात धुळे जिल्ह्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं. जगदीश बंजारा यांनीही सततच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्याचं कुटुंबीय सांगतात.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.
'तीन मुलं कशी मोठी करणार, कर्ज कसं फेडणार'
शिरपूर हा तालुका खरं तर जलसंधारणासाठीच्या 'शिरपूर पॅटर्न' या नावानेही ओळखला जातो. परंतु यंदा सप्टेंबरमध्ये झालेला पाऊस आणि त्यामुळं झालेलं नुकसान यामुळे शेतकरी हवालदिल झाल्याचं चित्र आहे.
जगदीश बंजारा यांच्या भाटपुरा या गावात आम्ही पोहचलो त्यावेळी झालेल्या घटनेमुळे गावात शांतता पसरली होती.
छाया बंजारा यांच्यासोबत त्यांची तीन लहान मुलं होती. 13 वर्षांची मुलगी आणि 10 आणि 8 वर्षांची दोन लहान मुलं.

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC
41 वर्षीय जगदीश बंजारा शेती करत होते. त्यांच्या शेतात कापूस आणि मक्याचं पीक होतं. स्वत: चं शेत त्यांनी गहाण ठेवलं होतं.
पण दुसऱ्याच्या शेतात काम करत होते आणि त्या पिकातूनच कमाईची अपेक्षा होती, असं त्यांच्या पत्नी छाया यांनी सांगितलं.
सततची नापिकी आणि गावातूनच अनेकांकडून उचललेलं लाखो रुपयांचं कर्ज याचाही तणाव होता असं त्या सांगत होत्या.

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC
छाया बंजारा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "या पावसात नुकसान झालं. दरसाल काही ना काही अडचण येतच होती. माल पिकत नव्हता. यामुळं त्यासनी आत्महत्या केली.
थोडी दुसऱ्याची खेती केली होती. त्यात पिकलं होतं थोडसं. दोन्ही शेतं गहाण ठेवली आहेत. दुसऱ्याची शेती केली होती त्यात मका, तूर आहे. त्यात नुकसान झालं."
त्या पुढे सांगतात की, "गावातच कोणाकडून एक लाख, कोणाकडून दोन लाख, एक लाख पन्नास हजार गावातच निघालं," हे सांगताना त्यांना रडू आवरत नव्हतं.
30 वर्षीय छाया बंजारा यांना आता आपल्या तीन मुलांना मोठं कसं करायचं आणि डोक्यावर असलेलं कर्ज कसं फेडायचं? असा प्रश्न पडला आहे.
'कपाशी पाहिल्यावर काय झालं समजलंच नाही'
भाटपुरा गावापासूनच काही अंतरावर शिरपूर तालुक्यातील कुरखळी गावातही सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे.
युवराज कोळी हे अल्पभूधारक शेतकरी होते. अवघ्या एक एकर शेतीत कापसाचं पीक घेऊन आणि शेत मजुरी करून ते आपल्या कुटुंबाचा साभांळ करत होते. परंतु पावसानंतर शेतात फवारणी करण्यासाठी गेलेले युवराज कोळी घरी परतलेच नाहीत.
त्यांच्या मागे दोन पत्नी आणि तीन मुलं असा परिवार आहे.

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC
युवराज कोळी यांची मोठी मुलगी महाविद्यालयात बीएच्या पहिल्या वर्षाला शिकत आहे.
रिना कोळी यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं की, "ते सकाळी गेले. नाष्टा पाणी केला. फवारणीला जायचं म्हणले. फवारणीला गेल्यावर काय केलं काय. कपाशी पाहून काय केलं काहीच समजलं नाही."
दोन्ही मुलींनी आणि मुलाने शिक्षण घ्यावं, नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती असं रिना सांगते. शिवाय, तिच्या लग्नासाठीही बोलणी सुरू होती असं कुटुंबीय सांगतात.

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC
युवराज कोळी यांच्या पत्नी माया कोळी यांनी सांगितलं की, "पोरीचं लग्न करायचं होतं. आम्हाला सांगितलं फवारा मारायला जायचंय. आता जीव गेला तर, काय करावं काय नाही.
त्यांना टेंशन होतं की, कसं होणार आपलं. त्यांच्या मनात काय सुरू होतं, काय करून टाकलं त्यांनी. सांगितलंच नाही आम्हाला."
त्या पुढे म्हणाल्या की, "त्यासनी इच्छा होती पोरांनी शिकावं. मजुरी करू इकडं तिकडं, शिक्षण करू, लग्न करू असं त्यासनी वाटत होतं."

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC
"कर्ज काढायचं आणि शेतात टाकायचं. मजुरी करायची पोट भरायचं. कसंही करून शिक्षण करायचं. शेतात पैसा टाकला होता. ते पिकणार मग पोरीचं लग्न करायचं होतं", असं माया कोळी हुंदके देत सांगत होत्या.
एक एकर शेत, त्यात कर्ज आणि ते शेतही पाण्याखाली गेलं.
हातात आलेला कापूस, काढणीला आलेलं हे पीक राहिलंच नाही, यामुळे त्यांनी हे पाऊल उचललं असावं असा अंदाज असल्याचं कुटुंबीय सांगतात.
चार महिन्यात 15 शेतकऱ्यांच्या आत्महत्या
युवराज कोळी आणि जगदीश बंजारा या दोन्ही शेतकऱ्यांवर बँकेचं कर्ज होतं अशी माहिती धुळ्याच्या जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिली.
दोन्ही प्रकरणांमध्ये शासकीय प्रक्रिया पूर्ण केली जात असून. नियमानुसार भरपाई दिली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
धुळे जिल्ह्यात जून महिन्यापासून 15 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची नोंद आहे. तर सप्टेंबर महिन्यात इथल्या 19 गावांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामुळे 18 हजार हेक्टर शेतजमीन बाधित झाली आहे.
इथल्या स्थानिक शेतकऱ्यांच्या परिस्थितीबाबत बोलताना पत्रकार सचिन पाटील सांगतात की, "या आत्महत्या यंदाची नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी यामुळे घडून आलेला परिणाम तर आहेच पण गेल्या काही वर्षातली नापिकी हे सुद्धा कारण आहे.
यातले बहुसंख्य शेतकरी हे अल्पभूधारक आहे. यासाठी ते हातउसणवारीने पैसे घेतात. वेळेवर व्यवहार पूर्ण करता आले नाहीत तर सार्वजनिक मानहानी होण्याची भीती त्यांना असते."
ते पुढे सांगतात, "अल्पभूधारक शेतकऱ्यावर दहा ते बारा जणांच्या कुटुंबाचा भार असणं, मुलांचं शिक्षण, वेगवेगळे कार्यक्रम यामुळे शेतीतून पुरेसं उत्पन्न होत नाही. याला सोबत उत्पन्न काहीच नाही. यामुळे अशावेळेला भरोशाच्या शेतीने दगा दिला तर शेतकरी हतबल झालेला दिसतो."

फोटो स्रोत, Shahid Shaikh/BBC
अशा परिस्थितीनंतर त्या शेतकऱ्याच्या कुटुंबाचं पुनर्वसन हा सुद्धा मोठा प्रश्न आहे.
याबाबत बोलताना ते सांगतात, "अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी काय करता येईल. त्यांना पर्यायी रोजगाराची जोड देता येईल का? उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबासाठी काय करता येईल यादिशेने सरकारने प्रयत्न करणं आवश्यक आहे." असंही ते सांगतात.
दरम्यान, शेतीच्या झालेल्या नुकसानीबाबत प्रशासनाकडून पंचनामे केले जात असल्याची माहिती जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी दिली.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.












