You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
कोल्हापूर आणि पोलंड यांचं नातं तुम्हाला माहिती आहे का? वाचा इतिहास
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी पोलंडला पोहोचले, तेव्हा तिथे त्यांनी राजधानी वॉर्सामध्ये असलेल्या कोल्हापूर स्मारकाला जाऊन आदरांजली वाहिली.
“वॉर्सा येथील कोल्हापूर स्मारक येथे श्रद्धांजली अर्पण केली. हे स्मारक कोल्हापूरच्या महान राजघराण्याला दिलेली मानवंदना आहे,” असं नरेंद्र मोदींनी X हँडलवरून केलेल्या एका पोस्टमध्ये म्हटलं आहे.
याशिवाय नवानगरचे जामसाहेब यांच्या स्मारकालाही भेट देऊन आदरांजली वाहिली. पण ही स्मारकं काय आहेत? पोलंडमध्ये कोल्हापूर आणि गुजरातच्या महाराजांच्या नावानं स्मारकं का आहेत? हे आपण जाणून घेऊयात
पंतप्रधान मोदींनीच त्यांच्या पोस्टमध्ये याविषयी सांगितलं आहे. “दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विस्थापित झालेल्या पोलिश महिला आणि मुलांना आश्रय देण्यात हे राजघराणे आघाडीवर होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांनी प्रेरित होऊन, कोल्हापूरच्या महान राजघराण्याने मानवतेला सर्वतोपरी प्राधान्य देत पोलिश महिला आणि मुलांना सन्मानाने जगता येईल, याकडे लक्ष दिले. करुणेची ही भावना अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील,” असं मोदींनी या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याविषय ट्विटरवर पोस्ट केली.
“पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी वॉर्सा, पोलंड येथील राजर्षि छत्रपती शाहू महाराजांच्या करवीर संस्थानाचा मानवतावादी दृष्टिकोन गौरवित करणाऱ्या स्मारकाला अभिवादन केले," असं फडणवीसांनी म्हटलं आहे.
"हे स्मारक म्हणजे दुसऱ्या महायुद्धादरम्यान पोलंडमधील निर्वासित नागरिकांना कोल्हापूरजवळील वळीवडे गावात करवीर संस्थानाने दिलेल्या सुरक्षित आश्रयाची सहृदय स्मृती आहे. मा. मोदीजी यांच्या भेटीद्वारे या पुण्यकार्यातील महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आणि तब्बल 6 हजार किमी दूर असूनही पोलंड-कोल्हापूरला जोडणाऱ्या आठवणींना उजाळा मिळाला!” असंही त्यांनी लिहिलं.
'कुटुंबासारखे प्रेम दिले'
कोल्हापूर राजघराण्याचे युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले ट्वीट रिट्वीट करत जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
हिटलरच्या भीतीने जेव्हा अनेक देशांनी पोलिश नागरिकांना जेव्हा आपल्या देशात प्रवेश नाकारला होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालणाऱ्या कोल्हापूर संस्थानांनी त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर हे नागरिक आपल्या राज्यात 6 वर्षं एखाद्या कुटुंबाप्रमाणे राहिले होते असंही ते पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
कोल्हापूरच्या जनतेनंही त्यांना कधीच आश्रित मानले नाही तर आपल्या कुटुंबातील व्यक्तीप्रमाणेच त्यांना प्रेम दिले असे संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटले आहे.
कोल्हापूरकरांच्या प्रेमाची पोचपावती म्हणून त्यांचे स्मारक पोलंडमधील वॉर्सामध्ये बांधण्यात आलं आहे.
भारत आणि त्यातल्या त्यात कोल्हापूरचं पोलंडशी हे नातं अनेक दशकं जुनं आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरात आश्रय नाकारलेल्या पोलिश नागरिकांना तेव्हा कोल्हापूरच्या संस्थानाने आश्रय दिला होता.
भारतावर त्यावेळी ब्रिटीश अंमल होता. कोल्हापूरच्या वळीवडे या गावात पोलीश नागरिकांसाठी छावणी उभारण्यात आली होती. 1943 ते 1948 अशी 5 वर्षं सुमारे 5000 पोलीश नागरिक इथे रहात होते.
यामध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. याच आश्रयाची आठवण आणि कृतज्ञता म्हणून पोलंडची राजधानी वॉरसॉमध्येही हे स्मारक उभारण्यात आलं आहे.
एवढंच नव्हे तर या पोलिश नागरिकांच्या आठवणींत कोल्हापूरच्या वळीवडे गावातही एक स्मारक उभारण्यात आलंय.
काही वर्षांपूर्वी 2019 मध्ये या आश्रितांच्या कुटुंबातील काही नागरिकांनी स्मारकाला भेट दिली होती. तेव्हा बीबीसीशी बोलताना त्यांनी आठवणी सांगितल्या होत्या.
याशिवाय पंतप्रधान मोदींनी नवानगरचे जामसाहेब दिग्विजयसिंह रंजितसिंग जडेजा यांच्या सन्मानार्थ उभारण्यात आलेल्या डोब्री महाराजा स्मारकालाही भेट दिली. डोब्री म्हणजे पोलिश भाषेत गुड किंवा चांगला.
या महाराजांनी 1942 मध्ये पोलंडच्या हजार मुलांना युद्धानंतरच्या काळात आश्रय दिला होता. म्हणूनच त्यांना इथे गुड महाराजा म्हटलं जातं.
भारतीय दूतावासाच्या वेबसाईटनुसार त्यांच्या सन्मानार्थ पोलंडमध्ये आठ पोलिश प्राथमिक आणि माध्यमिक शाळा त्यांचं नाव देण्यात आलं आहे.
या स्मारकाचं उद्घाटन 2014मध्ये तर कोल्हापूरच्या स्मारकाचं उद्घाटन 2017 मध्ये करण्यात आलं होतं.
पंतप्रधान मोदींचा पोलंड दौरा कोणत्याही भारतीय पंतप्रधानाचा पोलंडला 45 वर्षांनंतर पहिलाच दौरा आहे. यानंतर मोदी युक्रेनलाही भेट देणार आहेत.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचं प्रकाशन)