Drone War : लढाऊ विमानांसाठीही कसं आव्हान ठरतात छोटे ड्रोन? अशी बदलली युद्धाची पद्धत

फोटो स्रोत, Getty Images
- Author, द इन्क्वायरी पॉडकास्ट
- Role, बीबीसी वर्ल्ड सर्व्हिस
भारत-पाकिस्तान असो, इस्रायल-गाझा असो किंवा रशिया युक्रेन, अलीकडच्या काळात संघर्ष आणि युद्धामध्ये ड्रोनचा घातक शस्त्र म्हणून वापर वाढला आहे.
ड्रोन किंवा लष्कराच्या भाषेत 'अनमॅन्ड एरियल व्हेईकल' हे पारंपरिक लढाऊ विमान किंवा क्षेपणास्त्राच्या तुलनेत खूपच स्वस्त असतं. त्यामुळेच ड्रोन्सचा वापर, त्याचं तंत्रज्ञान आणि क्षमता झपाट्यानं विकसित होत आहेत.
एका अंदाजानुसार युक्रेन आणि रशियामधल्या युद्धात जे नुकसान झालंय, त्यापैकी 70 ते 80 टक्के नुकसान केवळ ड्रोन्समुळं झालं आहे.
पश्चिम आशियात इराण आणि इस्रायल सातत्यानं ड्रोन्सचा वापर करतायत. तर हूतींसारख्या बंडखोर गटांनीही इस्रायलवर आणि तांबड्या समुद्रातील नौकांवर हल्ले करण्यासाठी ड्रोनचा वापर केला आहे.
गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालानुसार 118 देश आणि किमान 65 बंडखोर गटांकडे आता लष्करी ड्रोन आहेत. त्यामुळे ड्रोनचा नैतिक वापर आणि जबाबदारीविषयी मूलभूत प्रश्न निर्माण झाले आहेत.
ड्रोन्स आधुनिक युद्धाचे चित्र कसे बदलत आहेत, हे समजून घेण्यासाठी सर्वात आधी ड्रोनला ड्रोन का म्हणतात, त्यांचा इतिहास काय आहे, हे जाणून घेऊयात.
'ड्रोन'चा उगम आणि युद्धात वापर
ड्रोन्स अलीकडे वापरात आले, असं तुम्हाला वाटत असेल. मात्र, 100 वर्षांहून अधिक काळ ते अस्तित्वात आहेत.
1903 मध्ये अमेरिकेत राईट बंधूंनी यशस्वीरित्या विमान उडवून दाखवलं, त्यानंतर लगेचच ड्रोन्सची निर्मिती सुरू झाली होती.

फोटो स्रोत, Getty Images
1918 साली जनरल मोटर्सचे अभियंता चार्ल्स केटरिंग यांनी पायलटशिवाय उडणारं विमान तयार करायचा प्रयत्न केला होता.
ते प्रयत्न निष्फळ ठरले, पण मनुष्यांऐवजी स्वयंचलित यंत्रणा युद्धाच्या रणांगणावर पाठवण्याची ती पहिलीच चाचपणी होती, असं जेम्स पॅटन रॉजर्स यांना वाटतं. ते अमेरिकेतील कॉर्नेल विद्यापीठाच्या टेक पॉलिसी इन्स्टिट्यूटचे संचालक आहेत.
पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात ब्रिटिश अभियंत्यांनी पायलटशिवाय उडणाऱ्या विमानांच्या निर्मितीवर काम सुरू केलं.
त्या विमानाला 'क्वीन बी' म्हणजे राणी माशी असं नाव देण्यात आलं. क्वीन बीचा वापर विमानभेदी तुकड्यांमधील सैनिकांच्या प्रशिक्षणासाठी केला जात होता.
या विमानावरूनच मानवरहीत विमानांसाठी 'ड्रोन' हा शब्द वापरायला सुरुवात झाली, असं सांगितलं जातं. कारण 'ड्रोन' या शब्दाचा अर्थ नर माशी असा होतो.
जेम्स पॅटन रॉजर्स सांगतात की, प्रत्यक्ष युद्धभूमीवर ड्रोनचा वापर व्हिएतनाम युद्धातच सुरू झाला होता.
"व्हिएतनाम युद्धात लायटनिंग बोल्ट नावाच्या ड्रोनचा वापर झाला. त्या ड्रोनमध्ये कोणतेही शस्त्र नव्हते. हे ड्रोन बॉम्ब टाकणाऱ्या विमानांमधून सोडले जायचे. पुढे हे ड्रोन जमिनीवर काय चालले आहे याचे फोटो काढून, पूर्वनियोजित मार्गाने परत येऊन एखाद्या ठिकाणी पडत असे. तिथून मग त्याला उचलून घेतलं जात असे."

फोटो स्रोत, Getty Images
पुढे अमेरिकेत 9/11 च्या हल्ल्यानंतर ड्रोन तंत्रज्ञान विकसित करण्याचं काम वेगानं सुरू झालं. ड्रोन्स शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केली जाऊ लागली.
9/11 च्या हल्ल्यानंतर केवळ महिनाभरातच अमेरिकेने तालिबान नेता मुल्ला उमरला ठार करण्यासाठी ड्रोनचा वापर केला. मात्र, तो प्रयत्न यशस्वी झाला नाही.
त्याविषयी जेम्स पॅटन रॉजर्स माहिती देतात, "मुल्ला उमर एका मशिदीत लपल्याचं अमेरिकेला समजलं. मात्र, त्यांना त्या मशिदीवर हल्ला करायचा नव्हता. त्यामुळे त्यांनी मुल्ला उमरला बाहेर पडण्यास भाग पाडण्यासाठी मशिदीबाहेर हल्ला केला.
"पण हेलफायर क्षेपणास्त्राच्या स्फोटामुळे वाळवंटात धूर आणि धूळीचा लोट उठला. त्या गोंधळात मुल्ला उमर पळून गेला. मात्र, अमेरिकेनं विशिष्ट लक्ष्य ओळखून त्यावर ड्रोनद्वारे नजर ठेवून हल्ला करण्याची क्षमता विकसित केल्याचं तेव्हा दिसून आलं."

फोटो स्रोत, Getty Images
पुढे अफगाणिस्तानात आणि इराकमधल्या युद्धातही अमेरिकेनं प्रिडेटर ड्रोन्सचा वापर करत अशा प्रकारचे अनेक हल्ले केले.
तेव्हा काही वेळा चुकून लग्न किंवा अंत्यसंस्कारांच्या कार्यक्रमांवर हल्ले झाले आणि निष्पाप लोक मारले गेले. त्यामुळे या हल्ल्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर निषेध आणि अमेरिकेची निंदा झाली.
पण तोपर्यंत जगात व्यावसायिक ड्रोनही येऊ लागले, जे फक्त काहीशे डॉलर्समध्ये विकत मिळू लागले. वेगवेगळ्या कारणांसाठी ड्रोन्सचा वापर होऊ लागला.
असं असलं तरी युद्धात ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणात वापर 2022 मध्ये म्हणजे रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्धापासून सुरू झाला.
जेम्स पॅटन रॉजर्स सांगतात, "सुरुवातीला सुरक्षित ड्रोन ऑपरेटर्स सुरक्षित ठिकाणी बसून शत्रूच्या प्रदेशात 15-20 किलोमीटर आत ड्रोन पाठवत आणि त्यातून मिळणाऱ्या थेट प्रतिमा पाहून क्षेपणास्त्रे डागत.
"मात्र, रशिया आणि युक्रेन दोघांनाही एकमेकांचे ड्रोन सिग्नल्स जाम करण्यात यश मिळू लागलं. त्यानंतर मग ड्रोनमध्ये फायबर ऑप्टिक केबल्सचा वापर सुरू झाला."

फोटो स्रोत, Getty Images
ऑप्टिक केबल्समुळे ऑपरेटर आणि ड्रोनमधील संपर्क तोडणे कठीण झाले.
असे ड्रोन्स रडारवर शोधणं कठीण जातं, तसंच हे ड्रोन्स शत्रूच्या प्रदेशात अगदी 60 किलोमीटर आत जाऊनही मोठं नुकसान करू शकतात.
युक्रेनची रणभूमी
डॉ. ओलेक्झांड्रा मोलॉय युक्रेनी आहेत आणि त्या ऑस्ट्रेलियातील न्यू साउथ वेल्स विद्यापीठात उड्डाण आणि ड्रोन तंत्रज्ञान विषयाच्या वरिष्ठ प्राध्यापक आहेत.
2014 मध्ये रशियाने क्रायमियावर कब्जा केल्यापासून युद्धात ड्रोन तंत्रज्ञानाच्या वापर कसा होऊ लागला, यावर त्या संशोधन करत आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
अलेक्झांड्रा सांगतात की, 2022 पर्यंत रशिया आणि युक्रेन या दोघांकडेही ड्रोन नव्हते, पण आता या युद्धात दोन्ही देश मोठ्या प्रमाणात ड्रोन वापरत आहेत.
"आता युक्रेनचे ड्रोन त्यांच्या इतर शस्त्रांच्या तुलनेत दुप्पट प्रभावी ठरत आहेत. युक्रेनने रशियाला जे नुकसान पोहोचवले, त्यातील 60 ते 70 टक्के नुकसान हे ड्रोनमुळे झाले आहे."
युक्रेनमध्ये युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांत सैनिक नसलेल्या स्वयंसेवकांनी ड्रोन्सचा वापर केला आणि ड्रोन्स विकसित करण्यातही मोठी भूमिका बजावली.
त्यांनी व्यावसायिक ड्रोनवर स्फोटकं लावून ती शस्त्रासारखी वापरण्याचा प्रयोग केला.
युद्धाच्या सुरुवातीच्या दिवसांत अशाच एका ड्रोनने पूर्व युक्रेनमधील एका रशियन घरावर हल्ला केला होता.
त्या ड्रोनमध्ये एफपीव्ही म्हणजेच फर्स्ट पर्सन व्ह्यूची सुविधा होती, म्हणजे हल्ल्याचा थेट व्हीडिओ रेकॉर्ड झाला. हा व्हीडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर युक्रेनच्या लष्कराने या तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू केला.
त्यांनी परदेशातून मोठ्या प्रमाणावर ड्रोन खरेदी केले आणि देशातही ड्रोन्सचं उत्पादन सुरू केले.

फोटो स्रोत, Getty Images
"युक्रेनचा उत्तर ते दक्षिण असा सुमारे 1 हजार किलोमीटरचा भूभाग आता युद्धाच्या फ्रंटलाईनवर आला आहे. इतक्या मोठ्या भागाचे संरक्षण करण्यासाठी ड्रोन्स ही अत्यंत उपयुक्त शस्त्रे ठरत आहेत.
"ड्रोन हेच युक्रेनचे एक प्रमुख शस्त्र बनले आहे. ड्रोन्सचा वापर केवळ आकाशातच नाही, तर जमिनीवर आणि समुद्रात तैनात सैनिकांवर हल्ला करण्यासाठीही केला जात आहे."
युक्रेन आता दर महिन्याला 2 लाख ड्रोन्स तयार करत आहे. रशियानेही त्यांचं ड्रोन उत्पादन वाढवले आहे.
डॉ. मोलॉय यांनी दिलेल्या माहितीनुसार, युक्रेनने गेल्या वर्षी सुमारे 15 लाख ड्रोन्स तयार केले होते आणि यावर्षी त्यांना 40 लाख ड्रोन्स तयार करायचे आहेत.
रशियानेही ड्रोन्सचं उत्पादन आणि त्यांचा वापर, दोन्ही वेगाने वाढवले आहेत. या कामात दोन्ही देशांना त्यांच्या सहयोगी देशांची मदत मिळते आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ड्रोन हे क्षेपणास्त्रांच्या तुलनेत खूपच स्वस्त आहेत, असं डॉ. मोलॉय नमूद करतात.
"30 लाख डॉलर्सच्या क्षेपणास्त्राने 500 डॉलर्सचा ड्रोन पाडता येतो, पण हे व्यवहार्य नाही. मात्र, 500 डॉलर्सच्या ड्रोनने 30 लाख डॉलर्सचा टँक नष्ट करणे हे निश्चितच अत्यंत प्रभावी आहे."
"मला वाटते की, ड्रोनमुळेच रशिया आणि युक्रेनमधील युद्ध इतकं लांबले आहे. अनेकदा घरगुती पातळीवर तयार केलेलं आणि सामान्य वाटणारे तंत्रज्ञान शक्तिशाली शत्रूचा सामना करण्यासाठी किती उपयुक्त ठरू शकते, याचे ही ड्रोन्स उदाहरण आहेत."
आकाशातलं मोठं आव्हान
स्टेसी पेटीजॉन, या वॉशिंग्टन डी.सी. येथील सेंटर फॉर न्यू अमेरिकन सिक्युरिटीच्या संरक्षण कार्यक्रमाच्या संचालक आहेत.
त्या सांगतात की, ड्रोन्स किंवा विमाने, अशा आकाशातून येणाऱ्या धोक्याचा वेळीच शोध घेण्याची आणि त्याला निष्क्रिय करण्याची क्षमता अत्यंत महत्त्वाची असते.
"आकाशातील धोके शोधण्यासाठी नेहमीचा पर्याय म्हणजे रडार. रेडिओ सिग्नल्स किंवा प्रतिमांचा वापर करून रडार शत्रूंचा शोध घेते. एखादा ड्रोन हवाई सीमेत प्रवेश करत असेल, तर त्याच्या प्रोपेलरचा आवाज किंवा त्याला नियंत्रित करणाऱ्या रिमोट पायलटच्या रेडिओ सिग्नल्सवरून त्याचा शोध घेता येतो."
"युक्रेनमध्ये ड्रोनचा सामना करण्यासाठी त्याचे सिग्नल जाम केले जातात किंवा त्याची दिशा बदलली जाते. अशी वाहनं GPS द्वारा नियंत्रित केली जातात. त्यामुळे ती सहजपणे जाम करता येतात."

फोटो स्रोत, Getty Images
अनेकदा शत्रूचे ड्रोन्स नष्ट करण्यासाठी क्षेपणास्त्र किंवा दुसऱ्या ड्रोनचा वापर केला जातो.
स्टेसी पेटीजॉन सांगतात की, याशिवाय हवाई सीमा ओलांडून येणारे ड्रोन्स पाडण्यासाठी लेझर बीमचा वापरही केला जातो.
लेझर बीम्स शत्रूच्या ड्रोन किंवा विमानांमध्ये छिद्र करू शकतात किंवा त्यातील इलेक्ट्रॉनिक उपकरणे निष्क्रिय करू शकतात.
मात्र, हे उपाय इस्रायलसारख्या छोट्या प्रदेशात प्रभावी ठरत असले, तरी युक्रेन किंवा रशियासारख्या मोठ्या देशांमध्ये ते तितकेसे प्रभावी ठरत नाहीत, असं स्टेसी पेटीजॉन नमूद करतात.
"इस्रायल हा तुलनेनं छोटा देश आहे. तिथे आयर्न डोम, डेव्हिड्स स्लिंग किंवा डेव्हिड्स अॅरोसारख्या हवाई संरक्षण प्रणालींचा वापर केला जातो.
"मात्र, युक्रेन आणि रशियाचा भूभाग इतका विशाल आहे की, त्याचे संरक्षण करणे अशा संरक्षण प्रणालींसाठी शक्य नाही. त्यामुळे युद्धभूमीत आणि देशातील अंतर्गत शहरांवरही यशस्वी हवाई हल्ले होत आहेत."
ड्रोनसारख्या नव्या संकटाचा सामना करणे हे आता जगभरातील लष्करी अधिकाऱ्यांसमोरचं मोठं आव्हान बनलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
स्टेसी पेटीजॉन सांगतात की, अनेकदा ड्रोन्स, क्रूझ मिसाइल्स आणि इतर क्षेपणास्त्रं ही समन्वय साधून थोड्या अंतराने एकत्र किंवा लहरींच्या स्वरूपात शत्रूच्या ठिकाणांवर पाठवली जातात. याला 'ड्रोन स्वॉर्म' असंही म्हटलं जातं.
अशा वेळी संरक्षण प्रणाली सर्व हल्ले निष्क्रिय करू शकत नाही. काही हल्ले यशस्वी होतात आणि मोठं नुकसान करतात.
त्यामुळे युद्धाची रणनीतीही आता बदलावी लागते आहे, असं अलीकडच्या काळात दिसून आलं आहे.
युक्रेनने रशियाच्या परमाणु शस्त्र वाहून नेणाऱ्या युद्धक विमानांना ड्रोनद्वारे लक्ष्य केले होते.
त्यांनी परदेशातून आणलेले छोटे ड्रोन नेहमीच्या मालवाहू ट्रकमध्ये भरून रशियाच्या सीमेत हजारो किलोमीटर आत स्मगल केले होते. या ड्रोन्सनी मग बॉम्बवर्षाव करणाऱ्या विमानांजवळ जात स्फोट घडवून आणले.

फोटो स्रोत, SBU
स्टेसी सांगतात, "युक्रेनच्या अशा स्पायडर वेब ड्रोन हल्ल्यांमुळे आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्यांमुळे लोक चकित झाले. कारण छोटे ड्रोनही किती मोठं नुकसान करू शकतात, हे दिसून आलं.
"सध्या कोणताही देश अशा प्रकारच्या हल्ल्यांचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम नाही. स्वायत्त ड्रोन, म्हणजेच कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे ड्रोन, थांबवणे किंवा जाम करणे आता कठीण झाले आहे."
कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे ड्रोन हल्ल्याचा निर्णय स्वतः घेऊ शकतात, पण त्यामुळे अनेक नैतिक प्रश्न निर्माण होत आहेत.
युद्धाचं बदलतं स्वरूप
डॉ. एल्के श्वार्त्झ या लंडनमधील क्वीन मेरी युनिव्हर्सिटीमध्ये राजकीय सिद्धांत विषयाच्या प्राध्यापक आहेत.
त्या सांगतात की, सुरक्षित ठिकाणाहून ड्रोनचं संचालन केल्यामुळे ड्रोन ऑपरेटर्स आणि हल्ल्याच्या ठिकाणांमधलं अंतर वाढत चाललं आहे.
"इराक आणि अफगाणिस्तान युद्धापासून ड्रोनच्या वापरानं रणनीती आणि प्राधान्यक्रम बदलून टाकले आहेत. आता शत्रूंना बंदी बनवण्याऐवजी ड्रोन हल्ल्यात ठार मारण्याच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडू लागल्या आहेत."

फोटो स्रोत, Getty Images
युद्धात ड्रोनच्या वापरासोबत आता एक नैतिक पैलूही जोडला गेला आहे. डॉ. एल्के श्वार्त्झ याला 'अल्गोरिदमिक इन्फ्रास्ट्रक्चर' म्हणतात.
म्हणजे ड्रोन एखाद्या भागात संशयितांविरोधात माहिती गोळा करतो आणि त्याचे विश्लेषण करून कारवाईचा निर्णय घेऊ शकतो.
"सध्या दूरवरून ड्रोन रिमोट पद्धतीने चालवले जातात. तिथे विश्लेषणासाठी एक अल्गोरिदमिक आराखडा वापरला जातो. त्याच्या आधारे कोण शत्रू आहे आणि कोणती कृती योग्य किंवा अयोग्य आहे, हे ठरवलं जातं.
"थोडक्यात ड्रोनने जमा केलेल्या माहितीच्या आधारे हल्ल्याचा निर्णय घेतला जातो. असं अल्गोरिदमिक विश्लेषण आणि रिमोट हल्ल्याच्या क्षमतेमुळे युद्धाचे स्वरूप बदलत आहे."
डॉ. एल्के श्वार्त्झ यांच्या मते, ड्रोनच्या वापरामुळे युद्धे आता अधिक काळ चालू राहतात आणि मोठ्या प्रदेशात पसरतात.
क्षेपणास्त्र आणि विमानांचा वापर अत्यंत खर्चिक असतो. त्यामुळे दीर्घकाळ त्यांचा वापर करण्याचा आर्थिक भार देशांना पेलवत नसे. यामुळेच युद्ध लवकर थांबवण्याचे प्रयत्नही व्हायचे.
मात्र, स्वस्त ड्रोन्समुळे ही परिस्थिती बदलली आहे. दूरवरून होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांमध्ये सामान्य नागरिकांच्या मृत्यूची शक्यता मात्र वाढली आहे.
डॉ. एक्ले श्वार्त्झ सांगतात की, पाहता पाहता ड्रोन हे युद्ध क्षेत्रातील एक नवीन शस्त्र बनलं खरं, पण आता युद्धं ज्या पद्धतीनं लढली जात आहेत, ती गोष्ट चिंतेची आहे.
"आता कोणत्याही प्रकारे शत्रूला लक्ष्य करणे हे युद्धाचे उद्दिष्ट हे बनले आहे. कारण त्यामुळे अधिक नुकसान होतं आणि लोकांना मानसिक धक्का बसतो. अशा प्रकारच्या युद्धात असे बरेच काही घडते जे घडू नये."

फोटो स्रोत, Getty Images
अफगाणिस्तान आणि इराकमधली युद्धं आणि नंतर रशिया-युक्रेन युद्धात ड्रोनच्या वापराने रणनीतीच्या पद्धती बदलल्या आहेत.
आता अनेकदा थेट लोकांच्या हत्या करण्यासाठीही ड्रोन्सचा वापर केला जातो आहे.
इतर शस्त्रांच्या तुलनेत ड्रोन स्वस्त असतात आणि त्यामुळे अनेक देश त्यांचा वापर करून दीर्घकाळ युद्ध लढू शकतात.
एक महत्त्वाची बाब म्हणजे ड्रोनमध्ये बसवलेलं अत्याधुनिक तंत्रज्ञान आता माहिती गोळा करून त्यानुसार स्वतः निर्णय घेण्यास सक्षम बनत आहे.
म्हणजेच ड्रोन्समध्ये एक प्रकारची स्वायत्तता विकसित केली जात आहे.
या तंत्रज्ञानाचा प्रवास थांबवणे अशक्य झाले आहे आणि ड्रोनने युद्ध लढण्याची पद्धतच बदलून टाकली आहे.
म्हणूनच आता युद्धात कोणत्या प्रकारचे नियम लागू करावे लागतील, हे आपल्याला ठरवावे लागेल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











