युक्रेनच्या 'ऑपरेशन स्पायडर वेब'मधून भारत आणि इतर देश कोणते धडे घेऊ शकतात?

फोटो स्रोत, SBU
- Author, प्रेरणा
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
1 जून रोजी, युक्रेनने त्यांच्या 100 हून अधिक ड्रोनद्वारे रशियाच्या हवाई दलाच्या तळांवर हल्ला चढवला, ज्यामध्ये अण्वस्त्रे वाहून नेण्यास सक्षम असलेल्या बॉम्बर्सला (लांब पल्ल्याचे हल्ले करण्यास सक्षम विमाने) लक्ष्य केलं गेलं.
युक्रेनच्या लष्करी गुप्तचर संस्थेने माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार, लाकडी केबिनमध्ये लपवलेल्या ट्रकद्वारे ड्रोन रशियाला नेण्यात आले. हे केबिन रिमोटद्वारे चालणाऱ्या छताखाली लपवण्यात आले होते.
हे ट्रक विमानतळांवर नेण्यात आले, ट्रक चालकांना कदाचित ट्रकमध्ये ठेवलेल्या सामानाबाबत काहीही माहिती नव्हते. तिथे पोहोचल्यानंतर लक्ष्यांच्या दिशेने ड्रोन सोडण्यात आले.
या कारवाईचे निरीक्षण करणारे युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमिर झेलेन्स्की यांनी रविवारी (1 जून) रात्री सोशल मीडियावर सांगितलं की, या धाडसी हल्ल्यात एकूण 117 ड्रोन वापरण्यात आले. या हल्ल्याची तयारी करण्यासाठी 'एक वर्ष, सहा महिने आणि नऊ दिवस' लागले.
खरं तर, अलिकडच्या काळात युद्धात ड्रोनच्या वापरावर चर्चा होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी, भारत आणि पाकिस्तानमधील संघर्षादरम्यान, 'ड्रोन युद्धा'बाबत बरीच चर्चा झाली होती.
भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान, अनेक विश्लेषकांनी असा दावा केला होता की, ही संघर्षाच्या एका नवीन युगाची सुरुवात आहे, ज्याला 'ड्रोन युग' म्हणता येईल. या युगात, मानवरहित शस्त्रे म्हणजेच ड्रोन युद्धभूमीची स्थिती आणि दिशा ठरवतील.

फोटो स्रोत, Getty Images
मात्र, रशियाचे हल्ले वाढल्यानंतर युक्रेनने 1 जून रोजी रशियाविरुद्ध 'ऑपरेशन स्पायडर वेब' सुरू केलं. हा युक्रेनचा रशियावरील आतापर्यंतचा सर्वात घातक हल्ला असल्याचं म्हटलं जात आहे.
युक्रेन गेल्या 18 महिन्यांपासून या ऑपरेशनची तयारी करत असल्याचा दावा केला जातो आहे.
एसबीयूकडूनच लीक झालेल्या माहितीवरून असं दिसून येत की, अनेक लहान आकाराचे ड्रोन्स गुप्तपणे रशियाला नेण्यात आले होते. त्यानंतर त्यांना हजारो मैल दूर असलेल्या चार वेगवेगळ्या ठिकाणी नेण्यात आलं आणि त्या ठिकाणच्या लष्करी विमानतळांवर हे ड्रोन सोडण्यात आले.
भविष्यातील युद्धांची ही रंगीत तालीम आहे का?
या हल्ल्यात झालेल्या नुकसानीबाबत दोन्ही बाजूंचे आपापले दावे आहेत. युक्रेनने म्हटले आहे की, त्यांनी या ड्रोन हल्ल्यात 40 हून अधिक रशियन बॉम्बर्सला लक्ष्य केलं आहे.
रशियन संरक्षण मंत्रालयाने पुष्टी केली आहे की, हे हल्ले देशाच्या पाच प्रदेशांमध्ये झाले आहेत. यामध्ये दोन ठिकाणी विमानांचे नुकसान झाले आहे. इतर ठिकाणी केलेले सर्व हल्ले हाणून पाडण्यात आले आहेत.

बीबीसी स्वतंत्रपणे या दाव्यांची पुष्टी करत नाही. मात्र सर्व संरक्षण विश्लेषक हे मान्य करत आहेत की, युक्रेनने केलेला हा हल्ला अभूतपूर्व आहे.
विशेषतः ज्या पद्धतीने ड्रोन रशियामध्ये नेण्यात आले आणि नंतर उपग्रह किंवा इंटरनेट लिंकद्वारे दूरस्थपणे चालवले गेले ते असाधारण होतं.
आंतरराष्ट्रीय आणि सामरिक बाबींमधील तज्ज्ञ डॉ. स्वस्ति राव म्हणतात, "भारत आणि इतर देश जे स्वतःची ड्रोन प्रणाली विकसित करत आहेत ते या ऑपरेशनमधून बरेच काही शिकू शकतात. ऑपरेशन 'स्पायडर वेब' भविष्यात लढलेल्या युद्धांचे स्वरूप कसे असेल हे दाखवतं."
उदाहरणार्थ, तंत्रज्ञान आणि नवीन उपक्रमांच्या मदतीने लहान देश मोठ्या आणि शक्तिशाली देशांना कसे जोरदारपणे तोंड देऊ शकतात.
'भारताला ड्रोन्सच्या वापराबाबत आणखी सक्षम व्हावं लागेल'
बीबीसीशी बोलताना स्वस्ति राव म्हणाल्या, "जर भारताला संरक्षण क्षेत्रात होत असलेल्या नवीन तांत्रिक नवकल्पनांशी बरोबरी साधायची असेल, तर आपण वर्षानुवर्षे लष्करी प्रकल्पांमध्ये होणाऱ्या विलंबाकडे दुर्लक्ष करू शकत नाही."
काही दिवसांपूर्वीच भारतीय हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी संरक्षण खरेदी प्रकल्पांमध्ये होणाऱ्या विलंबाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली होती.
त्यांनी सांगितले होते की, त्यांच्या माहितीनुसार आतापर्यंत एकही प्रकल्प वेळेवर पूर्ण झालेला नाही.
या गोष्टी अधोरेखित करताना स्वस्ति राव म्हणतात की, भारताचे ड्रोन मिशन पूर्वीपेक्षा निश्चितच सुधारले आहे, परंतु जगात स्थापित केलेल्या उच्च मानकांच्या बाबतीत, आपण स्पर्धेत नाही आहोत.
त्या म्हणाल्या, "पाकिस्तानशी झालेल्या अलिकडच्या संघर्षात, आम्ही चीन आणि तुर्कीचे ड्रोन यशस्वीरित्या नष्ट केले, परंतु ते मूलभूत पातळीचे ड्रोन होते. अशा परिस्थितीत, जर आपण असे गृहीत धरले की जगात विकसित होत असलेल्या तंत्रज्ञानाच्या बाबतीत, जर त्या उच्च तंत्रज्ञानाच्या ड्रोनने आपल्यावर हल्ला केला तर मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे."
स्वस्ति राव म्हणतात, "युक्रेनच्या या कारवाईची इतकी चर्चा होत आहे कारण युक्रेनकडे योग्य हवाई दल किंवा सैन्य नाही. ते युद्धात आहेत आणि युद्धात असताना त्यांनी अशी ड्रोन प्रणाली विकसित केली आहे ज्यामुळे त्यांच्या सीमेवर जगातला दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मजबूत लष्करी देश आहे आणि त्यांनी त्या देशाचं नुकसान केलं आहे."

फोटो स्रोत, ASISGUARD.COM
'स्पायडर वेब ऑपरेशन'मधून भारताला मिळालेले धडे
सेंटर फॉर स्ट्रॅटेजिक अँड इंटरनॅशनल स्टडीज ही एक प्रसिद्ध थिंक टँक आहे जी सुरक्षा आणि परराष्ट्र धोरणाशी संबंधित विषयांवर संशोधन करते.
येथील वाधवानी सेंटर फॉर एआय अँड अॅडव्हान्स्ड टेक्नॉलॉजी येथील फेलो कॅटरिना बोंडार यांनी त्यांच्या लेखात युक्रेनच्या 'स्पायडर वेब' ऑपरेशनमधून शिकता येणारे धोरणात्मक धडे यावर भाष्य केलं.
बोंडार लिहितात, "या ऑपरेशनने हे सिद्ध केले आहे की, कमी किमतीच्या, ओपन सोर्स ड्रोन सिस्टीममध्ये अब्जावधी खर्चून बनवलेल्या संरक्षण उपकरणांना देखील प्रभावीपणे नष्ट करण्याची क्षमता आहे."
बोंडार लिहितात, "युक्रेनने त्यांचे लक्ष्य साध्य करण्यासाठी एआय सिस्टीमचा वापर केला, ज्यामुळे त्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष करून ड्रोनने अचूक हल्ले करण्यास मदत झाली. त्याच वेळी, युक्रेनने हे सुनिश्चित केले की, रशिया हल्ल्यात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांचा अभ्यास करू शकत नाही, जसे की ड्रोन किंवा लाँच सिस्टीम."
'भारताने सुसज्ज व्हावे'
संरक्षण तज्ज्ञ राहुल बेदी यांच्या मते, हल्ल्यासाठी युक्रेननं वापरलेल्या ड्रोनला क्वाड कॉप्टर्स म्हणतात. ते दिसायला हेलिकॉप्टरसारखे असतात.
युक्रेननं हे ड्रोन फक्त 200 ते 400 डॉलर्समध्ये तयार केले. म्हणजे कमी खर्चात शत्रूवर प्रभावी हल्ला करता येतो, हे यावरून स्पष्ट दिसतं.

फोटो स्रोत, NASIR KACHROO/NURPHOTO VIA GETTY IMAGES
बीबीसीशी बोलताना ते म्हणाले, "आजच्या काळात शत्रूची हानी करण्यासाठी त्यांच्या सीमेत घुसण्याची किंवा थेट शत्रूशी भिडण्याची गरज नाही. तीन-चार हजार किलोमीटर अंतरावरूनही तुम्ही अचूक हल्ले करू शकता. युक्रेनने या ऑपरेशनद्वारे ते सिद्ध केलं आहे."
भारत या कारवाईतून काय शिकू शकतो? या प्रश्नावर ते म्हणाले की, भारताचीही ड्रोनची क्षमता चांगली आहे.
"आम्ही विविध प्रकारचे ड्रोन वापरू आणि तैनात करू शकतो, हे आपणही ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून सिद्ध केलं आहे. पण युक्रेननं या ऑपरेशनद्वारे लहान-मोठ्या देशांमधील लष्करी शक्तीच्या तफावतीची रेषाही पुसट केली आहे. त्यामुळं या ऑपरेशनमधून भारतानं एकच धडा घ्यावा. तो म्हणजे, वेगाने बदलणाऱ्या युद्धांच्या स्वरुपासाठी स्वतःला सज्ज ठेवणं," असं राहुल बेदी म्हणाले.
पाश्चात्य माध्यमांची अतिशयोक्ती?

दरम्यान, या हल्ल्याबाबत आणि ऑपरेशनबाबत युक्रेन आणि पाश्चात्य माध्यमं अतिशयोक्ती करत असल्याचं मत, संरक्षण तज्ज्ञ आणि सेंटर फॉर एअर पॉवर स्टडीजमधील वरिष्ठ फेलो दिनेश पांडे यांनी व्यक्त केलं.
"ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतानं पाकिस्तानातील ज्या 9 दहशतवादी तळांवर हल्ला केल्याचं म्हटलं होतं, त्यांचे फोटो आणि सॅटेलाइट इमेजेस सादर केले होते. पण युक्रेननं ज्या 40 विमानांची हानी केल्याचा दावा केला जात आहे, त्याचे फोटो का सादर करण्यात आले नाही," असं ते बीबीसीशी बोलताना म्हणाले.

फोटो स्रोत, Getty Images
तसंच त्यांनी FPV (फर्स्ट पर्सन व्ह्यू) ड्रोनद्वारे युक्रेननं केलेले हल्ले प्रभावी मानलेच, पण ती रशियाच्या सुरक्षेतील मोठी चूक असल्याचंही म्हटलं. युक्रेननं हे ड्रोन फायबर ऑप्टिक्स केबल्सद्वारे लाँच केले होते. त्यामुळं ते ड्रोन्स लक्ष्यांच्या अगदी जवळ होते.
हल्ला करताना शस्त्र लक्ष्याच्या खूप जवळ असल्यास शत्रूला प्रतिक्रिया द्यायला फार कमी वेळ असतो. या परिस्थितीत तुम्हालाही वेगानं प्रतिसाद देणारी यंत्रणा तयार करावी लागेल, असं मतही त्यांनी मांडलं.
भारताकडेही पाच एफपीव्ही ड्रोन
भारतही भविष्यातील संघर्षाचा विचार करून एफपीव्ही (फर्स्ट पर्सन व्ह्यू ड्रोन), काऊंटर ड्रोन आणि हवाई संरक्षण क्षेत्रांतील नवीन तंत्रज्ञानासह तयारी करत असल्याचं, दारुगोळा आणि स्फोटक तज्ज्ञ निवृत्त कर्नल देवेश सिंग इंडिया टुडेशी बोलताना म्हणाले.
भारतानं याच वर्षी मार्च महिन्यात लष्करी ताफ्यात 5 एफपीव्ही ड्रोनचा समावेश केला आहे. आगामी काळात हा आकडा 100 वर नेला जाईल.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











