फायबर ऑप्टिक ड्रोन : रशिया युक्रेन युद्धाचा चेहरा बदलू पाहणारे अधिक धोकादायक शस्त्र

फोटो स्रोत, Getty Images
- Author, योगिता लिमये
- Role, बीबीसी न्यूज
रॉडिन्स्के शहरात एक तीव्र दुर्गंधी पसरलेली आहे. शहरात प्रवेश केल्यानंतर काही मिनिटांतच आम्हाला तो दुर्गंध कुठून येत आहे, हे समजलं.
शहराच्या मुख्य प्रशासकीय इमारतीवर 250 किलोचा ग्लाइड बॉम्ब पडला होता. यामुळं त्या परिसरातील तीन रहिवासी इमारती उद्धवस्त झाल्या.
स्फोट झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आम्ही त्या ठिकाणी भेट दिली, पण अजूनही काही भागातून तिथे धूर येत होता.
शहराच्या सीमांवरून आम्हाला तोफगोळ्यांचा आवाज आणि गोळीबार ऐकू येत होता. युक्रेनचे सैनिक रशियाचे ड्रोन पाडत होते.
रॉडिन्स्के हे युद्धग्रस्त पोकरोवस्क शहराच्या सुमारे 15 किमी (9 मैल) उत्तर दिशेला आहे.
गेल्या वर्षीपासून रशिया दक्षिणेकडून हे शहर ताब्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे, पण आतापर्यंत युक्रेनियन सैन्यानं रशियन सैनिकांना आत घुसण्यापासून रोखलं आहे.
थोडक्यात बचावली बीबीसीची टीम
रशियानं आता रणनिती बदलली आहे. त्यांनी शहराला वेढा घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, जेणेकरून तिथला पुरवठा मार्ग त्यांना बंद करता येईल.
युक्रेनबरोबर शस्त्रसंधी घडवून आणण्यासाठीचे राजनैतिक प्रयत्न अपयशी ठरल्यानंतर, रशियानं हल्ला तीव्र केला आहे.
जानेवारीपासूनची रशियाची ही सर्वात मोठी चढाई मानली जात आहे. रॉडिन्स्केमध्ये आम्हाला याचे पुरावेही सापडले.
शहरात पोहोचताच काही मिनिटांतच आम्हाला डोक्यावर रशियन ड्रोनचा आवाज ऐकू आला. त्यावेळी आमच्या टीमनं धावत जाऊन लगेच एका झाडाचा आडोसा घेतला.

आम्ही त्या ड्रोनच्या नजरेस येणार नाही अशा पद्धतीने लपून बसलो. त्यानंतर एका मोठा स्फोटाचा आवाज आला. दुसरा ड्रोन जवळच्या ठिकाणी पडल्याचं लक्षात आलं.
आमच्यावर असलेला ड्रोन अजूनही तिथंच घिरट्या घालत होता. काही मिनिटानंतर, आम्हाला पुन्हा तो भीतीदायक आवाज ऐकू येऊ लागला. हेच ड्रोन या युद्धातील सर्वात घातक शस्त्र बनले आहे.
आम्हाला तो आवाज ऐकू येणं बंद झाला, तेव्हा आम्ही धोका पत्करत झाडापासून 100 फुटांवर असलेल्या एका पडक्या इमारतीकडे धावलो.
तिथं असताना आम्हाला पुन्हा ड्रोनचा आवाज ऐकू आला. कदाचित आमच्या हालचाली पाहून ते ड्रोन परत आलं असावं.
हल्ले पोकरोवस्कच्या दक्षिणेकडील रशियन ठिकाणांहून खूप जवळ आहेत. हे ड्रोन बहुधा पोकरोव्स्कच्या पूर्वेकडून कोस्त्यान्टिनीवकापर्यंत जाणाऱ्या महत्त्वाच्या मार्गावरून नव्याने जिंकलेल्या भागातून येत असावेत, असं रॉडिन्स्केवरील रशियन ड्रोन हल्ल्यातून स्पष्ट होतं.
अर्धा तास वाट पाहिल्यानंतर, ड्रोनचा आवाज येत नसल्याचे पाहून आम्ही झाडाच्या खाली उभ्या केलेल्या आमच्या कारकडे धावलो. त्यानंतर आम्ही लगेचच रॉडिन्स्केमधून तातडीने बाहेर पडलो.
त्यावेळी महामार्गाच्या बाजूला आम्ही धुराचे लोट आणि काहीतरी जळताना पाहिलं, बहुदा तिथे एक ड्रोन पाडले असण्याची शक्यता होती.
याठिकाणी दिवसेंदिवस परिस्थिती कठीण होत चालली आहे.

फोटो स्रोत, Reuters
आम्ही बिलीट्सकेकडे जात होतो. हे शहर फ्रंटलाइनपासून आणखी दूर आहे. एका रात्री क्षेपणास्त्र हल्ल्यामुळं तिथली अनेक घरं उद्ध्वस्त झाल्याचे आम्ही पाहिलं. त्यातील एक घर स्वेतलाना यांचे होते.
"इथली परिस्थिती दिवसेंदिवस वाईट होत चालली आहे. पूर्वी, आम्हाला फक्त दूरवरच्या स्फोटांचे आवाज ऐकू येत असत. पण, आता आमच्या शहराला लक्ष्य केलं जात आहे. आता आम्ही स्वतः हे अनुभवत आहोत," असं 61 वर्षीय स्वेतलाना म्हणाल्या.
घराच्या ढिगाऱ्यातून त्या काही तरी सामान उचलत होत्या. सुदैवाने हल्ला झाला, त्यावेळी त्या घरी नव्हत्या.
"शहराच्या मध्यवर्ती भागात जा, तुम्हाला तिथं खूप काही उद्धवस्त झालेलं दिसेल. बेकरी आणि प्राणीसंग्रहालयही नष्ट झाले आहेत," असं त्या म्हणाल्या.
ड्रोनच्या आवाक्याबाहेर असलेल्या एका सेफहाऊसमध्ये, आम्ही 5th असॉल्ट ब्रिगेडच्या तोफखाना युनिटच्या सैनिकांना भेटलो.
"रशियाच्या हल्ल्यांची तीव्रता वाढत असल्याचं तुम्ही अनुभवू शकता. शहराच्या पुरवठा मार्गात अडथळा आणण्यासाठी रॉकेट्स, मोर्टार, ड्रोनसह ते सर्व काही वापरत आहेत," असं त्यांनी सांगितलं.
त्यांचे युनिट पोझिशनवर तैनात होण्यासाठी तीन दिवसांपासून वाट पाहत आहेत. त्यांना ड्रोनपासून संरक्षण मिळवण्यासाठी ढगांचे आच्छादन किंवा वेगवान वाऱ्याची गरज आहे.
फायबर ऑप्टिक ड्रोनमुळे संघर्ष आणखी तीव्र
सततच्या संघर्षात, सैनिकांना नवीन तंत्रज्ञानामुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांना लवकर प्रतिसाद देणं आवश्यक आहे. सध्याचा असाच नवीन धोका म्हणजे फायबर ऑप्टिक ड्रोन.
ड्रोनच्या तळाशी दहा किलोमीटरच्या केबलचा स्पूल बसवला जातो आणि त्या फिजिकल फायबर ऑप्टिक कॉर्डला पायलटच्या हातातील कंट्रोलरशी जोडलं जातं.
"व्हीडिओ आणि कंट्रोल सिग्नल रेडिओ फ्रिक्वेन्सीच्या माध्यमातून नाही तर केबलद्वारे ड्रोनकडे पाठवले जातात. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक इंटरसेप्टर्सने त्याला जॅम करता येत नाही," असं 68व्या जेगर ब्रिगेडमधील ड्रोन अभियंता आणि कॉल साइन 'मॉडरेटर' असलेल्या एका सैनिकानं सांगितलं.

या युद्धात ड्रोनचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू झाल्यानंतर, दोन्ही सैन्यांनी त्यांच्या वाहनांवर इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली (वॉरफेअर) बसवल्या होत्या. त्या ड्रोन निष्क्रिय करू शकत होत्या.
मात्र, फायबर ऑप्टिक ड्रोनच्या आगमनाने ती सुरक्षा संपुष्टात आली आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये सध्या रशियाचा वरचष्मा आहे. युक्रेन याचं उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.
"रशियाने फायबर ऑप्टिक ड्रोनचा वापर आमच्यापेक्षा खूप आधी सुरू केला होता. जेव्हा आम्ही त्याची चाचणी घेत होतो, तेव्हा त्यांचा वापर सुरू झाला होता.
जिथे नेहमीच्या ड्रोनपेक्षा कमी उंचीवर जायचं असतं, अशा ठिकाणी हे ड्रोन वापरता येतात. एखाद्या घरात शिरता येतं आणि आतमधील लक्ष्यही शोधता येतं," असं 68 व्या जेगर ब्रिगेडमधील ड्रोन पायलट व्हेनिया म्हणतात.
"कदाचित दोर (फायबर ऑप्टिक केबल) कापण्यासाठी कात्री घेऊन जावी लागेल, असं आम्ही आता विनोदानं म्हणतो," असंही तोफखान्यातील अधिकारी सेर्ही म्हणाले.
फायबर ऑप्टिक ड्रोनमध्ये काही मर्यादा आणि उणिवाही आहेत. त्यांचा वेग कमी आहे आणि केबल झाडांमध्ये अडकू शकते.
परंतु, सध्या रशिया मोठ्या प्रमाणावर या ड्रोनचा वापर करत असल्याने, सैनिकांना त्यांच्या पोझिशन्सवर ने-आण करणं कधी कधी प्रत्यक्ष युद्धक्षेत्रापेक्षाही अधिक धोकादायक ठरत आहे.
युक्रेनच्या सैनिकांना जागाही बदलता येईना
"तुम्ही एखाद्या ठिकाणी (पोझिशन) प्रवेश करता, तेव्हा तुम्ही शत्रूच्या नजरेत आलात की नाही, हे तुम्हाला माहीत नसतं.
जर त्या ड्रोनच्या नजरेत आला असाल, तर कदाचित तुम्ही तुमच्या आयुष्यातील शेवटचे काही तास जगत असाल," असं पाचव्या ॲसॉल्ट ब्रिगेडच्या पथकाचे चीफ सार्जंट ओलेस म्हणाले.
या धोक्याचा अर्थ असा आहे की, सैनिकांना त्यांच्या पोझिशन्सवर जास्त वेळ राहावं लागत आहे.
ओलेस आणि त्याचे सहकारी हे इन्फन्ट्री (पायदळ) विभागात आहेत. ते युक्रेनच्या संरक्षणासाठीच्या अगदी पुढच्या खंदकात सेवा देत आहेत.
सध्याच्या काळात पत्रकारांना इन्फन्ट्री सैनिकांशी बोलणं दुर्मिळ झालं आहे, कारण खंदकामध्ये जाणं खूप धोकादायक बनलं आहे.
आम्ही ओलेस आणि मॅक्सिमला ग्रामीण भागातील एका घरात भेटलो. हे घर सध्या तात्पुरत्या तळामध्ये बदण्यात आलं आहे. इथे सैनिक तैनातीवर नसताना विश्रांतीसाठी येतात.

"मी एका पोझिशनवर सलग 31 दिवस घालवले होते. पण मला असेही लोक माहीत आहेत, जे तिथे 90 ते 120 दिवस होते. ड्रोन्स येण्यापूर्वी तैनातीची फेरबदल 3 ते 7 दिवसांमध्ये होत असे," असं मॅक्झिम सांगतात.
"युद्ध म्हणजे रक्त, मृत्यू, चिखल आणि डोक्यापासून पायांपर्यंत पसरलेली थंडी. दररोज तुम्हाला अशा पद्धतीनेच जगावं लागतं. मला एक प्रसंग आठवतो, जेव्हा आम्ही तीन दिवस झोपलो नव्हतो, प्रत्येक मिनिटाला सतर्क होतो.
रशियन सैन्य आमच्यावर एकापाठोपाठ एक हल्ले करत होते. अगदी एक छोटाशी चूकही आमच्या मृत्यूस कारणीभूत ठरली असती."
ओलेस म्हणतात, रशियाच्या इन्फन्ट्री दलानं आपली रणनिती बदलली आहे. "पूर्वी ते गटात हल्ला करत होते. आता ते फक्त एक किंवा दोन लोकं पाठवतात. ते मोटरसायकलींचाही वापर करतात आणि काही प्रसंगी क्वाड बाइकचा वापर करतात."
याचा अर्थ म्हणजे काही भागात पारंपरिक रेषा नाही. जिथे युक्रेनचे सैनिक एका बाजूला आणि रशियन सैनिक दुसऱ्या बाजूला असतात.
त्याऐवजी, हे एका चेस (बुद्धिबळ)बोर्डावरच्या पद्धतीसारखं झालं आहे, जिथे पोझिशन्स एकमेकांमध्ये गुंतलेल्या असतात.
यामुळे दोन्ही बाजूंनी केलेली प्रगती पाहणंही कठीण होतं.
युक्रेनची गोची अन् रशियाची आघाडी
रशियाच्या अलीकडील प्रगतीनंतरही, पोकरोवस्क असलेल्या संपूर्ण डोनेत्स्क प्रदेशावर नियंत्रण मिळवणं जलद आणि सोपं होणार नाही.
यूक्रेनने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. परंतु, संघर्ष कायम राखण्यासाठी त्यांना शस्त्रास्त्र आणि दारुगोळ्यांचा सातत्याने पुरवठा आवश्यक आहे.
युद्ध चौथ्या उन्हाळ्यात म्हणजेच चौथ्या वर्षात प्रवेश करत असताना, रशियन सैन्याविरोधात लढण्यासाठी युक्रेनला मनुष्यबळाची अडचणही भासत आहे.
आम्हाला भेटलेल्या बहुतेक सैनिकांनी युद्ध सुरू झाल्यानंतर सैन्यात प्रवेश केला होता. त्यांना काही महिन्यांचे प्रशिक्षण मिळालं आहे, पण चिघळलेल्या युद्धाच्या दरम्यान त्यांना अनेक गोष्टी शिकाव्या लागल्या.

फोटो स्रोत, Getty Images
लष्करात दाखल होण्यापूर्वी मॅक्सिम एका ड्रिंक्स कंपनीत काम करत होता. मी विचारलं की, त्याचे कुटुंब त्याच्या नोकरीसोबत कसं जुळवून घेतं.
"हे खूप कठीण आहे, खूपच कठीण. माझ्या कुटुंबाचा मला पाठिंबा आहे. पण मला दोन वर्षांचा मुलगा आहे, आणि मला त्याला फार कमी पाहता येतं.
मी त्याला व्हीडिओ कॉल करतो. त्यामुळे परिस्थितीप्रमाणे सर्व काही ठीक आहे," हे सांगताना तो काही क्षण थांबला. त्यावेळी त्याला अश्रू अनावर झाले होते.
मॅक्सिम एक सैनिक आहे, जो देशासाठी लढत आहे. पण तो एक बाप देखील आहे. ज्याला आपल्या दोन वर्षांच्या मुलाची खूप आठवण येते.
(अतिरिक्त वार्तांकन - इमोजेन अँडरसन, संजय गांगुली, वोलोदिमीर लोझको आणि अनास्तासिया लेव्हचेन्को )
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











