भारत आणि पाकिस्तानकडे कोणत्या प्रकारचे आणि किती ड्रोन आहेत?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, सय्यद मोझीझ इमाम
- Role, बीबीसी प्रतिनिधी
भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ला करण्यासाठी ड्रोनचा मोठ्या प्रमाणात वापर होतोय.
भारतीय लष्कराने शुक्रवारी, 9 मेला जाहीर केलेल्या एका निवेदनात पाकिस्तानने 8 आणि 9 मेच्या रात्री भारतात अनेक ठिकाणी ड्रोनवरून हल्ले केल्याचं म्हटलंय.
भारतीय लष्कराच्या प्रवक्त्या कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, "पाकिस्तानने जवळपास 300 ते 400 ड्रोन पाठवले होते."
तेच पाकिस्ताननेही म्हटलं आहे. भारताचे 25 ड्रोन्स पाडल्याचं त्यांनी जाहीर केलं. त्यावर भारताने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.
संरक्षण तज्ज्ञ ब्रिगेडियर शार्देन्दू म्हणतात, "ही नवी शैली आणि तंत्रज्ञान आहे. ते मानवविरहित आहे. त्यात लढाऊ विमानांप्रमाणे मानव नसतो. हल्ला करणाऱ्याचा जीव जात नाही."
ड्रोनची महत्त्वाची भूमिका
भारत-पाकिस्तान यांच्यातला तणाव 22 एप्रिलला पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर ऐरणीवर आला आहे.
या हल्ल्यांत पर्यटकांसमावेत 26 लोकांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याला प्रत्यूत्तर म्हणून भारताने 7 मेच्या पहाटे पाकिस्तानातील 9 ठिकाणांवर हल्ले केले.
आता या संघर्षात ड्रोनचा शिरकाव झाला आहे. ड्रोनला औपचारिकरीत्या मानवरहित हवाई वाहन (Unmanned aerial vehicle) म्हणून ओळखलं जातं.

फोटो स्रोत, Getty Images
एकप्रकारे ड्रोन हा उडणारा रोबोटच असतो. त्यावर सॉफ्टवेअर प्रणाली वापरून नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं. ड्रोनच्या सॉफ्टवेअरमध्ये उडणं, त्यासाठीचा रस्ता अशा गोष्टींचं प्रोग्रॅमिंग आधीपासून केलेलं असतं. त्यामुळे दूरवरूनही त्यावर नियंत्रण ठेवता येऊ शकतं.
ते स्वतंत्रपणेही उडवले जाऊ शकतात. ड्रोन ऑनबोर्ड सेन्सर आणि ग्लोबल पोझिशनिंग सिस्टिम (जीपीएस) सोबत काम करतात.
इम्पेरियल वॉर म्युझियमच्या वेबसाइटनुसार, त्याला पहिले रिमोटली पायलेटेड व्हेईकल (आरपीवी) म्हटलं जात होतं.
पहिल्या विश्व युद्धादरम्यान अमेरिका आणि इंग्लंडने याची निर्मिती केली होती. 1917-18 मध्ये त्याचं परिक्षण केलं गेलं. पूर्वी त्यावर रेडिओनं नियंत्रण ठेवलं जात होतं.
"सध्याच्या काळात बनवले जाणारे ड्रोन्स अतिशय अद्ययावत आहेत. दूरुनच ते लक्ष्य निश्चित करू शकतात आणि निशाणाही साधू शकतात. खाली पडले तरी लढाऊ विमानांच्या तुलनेत यात आर्थिक नुकसान कमी होते."
9/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने अफगणिस्तानमध्ये ड्रोन्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला. अलीकडे झालेल्या रशिया-युक्रेन युद्धातही याचा वापर केला जात होता.

फोटो स्रोत, Getty Images
रॉयटर्सच्या 9 मे 2025 च्या अहवालानुसार जेरान-2 आत्मघातकी ड्रोन आहे. त्याचा वापर रशियाने युक्रेनमधली ऊर्जा क्षेत्रातली बांधकामं उद्ध्वस्त करण्यासाठी केला.
रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, रशियाने चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि इतर दोन डझन विदेशी नेत्यांसमोर रशियाने निर्माण केलेल्या ड्रोनचं मॉस्कोच्या रेड स्क्वॉयरवर प्रदर्शन केलं होतं.
भारत आणि पाकिस्तानमध्ये सुरू असलेल्या तणावाकडे पाहिलं तर हे स्पष्ट होतं की आधुनिक काळातल्या युद्धात ड्रोनची भूमिका महत्त्वाची होत चालली आहे.
गुरूवारी पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते लेफ्टनंट जनरल अहमद शरीफ चौधरी यांनी सांगितलं की त्यांचा देश "ड्रोन हल्ल्यात अडकला होता. कराची, लाहोरसारख्या मोठी लोकसंख्या असणाऱ्या शहरांवर ड्रोनच्या माध्यमातून निशाणा साधला गेला."
भारताने पहिल्या हल्ल्यावेळी हे स्पष्ट केलं होतं की पाकिस्तानातील कोणत्याही लष्करी तळांना लक्ष्य केलं नाही.
मात्र, परिस्थिती बदलल्यानंतर गुरूवारी, 8 मेला सोफिया कुरेशी म्हणाल्या, "भारताने यशस्वीपणे लाहोरमधील हवाई संरक्षण प्रणाली नष्ट केली आहे."
या हल्ल्यात ड्रोनचा वापर केला गेला की क्षेपणास्त्राचा हे कुरेशी यांनी स्पष्ट केलेलं नाही.
भारताजवळचे ड्रोन
भारताजवळ अनेक प्रकारचे ड्रोन आहेत. बालाकोट सर्जिकल स्ट्राइकनंतर इस्रायलसोबत अनेक ड्रोन करार करण्यात आले होते.
संरक्षण तज्ज्ञ ब्रिगेडियर शार्देन्दू सांगतात, "भारताकडे पाकिस्तानपेक्षा तिप्पट ड्रोन्स आहेत. त्यामुळे भारताची मारा करण्याची क्षमता जास्त आहे. त्यात हॅरोप, हिरोन मार्क-2 आणि स्काय स्ट्रायकर यासारख्या ड्रोन्सचा समावेश आहे."
भारताजवळच्या स्काय स्ट्रायकर ड्रोन्सची निर्मिती इस्रायलसोबत झालेल्या एका उपक्रमातंर्गत बंगळुरूमध्ये करण्यात आली होती.
नवी दिल्लीतील सेंटर फॉर एयर पॉवर स्टडीजमधले वरिष्ठ सहकारी, रिटायर्ड ग्रुप कॅप्टन डॉक्टर दिनेश कुमार पांडेय म्हणाले, ''भारताजवळ अनेक प्रकारचे ड्रोन्स आहेत. पण परिस्थितीचं गांभीर्य ओळखून कोणता ड्रोन वापरायचा, हे लष्करावर ठरतं. अमेरिका, इस्रायल आणि अन्य अनेक देश भारताकडून ड्रोन घेत आहेत.''
भारताने 2021मध्ये जवळपास 100 स्काय स्ट्रायकर ड्रोन्स घेतले होते. त्यांची रेंज जवळपास 100 किलोमीटर एवढी लांब आहे. शिवाय, हे ड्रोन्स 10 किलोपर्यंत वॉरहेड वाहून नेऊ शकतात.
यांचा आवाजही कमी होतो. त्यामुळे कमी उंचीवरूनही ते चांगलं काम करतात.

फोटो स्रोत, ANI
"हे शांत, न दिसणारे आणि अचानक हल्ला करणारे ड्रोन आहेत," ड्रोन्सची निर्मिती करणारी कंपनी सांगते.
तर हॅरोप ड्रोनची रेंज खूप जास्त आहेत. इस्रायलने निर्मिती केलेल्या या ड्रोनचं वैशिष्ट्य असं की हे 1000 किलोमीटर लांबपर्यंत जातात आणि हवेत जवळपास 9 तास उडू शकतात.
हल्ल्यात भारताने याच हॅरोप ड्रोनचा वापर केल्याचं पाकिस्तानने म्हटलंय.
अधिकृत माहितीनुसार, हॅरोपमध्ये एँटी रडार तंत्रज्ञान आहे. याचे कॅमेरे मोठी लष्करी मशिनरी ओळखतात. हा ड्रोन सर्जिकल स्ट्राइकही करू शकतो इतकी याची क्षमता आहे.
हे 23 किलोपर्यंतचे वॉरहेड किंवा बॉम्ब वाहून नेऊ शकतात. याचा वापर समुद्री युद्धातही केला जाऊ शकतो.
याशिवाय, भारताकडे 3000 किलोमीटरची रेंज असणारे हॅरोन मार्क - 2 हेही ड्रोन आहेत. ते 2023 मध्ये खरेदी केले होते. ते 24 तासापर्यंत हवेत राहू शकतात.
त्यात रडार आयआर कॅमेरा बसवला आहे. हे ड्रोन लेजर मार्किंगचा वापर करून लक्ष्याबद्दल अचूक माहिती पुरवतात. जमिनीवरून डेटालिंकच्या माध्यमातूनही या ड्रोनवर नियंत्रण ठेवलं जाऊ शकतं.
दिनेश कुमार पांडेय म्हणतात, ''कोणता ड्रोन किती पे-लोड घेऊन जाऊ शकतो हे त्याच्या इंजिन क्षमतेवर ठरतं. ड्रोनवरचा पे-लोड जितका वाढेल तितकी त्याची दूर जाण्याची क्षमता कमी होईल.''
पाकिस्तानजवळचे ड्रोन
भारताकडून शुक्रवारी (9 मेला) लष्करानं जाहीर केलं की जम्मू, पठाणकोट आणि उधमपूरच्या लष्करी तळांवर पाकिस्तानने गुरूवारी रात्री हल्ला केला. तो परतवून लावण्यात आला. तिकडे पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी हे आरोप फेटाळून लावले.
भारताने गुरूवारी 8 मेला सांगितलं की पाकिस्तानने तुर्कीनिर्मित ड्रोन्सच्या वापर केला आहे.
पाकिस्तानजवळ स्वार्म ड्रोन्सही आहेत. दिनेश कुमार पांडेय सांगतात, 'हे गटांनी जातात. त्यांना मारणं सोपं नाही. कारण यातले अनेक वाचतात.'
"हे ड्रोन्स छोट्या छोट्या बॅचमध्ये सोडले जातात. पण हवेत आल्यानंतर एकत्र येतात. हे कोणावर निशाणाही धरू शकतात आणि संरक्षणही करू शकतात."

फोटो स्रोत, Getty Images
पाकिस्तानकडे शाहपार-2 हे ड्रोन्सही आहेत. त्याकडे 23,000 फूटापर्यंत उडण्याची क्षमता आहे.
अरब न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार नोव्हेंबर 2024 मध्ये शाहपार-3 ची पाकिस्तानने चाचणी केली होती. हे ड्रोन 35,000 फूट उंच जाऊ शकतात.
पाकिस्तानने दावा केलाय आहे की हे ड्रोन्स जवळपास 500 किलोपर्यंतचं वजन उचलू शकतात. दिनेश कुमार पांडेय सांगत होते, ''पाकिस्तानकडे स्वतःचा असा फक्त बुर्राख ड्रोन आहे. बाकी सगळे बाहेरून घेतले आहेत.'
याशिवाय पाकिस्तानकडे तुर्कीने बनवलेले अकिन्सी ड्रोनही आहेत. हे हवेतल्या हवेत आणि हवेतून जमिनीवरही हल्ला करू शकतात. त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञान बसवलं आहे.
"हे अतिशय अद्ययावत ड्रोन्स आहे. पण त्याची क्षमता किती ते नेमकं सांगता येणार नाही. सध्या दोन-तीनच ड्रोन्स बनवले गेले असल्याने त्याबद्दल काही फारशी माहिती नाही."
भारताविरोधात पाकिस्तान कोणत्या ड्रोनचा वापर करतोय हे समजलेलं नाही.
दोन्ही देशांची ड्रोन क्षमता
टेकी.कॉमनुसार, भारताकडे 200 मध्यम उंचावरचे आणि सुमारे 200 मध्यम उंचीवर उडणारे (एमएएलई) ड्रोन आणि 980 लहान यूएव्ही आहेत. पाकिस्तानकडे 60 एमएएलई, 60 नौदलाचे, 70 हवाई दलाचे आणि 100 लष्कराचे यूएव्ही असल्याचं सांगितलं जातं. मात्र, याची अधिकृतरीत्या माहिती नाहीये.
भारताकडे हार्पी, हॅरोप, एमक्यू 9 रीपर आणि रुस्तम-2 हे ड्रोन्स आहेत.
हार्पी इस्रायलने बनवलेला ड्रोन आहे. तो 9 तास उडू शकतो. त्याची रेंज 500 किलोमीटरपर्यंत जाते. त्याची किंमत जवळपास 40 लाख डॉलर्स एवढी आहे.
हॅरोपही इस्रायलने बनवलेला ड्रोन आहे. हवेत जवळपास 9 तास उडू शकणारे हे ड्रोन 1000 किलोमीटर लांबपर्यंत जातात.

फोटो स्रोत, DRDO
हे 23 किलोपर्यंतचं वजन वाहून नेऊ शकतात.
एमक्यू रीपर हे अमेरिकेने तयार केलेलं ड्रोन आहे. हे 1700 किलोपर्यंत सामान वाहू शकतं. याचा वापर अमेरिका इराक, सीरिया आणि अफगाणिस्तानमध्ये होतो.
हे ड्रोन हवेत तब्बल 27 तास राहू शकतात आणि त्याची रेंज 1850 किलोमीटरपर्यंत आहे. एका ड्रोनची किंमत सुमारे 3 कोटी 20 लाख डॉलर आहे.
रुस्तम-2 हे भारताच्या डीआरडीओने विकसित केलेले ड्रोन आहे. त्याची रेंज 200 किलोमीटर असून ते 350 किलोपर्यंत सामान वाहू शकतात. एका ड्रोनची किंमत 50 ते 60 लाख डॉलर दरम्यान आहे. सध्या ते चाचणी टप्प्यात आहे.

फोटो स्रोत, Getty Images
टेकी डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार पाकिस्तानकडे तुर्कीने बनवलेलं बैराकतार अकिन्सी नावाचं ड्रोन आहे. याची लांबी 12.2 मीटर असून ते 1500 किलोपर्यंत पे लोड घेऊ शकतं. हे ड्रोन 40000 फूट उंचीवर जाऊ शकतं.
बैराकतार टीबी-2 हेही तुर्कीचं ड्रोन आहे. ते 18,000 फूट उंचीवर 27 तास राहू शकतं आणि 150 किलोपर्यंत पे लोड घेऊ शकतं.
याशिवाय, पाकिस्तानकडे चीनने बनवलेलं सीएच-4 हे ड्रोन देखील आहे. याची रेंज 3000 ते 5000 किलोमीटर आहे आणि ते 345 किलोपेक्षा जास्त पे लोड वाहू शकतं.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











