व्हिएतनाममध्ये पर्यटकांनी भरलेली बोट उलटून 37 जणांचा मृत्यू, अनेकजण अद्याप बेपत्ता

फोटो स्रोत, Getty Images
- Author, टॉम मॅकआर्थर
- Role, बीबीसी प्रतिनिधी
व्हिएतनाममध्ये खराब हवामानामुळे पर्यटकांची बोट उलटून झालेल्या अपघातात किमान 37 जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच, अनेकजण अजूनही बेपत्ता आहेत.
व्हिएतनामच्या उत्तरेकडे 'हा लॉन्ग बे' ('हा लॉन्ग'ची खाडी) नावाचं एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे त्याठिकाणी ही दुर्घटना घडली आहे.
या दुर्घटनेतील बहुतांश प्रवासी हे व्हिएतनामचेच नागरिक आहेत. ते व्हिएतनामची राजधानी असलेल्या हनोईहून हा लॉन्ग बे या सुप्रसिद्ध पर्यटन स्थळी आपापल्या कुटुंबासहित फिरण्यासाठी आलेले होते.
सध्या मुसळधार पावसामुळे बचाव कार्यामध्ये प्रचंड अडथळे येत आहेत. परंतु, शोध घेण्याचे प्रयत्न सुरु असल्याचं बचावकर्त्यांचं म्हणणं आहे. आतापर्यंत तरी किमान 11 जणांना पाण्यातून जिवंत बाहेर काढण्यात आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
व्हिएतनामी सीमारक्षक आणि नौदलाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की, 'वंडर सीज' नावाचं हे जहाज अचानक आलेल्या वादळाचा सामना करताना उलटलं तेव्हा त्यामध्ये 53 लोक होते.
एका प्रत्यक्षदर्शीने एएफपी वृत्तसंस्थेला सांगितलं की, शनिवारी स्थानिक वेळेनुसार दुपारी 2 वाजता (07:00 जीएमटी) आभाळ भरुन आलं होतं.
"मुसळधार पाऊस, गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पायाच्या अंगठ्याइतक्या मोठ्या गारांची गारपीट होत होती," असंही त्यानं सांगितलं.
स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, उलटलेल्या जहाजाच्या एअर पॉकेटमध्ये अडकलेल्या एका 10 वर्षांच्या मुलाला वाचवण्यात यश आलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
"मी एक दीर्घ श्वास घेतला, डुबकी मारली आणि नंतर पोहत वर आलो. मी मदतीसाठी ओरडू लागलो. त्यानंतर एका बोटीतून मला वर खेचण्यात आलं," असं त्या बचावलेल्या मुलानं 'व्हिएतनामनेट' या सरकारी माध्यमाला सांगितलं. तो त्याच्या पालकांसोबत इथे पर्यटनासाठी आला होता.
'व्हीएनएक्सप्रेस'च्या वृत्तानुसार, आतापर्यंत सापडलेल्या मृतदेहांपैकी किमान आठ मृतदेह लहान मुलांचे आहेत.
अजूनही बेपत्ता असलेल्यांना शोधण्यासाठी रात्रीपर्यंत बचावकार्य सुरू राहणार आहे.

फोटो स्रोत, Getty Images
व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिन यांनी या दुर्घटनेबाबत शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबियांप्रती सांत्वन व्यक्त केलं आहे.
या अपघातामागचं कारण शोधण्यासाठी अधिकारी चौकशी करतील आणि "नियमांचं उल्लंघन झालेलं असल्यास त्याबाबत कठोरपणे कारवाई करतील," असं सरकारी निवेदनात म्हटलं आहे.
क्वांग निन्ह प्रांतातील 'हा लॉन्ग बे' हे पर्यटन स्थळ शेकडो लहान बेटांनी भरलेलं आहे.
2019 मध्ये 40 लाख पर्यटकांनी इथे येऊन पर्यटनाचा आनंद घेतला होता. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत या पर्यटन स्थळाचाही समावेश आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











