अहमदाबाद विमान अपघात : प्राथमिक अहवालातून समोर आलेले 7 महत्वाचे मुद्दे

फोटो स्रोत, Getty Images
अहमदाबादमध्ये 12 जून रोजी झालेल्या विमान अपघाताच्या बरोबर एक महिन्यानंतर, प्राथमिक तपास अहवाल (प्रिलीमिनरी रिपोर्ट) प्रसिद्ध करण्यात आला आहे.
हा अहवाल भारताच्या विमान अपघात अन्वेषण ब्युरो (AAIB) ने प्रसिद्ध केला आहे.
शनिवारी (12 जुलै) रात्री उशिरा प्रसिद्ध झालेल्या या अहवालात विमानाच्या दोन्ही वैमानिकांमधील संभाषणाचाही खुलासा करण्यात आला आहे.
हे संभाषण कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरद्वारे मिळवण्यात आलं आहे.
हा रिपोर्ट कोणत्याही अंतिम निष्कर्षापर्यंत येत नाही. मात्र, त्यामधून पायलट्सच्या त्यावेळच्या संभाषणाबद्दलचे तपशील पुरवलेले आहेत.
या अपघातामध्ये एकूण 260 जणांचा मृत्यू झाला होता. त्यापैकी 241 जण हे विमानातील प्रवासी होते.
अपघातामागच्या संभाव्य कारणांचा शोध घेणाऱ्या या प्राथमिक अहवालातील 7 महत्त्वाचे मुद्दे आपण पाहूयात.

विमानाने सुमारे 08:08:42 UTC वाजता 180 नॉट्स IAS चा वेग (नोंद झालेला कमाल वेग) गाठला होता आणि त्यानंतर लगेचच, इंजिन 1 आणि इंजिन 2 चे फ्यूएल कटऑफ स्विचेस (इंधनाचे स्विच) अगदी 01 सेकंदाच्या अंतराने एकामागून एक RUN वरून CUTOFF मोडमध्ये गेले आणि विमानाचा इंधन पुरवठा बंद झाला.

या प्राथमिक अहवालातून विमानामध्ये काय घडलं ते स्पष्ट केलेलं आहे. मात्र, ते का घडलं, याबाबत अनभिज्ञता कायम आहे. फ्यूएल कंट्रोल स्विच हे चुकून हलवले जाऊ नयेत, म्हणून त्या पद्धतीनेच डिझाइन केलेले असतात.

फोटो स्रोत, aaib.gov.in
त्यांना RUN वरून CUT OFF मध्ये हलवणं हीदेखील दोन टप्प्यांमध्ये करावी लागणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक स्विच खाली हलवण्यापूर्वी तो उचलावा लागतो आणि प्रत्येक इंजिनसाठी एक असे दोन स्विचेस असतात.
त्यामुळे, इंधन पुरवठा करणारे स्विचेस बंद झाले, हे खरं असलं तरीही ते कसे झाले आणि कुणी केले याबाबत अनभिज्ञता आहे.

विमानाने उड्डाण केलं तेव्हा सह-वैमानिक विमान चालवत होते, तर कॅप्टन निरीक्षण करत होते.

फोटो स्रोत, UGC
अपघातापूर्वीच्या काही क्षणांमध्ये कॉकपिटच्या व्हॉइस रेकॉर्डिंगमध्ये, "विमानाचं इंजिन का कटऑफ केलं?" असं एक पायलट दुसऱ्या पायलटला विचारताना ऐकू येतं, असं या रिपोर्टमधील एका निष्कर्षात म्हटलं आहे.
त्यावर दुसऱ्या पायलटनं मात्र आपण असं काही केलं नसल्याचं म्हटलेलं ऐकू येतं.
मात्र, कोणता आवाज कोणत्या पायलटचा आहे, हे या अहवालात स्पष्ट केलेलं नाही.
या दोन्ही पायलट्सच्या समन्वयामध्ये काही संभ्रम होता का, हा आता पुढील तपासाचा मुद्दा असेल, असं बीबीसीचे इंटरनॅशनल बिझनेस करस्पाँडट थियो लेगेट यांनी विश्लेषण करताना म्हटलंय.

अपघाताच्या अगदी काही क्षण आधी, म्हणजेच टेकऑफनंतर हे स्विचेस लगेचच 'रन'वरून 'कटऑफ' स्थितीत हलवले गेले होते, हे उघड झालं आहे.

फोटो स्रोत, aaib.gov.in
मात्र, त्यानंतर स्विचेस त्यांच्या सामान्य इनफ्लाइट स्थितीत परत आणले गेले, जेणेकरुन इंजिन पुन्हा कार्यान्वित होण्याची प्रक्रिया आपोआप सुरू व्हावी.
अहवालानुसार, विमान क्रॅश झालं तेव्हा एक इंजिन पुन्हा कार्यान्वित झालं होतं. तर दुसरं पुन्हा कार्यान्वित होण्याच्या प्रक्रियेत होतं, मात्र त्याला उड्डाणासाठी हवा तेवढा उर्जेचा जोर मिळालेला नव्हता. परिणामत:, हा अपघात घडला.

विमान जिथं कोसळलं त्या ठिकाणापासून ते सापडलेल्या शेवटच्या विमानाच्या अवशेषाच्या अंतराचे विश्लेषण केल्यास हे विमानाचे अवशेष सुमारे 1000 फूट परिसरात पसरलेले होते.

याआधी, तज्ज्ञांनी अशीही शक्यता व्यक्त केली होती की, कदाचित पक्ष्यांची धडक हे अपघातामागचं एक संभाव्य कारण असू शकतं.

फोटो स्रोत, aaib.gov.in
मात्र, हा प्राथमिक अहवाल असं सांगतो की, "विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये असं दिसून आलं आहे की विमानानं उड्डाण सुरू केल्यानंतर लगेचच रॅम एअर टर्बाइन (RAT) सक्रिय झालं होतं कारण विमान वर येऊ लागलं होतं.
उड्डाण मार्गावर कोणत्याही मोठ्या पक्ष्यांच्या हालचालीबाबतची माहिती मिळालेली नाही. विमानतळावरील धावपट्टीची सीमा ओलांडण्यापूर्वीच विमानाने गाठलेली उंची उतरणीला लागलेली होती.

एअर इंडियाच्या या विमानात उड्डाणासाठी जाण्यापूर्वी पायलट आणि क्रू ची तपासणी करण्यात आली होती. उड्डाणासाठी ते फिट आहेत का, हे तपासण्यासाठी ही तपासणी करतात.
अहवालानुसार, दोन्ही पायलट मुंबईचे होते आणि उड्डाणाच्या एका दिवसापूर्वीच अहमदाबादला पोहोचले होते. त्यामुळं त्यांना पुरेसा आराम मिळालेला होता.
पायलट आणि क्रूची स्थानिक वेळेनुसार 06:25 वाजता ब्रीथ ॲनलायझर टेस्टही झाली होती. त्यात ते 'फ्लाइट ऑपरेट करण्यासाठी फिट' असल्याचं आढळलं होतं.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)











