अहमदाबाद विमान अपघात : ब्लॅक बॉक्समधून नेमकं काय समोर येईल? तपास कुठवर आलाय?

एअर इंडिया विमानाने अवशेष

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी न्यूज

अहमदाबादमध्ये अपघात झालेले विमान उड्डाणानंतर केवळ 40 सेकंद हवेत होतं. त्यानंतर ते जवळच्या दाट लोकवस्ती असलेल्या परिसरात कोसळलं.

भारतातील अलीकडच्या काळातील हा एक दुर्मीळ विमान अपघात ठरला आहे.

आता तपास अधिकाऱ्यांपुढे बोईंग 787 ड्रीमलायनरच्या अवशेषांची तपासणी करणं, ही एक अवघड जबाबदारी आहे.

कॉकपिट व्हॉइस आणि फ्लाइट डेटा रेकॉर्डर्सचे विश्लेषण करून उड्डाणानंतर काही सेकंदांत नेमकं काय चुकलं याचा मागोवा आता घ्यावा लागेल.

संयुक्त राष्ट्रांच्या विमान वाहतूक संस्थेने (ICO) ठरवलेल्या आंतरराष्ट्रीय नियमांनुसार, प्राथमिक चौकशी अहवाल 30 दिवसांत जाहीर केला गेला पाहिजे, तर अंतिम अहवाल 12 महिन्यांत पूर्ण केला जाणं अपेक्षित असतं.

लंडनकडे जाणारे हे विमान कॅप्टन सुमीत सभरवाल आणि सह-पायलट क्लाइव्ह कुंदर चालवत होते.

या विमानानं गुरुवारी (12 जून) स्थानिक वेळेनुसार दुपारी 1:39 वाजता अहमदाबाद शहरातून उड्डाण केलं. या विमानात 242 प्रवासी आणि सुमारे 100 टन इंधन होतं.

उड्डाणानंतर काही सेकंदातच कॉकपिटमधून 'मे-डे' कॉल आला, तोच शेवटचा संदेश ठरला. त्यानंतर विमानानं झपाट्यानं उंची गमावली आणि आगीच्या भडक्यासह ते कोसळलं.

'असा अपघात पूर्वी कधीच झाला नाही...'

कॅप्टन किशोर चिंता, हे भारताच्या एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचे (AIB) माजी तपास अधिकारी आहेत. त्यांनी या अपघाताला 'दुर्मिळातील दुर्मिळ' प्रकारातला अपघात म्हटलं आहे. "माझ्या माहितीनुसार याआधी असं कधीच घडलेलं नाही," असं त्यांनी बीबीसीला सांगितलं.

दोन्ही इंजिन्स पक्ष्यांच्या धडकेमुळे बंद पडली का? की अशुद्ध इंधनामुळे? प्रचंड उष्णतेत, जास्त भार असलेल्या जेटवर फ्लॅप्स चुकीच्या प्रकारे वाढवले गेले होते का, ज्यामुळे लिफ्ट कमी झाली? इंजिन सर्व्हिसिंगदरम्यान मेंटेनन्समध्ये काही चूक झाली का? की क्रूच्या अनावधानानं दोन्ही इंजिन्सना जाणारं इंधन बंद झालं?

तपास अधिकारी या सर्व शक्यतांचा आणि इतर अनेक कारणांचा सखोल तपास करतील.

अहमदाबादमध्ये अपघातस्थळी पडलेले एअर इंडियाचे लँडिंग गिअर.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अहमदाबादमध्ये अपघातस्थळी पडलेले एअर इंडियाचे लँडिंग गिअर.

विमान अपघाताची चौकशी 'त्रिकोणीय मोजमाप आणि शक्यता निर्मूलन' (triangulation and elimination) पद्धतीवर आधारित असतात.

म्हणजेच अपघातस्थळी मिळालेल्या भौतिक पुराव्यांची विमानाच्या कार्यक्षमतेच्या डेटाशी तुलना करून नेमकं काय चुकलं याचं स्पष्ट चित्र तयार केलं जातं.

प्रत्येक जळालेली केबल, तुटलेलं टर्बाइन ब्लेड, विमानातील देखभाल नोंदी तसंच फ्लाइट डेटा आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधील आवाज आणि सिग्नल्स म्हणजेच 'ब्लॅक बॉक्स' सविस्तरपणे तपासले जातील.

'पहिला पुरावा जमिनीवरच मिळेल'

तपास कसा पुढे जाईल हे 'बीबीसी'नं अपघात तज्ज्ञांशी संवाद साधून समजून घेतलं आहे.

महत्त्वाचं म्हणजे, किमान तीन तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, प्राथमिक पुरावे हे जमिनीवर असलेल्या दोन इंजिनांच्या अवशेषांमधून मिळू शकतात.

"तुम्ही इंजिनांच्या नुकसानावरून ठरवू शकता की, अपघातावेळी इंजिन्समध्ये ऊर्जा तयार होत होती की नाही. टर्बाइन्स उच्च गतीने फिरताना वेगळ्या प्रकारे तुटतात," असं अमेरिकेच्या नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्डचे (एनटीएसबी) माजी व्यवस्थापकीय संचालक पीटर गोएल्झ म्हणतात.

"काय चूक झाली हे सांगणारीहीच सुरुवातीची माहिती असते."

टर्बाइन्स हे महत्वाचे फिरणारे घटक आहेत, जे ऊर्जा निर्माण करून थ्रस्ट तयार करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतात.

अहमदाबाद विमान अपघात

फोटो स्रोत, Getty Images

"जर इंजिन्समध्ये ऊर्जाच तयार झाली नसेल, तर तपासकर्त्यांसमोर मोठी समस्या येईल आणि थेट कॉकपिटवर लक्ष केंद्रित होईल."

कॉकपिटमध्ये काय घडलं हे बोईंग 787 च्या एन्हान्स्ड एअरबोर्न फ्लाइट रेकॉर्डर्स (इएएफआरस) म्हणजेच 'ब्लॅक बॉक्स'च्या मदतीनं उलगडलं जाईल, असं तपासकर्ते सांगतात. (भारतीय अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हे रेकॉर्डर्स अपघातस्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहेत.)

ही उपकरणं विस्तृत फ्लाइट डेटा आणि कॉकपिटमधील ऑडिओ रेकॉर्ड करतात. उदाहरणार्थ- पायलटच्या रेडिओ कॉल्सपासून ते कॉकपिटमधील इतर आवाजांपर्यंत.

व्हाइस रेकॉर्डिंगमध्ये वेगवेगळ्या पायलटचे मायक्रोफोन्स, रेडिओ ट्रान्समिशन्स आणि कॉकपिटमधील पार्श्वभूमीचा आवाज टिपणाऱ्या एरिया मायक्रोफोन यांचा समावेश असतो.

डेटा रेकॉर्डर्स अत्यंत अचूक पद्धतीनं गियर आणि फ्लॅप लीव्हर्सची स्थिती, थ्रस्ट सेटिंग्ज, इंजिनची कामगिरी, इंधन प्रवाह आणि अग्निशमन हँडलच्या सक्रियतेचा मागोवा ठेवतात.

...तर संपूर्ण विमान उद्योगासाठी चिंतेची गोष्ट

"इंजिन्स पूर्ण शक्तीनं काम करत असल्याचं फ्लाइट डेटा रेकॉर्डरनं दाखवलं तर तपासाचा रोख फ्लॅप्स आणि स्लॅट्सकडे वळेल. जर ते आवश्यकतेनुसार विस्तारित आढळले, तर तपास फारच कठीण होईल," असं गोएल्झ म्हणतात.

फ्लॅप्स आणि स्लॅट्स कमी वेगानं लिफ्ट वाढवतात, ज्यामुळे विमान हळूहळू टेकऑफ करू शकतं आणि सुरक्षित उतरू शकतं, तेही विमान न थांबता.

"फ्लाइट मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टिममध्ये समस्या निर्माण झाल्याचं लक्षात आलं, तर मात्र ती गोष्ट चिंताजनक असेल. ती चिंता केवळ बोईंगसाठीच नाही, तर संपूर्ण विमान उद्योगासाठीही असेल."

बोईंग 787 ची फ्लाइट मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टिम एक अत्यंत स्वयंचलित प्रणाली आहे जी नेव्हिगेशन, विमानाची कार्यक्षमता आणि दिशादिग्दर्शन यांचं व्यवस्थापन करते. ही सिस्टीम वेगवेगळ्या सेन्सर्समधील डेटा एकत्र करून विमानाच्या उड्डाणाचा मार्ग आणि इंधनाची कार्यक्षमता सुधारते.

एअर इंडिया विमान

फोटो स्रोत, Getty Images

2011 पासून जगभरात 1100 पेक्षा जास्त बोईंग 787 उड्डाण करत असल्यामुळे तपासात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल की, हा अपघात मॅनेजमेंट कंट्रोल सिस्टिममधला आहे का. कारण तसं असेल तर त्याचा परिणाम बोईंगच्या जागतिक फ्लीटवरही होऊ शकतो. पण तसं नसेल तर हा केवळ या एका विमानातील दोष असू शकतो."

"जर ही सिस्टिमची समस्या असल्याचं दिसलं, तर नियामक संस्थांना लवकरात लवकर कठीण निर्णय घ्यावे लागतील," असं गोएल्झ म्हणतात.

आत्तापर्यंत यात कोणाचाही दोष असल्याचे संकेत दिसून आलेले नाहीत. भारताच्या नागरी उड्डाण मंत्रालयानं मंगळवारी (17 जून) सांगितलं की, एअर इंडियाच्या बोईंग 787 फ्लीटच्या अलीकडील तपासणीत एकूण 33 विमानांपैकी 24 विमानांची तपासणी झाली आहे.

यात सुरक्षेची कोणतीही मोठी चिंता समोर आलेली नाही. विमानं आणि देखभाल प्रणाली विद्यमान मानकांनुसार आहेत, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

'अपघात का घडला हे कळायला वेळ लागेल'

बोईंगचे अध्यक्ष आणि सीईओ केली ऑर्टबर्ग यांनी 12 जूनला सांगितलं, "एअर इंडिया फ्लाईट 171 संदर्भातील माहितीबाबत बोइंग संयुक्त राष्ट्रांच्या ICAO (आंतरराष्ट्रीय नागरी विमान वाहतूक संघटना) प्रोटोकॉलनुसार भारताच्या विमान अपघात तपास संस्थेच्या (AAIB) अधिकारात निर्णय घेईल."

दिल्लीतील एएआयबी लॅबमध्ये डेटा डिकोडिंग भारतीय तपासकर्त्यांच्या नेतृत्वाखाली होईल, ज्यात बोईंग, इंजिन निर्माता जीई, एअर इंडिया आणि भारतीय नियामकांच्या तज्ज्ञांचा समावेश असेल. याशिवाय एएनटीएसबी (अमेरिका) आणि यूकेच्या तपास यंत्रणाही सहभागी होतील.

"माझ्या अनुभवानुसार टीम्स साधारणपणे काय घडलं ते लवकरच ठरवू शकतात," असं गोएल्झ म्हणतात. "पण हे का घडलं हे समजून घेण्यासाठी जास्त वेळ लागू शकतो."

तपासकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, अपघातानुसार विमानाच्या अवशेषांचं महत्त्व वेगळं असतं.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, अपघाताच्या तीव्रतेनुसार विमानाच्या अवशेषांचं महत्त्व वेगळं असतं.

अवशेषांमधून इतर पुरावेही मिळू शकतात. "प्रत्येक भाग वायर, नट, बोल्ट काळजीपूर्वक गोळा केले जातील," असं चिंता म्हणतात.

सामान्यतः, अवशेष जवळच्या हँगर किंवा सुरक्षित ठिकाणी हलवले जातात. नाकाचा भाग, शेपटी आणि पंखांचे टोक ओळखण्यासाठी तो व्यवस्थित मांडला जातो आणि नंतर ते पुन्हा जुळवले जातात.

मात्र, या प्रकरणात, उड्डाण डेटा आणि व्हॉईस रेकॉर्डरमधून काय माहिती मिळते यावर संपूर्ण पुनर्रचना आवश्यक आहे की नाही हे ठरेल असे तपास अधिकारी म्हणतात.

तपास अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, अपघातानुसार विमानाच्या अवशेषांचं महत्त्व वेगळं असतं.

जुलै 2014 मध्ये पूर्व युक्रेनवर पडलेल्या मलेशिया एअरलाईन्सच्या फ्लाइट एमएच17 चे अवशेष अतिशय महत्त्वाचे होते. विमानाच्या नाकाच्या भागाची पुनर्रचना केल्यावर, रशियन बनावटीच्या क्षेपणास्त्राच्या शॅर्पनेलमुळे (लोखंडी तुकडे) झालेल्या आघात स्पष्ट दिसत होते.

'छोट्या छोट्या गोष्टींचाही तपास होणार'

अपघातस्थळी सापडलेल्या अवशेषांमध्ये तपासकर्ते इंधन फिल्टर्स, पाइपलाइन, व्हॉल्व्ह आणि शिल्लक इंधनाचीही तपासणी करतील, जेणेकरून इंधनात अशुद्धता होती का हे तपासता येईल, हे शोधणं तुलनेनं सोपं असतं, असं नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर एका अपघात तपासकर्त्यानं सांगितलं.

त्याचबरोबर, उड्डाणापूर्वी वापरण्यात आलेलं रिफ्युएलिंग उपकरण कदाचित वेगळं ठेवण्यात आलं असेल आणि आधीच तपासलं गेलं असण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली.

एवढंच नाही, तपास अधिकारी एअर इंडिया आणि बोईंगकडून देखभाल व तांत्रिक बिघाडाच्या इतिहासाची नोंद गोळा करतील, तसेच बोईंगचे एसीएआरएस (एअरक्राफ्ट कम्युनिकेशन्स ॲड्रेसिंग अँड रिपोर्टिंग सिस्टिम) डेटा, जो रेडिओ किंवा सॅटेलाइटद्वारे बोईंग आणि एअर इंडियाला प्रसारित केला जातो, हाही तपासला जाईल, असं चिंता म्हणतात.

गेल्या काही महिन्यांत या विमानानं आणि क्रूनं केलेल्या सर्व उड्डाणांचा आढावा घेतील, त्याचबरोबर पायलट्सनी नोंदवलेल्या बिघाडांची तांत्रिक नोंद व विमान सेवा सुरू करण्यापूर्वी घेतलेल्या सुधारात्मक कृतींचाही तपास केला जाईल.

एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच का कोसळले, याचा तपास सध्या सुरू आहे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एअर इंडियाचे विमान उड्डाणानंतर काही सेकंदातच का कोसळले, याचा तपास सध्या सुरू आहे
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

तपास अधिकारी पायलटचे परवाने, प्रशिक्षण नोंदी, सिम्युलेटरमधील कामगिरी आणि प्रशिक्षकांच्या टिप्पण्यांचाही अभ्यास करतील, विशेषतः इंजिन फेल होण्यासारख्या परिस्थितींचं प्रशिक्षण कसं दिलं गेलं याचाही अभ्यास होईल.

"माझ्या मते एअर इंडियानं या सर्व नोंदी तपास पथकाला आधीच दिल्या असतील," असं चिंता सांगतात.

तपास अधिकारी विमानाच्या त्या सर्व घटकांचा सेवा इतिहास (सर्व्हिस हिस्ट्री) तपासतील जे काढून टाकण्यात आले होते किंवा बदलले गेले होते.

त्यांनी नोंदवलेल्या बिघाडांचा आढावा घेतला जाईल, जेणेकरून कुठलीही पुनरावृत्ती होणारे दोष किंवा अशा संकेतांचा मागोवा घेता येईल, जे या उड्डाणावर परिणाम करू शकले असते.

"या तपासण्या अत्यंत गुंतागुंतीच्या असतात. त्यांना वेळ लागतो, पण सुरुवातीलाच काही प्राथमिक संकेत मिळतात की, नेमकं काय चुकलं असावं," असं गोएल्झ म्हणतात.

एक मोठं कारण म्हणजे तंत्रज्ञानानं किती प्रगती केली आहे.

"1994 मध्ये मी तपासलेला पहिला अपघात होता, ज्यामध्ये फ्लाइट डेटा रेकॉर्डर फक्त चारच पॅरामीटर्स ट्रॅक करत होता," असं ते सांगतात.

"आजचे रेकॉर्डर्स दर सेकंदाला शेकडो, कधी कधी हजारो पॅरामीटर्स नोंदवतात. यामुळेच अपघातांच्या तपासणीची संपूर्ण पद्धत बदलून गेली आहे."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)