शुभांशु शुक्ला म्हणाले, 'खांद्यावरचा तिरंगा सांगतोय, मी एकटा नाही', ॲक्सियम-4 अंतराळात झेपावलं

शुभांशु शुक्ला

फोटो स्रोत, AXIOM SPACE

फोटो कॅप्शन, शुभांशु शुक्ला
    • Author, प्रियंका
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना घेऊन ॲक्सियम-4 अवकाशात झेपावले आहे. त्यांच्या रुपानं तब्बल 41 वर्षांनी एका भारतीय अंतराळवीरानं अंतराळात पाऊल टाकलं आहे.

याआधी 1984 साली राकेश शर्मा भारताचे पहिले अंतराळवीर ठरले होते. शर्मा यांनी अंतराळात उड्डाण केलं, तेव्हा शुभांशु यांचा जन्मही झाला नव्हता.

तर भारतीय वंशाच्या पण अमेरिकन नागरिकत्व असलेल्या सुनिता विल्यम्स आणि त्याआधी कल्पना चावला यांनी अंतराळवीर म्हणून नासासाठी भरीव कामगिरी बजावली होती.

शुभांशु शुक्ला या मोहिमेअंतर्गत International Space Station अर्थात आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाला भेट देतील आणि तिथे किमान दोन आठवडे वास्तव्य करतील.

खरंतर याआधी चार वेळा उड्डाण त्यांच्या यानाचं उड्डाण पुढे ढकलण्यात आलं होतं. अखेर आज ( 25 जून ) रोजी हे अवकाशयान अंतराळात झेपावले आहे.

शुक्ला यांच्यासोबत अमेरिका, हंगेरी आणि पोलंडचे अंतराळवीरही आहेत.

अमेरिकेच्या फ्लोरिडामधल्या केनेडी स्पेस सेंटरमधून यशस्वी उड्डाण केल्यावर हे यान आता आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे प्रवास करत आहे.

अवकाशात एक्सिएम - 4 झेपावले

फोटो स्रोत, NASA Youtube

उड्डाणाची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर शुभांशु यांनी अंतराळातून हिंदीत पृथ्वीवर संदेश पाठवला. ते म्हणाले, "नमस्कार, माझ्या देशबांधवांनो, काय राईड होती. 41 वर्षांनी आपण (भारत) अंतराळात परतलो आहोत. हा प्रवास शानदार आहे.

"सध्या आम्ही 7.5 किलोमीटर प्रतीसेकंद या वेगानं पृथ्वीला प्रदक्षिणा घालत आहोत. माझ्या खांद्यावर आपला तिरंगा आहे, तो दाखवून देत आहे, की मी तुम्हा सर्वांसोबत आहे."

शुभांशु पुढे म्हणाले, "ही माझ्या अंतराळ प्रवासाची सुरुवात नाही, तर भारताच्या अंतराळातील मानवी मोहिमांची सुरुवात आहे. माझे तुम्ही सगळे देशबांधव या प्रवासात माझ्यासोबत आहात."

अ‍ॅक्सियम-4 मिशन काय आहे?

अ‍ॅक्सियम-4 ही एक कमर्शियल म्हणजे व्यावसायिक मोहिम आहे.

अ‍ॅक्सियम स्पेस नावाच्या अमेरिकन कंपनीनं ती आखली आहे. त्यांचं मुख्यालय अमेरिकेतील टेक्सास राज्यातल्या ह्यूस्टन शहरात आहे.

अ‍ॅक्सियम स्पेसनं नासा आणि इलॉन मस्क यांची स्पेसएक्स यांच्या सहकार्यानं ही मोहिम आखली आहे. त्यासाठी स्पेसएक्सच्या फाल्कन 9 रॉकेटचा वापर करण्यात आला.

अ‍ॅक्सियम कंपनीचं हे चौथं मिशन असून पहिल्यांदाच एखादा भारतीय अंतराळवीर या मिशनमध्ये सहभागी असणार आहे.

तर नासाशिवाय भारताची इस्रो ही अंतराळ संस्था आणि युरोपियन स्पेस एजन्सी यांचाही या मोहिमेत सहभाग आहे.

या मोहिमेत यानातली एक जागा इस्रोनं 550 कोटी रुपये देऊन विकत घेतली आहे.

एक्सियम-4 मिशन एक कमर्शियल स्पेस फ्लाईट आहे. ह्यूस्टन की कंपनी हे एक्सियम स्पेस अभियान पार पाडते.

फोटो स्रोत, Axiom space

फोटो कॅप्शन, अ‍ॅक्सियम-4 मिशन एक कमर्शियल स्पेस फ्लाईट आहे.

नासाच्या अंतराळवीर पेगी व्हिटसन या मिशनच्या कमांडर आहेत.

ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला हे अ‍ॅक्सियम-4 मिशनचे पायलट आहेत. पायलटची भूमिका ही सेकंड कमांडर सारखीही असते.

तर मोहिमेत सहभागी झालेले युरोपीयन स्पेस एजन्सीचे अंतराळवीर स्टावोझ युझनान्स्की विझन्युस्की (Sławosz Uznański-Wiśniewski) हे पोलंडचे आहेत आणि टिबोर कापू हे हंगेरीचे आहेत.

भारतासाठी का आहे हे मिशन महत्त्वाचं?

1984 साली भारताचे अंतराळवीर विंग कमांडर राकेश शर्मा हे सोवियत संघ मिशनसोबत अंतराळात गेले होते. अ‍ॅक्सियम-4 च्या माध्यमातून आता दुसरा भारतीय व्यक्ती अंतराळात झेपावणार आहे.

भारतीय अंतराळवीर म्हणून आणखी काही अंतराळवीरांचं नाव नक्कीच घेतलं जातं.

त्यामध्ये, कल्पना चावला आणि सुनीता विल्यम्स यांची नावे आघाडीवर असतात. मात्र, या दोघीही भारतीय वंशाच्या असल्या तरी त्या भारतीय नागरीक नाहीत.

अ‍ॅक्सियम-4 च्या माध्यमातून आणि शुभांशु शुक्ला यांच्या रुपाने आता दुसरा भारतीय व्यक्ती अंतराळात झेपावणार आहे.

फोटो स्रोत, Axiom space

फोटो कॅप्शन, राकेश शर्मांनंतर शुभांशु शुक्ला दुसरे भारतीय अंतराळवीर ठरले आहेत

विज्ञानविषयक घडामोडींचे अभ्यासक पल्लव बागला यांनी बीबीसीला सांगितलं, "अ‍ॅक्सियम-4 मोहिमेतून भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोला त्यांच्या मानवी मोहिमेसाठी मदत होईल."

गगनयान ही भारताची स्वत:ची पहिली मानवी मोहिम असणार आहे. त्यात एका भारतीय अंतराळवीराला भारतीय रॉकेटच्या मदतीने श्रीहरीकोटा इथल्या स्पेस सेंटरमधून अंतराळात पाठवलं जाईल. 2027 मध्ये ही मोहिम राबवण्यात येईल, अशी आशा आहे.

पल्लव बागला पुढे सांगतात, "अ‍ॅक्सियम-4 हे भारतासाठी गगनयान मोहिमेच्या दिशेने आणखी एक पावलं टाकण्यासारखंच आहे. यातून भारताला बरंच काही शिकण्यासारखं आहे.

"पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी जो अंतराळ सहकार्याचा करार केला होता, तो आता प्रत्यक्षात उतरत आहे."

शुभांशु शुक्ला

फोटो स्रोत, Axiom space

बागला यांच्यामते "इस्रोच्या योजनेनुसार 2035 पर्यंत भारताला एक स्वत:चं अंतराळ स्थानक तयार करायचं आहे. तसंच एका भारतीय व्यक्तीला भारतीय रॉकेटमधून पूर्णतः भारतीय ताकदीच्या जोरावर चंद्रावर पाठवण्याची महत्त्वाकांक्षा पंतप्रधान मोदींनी बोलून दाखवली होती.

"पुढच्या15 वर्षांचा रोडमॅप इस्रोच्या डोळ्यांपुढे स्पष्ट आहे. आपल्या एका अंतराळवीराला अ‍ॅक्सियम-4 मिशन अंतर्गत अंतराळात पाठवणं, हे त्यातलं पहिलं पाऊल आहे."

अ‍ॅक्सियम-4 मोहिमेत भारतीय अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय पातळीवर पूर्ण प्रशिक्षण मिळत आहे.

इस्रोला अद्याप मानवी अंतराळ उड्डाणाचा अनुभव नाही. भारतानं आजवर उपग्रह प्रक्षेपित केलेले आहेत, पण मानवी मोहीम हे एक कठीण काम आहे. त्यासाठीचं अ‍ॅक्सियमसोबतची मोहीम एक शिकण्याची संधी म्हणून महत्त्वाची आहे

शुभांशु शुक्ला कोण आहेत आणि ते काय करणार आहेत?

शुभांशु शुक्ला भारतीय वायुसेनेचे ग्रुप कॅप्टन आहेत. 1985 साली जन्मलेले शुक्ला हे उत्तर प्रदेशातल्या लखनौचे रहिवासी आहेत.

2006 मध्ये ते भारतीय वायुसेनेत दाखल झाले आणि त्यांना 2000 तासांचा उड्डाणाचा अनुभव आहे.

भारतीय वायुसेनेत असणाऱ्या सुखोई-30 MKI, मिग-21S, मिग-29 S, जॅग्वार, हॉक्स डॉर्नियर्स आणि N-32 सारखी लढाऊ विमानं चालवण्याचा अनुभव शुक्लांच्या गाठीशी आहे.

त्यांचा वैयक्तिक प्रवास नेमका कसा होता, यासंदर्भात सविस्तर वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

इस्रोच्या गगनयान मोहिमेसाठी निवडण्यात आलेल्या चार अंतराळवीरांपैकी शुक्ला एक आहेत.

अ‍ॅक्सियम-4 चे मिशन पायलट म्हणून, शुभांशु शुक्ला यांची भूमिका मोहिमेच्या प्रत्येक टप्प्यात महत्त्वाची आहे.

यामध्ये रॉकेटचे प्रक्षेपण, त्याचं कक्षेत पोहोचणं, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर त्याचं डॉकिंग होणं, त्याचं परत येणं आणि सुरक्षित लँडिंग होणं, या सगळ्याचा यात समावेश आहे.

1985 साली जन्मलेले शुभांशु शुक्ला हे उत्तर प्रदेशातल्या लखनौचे रहिवासी आहेत.

फोटो स्रोत, Axiom space

फोटो कॅप्शन, 1985 साली जन्मलेले शुभांशु शुक्ला हे उत्तर प्रदेशातल्या लखनौचे रहिवासी आहेत.

या मोहिमेदरम्यान पृथ्वीवर मिशन कंट्रोल टीमसोबत संवाद करण्याची जबाबदारीही त्यांचीच असेल.

अ‍ॅक्सियम-4 एक कमर्शियल स्पेसफ्लाईट असली तरी त्याद्वारा अनेक नवे प्रयोगही केले जाणार आहेत.

शुभांशु शुक्ला यांच्यासहित अ‍ॅक्सियम-4 ची टीम अंतराळात बियाणे उगवणे आणि अवकाशात वनस्पती कशा वाढवायच्या याचाही अभ्यास करतील.

जवळजवळ शून्य गुरुत्वाकर्षणावर अवकाशात वनस्पती कशा वाढतात, यांसारख्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच, या वनस्पतींमध्ये कोणते गुणधर्म असतील, हेदेखील जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

पल्लव बागला माहिती देतात, "अ‍ॅक्सियम-4 मिशनमध्ये जवळपास 60 वैज्ञानिक प्रयोग केले जाणार आहेत, जे एक्सियमच्या मागील तीन मिशनमध्ये झालेले नव्हते. या मोहिमेत सुमारे 30 देशांचे प्रयोग होत आहेत.

"शुभांशु शुक्ला हे त्यापैकी अनेक प्रयोगांचा भाग असतील. भारताच्या स्वतःच्या शास्त्रज्ञांनी यापैकी सात प्रयोग सुचवले आहेत."

या मिशनदरम्यान पृथ्वीवर मिशन कंट्रोल टीमसोबत संवाद करण्याची जबाबदारीही शुभांशु शुक्ला यांचीच असेल.

फोटो स्रोत, Axiom space

फोटो कॅप्शन, अ‍ॅक्सियम-4 मोहिमेदरम्यान पृथ्वीवर मिशन कंट्रोल टीमसोबत संवाद करण्याची जबाबदारीही शुभांशु शुक्ला यांचीच असेल.
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

ते म्हणाले की, भारताने कधीही अंतराळात खगोल-जीवशास्त्राचे असे प्रयोग केलेले नाहीत, या क्षेत्रातील हे भारताचं पहिलं पाऊल असेल.

याआधी भारतातील एमिटी युनिव्हर्सिटीने, एका स्टार्टअपने आणि एका इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस टेक्नोलॉजीने पीएसएलव्हीच्या माध्यमातून बायोलॉजीचे काही खास प्रयोग केले होते.

मात्र, त्यातले नमुने अंतराळातच राहिले होते, ते परत आणले गेले नव्हते. भारत पहिल्यांदाच असे प्रयोग करणार आहे, ज्यात नमुने पुन्हा परत आणले जाणार आहेत.

या सात प्रयोगांशिवाय आणखी पाच प्रयोग इस्रो आणि नासा मिळून करणार आहेत. मात्र त्याविषयी अद्याप सविस्तरपणे सांगण्यात आलेलं नाहीये.

पुढे बागला यांनी सांगितलं की, "शुभांशु शुक्ला अंतराळातून काही आऊटरिच ऍक्टीव्हीटीदेखील करतील. याअंतर्गत ते लखनऊमधील ज्या शाळेत शिकले आहेत, तिथल्या विद्यार्थ्यांशी बातचित करतील.

"त्यासोबतच ते अंतराळ संशोधक, स्टार्टअप्ससोबत बातचित करतील. ते एका व्हीआयपी व्यक्तीशीही संवाद साधतील. मात्र, ही व्हीआयपी व्यक्ती कोण आहे, ते नाव अद्याप उघड झालेले नाही."

1984 साली जेव्हा राकेश शर्मा अंतराळात गेले होते, तेव्हा त्यांनी तिथून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी संवाद साधला होता.

इंदिरा गांधींनी त्यांना प्रश्न विचारला होता की, अंतराळातून भारत कसा दिसतो? या प्रश्नाच्या उत्तरामध्ये राकेश शर्मा यांनी म्हटलं होतं की, "सारे जहाँ से अच्छा..."

गगनयान मिशनसाठी होतील दरवाजे उघडे?

भारताची पहिली मानवी अंतराळ मोहीम 'गगनयान' ही आहे. ही मोहीम अंतिम टप्प्यात असल्याचं म्हटलं जातं. जर या मोहिमेबाबत सर्व काही व्यवस्थित झालं तर ते 2027 मध्ये ती अवकाशात जाईल. या मोहिमेअंतर्गत भारताने चार अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची योजना आखली आहे.

या मोहिमेअंतर्गत अंतराळवीरांना 400 किलोमीटरच्या कक्षेत पाठवलं जाईल, त्यानंतर त्यांना तीन दिवसांनी परत यावं लागेल.

भारताने यासाठी चार अंतराळवीरांची निवडदेखील केली आहे आणि यामध्ये शुभांशु शुक्ला यांचंदेखील नाव आहे.

भारताच्या 'गगनयान मोहिमे'मध्ये शुभांशु शुक्ला यांचंदेखील नाव आहे.

फोटो स्रोत, Axiom space

फोटो कॅप्शन, भारताच्या 'गगनयान मोहिमे'मध्ये शुभांशु शुक्ला यांचंदेखील नाव आहे.

पल्लव बागला सांगतात की, "अंतराळातील मानवी मोहिम कधीही सोपी नसते. आतापर्यंत फक्त रशिया, अमेरिका आणि चीन या तीनच देशांना हे स्वबळावर करता आलं आहे. अ‍ॅक्सियम-4 हे भारताच्या गगनयान मोहिमेसाठी टाकलेलं हे पहिलं पाऊल आहे.

"जेव्हा एखादा माणूस अंतराळात जातो, तेव्हा त्याच्या सुरक्षिततेसाठी फारच सतर्कता बाळगावी लागते. एखाद्या व्यक्तीला अंतराळात पाठवणं फार सोपं आहे, पण सुरक्षितपणे परत आणणं अधिक अवघड आहे आणि तेच अधिक महत्त्वाचंही असतं."

ते पुढे सांगतात की, "भामूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा ते तातडीनं धावायला लागत नाही. आधी ते रांगायला लागतं. गगनयन मोहिम हे एखादं धावणारं बाळ असेल तर, अ‍ॅक्सियम-4 मोहिम हा रांगण्याचा टप्पा आहे, असा त्याचा अर्थ आहे."

राकेश शर्मांच्या अंतराळयात्रेपासून आतापर्यंत काय काय बदललं?

राकेश शर्मा जेव्हा अंतराळात गेले होते, तेव्हा ती भारत-रशियाची मैत्रीपूर्ण मोहिम होती. त्यावेळी भारताने रशियाला पैसे दिलेले नव्हते.

पण शुभांशु शुक्ला ज्या अ‍ॅक्सियम-4 अंतर्गत जात आहेत, ती एक कमर्शियल म्हणजे व्यावसायिक मोहीम आहे.

पल्लव बागला सांगतात, "यामध्ये इस्रो आणि नासा यांची भागीदारी आहेच, पण त्यात काही आर्थिक हितसंबंधही आहेत."

भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा

स्वतः राकेश शर्मांना या मोहीमेविषयी काय वाटतं? बीबीसी तमिळशी बोलताना ते म्हणाले की, "मला फार आनंद होतोय. भारतीय अवकाश क्षेत्रासाठी हा नक्कीच एक अत्यंत महत्त्वाचा असा क्षण आहे."

"जेव्हा मी अंतराळात गेलो होतो, तेव्हा सगळं काही नवं होतं. संपूर्ण जगाचं लक्ष आपल्याकडे होतं. विशेषत: संपूर्ण भारत या घटनेकडे लक्ष ठेवून होता.

"आताचा काळ हा तांत्रिकदृष्ट्या आधुनिक आणि विकसित असा आहे. त्या पार्श्वभूमीवर, अंतराळ प्रवासामध्येही बरेच मूलभूत बदल झालेले आहेत. मात्र, तरीही त्यातील आव्हाने अद्यापही कायम आहेत," असंही ते म्हणाले.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)