गोकर्णच्या गुहेत सापडलेली रशियन महिला मुलांसह मायदेशी रवाना

रशियन महिला आणि तिच्या मुलांचे वडील

फोटो स्रोत, ANI

    • Author, इमरान कुरैशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी, बंगळूरूहून

कर्नाटकातील उत्तर कन्नड जिल्ह्यातील दुर्गम भागातील एका गुहेत पोलिसांना एक रशियन महिला आणि दोन लहान मुली सापडल्या होत्या. 14 जुलै रोजी हे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची देशभरात चर्चा झाली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर त्या महिलेला आणि तिच्या मुलींना प्रवासासाठी आवश्यक कागदपत्रे देण्यात आली.

नीना कुटीना नाव असलेल्या या महिलेचा व्हिसा संपल्यानंतरही ती भारतात थांबली होती. नीना कुटीना यांच्याकडे भारतात राहण्यासाठी वैध कागदपत्रे नव्हती. त्यांना बंगळुरूपासून सुमारे 76 किमी अंतरावर असलेल्या तुमकुर येथील विदेशी महिलांसाठी असलेल्या एका केंद्रात हलवण्यात आले होतं.

परदेशी क्षेत्रीय नोंदणी कार्यालय (एफआरआरओ)च्या सूत्रांनी बीबीसी हिंदीला सांगितले, "आई आणि तीन मुले, ज्यामध्ये एक मुलगा तिच्या पूर्वीच्या नात्यातून झालेला आहे, ते रविवारी रात्री रशियाला रवाना झाले."

हा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती बी.एम. श्याम प्रसाद यांनी दिला होता, जो डॉर श्लोमो गोल्डस्टीन यांच्या याचिकेवर आधारित होता.

गोल्डस्टीन हे त्या दोन मुलींचे वडील आहेत. त्यांनी आपल्या मुलींना देशातून हाकलले जाऊ नये अशी मागणी केली होती आणि न्यायालयाकडे त्यांच्या कस्टडीची विनंती केली होती.

काही दिवसांपूर्नी या महिलेच्या मुलांचे वडील डॉरची प्रतिक्रिया समोर आली होती. मुलींना भेटण्यासाठी काही कागदपत्रांची आवश्यकता असल्यानं याबाबत वकिलांना भेटून सल्ला घेणार असल्याचं डॉर म्हणाला.

यावेळी माध्यमांबरोबर बोलताना,"नीना माझ्याबरोबर येणार नाही कारण आम्ही आता विभक्त झालेलो आहोत," असंही त्यानं सांगितलं.

तसंच मी माझ्या मुलींच्या संपर्कात राहिलेलं तिला आवडत नाही, असंही एएनआयशी बोलताना डॉरनं सांगितलं.

"मुलींसाठी मी कधीही कुठेही जाईन, त्यांच्यासाठीच इथं आलो आहे," असंही डॉरनं एएनआयशी बोलताना सांगितलं.

रशियन महिला

फोटो स्रोत, Karnataka police

दरम्यान, पोलिसांना सापडल्यानंतर नीना कुटीना एएनआय वृत्तसंस्थेशी बोलताना म्हणाल्या होत्या की, "आम्हाला निसर्गात राहायला आवडायचं. आणि आम्ही काही असं खूप घनदाट जंगलात नव्हतो, जिथे अन्न मिळत नव्हतं, काही खरेदी करताच येणार नाही, असं काही नव्हतं.

ते गावापासून खूप जवळ होतं. आणि ती काही छोटीशी गुहा नव्हती. मोठी होती. जंगल म्हटल्यावर तिथं सापासारखे वन्यजीव आलेच. पण तो निसर्गाचाच भाग आहे, निसर्गाने आम्हाला कधीही त्रास दिला नाही."

व्हिसा संपण्याच्या मुद्यावर प्रश्न विचारला असता नीना म्हणाल्या, "ते खोटं बोलत आहेत. ते तसं सांगत आहेत कारण त्यांना माझा जुना पासपोर्ट मिळाला. आमच्या व्हिसाची मुदत संपली आहे. पण ती काही दिवसांपूर्वीच.

2017 पासून आम्ही जवळपास चार देशांमध्ये जाऊन, पुन्हा भारतात आलो आहोत. माझ्या मुलाचा मृत्यू झाला. त्याच दरम्यान व्हिसा संपला, पण त्याला खूप काळ लोटला नाही."

नीना आणि त्यांच्या दोन मुली पोलिसांना कशा सापडल्या?

पोलिसांच्या गस्त घालणाऱ्या टीमला या गुहेच्या प्रवेशाजवळ जवळपास '700 ते 800 मीटर खाली' काही कपडे दिसले. त्या गुहेत कोणीतरी राहत असल्याची ती चिन्हं होती. ते पाहून पोलीस आश्चर्यचकित झाले.

पोलिसांचं गस्त पथक जंगलातून जात होतं. तेव्हा त्यांना एक परदेशी दिसणारी मुलगी गुहेतून पळत बाहेर येताना दिसली. जंगलात त्या मुलीला पाहून पोलिसांच्या पथकाला आश्चर्य वाटलं.

आम्हाला निसर्गाच्या सानिध्यात राहायला आवडायचं. निसर्गाने आम्हाला कधीच कोणता त्रास दिला नाही, असं या महिलेनं जंगलातील गुहेतल्या वास्तव्याबाबत एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं.

रशियन महिला

फोटो स्रोत, ANI

दरम्यान पोलिसांनी सांगितलं की ही महिला 2016 मध्ये बिझनेस व्हिसावर भारतात आली होती. तिच्या व्हिसाचा कालावधी जवळपास आठ वर्षांपूर्वीच संपला होता. आता या महिलेला रशियात परत पाठवण्याची तयारी केली जाते आहे.

जंगलात कशी पोहोचली रशियन महिला?

उत्तर कन्नड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम. नारायण यांनी बीबीसीला सांगितलं, "9 जुलैला आम्हाला गुहेच्या आसपास साप दिसले. गेल्या वर्षी या भागात रामतीर्थ डोंगराच्या जवळपास भूस्खलन झालं होतं. त्यामुळे हा परिसर धोकादायक आहे. त्यामुळे पोलिसांचं पथक या भागात कसून गस्त घालत होतं."

या 40 वर्षांच्या रशियन महिलेचं नाव नीना कुटीना आहे. नीना आणि त्यांच्या दोन मुली, प्रेमा (सहा वर्षे) आणि एमा (चार वर्षे) त्या जागी अतिशय आरामात राहत होत्या.

जंगलात गस्त घालणारे कर्नाटक पोलीस
फोटो कॅप्शन, जंगलात गस्त घालणारे कर्नाटक पोलीस

पोलीस अधीक्षकांनी सांगितलं, "इथं राहणं किती धोकादायक आहे, हे त्यांना समजवायला आम्हाला थोडा वेळ लागला."

एक आठवड्याआधी, नीना काही भाजीपाला आणि इतर सामान घेऊन आल्या होत्या. अन्न शिजवण्यासाठी त्यांनी जंगलातील लाकडाचा वापर केला. पोलिसांना तिथे नूडल्सची पाकिटं आणि एक लोकप्रिय ब्रँडच्या सॅलडचं पाकिट मिळालं.

'गुहेत पूजा करताना सापडली'

एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, पोलिसांनी जेव्हा या महिलेची चौकशी केली, तेव्हा तिनं पोलिसांना सांगितलं की ती गोव्याहून तिच्या मुलींसह इथे आली आहे.

पोलीस अधिकारी म्हणाले, "आमच्या टीमला त्या विठ्ठलाच्या मूर्तीची पूजा करताना देखील आढळल्या. महिलानं सांगितलं की भगवान कृष्णानं त्यांना ध्यान करण्यासाठी पाठवलं आहे आणि ती तपस्या करते आहे."

रशियन महिला

फोटो स्रोत, Karnataka police

नीना यांनी पोलिसांना सांगितलं की त्यांचा पासपोर्ट हरवला होता. मात्र पोलीस आणि वन अधिकाऱ्यांनी त्यांचा पासपोर्ट शोधून काढला. त्यांचं म्हणणं आहे की त्या नेहमीच भारतात येत-जात होत्या. मात्र 2017 मध्येच त्यांच्या व्हिसाचा कालावधी संपला होता.

18 ऑक्टोबर 2016 ते 17 एप्रिल 2017 दरम्यान नीना बिजनेस व्हिसावर भारतात आल्या होत्या. गोवा फॉरेनर्स रीजनल रजिस्ट्रेशन ऑफिसनं (एफआरआरओ) 19 एप्रिल 2018 ला त्यांना एक्झिट परमीट दिलं होतं. त्यानंतर त्या नेपाळला गेल्या आणि मग नंतर 8 सप्टेंबर 2018 ला भारतात परत आल्या.

सध्या पोलिसांनी या महिलेला एका आश्रमात ठेवलं आहे आणि मुलींना बालगृहात नेलं आहे.

अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की नीना आणि मुलींना बंगळुरूतील परदेशी नागरिकांसाठीच्या डिटेंशन सेंटरमध्ये नेण्यात येईल. त्यानंतर त्यांना रशियाला पाठवलं जाईल.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)