अमिताभ बच्चन ते रजनीकांत, 'हेमा कमिटी'च्या खळबळजनक अहवालावर सुपरस्टार्स चिडीचूप का?

    • Author, गीता पांडे
    • Role, बीबीसी न्यूज

केरळमधील न्या. हेमा समितीच्या अहवालामुळे सध्या भारतीय मनोरंजन उद्योगात उलथापालथ सुरू आहे. या अहवालात मल्याळम सिनेसृष्टीतील महिलांच्या लैंगिक छळाबाबतचे अनेक तपशील उघड करण्यात आले आहेत.

याविरोधात आता महिला एकजूट दाखवत असताना, भारतीय सिनेसृष्टीतील सुपरस्टार्स अर्थात प्रसिद्ध अभिनेते मात्र मौन बाळगून आहेत.

केरळमधील मल्याळम चित्रपट उद्योगातील 51 लोकांच्या साक्षींच्या आधारे हेमा समितीच्या अहवालात महिलांचे अनेक वर्षे होणारे शोषण मांडले गेले आहे.

अहवालात म्हटल्यानुसार, "मागणी होईल तेव्हा महिलांनी सेक्ससाठी स्वतःला उपलब्ध करून द्यावे आणि त्यांना कामाची गरज असेल, तर सतत अशी 'तडजोड' करावी लागेल, असे सांगण्यात आले.

पीडित महिला येत आहेत पुढे

मल्याळम सिनेमात काम करणाऱ्या महिलांनी स्थापन केलेल्या डब्ल्यूसीसी अर्थात ‘वुमन इन सिनेमा कलेक्टिव्ह’ (WCC) या संघटनेने 2017 मध्ये एका प्रसिद्ध अभिनेत्रीवर सामूहिक लैंगिक अत्याचार झाल्याची तक्रार केली होती. त्यात एका प्रसिद्ध निर्माता-अभिनेत्याचा हात असल्याचे समोर आले होते.

त्यानंतर सरकारकडून मल्याळम सिनेसृष्टीतील महिलांच्या समस्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि पीडितांना न्याय मिळवून देण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती हेमा यांच्या नेतृत्त्वाखाली समितीची स्थापना करण्यात आली. गेल्या महिन्यातच या समितीचा 290 पानांचा अहवाल प्रसिद्ध झाला. तथापि, त्यामध्ये काही लोकांची ओळख लपविण्यात आली होती.

परंतु, 19 ऑगस्ट रोजी हा अहवाल प्रसिद्ध झाल्यापासून अनेक महिला त्यांच्यावरील अत्याचाराच्या कहाण्या सांगण्यासाठी पुढे आल्या. त्यानंतर डझनभराहून अधिक अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक आणि इतर संबंधित व्यक्तींच्या विरोधात पोलिसांत तक्रारी दाखल झाल्या.

त्यानंतर केरळ सरकारने याबाबतचा तपास करण्यासाठी एसआयटीची अर्थात विशेष तपास पथकाची (SIT) स्थापना केली. हेमा अहवालात नमूद केलेल्या घटनांची चौकशी करावी, असे आदेश उच्च न्यायालयाने एसआयटीला दिले.

बॉलीवूडसह भारतातील चित्रपट उद्योगातील महिलांनी या प्रकारच्या छळाच्या वारंवार तक्रारी केल्या आहेत. त्यात प्रामुख्याने सिनेमातील कामाच्या बदल्यात लैंगिक सुखाच्या मागणीचा समावेश आहे.

चित्रपट समीक्षक आणि लेखिका शुभ्रा गुप्ता यांनी बीबीसीला सांगितले की, “भारतीय चित्रपट उद्योगात ही सडलेली वृत्ती खोलवर मुरली आहे. चित्रपट उद्योगातील अशी एकही महिला कलाकार सापडणार नाही, जिला या प्रकारचा त्रास झाला नसेल.

“प्रत्येकीने तक्रार करायचे ठरवले, तर त्यांच्या चौकशींसाठी अनेक दशके लागतील.”

डब्ल्यूसीसीच्या सदस्य, दीदी दामोदरन यांनी बीबीसीला सांगितले, की ‘‘हे घृणास्पद प्रकार वृत्तपत्रांचे मथळे झाले. टीव्हीवर प्राईम टाइम चर्चा झाल्या. त्यामुळे मोठी खळबळ माजली.

आपल्यासोबत घडलेल्या अशा भयंकर गोष्टींमुळे आपल्याला मल्याळम सिनेसृष्टीतून कसे बाहेर पडावे लागले, याबाबत आता अनेक महिला व्यक्त होऊ लागल्या आहेत. झालेल्या छळाचे त्यांच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत. सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना करावा लागला, तरी त्या व्यक्त झाल्या आहेत.’’

शेजारील राज्यांमध्येही अहवालाचे पडसाद

शेजारील तमिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि कर्नाटक येथील चित्रपट उद्योगातही हेमा समितीच्या अहवालाचे पडसाद उमटले आहेत.

तेलंगणामध्येही तेलगू चित्रपट उद्योगावरील अहवाल प्रकाशित करण्यासाठी सरकारवर दबाव वाढला आहे.

दोन वर्षांपूर्वी तेलंगणा सरकारने तेलुगू चित्रपट उद्योगातील लैंगिक छळ आणि कामाच्या ठिकाणचे वातावरण याची चौकशी करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमली होती. तिने 1 जून 2022 रोजी अहवाल सादर केला, मात्र तो अद्याप प्रकाशित करण्यात आलेला नाही.

महिलांच्या लैंगिक शोषणाकडे लक्ष वेधण्यासाठी तेथील नवोदित अभिनेत्री श्री रेड्डीने 2018 मध्ये सार्वजनिक ठिकाणी कपडे उतरवले होते. सिनेनिर्माता आणि दिग्दर्शकाने लैंगिक छळ केल्याचा आरोप तिने केला होता.

बंगाली चित्रपट उद्योगातील लैंगिक शोषणाच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी पश्चिम बंगालने एक समिती स्थापन केली आहे, असे अभिनेत्री रिताभरी चक्रवर्ती यांनी सांगितले. यामुळे सिनेसृष्टी भक्षकांपासून मुक्त होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

केरळ चित्रपट उद्योगाचा पर्दाफाश

कामाच्या ठिकाणी आवश्यक त्या सुविधा, सुरक्षा मिळावी यासाठी तमिळ आणि कन्नड चित्रपटसृष्टीतील महिलांनी राज्य सरकारांकडे मागणी केली आहे.

ज्येष्ठ तमिळ अभिनेत्री राधिका सरथकुमार यांनी याबाबत बीबीसीला सांगितले, की ‘‘हेमा समितीच्या अहवालामुळे बरीच जागरूकता निर्माण झाली आहे. यामुळे आता पुरुषांवर वचक राहील, अशी आशा वाटते आहे. यानिमित्ताने सिनेसृष्टीतील सर्व महिलांनी एकत्र येऊन या प्रकारांना आळा घालण्याची आणि बोलण्याची वेळ आली आहे.’’

मात्र या सर्व प्रकारामध्ये सिनेउद्योगातील पुरुषांकडून पाठिंबा मिळत नाही, हे निराशाजनक असल्याचे दीदी दामोदरन यांनी म्हटले आहे.

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल आणि मामुट्टी यांनी या अहवालाचे स्वागत केले आहे. परंतु त्यासोबतच सिनेउद्योगाचे नुकसान होईल, अशी काही कारवाई होऊ नये, असेही म्हटले आहे.

दामोदरन यांनी बीबीसीला सांगितले की, "या आमच्या हिरोंना आम्ही प्राणांपेक्षा प्रिय मानतो. परंतु आता ते खऱ्याखुऱ्या हिरोप्रमाणे कधी वागतील, याची आम्ही वाट पाहत आहोत."

तमिळनाडूतील अभिनेते आणि राजकीय नेते कमल हसन आणि विजय यांनी या प्रकारावर अद्याप मौन बाळगले आहे. तर, अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर 10 दिवस त्यावर न बोललेल्या सुपरस्टार रजनीकांत यांना चाहत्यांच्या टीकेचा सामना करावा लागला आहे.

अभिनेत्री सरथकुमार म्हणाल्या, "आयुष्यात प्रत्येकालाच कोणत्या ना कोणत्या छळाच्या अनुभवाला सामोरे जावे लागते. मग पुरुष या प्रकाराबद्दल असंवेदनशील का आहेत, हे कळत नाही. कदाचित हे आपल्याशी संबंधित नाही, म्हणून ते दुर्लक्ष करत असावेत. पण प्रत्येक वेळी स्वत:चे रक्षण करण्याची जबाबदारी स्त्रीवरच यावी, हे मात्र खेदजनक आहे."

बॉलिवूडच्या सुपरस्टार्सनी बाळगले मौन

या प्रकरणी अमिताभ बच्चन, शाहरुख खान, सलमान खान, आमिर खान, अक्षय कुमार आदी बॉलीवूडमधील मोठ्या कलाकारांनीही मौन बाळगणे पसंत केले आहे, याकडेही आता लक्ष वेधण्यात येत आहे.

शुभ्रा गुप्ता म्हणतात, "त्यांचे मौन असंवेदनशील आहे, परंतु ते अनपेक्षित नाही. या सगळ्यावर त्यांची प्रतिक्रिया आली असती, तर बाकी मला खूपच आश्चर्य वाटले असते. कारण 2008 मध्ये एका चित्रपटाच्या सेटवर अभिनेत्री तनुश्री दत्ताने एका अभिनेत्यावर तिच्याशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप केला होता.

"त्यानंतर बॉलीवूडमध्ये ‘मी टू’ चळवळ सुरू झाली होती. त्यानंतर काय काय घडले, ते आम्ही पाहिले आहे.

"काही काळ असे वाटले, की या प्रकाराच्या विरोधात बॉलीवूड पुढे येईल, त्यासाठी काही तरी करेल, पण नंतर सर्व वातावरण सोयीस्कररित्या शांत झाले. यात ज्यांच्यावर आरोप केला गेले होते, ते कलाकारही जणू काही घडलेच नाही, अशा प्रकारे सिनेसृष्टीत पुन्हा उजळ माथ्याने काम करू लागले.

"ज्या अभिनेत्रीने तक्रार केली होती, तिला मात्र पुन्हा सिनेसृष्टीत काम मिळाले नाही.

"बॉलीवूडमधील कोणत्याही आघाडीच्या अभिनेत्रीने आत्तापर्यंत अशा लैंगिक छळाच्या प्रकारांवर भाष्य केलेले नाही. अभिनेत्री तनुश्री दत्ताने तर हेमा समितीच्या अहवालाचे वर्णन ‘निरुपयोगी’ असेच केले आहे. कारण तिच्या म्हणण्यानुसार यापूर्वीच्या अशा अहवालांचा काहीही उपयोग झालेला नाही."

शुभ्रा गुप्ता म्हणतात, "आपल्याला त्रास होण्यापेक्षा यात न पडलेलेच बरे, या विचाराने सिनेकलाकार याबाबत काही बोलत नसावेत. शिवाय त्यांना सिनेसृष्टीत काम न मिळण्याचीही भीती वाटत असावी.

"आमिर खान किंवा शाहरुख खान असहिष्णुतेबद्दल बोलले होते तो काळ आठवतो? त्यांना त्याबाबत मोठ्या ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता."

तथापि, दामोदरन म्हणतात की, "हेमा अहवालाला मिळणाऱ्या प्रतिसादामुळे त्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. भारतातील पुरुषप्रधान चित्रपट उद्योगात लैंगिक विकृती खोलवर रुजली आहे. परंतु महिलांना त्यांच्या कामाच्या ठिकाणी ज्या प्रकारांचा सामना करावा लागतो, ते प्रकार आम्ही खपवून घेणार नाही. या गोष्टी बदलण्यासाठी आम्ही बांधील आहोत."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)