1.5 लाखाहून जास्त लोकांनी शोधण्याचा प्रयत्न केला पण चोरीला गेलेलं 'ते' बाळ मी नव्हेच...

    • Author, विबेके वेनामा
    • Role, बीबीसी स्टोरी

1964 मध्ये शिकागो हॉस्पिटलमधून एका दिवसाचं बाळ पॉल जोसेफ फ्रोंझाकची चोरी झाली होती. त्यावेळी संपूर्ण अमेरिकेतील वृत्तपत्रांमध्ये त्याची बातमी पहिल्या पानावर प्रसिद्ध झाली होती. नंतर दोन वर्षांनी एका अज्ञात मुलाची ते हरवलेलं बाळ म्हणून ओळख पटली, तेव्हा त्याला आई-वडिलांच्या ताब्यात देत त्यांना दिलासा देण्यात आला.

पुढं अनेक वर्षांनी पॉलचं नेमकं काय झालं होतं, हे शोधायला सुरुवात केली. त्यानंतर त्याला जे काही आढळलं ते धक्कादायक असंच होतं.

पॉल फ्रोंझाक 10 वर्षांचे असताना ख्रिसमसचे गिफ्ट शोधण्यासाठी आपल्या बंगल्याच्या तळघरात गेले. त्याठिकाणी एका छोट्याशा, कमी उंचीच्या जागेत, जाण्यासाठी त्यांनी सोफा बाजूला सरकावला. तिथं त्यांना तीन गूढ बॉक्स आढळले.

त्यामध्ये अनेक पत्रं, सहानुभूती दर्शवणारे लेख आणि वृत्तपत्राची काही कात्रणं होती. त्यापैकी एका कात्रणाचा मथळा होता, "चोरी गेलेल्या बाळासाठी 200 ठिकाणी शोधाशोध", दुसरा मथळा होता, "बाळ परत करण्याची मातेची अपहरणकर्त्यांना विनंती."

पॉल यांनी फोटोतील आई वडिलांचे फोटो ओळखले. फोटोमध्ये ते दोघं काहीसे अश्वस्थ आणि बरेच तरुण दिसत होते. त्यानंतर त्यांचं म्हणजे स्वतः पॉल जोसेफ यांचं अपहरण झालं होतं, हेही त्यांनी वाचलं.

"अरे व्वा!, हा तर मीच आहे!" असा विचार त्यांनी केला.

ती अत्यंत खळबळजनक कथा होती. 26 एप्रिल 1964 रोजी त्यांची आई डोरा फ्रोंझाक यांनी शिकागोच्या मायकल रीज हॉस्पिटलमध्ये एका बाळाला जन्म दिला. त्यादिवशी दिवसभर त्यांनी बाळाची काळजी घेतली होती.

कारण त्यावेळी बाळ इतर बाळांबरोबर नर्सरीमध्ये झोपलेलं नव्हतं. पण दुसऱ्या दिवशी सकाळी नर्सचा ड्रेस परिधान केलेली एक महिला, डोरा यांच्या खोलीत आली. ती बाळाला तपासण्यासाठी डॉक्टरकडे घेऊन गेली. पण कधीही परत आलीच नाही.

काहीतरी चुकीचं घडलं असल्याचं हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांच्याही लक्षात आलं होतं. त्यानंतर लगेचच त्यांनी अत्यंत वेगानं सगळीकडं शोधाशोध सुरू केली. पण, तरीही रुग्णालय व्यवस्थापनानं संबंधित अधिकारी किंवा बाळाच्या आई-वडिलांना अजूनही याबाबत माहिती दिली नव्हती.

सुमारे 3 वाजता त्यांनी बाळाचे वडील चेस्टर फ्रोंझाक यांना बोलावून घेतलं. ते कारखान्यात मशिनिस्ट म्हणून काम करत होते.

"माझ्या वडिलांना काम सोडून हॉस्पिटलमध्ये जावं लागलं. तिथं जाऊन त्यांनी त्यांच्या पत्नीला बाळ हरवलं असल्याचं सांगितलं," असं पॉल म्हणाले.

"तुम्ही रुग्णालयात आहात, म्हणजे सुरक्षित असाल, असं वाटत असतं. पण तिथंच तुमच्या बाळाचं अपहरण होतं."

त्यानंतर शिकागोच्या इतिहासातील सर्वात मोठी शोधमोहीम सुरू झाली. त्यात 1 लाख 75 हजार पोस्टाचे कर्मचारी, 200 पोलीस अधिकारी आणि एफबीआय या सर्वांचा समावेश होता.

त्या सर्वांनी मध्यरात्रीपर्यंत 600 घरांमध्ये शोधाशोध केली, पण काहीही हाती लागलं नाही.

पॉल यांना तळघरात जे सापडलं होतं, त्यामुळं ते अत्यंत उत्साहात होते. ते सर्व कात्रणं घेऊन वर आईकडे गेले. हे सगळं काही त्यांच्याबाबतच आहे का, असं त्यांना आईला विचारायचं होतं.

पण डोरा पॉलवर रागावल्या आणि त्यांना इकडे तिकडे शोधाशोध करणं बंद करायला सांगितलं. त्यानंतर डोरा यांनी मान्य करत म्हटलं की, "हो, तुझं अपहरण झालं होतं. पण तू आम्हाला परत सापडला. आमचं तुझ्यावर प्रेम आहे आणि तेच सर्वांत महत्त्वाचं आहे."

परत हा विषय काढायचा नाही, हे पॉल यांना समजलं होतं. त्यामुळं त्यांनी पुढची 40 वर्षं परत तो विषय काढलाही नाही.

पण तसं असलं, तरी त्यांची उत्सुकता संपलेली नव्हती. त्यामुळं ते घरात एकटे असले की, परत त्या छोट्याशा जागी जाऊन त्या विषयाबाबत अधिक वाचत असायचे.

त्यातूनच पॉल यांना या कथेचा पुढचा भाग समजला होता. तो म्हणजे ते फ्रोंझाक कुटुंबाबरोबर नेमके कशाप्रकारे राहायला आले होते.

अपहरणानंतर डोरा आणि चेस्टर हे जवळपास आठवडाभर हॉस्पिटलमध्येच राहिले होते. त्यांना बाळाबाबत काही माहिती मिळेल अशी आशा होती. त्यानंतर ते घरी परतले, तेव्हा त्यांना पत्रकारांनी अक्षरशः गराडा घातला होता.

या प्रकरणाला प्रचंड प्रसिद्धी मिळाल्यानंतरदेखील काहीही धागा सापडत नव्हता. त्यांचं बाळ बेपत्ताच झालं होतं. त्यानंतर हळूहळू या प्रकरणाचा तपासही थंड बस्त्यात गेला.

त्यानंतर जवळपास दोन वर्षांनी म्हणजे, मार्च 1966 मध्ये डोरा आणि चेस्टर यांना एफबीआयचं एक पत्र मिळालं. त्यांना न्यू जर्सीच्या नेवार्कमध्ये एक बाळ सापडलं होतं आणि ते बाळ त्यांच्या मुलाच्या वर्णनासारखंच दिसत होतं.

पुशचेअरमधील एका गर्दी असणाऱ्या शॉपिंग सेंटरमध्ये त्या बाळाला जुलै महिन्यात कोणीतरी सोडून गेलं होतं. त्यानंतर त्या बाळाला पालन पोषणासाठी एकर्ट्स कुटुंबाबरोबर ठेवण्यात आलं होतं.

त्यांनी चर्चमध्ये जाऊन त्या मुलाचं नाव स्कॉट मॅकिनली ठेवलं होतं. ते त्या बाळावर एवढं प्रेम करू लागले होते की, तेही या बाळाला दत्तक घेण्याचा विचार करत होते.

त्यांना तसं करता येण्यापूर्वीच न्यू जर्सी पोलिसांच्या हेर खात्यानं असा अंदाज लावला की, कदाचित हे बाळ शिकागोमधील हरवलेलं तेच बाळ म्हणजे पॉल असू शकतं.

एफबीआयनं त्यादिशेनं तपास सुरू केला. पण तपास पुढे नेण्यासाठी त्यांच्या हाती फार काही नव्हतं. पॉल जोसेफच्या रक्ताचे नमुने नव्हते किंवा रुग्णालयानं बाळाच्या हाताच्या बोटाचे किंवा पायाचे ठसेदेखील घेतलेले नव्हते. त्यांच्याकडे फक्त एक फोटो होता. तो फोटो पॉलचा जन्म झाला त्यादिवशी काढलेला होता. आणि त्या फोटोमध्ये बाळाच्या कानाचा जो आकार होता, तो त्या सापडलेल्या अज्ञात बाळाच्या कानाशी मिळताजुळता होता, एवढंच.

"त्यांनी पॉल असण्याची शक्यता असलेल्या सुमारे 10 हजारांपेक्षा अधिक बाळांची चौकशी, तपास केला होता. त्या सर्वांमध्ये मीच एकटा असा होतो, ज्याला ते पूर्णपणे नाकारू शकत नव्हते," असं पॉल म्हणाले.

ही बातमी ऐकल्यानंतर फ्रोंझाक दाम्पत्य आनंदी झालं. "त्याकाळी एफबीआय ही अत्यंत विश्वासार्ह संस्था होती. त्यामुळं ते जेव्हा एखादी गोष्ट सांगायचे तेव्हा त्यावर विश्वास ठेवला जायचा," असंही ते म्हणाले.

तीन महिन्यांनंतर ते शिकागोहून न्यू जर्सीला चिल्ड्रन्स सर्व्हिसमध्ये त्या बाळाला भेटण्यासाठी आले. कदाचित ते त्यांचं बाळ असण्याची शक्यता होती. त्या तिघांच्याही भेटण्यापूर्वी मानसशास्त्रीय दृष्टीकोनातून विविध चाचणी घेण्यात आल्या. स्कॉट अशी ओळख असलेल्या त्या बाळाला दत्तक घेण्याची परवानगीदेखील डोरा आणि चेस्टर यांना मिळाली होती.

"एक एफबीआय एजंट मला आत घेऊन गेले आणि त्यांनी आम्हाला एकमेकांची ओळख होण्यासाठी काही वेळ दिला," असं पॉल यांनी सांगितलं. "माझ्या आईला तिच्या मुलाला हॉस्पिटलमधून पळवून नेण्यापूर्वी त्याच्याबरोबर अर्ध्या दिवसापेक्षाही कमी वेळ घालवण्याची संधी मिळाली होती. त्यानंतर अनेक वर्षांनी तिनं या मुलाला पाहिलं होतं."

त्यावेळी संपूर्ण जग आपल्याकडे पाहत आहे, असं वाटलं होतं, असं नंतर डोरा पॉल यांना म्हणाल्या होत्या.

"हा माझा मुलगा आहे, अशी खात्री वाटत नाही," असं म्हणत डोरा त्या मुलाला परत त्याच जीवनात सोडून जाऊ शकत होत्या. किंवा "तो माझाच मुलगा आहे-आणि जरी नसला तरी त्याला भविष्यात अशा अत्यंत भयावह जीवनाचा सामना करण्यापासून वाचवायला हवं", असंही त्यांना म्हणता आलं असतं.

पण, तो त्यांचा मुलगाच आहे, असं डोरा म्हणाल्या.

"त्यांना जे योग्य वाटलं ते त्यांनी केलं आणि त्यांनी तसं केल्याचा मला आनंद आहे, " असं पॉल म्हणाले.

त्यांनी त्याला शिकागोला नेलं आणि अधिकृतरित्या दत्तक घेतलं.

फ्रोंझाक हे अत्यंत प्रेमळ पालक होते. तसंच जरा जास्त काळजी करणारेही होते. त्यामुळं कधी-कधी ते वादाचं कारण ठरायचं. पॉलला एका कॅथलिक स्कूलमध्ये पाठवण्यात येत होतं. त्याठिकाणी गणवेशाची अत्यंत कडक शिस्त होतं. दुसरीकडं पॉलला मात्र लांब केस ठेवायला आवडायचं.

एकदा असाच लांब केसावरून वाद सुरू असताना डोरा म्हणाल्या होत्या की, "तू आम्हाला परत सापडायलाच नको होता."

ते वाक्य पॉल यांच्याबरोबर कायमचं राहिलं. "अगदी आजही मी त्याच्याबाबत विचार केला, तर मला त्याची एक वेगळी जाणीव होते," असं पॉल म्हणाले.

हायस्कूलमधूल पदवी पूर्ण केल्यानंतर पॉल यांनी घर सोडत, गिटार वादक बनण्यासाठी अॅरिझोनामधील रॉक बँडमध्ये सहभागी झाले. पाच वर्षांनंतर जेव्हा हा बँड तुटला, तेव्हा ते शिकागोला परत आले. पण लवकरच त्यांना अस्वस्थ वाटू लागल्यानं ते एका वर्षासाठी लष्करात सहभागी झाले. त्यानंतर ते सेल्समन, मॉडेल आणि अभिनेता अशी कामं करत इकडे-तिकडं फिरत पाहिले. त्यानंतर अखेर ते लास वेगासमध्ये स्थायिक झाले.

"मी आयुष्यामध्ये किमान 50 वेळा राहाण्याची जागा बदलली आणि त्या दरम्यान सुमारे 200 पेक्षा जास्त नोकऱ्या किंवा कामं केली. पण मी कुठेही गेलो आणि काहीही करत असलो तरी, वृत्तपत्राची ती कात्रणं कायम माझ्याबरोबर असायची," असं ते म्हणाले.

2008 मध्ये पॉल यांनी दुसरं लग्न केलं. त्यांच्या पत्नी मिशेल शिक्षिका होता. काही दिवसांतच त्या गर्भवती राहिल्या. त्यामुळ पॉल अत्यंत आनंदी होती. पण डॉक्टरांनी जेव्हा त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वैद्कीय पार्श्वभूमीबाबत विचारलं तेव्हा, पॉलच्या अचानक लक्षात आलं की, याचं नेमकं उत्तर काय द्यायचं याबाबत त्यांना काही कळत नव्हतं.

जेव्हापासून त्यांना लहानपणीच्या अपहरणाबाबत सर्वकाही समजलं होतं तेव्हापासून त्यांना आपण खरंच आपल्या आई-वडिलांचा मुलगा आहोत का? असा प्रश्न पडत होता.

"मी शिकागोहून आणलेला एक मुलगा असण्याची किती शक्यता आहे? असा विचार माझ्या मनात सुरू झाला होता?"

"मी स्वतःला अचानक सर्वांपासून एवढं दूर असल्याचं अनुभवलं की, सर्वकाही माझ्यासाठी अनाकलनीय होतं."

पॉल यांना नेहमीच वाटायचं की, ते त्यांच्यामध्ये फिट होत नव्हते किंवा जुळत नव्हते. त्यांचे आई वडील त्यांचा लहान भाऊ डेव्ह हे काही प्रमाणात सारखेच होते. ते सगळेच काहीसे शांत आणि अंतर्मग्न स्वभावाचे होते. दुसरीकडं पॉल यांना मोठ्या आवाजातलं संगीत आणि मोटरबाईक्स यांची आवड होते. त्यांच्या दिसण्यातही वेगळेपणा होता.

"डेव्ह दिसायला अगदीच माझ्या वडिलांसारखा होता. त्याचा स्वभाव, चेहऱ्याचे हावभाव, शरीराची ठेवण सर्वकाही तसंच होतं. तर मी जराही तसा नव्हतो."

त्यामुळं मला आता एक प्रश्न सतावू लागला होता - खरंच चोरीला गेलेला तो मुलगा मीच होतो का?

"अनेक वर्षे मला आई-वडिलांसह डीएनए चाचणी करण्याची इच्छा होती. मी आनंदी नव्हतो असं नाही. पण, मला सत्य जाणून घ्यायचं होतं. मला प्रत्येकवेळी ते न करण्यासाठी कारणही सापडलं होतं. मला त्यांना दुखवायचंही नव्हतं. पण एक क्षण असा आला की, मला याबाबत सर्वकाही माहिती करून घेण्याची गरज वाटली," असं पॉल म्हणाले.

डीएनए चाचणीसाठी लागणाऱ्या खर्चामुळंही मी ते अनेकदा टाळलं होतं. पण 2012 मध्ये पॉल यांना घरी डीएनए चाचणी करता येणारी एक किट विक्रीसाठी उपलब्ध असल्याचं दिसलं आणि त्यांनी ती खरेदी केली.

पॉल यांचे आई वडील त्यांना भेटायला शिकागोहून आलेले होते. ते परत निघण्याच्या अंदाजे तासभर आधी पॉल यांनी धाडस करत पुन्हा एकदा तो विषय काढला.

"मी खरंच तुमचा मुलगा आहे का? असा विचार तुम्ही कधी केलाय का?" असं त्यांनी विचारलं. त्यावर आई वडिलांनी होकारार्थी उत्तर दिल्यानं पॉल यांनाही आश्चर्य वाटलं.

"तुम्हाला त्याचं उत्तर जाणून घ्यायला आवडेल का?" असं पॉल यांनी त्यांना विचारलं.

काही मिनिटांनंतर सर्वांनी नमुने घेतले आणि ते सगळे किटमध्ये सील केले. त्यानंतर पॉल आई वडिलांना एअरपोर्टला सोडण्यासाठी गेले.

त्यांचं विमान काही तासांनी लँड होणार होतं. पण त्याआधीच डोरा आणि चेस्टर यांचा विचार बदलला. त्यांनी पॉल यांना फोन केला आणि सॅम्पल चाचणीसाठी पाठवू नको असं सांगितलं. कारण तो त्यांच्यासाठी तो त्यांचाच मुलगा होता आणि त्यांच्यासाठी तो विषय तिथंच संपणारा होता.

"मी काही आठवडे ते सॅम्पल माझ्या टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलं. पण मला रोज द्विधा मनस्थितीचा सामना करावा लागत होता. कारण माझं आई वडिलांवर प्रेम होतं आणि मला त्यांच्या मताचा किंवा इच्छेचा आदर ठेवायचा होता. पण कधीकधी तुम्ही, तुम्हाला योग्य वाटेल तेच करत असता. सत्य शोधण्याचा प्रयत्न करत असाल, तर तुम्ही चुकीचे कसे असू शकता?" असा विचार पॉल यांनी केला.

त्यामुळं त्यांनी सॅम्पल पाठवून दिले.

त्यानंतर त्यांना जेव्हा चाचणीचे रिपोर्ट आल्याचा फोन आला तेव्हा पॉल कामावर होते. समोरून त्यांना खबरदारी म्हणून काही प्रश्न विचारण्यात आले, त्याची उत्तरं दिल्यानंतर त्यांना रिपोर्टमध्ये काय होतं, ते सांगण्यात आलं. ते म्हणजेच पॉल फ्रोंझाक हे डोरा आणि चेस्टर यांचा जैविक मुलगा असण्याची दूरपर्यंत शक्यता नसल्याचं, चाचणीतून समोर आलं होतं.

"मला अचानक जीवनाबाबतचा जो विचार मी केला होता, ते सर्व संपल्यासारखं वाटू लागलं. माझ्या चेहऱ्याचा रंग उडालेला होता. मी विचारशून्य होतो. पूर्णपणे घामाघूम झालो होतो," असं पॉल म्हणाले.

"मला स्वतःबाबत जे काही माहिती होतं, ते सर्वकाही म्हणजे - माझा वाढदिवस, माझी वैद्यकीय पार्श्वभूमी, पॉलिश वंशाचा असणं, कॅथलिक असणं आणि अगदी माझी रास, हे सर्वकाही अचानक गळून पडलं होतं आणि काही क्षणासाठी मला मी कोण? हेच माहिती नव्हतं."

या रिपोर्टमुळं दोन महत्त्वाचे प्रश्न समोर आले होते. डोरा आणि चेस्टर खरे आई-वडील नसतील तर सध्या पॉल म्हणून जो आहे त्याचे खरे आई-वडील कोण? आणि खऱ्या पॉलबरोबर नेमकं काय घडलं?

पॉल यांनी याबाबत आई-वडिलांना सांगण्याच्या आधी स्थानिक शोधपत्रकार जॉर्ज नॅप यांना फोन केला आणि त्यांची मदत मागितली. त्यानंतर लवकरच पुन्हा एकदा पॉल जोसेफ फ्रोंझाक हे राष्ट्रीय बातमीचा विषय बनले होते.

त्यांचे कुटुंबीय माध्यमांपासून दूर होते आणि त्यांच्यावर रागावलेलेही होते. ते जवळपास वर्षभर पॉल यांच्याशी बोललेच नाहीत.

"पण सर्वांना लक्षात यायला हवं की, हे सर्व करण्यामागचं मुख्य कारण म्हणजे, मला माझ्या पालकांच्या खऱ्या मुलाला शोधायचं होतं. ते जगातील सर्वात चांगले आई-वडील आहेत. मी त्यांच्या अपहरण झालेल्या मुलाचा शोध लावू शकलो, तर ती माझ्याकडून त्यांच्यासाठीची सर्वात मोठी भेट ठरू शकेल, असं मला वाटलं. त्यासाठी माध्यमांची मदत घेणं हा सर्वात चांगला मार्ग आहे, असं मला वाटलं," असं पॉल म्हणाले.

हे सर्व सार्वजनिक करण्याचा एक परिणाम म्हणजे, एफबीआयनं फ्रोंझाक अपहरणाची केस पुन्हा ओपन केली. त्यांनी जुन्या प्रकरणाशी संबंधित कागदपत्रांचे जवळपास 10 बॉक्स काढले. पण डीएनए चाचणीवरून चोरीला गेलेलं ते बाळ म्हणजे पॉल नव्हते हे स्पष्ट झालं होतं. त्यामुळे त्या कागदपत्रांपैकी काहीही पाहण्याचा अधिकार पॉल यांना नव्हता.

पण त्यांनी या केसवर काम केलेले निवृत्त एफबीआय एजंट बर्नी कॅरे यांच्याशी संपर्क साधून माहिती घेतली. त्यावेळी त्यांनी कबूल केलं की, त्यांना योग्य बाळ म्हणजे पॉलच सापडला आहे, याबाबत पथकातील काही जणांना तेव्हा खात्री पटलेली नव्हती.

दुसरीकडं पॉल यांना त्यांचे जैविक आई वडील शोधण्यात अधिक यश मिळालं.

डीएनए डिटेक्टिव्हज नावाच्या संस्थेतील काही स्वयंसेवकांनी विनामोबदला या प्रकरणावर काम करण्याचा निर्णय घेतला.

अनुवांशिकतेचा अभ्यास करणारे वंशशास्त्रज्ञ सेसे मूर यांच्या नेतृत्वातील हे पथक डीएनए चाचणी आणि तपासातील इतर माहिती या दोन्हीच्या मदतीनं काम करत होते. त्यात त्यांनी वृत्तपत्र आणि इतर सार्वजनिक माहिती तपासली, सोशल मीडियावर काही माहिती घेतली आणि फोनवरून अनेकांशी बोलले.

पॉल हे न्यू जर्सीमध्ये सापडलेले असले तरी, या टीमला त्यांचं कुटुंब टेनेसीचं असल्याचं समजलं. दरम्यान, त्यांच्या डीएनए चाचणीवरून त्यांचं मूळ हे अश्केनाझी ज्यूंचं (यहुदी) असल्याचं समोर आलं होतं.

"त्यांच्या कुटुंबातील एका बाजूचे आजी-आजोबा हे ज्यू (यहुदी) असायला हवेत हे मला कळलं होतं," असं मूर म्हणाल्या.

पण त्यांना अनेक धक्केही बसले. त्यांना यश मिळण्याच्या काही महिन्यांपूर्वी, ते पॉल यांचे नातेवाईक असल्याची शक्यता असलेल्या एका जणाशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी त्यांच्या कुटुंबातील काही जुळे हरवले असल्याचं सांगितलं होतं.

"त्यावेळी आम्हाला आपण योग्य मार्गावर आहोत असं वाटलं," असं मूर यांनी सांगितलं.

त्यांनी तपास सुरू केल्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे 3 जून 2015 रोजी त्या पॉल यांच्याशी फोनवरून बोलल्या.

"तुम्हाला जॅक या नावाबद्दल काय वाटतं?" असं त्यांनी विचारलं.

त्यावर पॉल यांनी "हे चांगलं आणि सामान्य नाव आहे," असं उत्तर दिलं.

"तेच तुमचं नाव आहे," असं मूर त्यांना म्हणाल्या.

त्यामुळं पॉल यांना समजलं की, त्यांचा जन्म जॅक रोसेंथल म्हणून झाला होता. तसंच त्यांना माहिती होतं, त्यापेक्षा त्यांचं वय सहा महिन्यांनी अधिक होतं. त्यांची नवी जन्मतारीख होती 27 ऑक्टोबर 1963.

पण त्यांना आणखी एक धक्का बसला होता. त्यांना एक जुळी बहीणही होती, पण तिची काहीही माहिती नव्हती. त्यामुळं आता पॉल यांना आणखी एका तिसऱ्या व्यक्तीला शोधायचं होतं.

जॅक यांच्या मते, "एखाद्याला जुळं भावंड आहे आणि त्यानं आयुष्यात कधीही त्याला पाहिलं किंवा भेटलं नाही, असं तुम्ही कधीच ऐकलं नसेल."

नातेवाईकांबरोबरची पॉल यांची पहिली भेट रोमांचक होती.

पॉल यांना नेहमीच संगीताची आवड होती. त्यांच्या नात्यातला एक भाऊ लेन्नी रोक्कोदेखील म्युझिशियन आहे हे समजल्यानंतर त्यांना आनंद झाला होता. लेन्नी हे 1950 च्या काळातील डू वॉप प्रकारची गाणी गायचे.

"माझ्यासाठी हे सिद्ध झालं होतं की, संगीतासारखे गुण किंवा वैशिष्ट्ये तुमच्यात असण्यासाठी तुम्हाला तुमच्या खऱ्या आई वडिलांनीच सांभाळायला हवं असं काही नाही. मी कधीही याच्या संपर्कात नव्हतो, तरीही त्याकडे ओढला गेलो," असं पॉल यांनी म्हटलं.

"मी संपूर्ण जीवनात बँडमध्ये संगीताचा आनंद घेत होतो. नंतर मला जेव्हा खऱ्या कुटुंबाला भेटता आलं, तेव्हा मला लेन्नी यांच्या बँडबरोबरही संगीत अनुभवता आलं."

मूर यांनी हजारो कुटुंबांची भेट घडवून आणलेली आहे, त्यामुळं त्यांना कायमच अशी चित्रं पाहायला मिळत होती.

"वेगवेगळ्या ठिकाणी लहानाचे मोठे झालेले लोक एकमेकांना भेटतात आणि तरीही त्यांच्यामध्ये अनेक साम्य असतात," असं त्या म्हणाल्या.

"इथं मुद्दा फक्त ते कसे दिसतात एवढाच नसतो. तर जीवनात त्यांनी घेतलेले निर्णय, त्यांनी कुणाशी लग्न केलं, त्यांनी मुलांची नावं काय ठेवली, अगदी त्यांच्या फोनचे पासवर्ड काय आहेत, अशा अनेक गोष्टींचा इथं विचार होतो. माझा असा ठाम विश्वास आहे की, आपल्याला वाटतं त्यापेक्षाही बरंच काही आपल्या डीएनएमध्ये दडलेलं असतं, हा केवळ योगायोग असू शकत नाही."

पण सगळ्याच नातेवाईकांनी पॉल यांचं खुल्या मनानं स्वागत केलं असंही नाही. लवकरच पॉल यांना त्यांच्या जैविक कुटुंबाची दुसरी किंवा काळी बाजूदेखील समजली. त्यांची आई मेरी या खूप दारू प्यायच्या आणि त्यांचे वडील गिल्बर्ट हे कोरियातून युद्ध करून आलेले अत्यंत रागीट स्वभावाचे व्यक्ती होते.

पॉल आणि त्यांची जुळी बहीण जिल यांच्याकडं प्रचंड दुर्लक्ष करण्यात आलं होतं, याचे पुरावे आहेत. त्यांना दोन मोठ्या बहिणी आणि एक लहान भाऊदेखील होता. पॉल आणि जिल कायम रडत असायचे. त्यांच्या एका भावानं तर एकदा दोघांना एका पिंजऱ्यात पाहिल्याचं सांगितलं.

नेमकं काय झालं हे कुणालाही माहिती नव्हतं. पण कुटुंबातील सदस्य जेव्हा या जुळ्या भावंडांबद्दल विचारायचे तेव्हा ते कुटुंबातील दुसरं कोणी तरी त्यांचा सांभाळ करत असल्याचं सांगायचे. पण तसं काहीही नव्हतं.

जिलबरोबर काहीतरी वाईट घडलं असावं आणि त्यामुळं जॅकपासून सुटका मिळवण्याचा निर्णय त्यांनी घेतला असेल, असं पॉल यांना वाटलं. कारण जुळ्या भावंडातील एकच असेल तर त्यांना त्याचं स्पष्टीकरण देता आलं नसतं.

पॉल यांनी त्यांच्या 'द फाँडलिंग' नावाच्या पुस्तकामध्ये त्यांच्या या उत्तरांच्या शोधासाठीचं वेड किंवा धाडसाच्या प्रवासातील चढ उतारांचं वर्ण केलंय. एक क्षण तर असाही आला होता जेव्हा त्यांनी त्यांचं जैविक कुटुंब म्हणजे रोसेंथल पूर्वी राहत असलेल्या एका घराच्या गार्डनमध्ये खोदूनही शोधाशोध केली होती. कदाचित त्यांच्या जुळ्या बहिणीचे अवशेष तिथं सापडतील असं त्यांना वाटलं होतं.

"माझे खरे आई-वडील हे खरंच फार चांगले लोक नव्हते. त्यांनी मला सोडून दिलं याबद्दल मी आभारी होतो, कारण त्यामुळंच मला फ्रोंझाक यांच्याबरोबर राहता आलं होतं. त्यांनी माझा जीव वाचवला," असं पॉल सांगतात.

अखेर डीएनए चाचणीच्या दोन वर्षांनंतर पॉलनं दत्तक घेतलेल्या आई वडिलांबरोबर म्हणजे फ्रोंझाक यांच्याबरोबरची सर्व कटुता संपवली. पहिल्यांदाच ते त्यांच्याबरोबर शांतपणे बसले आणि नेमकं काय घडलं होतं, याबाबत चर्चा केली. डोरा यांनी त्यांना त्यावेळी त्या नेमक्या कुठल्या मनस्थितीत होत्या, हे सांगितलं.

पॉल म्हणाले की, "माझ्या आता लक्षात येतं की, त्यावेळी ज्या घटना घडल्या त्यामुळं माझी आई आज अशी बनलीय. आईच्या मनात एका अपराधीपणाच्या भावनेनं कायमचं घर केलं होतं. नर्सच्या हाती पॉलला सोपवण्याच्या निर्णयाबद्दलची ती भावना होती. हॉस्पिटलमध्ये नर्स बाळ मागतात आणि आपण ते त्यांच्या ताब्यात देतो, असं सगळेच करत असतात हेही आईला माहिती होतं. तरीही आयुष्यभर त्याबाबतची खंत तिच्या मनात साठलेली होती."

डोरा यांनी पॉलला एक फोटो अल्बम आणि काही पत्रंही दिली. एकर्ट्स दाम्पत्यानं ती त्यांच्याकडं दिली होती. त्यांनी वर्षभर पॉलचा सांभाळ केला होता आणि स्कॉट मॅकिनली असं नाव ठेवलं होतं, त्यावेळचे ते फोटो आणि इतर साहित्य होतं.

"माझ्या आईकडे संपूर्ण आयुष्यभर हा अल्बम होता, पण तिनं कधी त्याचा उल्लेखही केला नाही. त्यामुळं माझ्या डोळ्यासमोर सर्वकाही अस्पष्ट झाल्यासारखं झालं होतं. कारण मी लहान होतो, तेव्हाचे हे सर्वात पहिले फोटो होते. अगदी माझ्या खऱ्या कुटुंबाकडंही मी बाळ असतानाचे फोटो नव्हते. माझ्या आजीकडं एक फोटो अल्बम होता. त्यात सर्व भावंडांचे फोटो क्रमानं लावलेले होते. पण त्यातलं माझ्या आणि बहिणीच्या फोटोचं पान फाडलेलं होतं."

पॉल यांचे वडील चेस्टर यांचं काही वर्षांपूर्वी निधन झालं. पण पॉल दर दोन दिवसांत आईबरोबर म्हणजे डोरा यांच्याबरोबर फोनवरून बोलू लागले. योगायोग म्हणजे डोरा आणि पॉल यांचा वाढदिवस सारखाच म्हणजे 27 ऑक्टोबरला असतो.

डोरा यांच्या पॉल यांनी लिहिलेल्या पुस्तकाबाबतच्या काही संमिश्र भावना आहेत. "मी प्रत्येक गोष्टीबद्दल एवढं प्रामाणिक आणि खुलेपणानं वागायला नको होतो, असं आईला वाटतं. पण मी प्रामाणिकपणेच पुस्तक लिहिलं," असं पॉल म्हणाले.

डोरा यांच्या मुलाबरोबर नेमकं काय घडलं याचा शोध घेण्याबाबत पॉल यांनी निश्चय केलाय. या प्रकरणावर अजूनही एक खासगी गुप्तहेर त्यांच्यासाठी काम करतोय. आता पुढचं पाऊल मृतदेह खोदून पाहणं हेच असल्याचं ते सांगतात.

खरं तर त्यांना दोन मृतदेह खोदून तपास करायचा आहे.

"आम्हाला काही पुरावे मिळाले आहेत. त्यामुळं ते कदाचित डोरा यांचा जैविक मुलगा पॉल आणि माझ्या जुळ्या बहिणीबद्दल असण्याची शक्यता आहे."

अशा प्रकारे मृतदेह खोदून तपास करणं ही अत्यंत खर्चिक आणि गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. पण पॉल हे ठाम आहेत. कारण त्यांच्यासमोर अजूनही अनेक अनुत्तरीत असे प्रश्न आहेत.

"ही गोष्ट कोणत्याही अर्थानं इथंच संपलेली नाही," असं ते म्हणतात.

ते आणि त्यांची दुसरी पत्नी यांचा आता घटस्फोट झालाय. पण तरीही ते चांगले मित्र आहेत. स्वतःबद्दलच्या शोधासाठी असलेल्या वेडामुळं त्यांचं नातं तुटण्याची वेळ आली असावी, असं पॉल मान्य करतात.

"एक काळ असा आला होता, जेव्हा मी अगदी प्रत्येक क्षणाला या शोधाशी संबंधित काहीतरी करत असायचो," असं ते म्हणाले. मात्र, त्यांना त्याबद्दल वाईट वाटत नाही.

"मी हे करायलाच हवं होतं. त्यामुळं मला अधिक शांत वाटतं."

यामुळं त्यांना स्वतःबद्दलदेखील काही गोष्टी समजण्यास मदत झाली. उदाहरणादाखल ते कधीही स्थिर-स्थावर का होऊ शकले नाही, अशा गोष्टी.

"सुरुवातीच्या काही वर्षांनी खऱ्या अर्थानं मी कोण बनणार यासाठी मला आकार दिला. मी कुठूनही दुसऱ्या ठिकाणी जायला तयार होतो. कोणतीही नोकरी, कोणतीही परिस्थिती असली तरी मागे वळून पाहायचं नाही. मला वाटतं कदाचित बालपणीच तीन वेगवेगळी आयुष्य जगल्याचा हा परिणाम असू शकतो. कारण अगदी कमी वयापर्यंतच मला तीन वेगवेगळ्या ओळखी मिळालेल्या होत्या. त्यामुळं तुम्ही काहीही कसं स्वीकारता यावर सर्व अवलंबून आहे. तग धरून राहणं आणि पुढच्या दिवसाकडं वाटचाल करणं, हे सर्व त्यातून आलं असावं."

सेसे मूर यांनाही या सर्वाचा चिमुकल्या पॉलवर कसा परिणाम झाला असेल, याचं आश्चर्य वाटलं. पॉल यांची जेव्हा एफबीआयकडून चौकशी केली जात असेल तेव्हा नेमकं काय घडलं असावं, हे जाणून घेण्याची मूर यांना उत्सुकता आहे.

"ते बाळ पॉल फ्रोंझाक आहे, या निर्णयापर्यंत ते कसे पोहोचले? ते बाळ नक्कीच तेव्हा धक्क्यामध्ये असेल. पण त्या धक्क्याचं चुकीचं कारण गृहित धरण्यात आलं का? कदाचित बाळाला कुटुंबाकडून मिळालेल्या वाईट वागणुकीमुळं बसलेला धक्का हा अपहरणामुळं बसलेला धक्का आहे असं तर समजलं गेलं नाही?" असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले.

पॉल यांची मुलगी एमा आता 14 वर्षांची आहे. तिला पॉल यांना जॅक म्हणण्यात गंमत वाटते. कधी-कधी ती चिडवण्यासाठीही तसं करते. पण पॉल यांनी त्यांचं नाव बदलण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही.

"जोपर्यंत त्यांना पॉल सापडत नाही, तोपर्यंत मी पॉलच राहणार. ज्यादिवशी पॉल सापडेल, त्यावेळी मी पॉलला त्याचं जन्माचं प्रमाणपत्र देईल आणि माझं मिळवण्यासाठी निघून जाईल."

पॉल जोसेफ फ्रोंझाक यांनी अॅलेक्स ट्रेस्निऑस्की यांच्यासह द फाँडलिंग नावाचं पुस्तक लिहिलं आहे. त्यात अपहरणाची खरी गोष्टं, कुटुंबाबतची काही गुपितं आणि त्यांच्या अस्तित्वाबद्दल माहिती आहे.

या प्रकरणाबद्दल कुणालाही काही माहिती असेल, तर ती त्यांना पुढील शोधासाठी हवीच आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)