भारतीय सैनिकांनी जेव्हा जेरुसलेममधील अल अक्सा मशिदीचं संरक्षण केलेलं

    • Author, गुरजोत सिंग
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

ल्यालपूरचे पाल सिंग, पटियालाचे आसा सिंग, अजनालाचे मगर सिंग, ग्वाल्हेर इन्फंट्री (पायदळ) चे सीताराम आणि गाझियाबादचे बशीर खान यांच्या कबरी किंवा समाधीस्थळं त्यांच्या जन्मस्थानापासून हजारो मैल दूर जेरुसलेममधील एका स्मशानात आहेत.

पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धादरम्यान ब्रिटीश सैन्याचा भाग असलेले शेकडो सैनिक मध्यपूर्वेत मारले गेले होते.

पॅलेस्टाईन आणि मध्य पूर्वेतील इतर प्रदेशांमध्ये त्यावेळी मारल्या गेलेल्या सैनिकांची शेवटची स्मारकं आता इस्रायलमधे असलेल्या चार स्मशानभूमीत बांधण्यात आलेली.

इतकंच नाही तर त्यांच्या स्मृती जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या नावाचे दगडही थडग्यांजवळ ठेवण्यात आलेले. ब्रिटिश सैन्यात मोठ्या प्रमाणात भारतीय सैनिक होते.

हे सैनिक अविभाजित पंजाब तसंच सध्याच्या भारत आणि पाकिस्तानच्या विविध भागातील होते.

इस्रायलमधील तेल अवीव येथील भारतीय दूतावासाने प्रसिद्ध केलेल्या 'मेमोरियल ऑफ इंडियन सोल्जर्स इन इस्रायल' या पुस्तिकेतही त्यांच्या नावांचा उल्लेख आहे. हे पुस्तक इस्रायलमधील भारताचे तत्कालीन राजदूत नवतेज सिंग सरना यांच्या कार्यकाळात प्रकाशित झालेलं.

इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्ध सुरू होऊन एक महिन्याहून अधिक काळ लोटलाय.

7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केला ज्यात 1200 हून अधिक लोक मारले गेले. त्या दिवसापासून इस्रायल गाझावर सातत्याने बॉम्बफेक करत असून इस्रायलचे सैन्य उत्तर गाझामध्ये जमिनीवर कारवाई करतायत. हमासच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, आतापर्यंत 11,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय. उत्तर गाझाचा मोठा भाग उद्ध्वस्त झालाय आणि सध्या रुग्णालयांभोवती भीषण लढाई सुरू आहे.

या युद्धप्रश्नाच्या इतिहासाची चर्चा सोशल मीडिया आणि वृत्तपत्रांमध्येही जिवंत ठेवली जातेय.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला आताच्या इस्रायलमध्ये तैनात करण्यात आलेल्या भारतीय सैनिकांच्या छायाचित्रांबद्दलही सोशल मीडियावर लोकं आश्चर्य व्यक्त करतायत.

अल-अक्सा मशिदीबाहेर पगडीधारी सैनिकही तैनात करण्यात आलेले

सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये आताच्या इस्रायलमधील अल-अक्सा मशिद किंवा 'टेम्पल माउंट' बाहेर तैनात करण्यात आलेले पगडीधारी भारतीय सैनिक दिसतायत.

नवतेज सरना म्हणतात की ‘अल-अक्सा मशिद’ किंवा ‘टेंपल माउंट’ हे ज्यू आणि अरब या दोन्ही समुदायांसाठी एक महत्त्वाचं पवित्र स्थान आहे.

जेरुसलेमबाबत ज्यू आणि अरबांमध्ये अनेक दशकांपासून तणाव आहे आणि इथेही वेळोवेळी संघर्ष होत आलाय.

सरना सांगतात, "त्यावेळी हा भाग ब्रिटीश साम्राज्याच्या ताब्यात होता. भारतीय सैनिकांना तटस्थ मानलं जायचं, त्यामुळे सुरक्षेसाठी त्यांना इथे तैनात करण्यात आलेलं."

ते म्हणाले की, हे सैनिक इथे येणाऱ्या लोकांची झडतीसुद्धा घेत असत.

पंजाबी सैनिकांची भूमिका

सैन्याचे इतिहासकार मनदीप सिंग बाजवा सांगतात की, ब्रिटीश सैन्यात अविभाजित भारताच्या विविध भागांतील सैनिक तसंच अविभाजित पंजाबमधील सैनिकांचा समावेश होता.

इथल्या सैनिकांनी हैफाचे युद्ध आणि इतर अनेक लढायांमध्ये भाग घेतलेला.

मनदीपसिंग बाजवा म्हणतात की, त्यावेळी बहुतांश भारतीय सैनिक पगडी घालत त्यामुळे काहीवेळेस असा गैरसमज होई की बहुतेक सैनिक पंजाबी किंवा शीख होते.

परंतु, शिखांनी त्यांच्या लोकसंख्येच्या मानाने खूप मोठं योगदान दिलंय. सिनाई-पॅलेस्टाईन मोहिमेतही शिखांनी महत्त्वाची भूमिका बजावली, तसंच पश्चिम आघाडी, इराक (त्यावेळचे मेसोपोटेमिया) इथलीही त्यांची भूमिका महत्त्वाची होती.

दुसर्‍या महायुद्धापर्यंत बहुतांश भारतीय सैनिक पगडी बांधायचे. दुस-या महाद्धाच्या दरम्यान भारतीय सैनिकांच्या पोशाखात बदल होण्यास सुरूवात झाली.

काही वर्षांपूर्वी इस्रायल सरकारने प्रसिद्ध केलेल्या पोस्टाच्या स्टॅम्पबाबत ते म्हणाले की, इस्रायलने प्रसिद्ध केलेलं टपाल तिकीट केवळ शीख सैनिकांच्या सन्मानार्थ नाही, तर सर्व भारतीय सैनिकांच्या सन्मानार्थ आहे.

मनदीप सिंग बाजवा सांगतात की, इथे लढलेली 'हैफाची लढाई' ही पहिल्या महायुद्धातील अत्यंत महत्त्वाची लढाई होती.

1918 च्या हैफाच्या युद्धातही भारतीय जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. मनदीप सिंग बाजवा म्हणतात की हैफाची लढाई ही ब्रिटिश सैन्य आणि तुर्क साम्राज्याच्या सैन्यामधील निर्णायक लढाई होती.

ब्रिटिश साम्राज्यासाठी लढणाऱ्या सैन्यात घोडदळ मोठ्या प्रमाणात होतं. त्याने तुर्की सैन्याचा पराभव केलेला.

ब्रिटिश सैन्यात त्यावेळी भारतीय राज्य दलाच्या तुकड्यांचा समावेश होता, त्यांना 'इम्पीरियल सर्व्हिस ट्रूप्स' असंही म्हणतात.

हैफाच्या या लढाईत जोधपूर लान्सर्स आणि म्हैसूर लान्सर्सने महत्त्वाची भूमिका बजावली होती.

सैनिकांच्या त्या तुकड्या जोधपूर आणि म्हैसूर कुटुंबातील होत्या.

मनदीप सिंह बाजवा सांगतात की पटियाला घराण्याशी संबंधित पटियाला लान्सर 'हैफाच्या लढाई' दरम्यान सैन्याचा भाग होते, परंतु ते युद्धात सहभागी झाले नाहीत.

हैफाच्या लढाईत पंजाबी सैनिकांच्या भूमिकेबाबत ते म्हणतात की, त्यात शीख सैनिकांचा सहभाग असल्याची चुकीची माहिती सोशल मीडियावर पसरवण्यात आलेय .

'जागतिक युद्धांमध्ये पंजाबी किंवा भारतीय सैनिकांनी मोठी भूमिका बजावलेय ही अभिमानाची बाब आहे, मात्र हैफाच्या युद्धात शीखांच्या सहभागाचा दावा खरा नाही.’, असंही ते म्हणाले.

बाबा फरीद यांच्याशी संबंधित ठिकाणे

नवतेज सरना म्हणतात की, दुसऱ्या महायुद्धात पॅलेस्टाईनमध्ये मोठं युद्ध झालं नाही. नवतेज सरना हे 'द हेरोड्स गेट - अ जेरुसलेम टेल' या पुस्तकाचे लेखक आहेत.

ते म्हणाले की, भारतीय सैनिक जेरुसलेममध्ये लिबिया, लेबनॉन, इजिप्त आणि इतर भागातून विश्रांती आणि उपचारासाठी येत असत.

भारतीय धर्मशाळेत ते विश्रांती घेत, ज्याला बाबा फरीद धर्मशाळा असंही म्हणतात. बाबा फरीद (शेख फरीद शकरगंज) यांनी 1200 साली या ठिकाणी भेट दिलेली.

पहिल्या महायुद्धात पॅलेस्टिनी प्रदेशातील अनेक महत्त्वाच्या लढायांमध्ये भारतीय सैनिकांचा सहभाग होता. भारतीय लष्करातील मेजर दलपत सिंग यांना आजही हैफाच्या लढाईचे नायक मानलं जातं.

भारतीय दूतावासाने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेनुसार, 'अविभाजित भारताच्या सैनिकांनी मध्यपूर्वेतील विशेषत: पॅलेस्टाईनमधील दोन्ही महायुद्धांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली होती.

भारतीय दूतावासाने प्रकाशित केलेल्या पुस्तिकेनुसार, सुमारे 1,50,000 भारतीय सैनिक आताच्या इजिप्त आणि इस्रायलमध्ये पाठवण्यात आलेले.

इथल्या सैनिकांनी सप्टेंबर-ऑक्टोबर 1918 च्या पॅलेस्टाईन मोहिमेत भाग घेतलेला.

'कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्हज कमिशन'नुसार पहिल्या महायुद्धात 1,302,394 भारतीय सैनिक सहभागी झालेले, तर दुसऱ्या महायुद्धात सहभागी झालेल्यांची संख्या 25 लाखांवर पोहोचली होती.

भारतीय सैनिक जेव्हा पॅलेस्टाईनमध्ये पोहोचले

लष्करी इतिहासकार मनदीप सिंग बाजवा यांनी सांगितलं की पॅलेस्टाईन हे महत्त्वाचं ठिकाण होतं जिथे ब्रिटिश सैन्याने ऑट्टोमन साम्राज्याविरुद्ध लढा दिला.

ऑट्टोमन साम्राज्याच्या सीमा सिनाई, सीरिया आणि जॉर्डनपर्यंत विस्तारलेल्या होत्या.

ते म्हणाले की, ज्या युद्धाने सध्याच्या इस्रायलचा पाया रचलाय त्याच युद्धादरम्यान बाल्फोर जाहिरनामा (अल्पसंख्यांक ज्यू समुदायासाठी पॅलेस्टाईनमध्ये ‘राष्ट्रीय घर’ स्थापनेला समर्थन देणारी ब्रिटिश घोषणा) प्रसिद्ध करण्यात आला होता.

नवतेज सरना म्हणाले की, 1917 मध्ये ब्रिटीश जनरल अॅलेनबीने जेरुसलेम काबीज केलं तेव्हा भारतीय सैनिक अॅलेनबाईच्या सैन्याचा भाग होते.

स्थानिक लोक या सैनिकांच्या आवठणी कशा जागवतात?

नवतेज सरना सांगतात की हैफाच्या लोकांना मेजर दलपत सिंग यांच्या सन्मानार्थ पुतळा बांधायचा आहे. आम्ही त्यांना पाठिंबा दिला.

त्यामुळे 23 सप्टेंबर रोजी 'हैफा डे' निमित्त वार्षिक उत्सव सुरू करण्यात आला.

ते म्हणाले की हैफा स्मशानभूमी हे हैफाच्या युद्धात सहभागी झालेल्या सैनिकांचे स्मारक नसून इतर सैनिकांचे स्मारक आहे.

हैफा स्मशानभूमीत ज्या सैनिकांचं स्मारक बनवण्यात आलंय, त्या सैनिकांचं या दिवशी स्मरण केले जातं, तसंच 'हैफाच्या लढाईत’ सहभागी झालेल्या सैनिकांचंही स्मरण केले जातं, असंही त्यांनी सांगितलं

आता केवळ पर्यटकच नाही तर इस्रायलला भेट देणारे अधिकारीही इथे आदरांजली वाहण्यासाठी जातात.

नवतेज सरना म्हणतात की, आता बराच काळ उलटून गेल्यामुळे लोकांना सैनिकांबद्दल फारशी माहिती नाही.

'जे अजूनही हैफामध्ये राहतात त्यांना हैफाच्या युद्धात लढलेल्या सैनिकांची आठवण आहे. त्यांच्यावर काम करणारी हैफा हिस्टोरिकल सोसायटी देखील आहे.’, असंही ते म्हणाले.

भारतीय सैनिकांची स्मारकं कुठं आहेत?

इस्रायलमध्ये चार स्मशानभूमी आहेत जिथे भारतीय सैनिकांना दफन केलं गेलंय किंवा त्यांची स्मारकं बांधण्यात आली आहेत.

‘जेरुसलेम भारतीय युद्ध स्मशानभूमीत’ जुलै 1918 ते जून 1920 दरम्यान दफन करण्यात आलेल्या 79 भारतीय सैनिकांच्या कबरी आहेत, त्यापैकी एकाची ओळख पटलेली नाही.

हैफा इंडियन वॉर सेमेटरीमध्ये पंजाब, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि हैदराबाद येथील सैनिकांच्या कबरी आहेत.

बहुतांश भारतीय जवानांना 'रामल्ला वॉर सिमेट्री'मध्ये दफन करण्यात आलंय. या स्मशानभूमीत 528 कबरी आहेत. पहिले जागतिक स्मारकही इथे आहे.

1941 मध्ये स्थापन झालेल्या 'खयात बीच वॉर सेमेटरी'मध्ये दुसऱ्या महायुद्धातील 691 सैनिकांच्या कबरी आहेत, ज्यापैकी 29 भारतीय होते.

नवतेज सरना सांगतात की पहिल्या महायुद्धात लढलेल्या सैनिकांची स्मारके कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्हज कमिशनने स्थापन केली होती.

या स्मशानभूमींपैकी हैफा ही महत्त्वाची स्मशानभूमी असल्याचं त्यांनी सांगितलं.

हैफाची लढाई 1918 मध्ये झाली. म्हैसूर, जोधपूर, बिकानेर लान्सरच्या तुकड्या यात सहभागी झालेल्या. या तुकडयांच्या स्मरणार्थ नवी दिल्ली येथे ‘तीन मूर्ती स्मारक’ उभारण्यात आलंय.

सैनिक त्याच भागात मरण पावले किंवा तिथेच दफन केलं गेलं असं नाहीए. काहीवेळा सैनिकांचे स्मारक म्हणून त्यांच्या कबरींवर त्यांच्या नावाचे दगड ठेवले गेलेत.

सरना सांगतात की, हे सैनिक हिंदू, मुस्लिम आणि शीख धर्मातील होते.

'आम्ही या ठिकाणांची ओळख पटवली, माहिती गोळा केली, छायाचित्रे काढली आणि यापूर्वी कधीच झाली नसेल अशा पद्धतीने पुस्तिका प्रकाशित केली, असं ते म्हणाले.

ते म्हणाले, 'आम्ही युद्ध कबरीवर राष्ट्रकुल आयोगासोबत जवळून काम केलंय आणि आता जेव्हा जेव्हा भारत सरकारचे प्रतिनिधी तिथे भेट देतात तेव्हा या ठिकाणी आदरांजली वाहतात.’

लष्करी इतिहासकार मनदीप सिंग बाजवा यांनी सांगितलं की, कॉमनवेल्थ वॉर ग्रेव्हज कमिशन सुमारे 60 देशांमध्ये बांधलेल्या ब्रिटीश साम्राज्याच्या सैनिकांच्या स्मशानभूमींची देखरेख करतं. यावर होणा-या खर्चातही भारत योगदान देतो.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)