अल-अक्सा मशीद इस्रायल आणि पॅलेस्टाईनसाठी का महत्त्वाची आहे?

इस्लामी कट्टरवादी गट 'हमास'ने इस्रायलवर अचानक हल्ला करून देशात प्रवेश केला आहे.

शनिवारी (7 ऑक्टोबर) सकाळी गाझा पट्टीतून इस्रायलच्या दिशेने तब्बल 5 हजार रॉकेट्स डागण्यात आल्याचा हमास या इस्लामी कट्टरतावादी गटाने दावा केला आहे.

या रॉकेट हल्ल्यांनंतर इस्रायलमध्ये हवाई हल्ल्याच्या धोक्याचे सायरन वाजले. तेल अवीव आणि दक्षिण गाझाच्या आसपासच्या भागात स्फोट झाल्याचंही वृत्त आहे.

या हल्ल्यात इस्रायलमधील एका महिलेचा मृत्यू झाल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे, तर 15 जण जखमी झाले आहेत.

या हल्ल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांनी आम्ही युद्धात असून आम्हीच जिंकू अशी प्रतिक्रिया दिली आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार नेत्यानाहू म्हणाले, आमच्या शत्रूला कळणारही नाही इतकी याची किंमत मोजावी लागेल.

'अल-अक्सा'वरून वाद का आहे?

1948 च्या अरब इस्रायली युद्धापासून आंतरराष्ट्रीय कायद्यानुसार जेरुसलेमचा पूर्व भाग पॅलेस्टिनी प्रदेश म्हणून ओळखला जातो.

1967 साली पुन्हा युद्ध झालं, तेव्हा इस्रायलनं या ईस्ट जेरुसलेमवर कब्जा केला आणि अख्ख शहरच आपलं असल्याचा दावा केला, जो बहुतांश देशांना मान्य नाही. दुसरीकडे ईस्ट जेरुसलेम ही आपल्या स्वतंत्र देशाची राजधानी असेल अशी आशा पॅलेस्टिनी लोक करतात.

याच पूर्व जेरुसलेमच्या भागात या शहराचा जुना भाग म्हणजे ओल्ड सिटी आहे जी चार भागांत विभागली आहे. ख्रिस्ती क्वार्टर, मुस्लीम क्वार्टर, ज्यूईश क्वार्टर आणि अर्मेनियन क्वार्टर्स नावानं हे भाग ओळखले जातात.

या चारही भागांना इतर शहरापासून वेगळं करणारी किल्लेवजा तटबंदी सुद्धा आहे.

ओल्ड सिटीमध्येच ज्यू, इस्लाम आणि ख्रिश्चन धर्मियांची पवित्र स्थळं आहेत. अल अक्सा मशीद त्यापैकीच एक आहे. अल हरम अल शरीफ आणि टेंपल माऊंट नावानंही हा परिसर ओळखला जातो.

इस्रायली आणि पॅलेस्टिनी दोघंही या जागेवर दावा करतात आणि त्यांच्यातल्या संघर्षातला हा एक कळीचा मुद्दा आहे.

अल-अक्सा आणि टेंपल माऊंट का महत्त्वाचा आहे?

अल-अक्सा किंवा टेंपल माऊंट परिसराच्या नकाशावर नजर टाकली, तर तिथे तीन प्रमुख वास्तू दिसून येतात. डोम ऑफ द रॉक, अल अक्सा मशीद आणि वेस्टर्न वॉल.

ज्यू लोकांच्या मान्यतेनुसार या त्यांची दोन प्राचीन मंदिरं याच जागी होती, आणि म्हणूनच या जागेला टेंपल माऊंट (मंदिराचा डोंगर) असं म्हटलं जातं.

ज्यूईश बायबलनुसार राजा सोलोमननं जेरुसलेममध्ये मंदिर उभारलं होतं जे सोलोमन्स टेंपल किंवा फर्स्ट टेंपल म्हणून ओळखलं जातं. एका आक्रमणात ते नष्ट झाल्यावर सेकंड टेंपल उभारण्यात आलं.

रोमन आक्रमणात सेकंड टेंपलही नष्ट झालं आणि आज केवळ त्याची एक भिंत शिल्लक राहिली आहे असं ज्यू लोक मानतात. हीच ती वेस्टर्न वॉल. या भिंतीच्या एका भागापाशी ज्यू धर्मिय प्रार्थना करू शकतात.

या भिंतीचं व्यवस्थापन ज्यू धर्मियांतर्फे केलं जातं आणि दरवर्षी जगभरातले लाखो पर्यटकही या स्थळाला भेट देतात.

याच टेंपल माऊंटवर आज 'डोम ऑफ द रॉक' आणि 'अल-अक्सा' मशीद उभी आहे. डोम ऑफ द रॉकच्या मध्यभागी असलेला खडक फाऊंडेशन स्टोन म्हणून ओळखला जातो, ज्याचा संबंध बायबलमधल्या जगाच्या निर्मितीच्या कथेशी आहे.

इथे एक लक्षात घ्यायला हवं, की मुळात ज्यू, ख्रिश्चन आणि इस्लाम हे तिन्ही अब्राहमिक म्हणजे इब्राहिमी धर्म आहेत. त्यामुळे त्यांच्या धार्मिक ग्रंथांत आणि कथांमध्ये साम्यं दिसून येतात.

ज्या अब्राहमपासून या धर्मांचा उगम झाला असं मानलं जातं, त्याची कहाणीही या फाऊंडेशन स्टोनशी जोडली गेली आहे. अब्राहमानं आपल्या मुलाचा त्याग करण्याची, बळी देण्याची तयारी दाखवली होती ती हीच जागा आहे, असं मानलं जातं.

तर इस्लामिक मान्यतेनुसार प्रेषित मोहम्मद पैगंबर एका रात्रीत प्रवास करून मक्केहून इथे आले होते.

पैगंबरांनी इथे इतर प्रेषितांसोबत प्रार्थना केली आणि मग स्वर्गाचा प्रवासही केला ज्यामुळे त्यांना नवं बळ मिळालं असं मुस्लीम मानतात.

त्यामुळेच इथे डोम ऑफ द रॉक आणि अल अक्सा मशिदीची उभारणी करण्यात आली.

डोम ऑफ द रॉक हा घुमट इस्लामिक स्थापत्यशैलीचा सगळ्यात जुना नमुना मानला जातो. या इमारतीवरचा सोनेरी रंगाचा घुमट ही जेरुसलेमची ओळखच बनली आहे.

या घुमटाशेजारीच एक छोटा घुमट आहे जो डोम ऑफ द चेन म्हणून ओळखला जातो आणि इस्लामिक मान्यतेतील 'कयामत'च्या दिवसाशी तो जोडला गेला आहे.

जॉर्डनच्या वक्फतर्फे या जागेची देखरेख ठेवली जाते. तर सुरक्षा व्यवस्था इस्रायल पाहतं.

इस्लाममध्ये मक्का आणि मदिनेनंतर हे तिसरं सर्वात महत्त्वाचं धर्मस्थळ आहे. त्यामुळे जगभरातून मुस्लीम लोकही या स्थळाला भेट देण्यासाठी येतात. विशेषत: रमझानच्या महिन्यात.

मुसलमान नसलेल्या व्यक्तींना इथे प्रार्थना करण्यास मनाई आहे आणि काही विशिष्ठ दिवसांत इथे अन्य धर्मियांना प्रवेश करता येत नाही.

म्हणजे खरंतर ही जागा ज्यू आणि मुस्लीम दोघांसाठी तेवढीच महत्त्वाची आहे. पण कदाचित म्हणूनच इस्रायल-पॅलेस्टाईन वादामुळे ती अनेकदा संघर्षाच्या केंद्रस्थानी येताना दिसते.

ख्रिश्चनांचंही पवित्र स्थान

जरुसलेमच्या ख्रिस्ती आणि आर्मेनियन भागात ख्रिश्चन धर्मियांचा प्रभाव दिसतो. ख्रिश्चनांच्या आर्मेनियन पंथाचे लोक प्रामुख्यानं सेंट जेम्स चर्चच्या परिसरात राहतात आणि हे या पंथाचं जगातलं सगळ्यात जुनं केंद्र आहे.

ख्रिश्चनांसाठी महत्त्वाचं चर्च ऑफ द होली सेपल्कर ख्रिस्ती भागात आहे.

येशू ख्रिस्तांना वधस्तंभावर नेणं, त्यांचा मृत्यू आणि पुनरुत्थान या सगळ्या घडामोडी ज्या परिसरात घडल्या, तिथे हे चर्च उभं असल्याची ख्रिश्चनधर्मियांची मान्यता आहे.

ख्रिस्ती मान्यतेनुसार येशू ख्रिस्तांना जिथे क्रूसावर चढवण्यात आलं ती गोलगोथा टेकडी तसंच त्यांचं थडगं याच चर्चच्या आवारात आहे. इथूनच त्यांचं पुनरुत्थानही झालं, अशी मान्यता आहे.

साहजिकच जगभरातील कोट्यवधी ख्रिश्चनांसाठी हे महत्त्वाचं धर्मस्थळ आहे. प्रार्थनेतून शांती आणि मोक्ष मिळवण्यासाठी ते या पवित्र स्थळाला भेटी देतात.

या चर्चचं व्यवस्थापन वेगवेगळ्या ख्रिस्ती संप्रदायांच्या प्रतिनिधींमार्फत केलं जातं.

जेरुसलेमचं महत्त्व

जेरुसलेमला हिब्रू भाषेत येरुशलायीम तर अरेबिक भाषेत अल-कड्स म्हणतात आणि हे जगातल्या सगळ्यांत जुन्या शहरांपैकी एक आहे. तीन धर्मांचा त्रिवेणी संगम झालेलं जेरुसलेम मुस्लीम, ख्रिस्ती आणि ज्यू अनुयायांच्या जिव्हाळ्याचं ठिकाण आहेच, पण ते अनेक शतकांपासून संघर्षाच्याही केंद्रस्थानी राहिलं आहे.

बीबीसीच्या एरिका चेर्नोफस्की लिहितात, "या शहरावर अनेक आक्रमणं झाली, ते उद्धवस्त करण्यात आलं, पुन्हा उभं राहिलं. इतिहासाच्या पानांमध्ये या शहराच्या भूतकाळाचे अनेक पदर सापडतील.

"वेगवेगळ्या धर्मांच्या अनुयायांमध्ये असलेले वाद, त्यातून निर्माण होणारा संघर्ष यावरच सगळ्यांचं लक्ष असतं. पण या शहराच्या पावित्र्याविषयी त्यांच्या मनात दुमत नाही. ही त्यांना एकत्र आणणारी एक बाब आहेच."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)