कृत्रिम पाऊस पाडणं महाराष्ट्रात आजवर का शक्य झालं नाही?

कृत्रिम पाऊस पाडणारे विमान (फाईल फोटो)

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, कृत्रिम पाऊस पाडणारे विमान (फाईल फोटो)
    • Author, हर्षल आकुडे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

राज्यात पावसाने अशीच दडी मारली तर येत्या काळात कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे संकेत पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले आहेत. सोमवारी (28 ऑगस्ट) जळगाव जिल्हा आढावा बैठक पार पडली. तेव्हा पाटील यांनी हे वक्तव्य केलं.

ऐन मान्सूनच्या काळात राज्यात गेल्या एक महिन्यापासून तुरळक पाऊस पडत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतातील पीकं करपू लागली आहेत. कोरडवाहू शेतात दुबार पेरणी करूनही काहीच उगवलं नसल्याचं शेतकरी सांगतायत.

कृत्रिम पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाल्यावर शास्त्रज्ञांनीशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाऊ शकतो, असं गुलाबराव पाटील म्हणाले.

जळगाव जिल्ह्यात पाऊस न पडल्यामुळे काही गावांमध्ये पाणीटंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.

याआधी 2019मध्ये दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने कृत्रिम पावसाचा प्रयोग करण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा त्यासाठी 30 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती.

त्याच काळात सरकारने कृत्रिम पावसासाठी अनुकूल असलेल्या ढगांचा अभ्यास करण्यासाठी एक केंद्र यापूर्वीच सोलापूरमध्ये उभारलं होतं.

पण कृत्रिम पाऊस म्हणजे काय? तो महाराष्ट्रात याआधी पाडण्यात आला होता का? त्यासाठी कोणत्या गोष्टींची गरज असते? याविषयी आपण जाणून घेऊयात.

कृत्रिम पाऊस कसा पाडतात?

कृत्रिम पाऊस ही एक वैज्ञानिक प्रक्रिया आहे. ज्या भागात कृत्रिम पाऊस पाडायचा आहे, तिथल्या आकाशात बाष्पयुक्त ढग असणं आवश्यक आहे. रडार यंत्रणेच्या माध्यमातून पावसासाठी अनुकूल असणाऱ्या ढगांचा शोध घेण्यात येतो.

कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी परिसरात आर्द्रता 70 टक्के असणे आवश्यक आहे. योग्य त्या ढगांची निवड करून त्यात ठराविक प्रकारच्या कणांचं बीजरोपण करण्यात येतं.

हा कण पावसाच्या थेंबाच्या केंद्राची भूमिका बजावतो. या केंद्रावर बाष्प जमा होत जातं. याचा आकार वाढला की तो पावसाचा थेंब म्हणून जमिनीवर पडतो. उष्ण तसंच शीत ढगांसाठी कृत्रिम पावसाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.

उष्ण ढगात 14 मायक्रॉन त्रिज्येच्या आकाराचे थेंब नसतात, अशावेळी ढगामध्ये सोडिअम क्लोराईड किंवा मिठाच्या 4 ते 11 मायक्रॉन त्रिज्येच्या आकाराची पावडर फवारली जाते. मिठाला पाण्याचं आकर्षण असल्यामुळे हे कण ढगात पसरतात. ढगातील बाष्प शोषल्यानंतर थेंबाचा आकार 14 मायक्रॉनपेक्षा वाढून पाऊस पडायला सुरूवात होते.

कृत्रिम पाऊस विमान विशिष्ट मिठाची फवारणी करताना (फाईल फोटो)

फोटो स्रोत, Jean Francois Berthoumieu

फोटो कॅप्शन, कृत्रिम पाऊस विमान विशिष्ट मिठाची फवारणी करताना (फाईल फोटो)

तर शीत ढगांमध्ये हिमकण तयार होण्यासाठी लागणाऱ्या केंद्रबिंदूंचा अभाव असतो, अशावेळी ढगांवर सिल्व्हर आयोडाईड फवारलं जातं. त्यावर हिमकण वेगाने तयार होऊन त्यांचा आकार वाढल्यानंतर ते खाली पडू लागतात. अशा पद्धतीने पाऊस पाडण्यास असमर्थ असलेल्या ढगातून पाऊस पाडता येऊ शकतो, असे प्रा. जोहरे सांगतात.

प्रा. जोहरे यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटरोलॉजीमध्ये (IITM) सुमारे 13 वर्षे शास्त्रज्ञ म्हणून काम केलं आहे.

विमानाने फवारणी करणे, रॉकेटने ढगात रसायन सोडणे आणि जमिनीवर रसायनाचं ज्वलन करणे अशा तीन पद्धती वापरून कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग केला जातो. मात्र या प्रयोगाद्वारे पाऊस पडेलच याची शाश्वती नसते, असं प्रा. जोहरे आणि हवामानतज्ज्ञ माधवराव चितळे याचं मत आहे.

'याआधीचे प्रयोग फसले'

राज्यात तसंच देशभरात यापूर्वी झालेले कृत्रिम पावसाचे प्रयोग अयशस्वी ठरल्याचं हवामान तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे सांगतात..

यापूर्वी कर्नाटकात 2003 मध्ये, महाराष्ट्रात 2003 आणि 2004 तर आंध्र प्रदेशात 2007 आणि 2007 मध्ये कृत्रिम पावसाचे प्रयोग अमेरिकन कंपनीद्वारे करण्यात आले होते.

2009 ते 2011 मध्ये पुण्याच्या आयआयटीएमतर्फे कायपिक्स नावाचा प्रयोग हाती घेण्यात आला. त्यानंतर 2010 व 2011 मध्ये तिन्ही राज्यांतील दुष्काळी भागात प्रयोग करण्यात आले, मात्र हे सर्व प्रयोग अयशस्वी ठरले आहेत, असं प्रा. किरणकुमार जोहरे सांगतात.

ते पुढे सांगतात, "जगभरातही कृत्रिम पावसाचे प्रयोग अयशस्वी ठरल्याचा इतिहास आहे. ढगांवर रसायन फवारल्यानंतरही ते ढग पुढे वाहून निघून गेल्यास त्याचा काहीच उपयोग नाही. फक्त चीनने कृत्रिम पावसाचा प्रयोग यशस्वीरित्या केला आहे. पण त्यांनी या प्रयोगाचा फॉर्म्यूला जगाला न देता लपवून ठेवला आहे."

विमान

'कृत्रिम पाऊस भरवशाचा उपचार नाही'

"जगभरात कृत्रिम पावसाचे खूप सारे प्रयोग झाले आहेत त्यापैकी केवळ 30 टक्के ठिकाणी यश आलं आहे. त्यामुळे परिस्थिती सांभाळून घेण्यासाठी सामाजिक आणि आर्थिक विचार करून मगच हा निर्णय घ्यायचा असतो. कृत्रिम पावसाचं शास्त्र अजूनही पूर्णपणे विकसित होण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे अगदी अगतिकता असेल, तरच कृत्रिम पावसाचा प्रयोग करायला हवा," असं हवामानतज्ज्ञ माधवराव चितळे यांना वाटतं.

चितळे सांगतात, "मराठवाडा हा पर्जन्यछायेचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. याठिकाणी कृत्रिम पावसासाठी अनुकूल ढग असतील की नाही याबाबत शंका आहे."

"वेगवेगळ्या तंत्रज्ञानात एक देश म्हणून आपण सहभागी होण्याचा प्रयत्न करत आहोत. पण त्याच्यावर सध्यातरी अवलंबून राहू शकत नाही. हे अनिश्चिततेचं शास्त्र आहे. कृत्रिम पावसावर अवलंबून राहू नये."

चितळे पुढे सांगतात, "इस्रायलच्या धर्तीवर नॅशनल कॅरियरसारखे पाण्याचे पाईपलाईन नेटवर्क तयार करण्याची गरज आहे. भरवशाच्या पाण्याच्या स्त्रोतांपासून नळ टाकून पाण्याची आवश्यकता असलेल्या भागाला पाणीपुरवठा करण्यात यावेत."

पावसाचे ढग

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, पावसाचे ढग

कृत्रिम पावसाच्या प्रयोगाचे दुष्परिणाम आहेत का?

या प्रश्नावर उत्तर देताना प्रा. जोहरे सांगतात, "पाऊस ही पूर्णतः नैसर्गिकरित्या होणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे कृत्रिम पावसाचा प्रयोग केल्यास त्याचा नैसर्गिक चक्रावर थोडाफार परिणाम होऊ शकतो,"

"ढगामध्ये फवारणी करण्यात येणारे रसायन ढगाच्या प्रकारानुसार त्या प्रमाणात फवारले गेले पाहिजेत. प्रमाणापेक्षा जास्त प्रमाणात फवारले गेले तर असलेले ढगदेखील विरून जाऊन नष्ट होतात. त्यामुळे नैसर्गिक पद्धतीने होणारा पाऊसही होत नाही."

"यावेळी वापरण्यात येणारं सिल्व्हर आयोडाईड हे विषारी असल्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचते. या कारणामुळे ऑस्ट्रेलियात कृत्रिम पावसाच्या प्रयोगावर बंदी आहे. कृत्रिम पावसामुळे फायदा होण्याऐवजी नुकसान होण्याचीच शक्यता जास्त आहे," असं प्रा. जोहरे यांना वाटतं.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)