You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
डाऊनसिंड्रोम बार्बी : ही बाहुली थोडी वेगळी दिसते, पण त्यामागे आहे एक खास कारण..
डाऊनसिंड्रोमने ग्रस्त असलेल्या व्यक्तीसदृश असलेली बार्बी बाहुली मॅटेल कंपनीने तयार केली आहे. समाजातील विविध स्तरातील लोकांना सामावून घेण्यासाठी मॅटेल कंपनीने हे पाऊल उचललं आहे.
बार्बी बाहुलीचं मूळ रुप खऱ्या महिलेचं, मुलीचं प्रतिनिधित्व करत नाही, अशी टीका पहिल्या बार्बीवर झाली होती. त्यानंतर मॅटेल कंपनीने विविध गटांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बाहुल्या आणण्याचं धोरण हाती घेतलेलं आहे.
गेल्या काही वर्षात ऐकण्यासाठी कानाला उपकरण लावलेली, कृत्रिम अवयवरोपण झालेली, व्हीलचेअरवर बसलेली अशा विविध स्वरुपातल्या बार्बी तयार केल्या होत्या.
समाजातल्या सर्व स्तरातल्या मुलींना बार्बीत आपलं रुप पाहता यायला हवं, असं मॅटेल कंपनीचं उद्दिष्ट आहे. त्यांच्यासारख्या न दिसणाऱ्या बाहुलीशीही त्यांनी खेळावं असाही कंपनीचा प्रयत्न आहे.
मॅटेल कंपनीने मूळ बार्बी 1959 मध्ये तयार केली होती. उंच, बारीक कंबर, भुरभरणाऱ्या केसांची अशी ही बार्बी होती.
दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठातील अभ्यासकांनी केलेल्या पाहणीनुसार बार्बीसारखा चेहरा आणि शरीर लाखभर मुलींपैकी एखादीकडेच असू शकतं.
बार्बी ही वास्तवाच्या जवळ जाणारी असावी असं मत काहींनी व्यक्त केलं. त्याचप्रमाणे एखाद्या स्वरुपाचं व्यंग असलेली बार्बी सगळ्यांना आपलीशी वाटेलच असं नाही.
2016 मध्ये मॅटेल कंपनीने कर्व्ही बार्बी, टॉल बार्बी आणि पेटीट बार्बी अशा तीन स्वरुपातील बार्बी तयार केली. विविधांगी वर्ण-वंश यांचं प्रतिनिधित्व होईल अशा अनेक स्वरुपाच्या बार्बी कंपनीने तयार केल्या.
समाजात विविध प्रकारची माणसं असतात. कोणाला काही व्याधी असू शकते. आपण सगळे एकाच समाजाचाच भाग आहोत ही शिकवण नव्या बार्बीच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न आहे असं लिसा मॅकनाईट यांनी सांगितलं. मॅटेल कंपनीत बार्बी अँड डॉल्सच्या त्या ग्लोबल हेड आहेत.
डाऊन सिंड्रोम असलेल्या व्यक्तीचं अचूक प्रतिनिधित्व व्हावं यासाठी अमेरिकेतल्या नॅशनल डाऊन सिंड्रोम सोसायटी यांच्याशी समन्वयातून या बाहुलीची निर्मिती करण्यात आल्याचं कंपनीने म्हटलं आहे.
ही छोटीशी बाहुली आहे मात्र तिचा चेहरा मोठा आहे. गोलाकार चेहऱ्याला दोन छोटे कान देण्यात आले आहेत. नकटं नाक आणि बदामाच्या आकाराचे डोळे आहेत. डाऊनसिंड्रोम स्थितीतल्या महिलेचं रुप रेखाटण्याचा कंपनीचा प्रयत्न आहे.
पिवळा आणि निळ्या रंगाचा ड्रेस या बाहुलीने परिधान केला आहे. डाऊन सिंड्रोमसंदर्भात जागरुकता वाढावी यासाठी या दोन रंगांची निवड करण्यात आली आहे.
या बाहुलीच्या गळ्यात गुलाबी रंगाचं गळ्यातलं आहे. हे गळ्यातलं खास आहे. या बाहुलीच्या गळ्यात एक गुलाबी रंगाचं पदक असलेलं गळ्यातलं आहे.
या पदकात वरच्या बाजूला तोंड असलेले व्ही शेपचे त्रिकोण आहेत. हे त्रिकोण म्हणजे मानवी शरीरातल्या 21 व्या जनुकांची प्रतिकृती आहेत. याच जनुकाचा संबंध डाऊन सिंड्रोमशी जोडला जातो.
डाऊन सिंड्रोम स्थिती दाखवणारं चिन्ह प्रतीकात्मक पद्धतीने या गळ्यातल्या आभूषणात दाखवलं आहे.
या बाहुलीच्या पायात गुलाबी रंगाचं ऑर्थोटिक्स घातलं आहे. कपडे आणि अक्ससरीज मॅचिंग ठेवण्यात आलं आहे.
या प्रकल्पासाठी काम करणं हा मोठा सन्मान असल्याचं नॅशनल डाऊन सिंड्रोम सोसायटीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कांडी पिकार्ड यांनी म्हटलं आहे.
डाऊन सिंड्रोम स्थिती असलेल्या व्यक्तींसाठी ही बाहुली खूप मोठं योगदान आहे. पहिल्यांदाच डाऊन सिंड्रोम स्थितीतल्या मुलींना त्यांच्यासारख्याच दिसणाऱ्या बाहुलीशी खेळता येणार आहे.
प्रतिनिधित्वाची ताकद कमी लेखता कामा नये. सर्वसमावेशकतेच्या दृष्टीने हे महत्त्वाचं पाऊल आहे. साजरा करावा असा हा क्षण आहे असं ते म्हणाले.
ब्रिटिश मॉडेल एले गोल्डस्टेन सर्वसमावेशकतेच्या पुरस्कर्त्या आहेत.
त्या म्हणतात, "डाऊन सिंड्रोम स्थितीतली बाहुली पाहून मला गहिवरुन आलं. समाजातील विविधता समजून घेणं आवश्यक आहे."
ब्रिटिश मासिक व्होगच्या मुखपृष्ठावर एले झळकल्या होत्या.
बाहुली तयार करणाऱ्या अन्य कंपन्यांनीही मॅटेल कंपनीसारखेच प्रयत्न केले आहेत.
2016 मध्ये लिगो कंपनीने पहिली व्हीलचेअरमध्ये बसलेली बाहुली तयार केली. बेनी नावाची लहानगी बाहुली होती. युकेमधल्या #toylikeme गटाच्या मोहिमेनंतर ही बाहुली तयार केली.
या गटाने डॅनिश कंपनीवर टीका केली होती. युकेमध्ये 7 लाख 70 हजार दिव्यांग मुलं आहेत. या मुलांसाठी अधिकाअधिक खेळणी निर्माण व्हावीत यासाठी चळवळ राबवण्यात आली होती.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)