पाचव्या महिन्यात जन्म, वजन अर्धा किलोपेक्षाही कमी; त्यांचं जीवन चमत्काराहून कमी नव्हतं...

    • Author, सुशीला सिंह
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

“माझ्या मुलीचा जन्म झाला तेव्हा ती माझ्या तळहाताएवढीच होती. मी माझ्या मुलीला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तिचे डोळे उघडे होते आणि तेव्हाच मला आशा वाटली की, ती जिवंत राहील.” शिवान्याची आई उज्ज्वला सांगत होत्या.

“डॉक्टरांनी सांगितलं होतं की, जियाना वाचू शकणार नाही. पण आता ती चार वर्षांची झाली आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी सामान्य मुलांप्रमाणेच तिचं संगोपन करत आहे,” जियानाची आई दीनल यांनी सांगितलं.

ही गोष्ट दोन मुलींची आहे ज्यांनी वेळेआधी जन्म घेतला आणि त्यांचं जगणं चमत्काराहून कमी मानलं जात नाही.

खरं तर गेल्यावर्षी मे महिन्यात मुंबईत राहणाऱ्या उज्ज्वला पवार यांनी 22 व्या आठवड्यात शिवान्याला जन्म दिला.

डॉ. सचिन शाह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, उज्ज्वला यांचं बायकोर्नेट गर्भाशय होतं. त्यांच्या गर्भाशयात बाळाची वाढ होत नव्हती त्यामुळे त्यांना वेळेआधीच प्रसूती कळा सुरू झाल्या.

उज्ज्वला यांना आधी एक मुलगा आहे. त्याच्या बाळंतपणात त्यांना कोणताही त्रास झालेला नव्हता. पण त्या दुस-यांदा गरोदर राहिल्या, त्यावेळी त्यांना काही समस्या आल्या.

गर्भाशयात बाळाची पूर्ण वाढ होत नव्हती. त्यामुळे त्यांना 9 महिने पूर्ण व्हायच्या आधीच प्रसूती कळा सुरू झाल्या.

बायर्कोनेट म्हणजे गर्भाशय दोन भागात विभागलं जातं आणि हा दुर्मिळ प्रकार असतो.

एखाद्या महिलेचं गर्भाशय जर बायकोर्नेट असेल तर बहुतांश वेळेला त्यांचे नऊ महिने भरत नाहीत किंवा त्यांचा गर्भपात होतो. अनेक केसेसमध्ये वेळेआधीच गरोदर महिलेला प्रसूती कळा सुरू होतात.

एखाद्या गरोदर महिलेची डिलिव्हरी 28 आठवड्यांपूर्वी झाल्यास नवजात बाळाला ‘प्रीमॅच्युअर बेबी’ म्हटलं जातं.

मुंबईतील सूर्या हॉस्पिटलचे नियोनेटल आणि पीडियाट्रीक इन्टेंसिव्ह केअर सर्व्हिसचे डॉ. सचिन शाह सांगतात, उज्ज्वला यांना हॉस्पिटलमध्ये भरती केल्यावर अल्ट्रासाऊंडमध्ये स्पष्ट झालं की बाळाचं वजन जवळपास 500 ग्रॅम होतं.

नियोनेटोलॉजिस्ट डॉक्टर म्हणजे नवजात बालकाच्या जन्मानंतर उद्भवणा-या समस्यांवर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टर.

आशेच्या दोन कहाण्या

डिलिव्हरी झाली त्यावेळी बाळाचं वजन 400 ग्रॅम होतं. हाताच्या आकारापेक्षा ती लहान होती आणि तिला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न करण्याची तिच्या पालकांची तयारी होती.

शिवान्याच्या आई उज्ज्वला सांगतात, "मी माझ्या मुलीला पहिल्यांदा पाहिलं त्यावेळी मी तिचा चेहरा पाहिला. तिचे डोळे उघडे होते. तिनेच माझ्या मनात आशा निर्माण केली की, ही जगू शकेल. मी माझ्या मनात एकदाही नकारात्मक विचार येऊ दिला नाही. याच सकारात्मकतेने माझी मदत केली." 

शिवान्येचे वडील शशिकांत पवार सांगतात, "शिवान्याच्या जन्मानंतर मी पहिल्यांदा तिच्याजवळ गेलो तेव्हा तिच्या बोटांचा मला स्पर्श झाला. या माझ्या भावना मी शब्दात सांगू शकत नाही. या क्षणानेच मला हिंमत दिली की, माझी मुलगी सुरक्षित राहील."

अशीच एक कहाणी आहे गुजरातमध्ये जन्मलेल्या जियानाची. चार वर्षांपूर्वी जियानाचा जन्म सुरत येथे झाला. ती 22 व्या आठवड्यातच जन्मली. तिचं वजन 492 ग्रॅम होतं. 

जियानाचा जन्म ऑक्टोबर 2018 मध्ये झाला.

अहमदाबाद येथील अर्पण न्यूबॉर्न केअर सेंटरचे संचालक आणि नियोनेटोलॉजिस्ट डॉक्टर आशिष मेहता बीबीसीशी बोलताना म्हणाले, “दीनल माझ्याकडे आल्या तेव्हा त्यांना प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या. त्यांना जुळी मुलं होणार होती.”

ते सांगतात, "त्यावेळी दीनल पाच महिन्यांच्या गरोदर होत्या. अशावेळी जुळ्या मुलांना वाचवणं कठीण होतं. त्यात प्रसूतीतज्ज्ञांनीही आशा सोडली होती. कारण पाचव्या महिन्यात डिलिव्हरी करत असताना बाळ जिवंत राहण्याचं एकही प्रकरण भारतात नाही."

ते पुढे सांगतात, मी सुद्धा यावर बराच अभ्यास केला आणि अशा डिलिव्हरमध्ये मूल जगण्याची शंका वर्तवली.

दीनल हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्यावर त्यांचा 22 वा आठवडा पूर्ण झाला होता. दीनल यांनी मुलांना जन्म द्यावा, अशी कुटुंबाचीही इच्छा होती.

परंतु डॉक्टरांनी स्पष्ट केलं की, 24 व्या आठवड्याआधी बाळाचा जन्म झाला तर त्याच्यात व्यंग निर्माण होण्याची शक्यता वाढते.

दीनल सांगतात, "आम्ही डॉक्टरांना सांगितलं की काहीही करून त्यांनी आमच्या बाळाला वाचवा. पण ते एकाच बाळाला वाचवू शकले. अशा परिस्थितीमध्ये संयम आणि धाडसाची गरज असते."

जियाना आणि शिवान्या या दोघींचाही जन्म 24 आठवड्यांपूर्वी म्हणजे सहाव्या महिन्याच्या आधी झाला.

प्रीमॅच्युअर डिलिव्हरीमध्ये काय धोका असतो?

प्रीमॅच्युअर डिलिव्हरीमध्ये काय धोका असतो? डॉ. सचिन शाह आणि डॉ. आशिष मेहरा सांगतात की, वेळेआधी जन्म झालेल्या मुलांच्या जगण्याची शक्यता पाच ते दहा टक्के असते.

  • अशा मुलांच्या डोक्याच्या सोनोग्राफीमध्ये रक्तस्त्राव झाल्यास भविष्यात अपंगत्व येण्याचा धोको वाढतो.
  • बाळाच्या जन्मानंतर तीन ते चार महिन्यात अंदाज बांधता येतो की भविष्यात काय समस्या येऊ शकते.
  • डोळ्यांचा विकास अपेक्षित झाला नसल्यास दृष्टी जाण्याचा धोका असतो.
  • ऐकू न येण्याचा धोका असतो.
  • नवजात बालकाची वाढ झाली नसल्यास प्रतिकार शक्ती कमी होते.
  • सेप्सीस होण्याचा धोका असतो. तसंच संसर्ग होण्याचाही धोका असतो.
  • किडनी फेल होण्याची शक्यता असते

24 आठवड्यांपूर्वी बाळाचा जन्म झाल्यास बाळ रडत नाही आणि त्याचं शरीर थंड असतं. याला ‘हायपोथर्मिया’ म्हटलं जातं.

हायपोथर्मियामध्ये नवजात बालकाच्या वजनाप्रमाणे शरीरात चरबीचं प्रमाण नसतं. अशी मुलं कमकुवत असतात कारण त्यांच्या शरीरात विकास पूर्ण झालेली नसतो. अशा बालकांना जन्मानंतर तातडीने इन्क्युबेटरमध्ये ठेवलं जातं जेणेकरून त्यांच्या शरीराचं तापमान संतुलित ठेवता येईल.

डॉ. आशिष मेहरा सांगतात, "अशा मुलांची किडनी, फुफ्फुसं, हृदय याची वाढ झालेली नसते. त्यांच्या नाकावर मास्क लावून फुफ्पुसांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवला जातो. कारण ते श्वास घेऊ शकत नाहीत."

ते पुढे सांगतात, "प्रीमॅच्युअर बेबी दूध पिऊ शकत नाही. त्यामुळे बालकाला सर्व पोषक तत्व मिळतील यासाठी त्याच्या नाभीतून अँबिलिकल कॅथेटरच्या माध्यमातून प्रोटीन, फॅट्स, कार्बोहायड्रेट, जीवनसत्त्वं आणि मिनरल्स पोहचवले जातात."

" तसंच तोंडावाटे ट्यूब लावून दूध पाजलं जातं आणि लक्ष दिलं जातं की बाळ कसा प्रतिसाद देत आहे. त्याचं पोट फुगलं आहे का, उलटी करत आहे का हे पाहिलं जातं."

डॉ. मेहरा पुढे सांगतात," जेव्हा त्यांना बालकामध्ये अपेक्षित वाढ दिसते त्यावेळी बालकाच्या पोटात दूध जात आहे हे पाहून डॉक्टर समाधानी होतात. बालकाने दूध पचवल्यास अँबिलिकल कॅथेटर हटवलं जातं. त्यांनंतर बालकाचे वजन वाढण्यासाठी प्रयत्न केले जातात.

34 व्या आठवड्यात बालकाची वाढ पाहिल्यानंतर ते आईचं दूध पिऊ शकतं का हे पाहिलं जातं. बालक आईचं दूध पिण्यास सक्षम असल्यास आई आणि नवजात बालकाला सोडलं जातं.

तीन, सहा आणि आठव्या महिन्यात नियमित तपासणी केली जाते.

मुली आता कशा आहेत?

शिवान्या आता जवळपास चार महिन्यांची आहे आणि जियानाने नुकताच आपला चौथा वाढदिवस साजरा केला.

शिवान्याचे वडील शशिकांत सांगतात, ती आता हात- पाय मारते. जोरात आवाज करते आणि गोड हसते. त्यांचं कुटुंब आता आनंदी आहे की तिची वाढ होत आहे.

दीनल सांगतात, "जियानानंतर मी दुस-यांदा आई बनले. पण ते 9 महिने मी किती दहशतीत काढले हे सांगू शकत नाही. जियानाला एखाद्या सामान्य मुलाप्रमाणेच मोठं करा, असं आम्हाला डॉक्टरांनी सांगितलं आहे. आम्ही त्यानुसारच मेहनत घेत आहोत.

जियाना आता दीदी बनली आहे आणि ती आपल्या छोट्या बहिणीची काळजी घेते. आपण आशा सोडायला नको एवढंच मी सांगेन."

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)