You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मेंदू नसलेलं बाळ पोटात असूनही गर्भपाताची परवानगी नाकारली आणि त्यानंतर..
- Author, व्हॅलेंटीना ओरोपेझा कोल्मेनेरेस
- Role, बीबीसी न्यूज
एल साल्वाडोर देशात राहणाऱ्या बीट्रिझ हिला वयाच्या 18व्या वर्षी ल्युपस आजाराचं निदान झालं होतं. हा एक ऑटोईम्युन (प्रतिकारशक्तीशी संबंधित) आजार आहे. ऑटोइम्युन म्हणजे विशिष्ट परिस्थितीत आपली प्रतिकारशक्ती शरीरावर हल्ला करते.
या आजाराशी लढा देत असतानाच बीट्रिझ 21व्या वर्षी गरोदर राहिली. शिवाय, तिच्या बाळाचाही अकाली जन्म झाला. यामुळे बीट्रिझच्या बाळाला काही काळ इन्क्युबेटरमध्ये (काचेची पेटी) ठेवावं लागलं.
2013 साली म्हणजे या घटनेच्या एका वर्षानंतर बीट्रिझ पुन्हा गरोदर राहिली. वैद्यकीय तपासणीसाठी ती आई डेल्मीसह डॉक्टरांकडे गेली असता तिला प्रचंड मोठा धक्का बसला.
वैद्यकीय चाचण्यांमध्ये बीट्रिझच्या पोटात वाढत असलेल्या बाळाला मेंदूच नसल्याचं आढळून आलं.
दुसऱ्या गर्भधारणेदरम्यान बीट्रिझच्या आरोग्याला आणखी धोका निर्माण झाला.
पण, एल साल्वाडोरमध्ये गर्भपातावर निर्बंध आहेत. त्यामुळे न्यायालयाने तिला गर्भपाताची परवानगी दिली नाही.
जन्माला येणारं मूल जगणार नाही, हे माहीत असूनही बीट्रिझला पोटात ते बाळ सांभाळणं भाग पाडण्यात येत होतं.
यादरम्यान, बीट्रिझ 22 वर्षांची होती. अखेर, प्रसूती रुग्णालयातील वैद्यकीय समिती, आरोग्य मंत्रालय आणि संबंधित संस्थांकडून बीट्रिझने गर्भपाताची परवानगी मिळवली.
या अहवालांमध्ये बीट्रिझच्या जीवाला धोका असल्याचं सांगण्यात आलं, तरीसुद्धा न्यायालयात हा खटला टिकू शकला नाही.
आता या घटनेच्या दहा वर्षांनंतर म्हणजे 23 मार्च 2023 रोजी बीट्रिझची आई डेल्मी ही कोस्टा रिका येथील इंटर-अमेरिकन मानवाधिकार न्यायालयात सुनावणीला उपस्थित होती. त्याच्या काही वर्षांपूर्वीच बीट्रिझचा अपघाती मृत्यू झाला होता.
एल साल्वाडोरमध्ये गर्भपात हा गुन्हा असून त्यासाठी कठोर दंडाची तरतूद आहे. तसंच कायद्याच्या आदेशाविरोधात गर्भपात केल्यास 30 ते 50 वर्षे तुरुंगवासाची शिक्षाही ठोठावली जाते.
गर्भपात संदर्भात खटला दाखल केल्यानंतर बीट्रिझ ही एल साल्वाडोरमध्ये प्रसिद्ध झाली होती.
त्यानंतर इंटर-अमेरिकन कोर्टात गर्भपात नाकारण्याची ही पहिलीच केस होती.
या प्रकरणात देण्यात आलेला निकाल हा त्या प्रदेशातील उर्वरित देशांसाठीही निर्देश मानला जातो. ज्या देशांनी मानवी हक्कांसंदर्भात अमेरिकन कन्व्हेन्शनवर स्वाक्षरी केली आहे, त्यांना तो लागू होऊ शकतो.
या पार्श्वभूमीवर बीट्रिझची आई डेल्मीने गेल्या दहा वर्षांत आपल्या कुटुंबाला सोसाव्या लागलेल्या त्रासाबाबत सर्वांना माहिती दिली.
तळहातात मावेल इतक्या आकाराचं बाळ
बीट्रिझला तिच्या पहिल्या गरोदरपणात प्रीक्लेम्पसिया या आजाराने ग्रासले होते. प्रसूतीपूर्वी तिला रक्त चढवावे लागले.
संपूर्ण गरोदरपणात तिला आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागला. अखेरीस, तिची प्रसूती पार पडली.
जन्माला आलेलं पुरुष जातीचं बाळ अत्यंत कमी वजनाचं होतं.
बीट्रिझची आई डेल्मी म्हणते, “ बाळाने पहिल्यांदा घातलेला शर्ट अजूनही माझ्याकडे आहे. ते मूल मला पहिल्यांचा हातात देण्यात आलं. मी पाहिलं तर ते माझ्या तळहातावर मावेल इतक्याच आकाराचं होतं.”
“मला रडू आलं. त्या बाळाला उपचारासाठी विविध प्रकारच्या सलाईन्स जोडलेल्या होत्या. त्याला पाहून बीट्रिझलाही खूप वाईट वाटलं. बाळाला स्तनपानही करता येत नव्हतं. त्याला रुग्णालयात फॉर्म्युला दूध दिलं जायचं.”
“हे बाळ जगेल की नाही, याबाबत आम्हाला शंका होती. पण, सुदैवाने ते बाळ जगलं.”
दुसरी गर्भधारणा, हॉस्पिटलमध्ये 81 दिवस
पहिलं बाळ जन्मल्यानंतर काही महिन्यांनी एके दिवशी बीट्रिझच्या चेहऱ्यावर मोठ-मोठे पुरळ उढले.
त्यातून रक्त आणि पू वाहू लागलं. हळूहळू असेच पुरळ संपूर्ण अंगभर पसरले. बीट्रिझला यामुळे खूप वेदना आणि त्रास होत होता.
बीट्रिझ त्यावेळी तिच्या पतीसोबत राहत होती. तिच्या या समस्येबाबत कळल्यानंतर आम्ही तिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो.
याच दरम्यान वैद्यकीय तपासणीत बीट्रिझ गरोदर असल्याचंही आढळून आले. तोपर्यंत पहिल्या मुलाच्या जन्माला दीड वर्ष झालं होतं.
याविषयी बोलताना डेल्मी सांगतात, “आम्ही चिंताग्रस्त झालो. पहिल्या गर्भधारणेवेळी तिला इतका त्रास सहन करावा लागला होता. आता दुसरी गर्भधारणा म्हणजे माझ्या मुलीला आणखी संघर्ष करावा लागेल. शिवाय, पहिल्या मुलाला यादरम्यान होणारा त्रास वेगळा, असा विचार आम्ही करत होतो.”
बीट्रिझला आमच्या भागातील एका मोठ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मी रोज तिथे बसने जायचे.
पुरळांवर उपचार करण्यात आले. बीट्रिझच्या दोन्ही हातांना पट्टी बांधण्यात आली होती. तिला मी जेवण भरवायचे.
बीट्रिझला बाथरुमलाही जाता येत नव्हतं. नर्स किंवा मी तिला त्यासाठी मदत करायचे.
बीट्रिझ काही दिवस रुग्णालयात होती. तिथून तिला काही दिवसांनंतर प्रसूती रुग्णालयात हलवण्यात आलं. ति
या कालावधीत तिची तब्येत खालावत होती. आणि मेंदू नसलेल्या बाळाचं प्रकरणही आमच्या लक्षात आलं. पण न्यायालयाने आम्हाला गर्भपाताची परवानगी दिली नाही.
वकिलांनी न्यायालयात लढा दिला. वैद्यकीय संघटना आणि अधिकार गटांनी त्याला पाठिंबा दिला. पण, निकाल लागला नाही.
अखेरीस, 26 आठवड्यात सिझेरियन सेक्शन करून बाळ बाहेर काढण्यात आलं. याला गर्भपात म्हणण्याऐवजी 'प्रीमॅच्युअर डिलिव्हरी' असे संबोधलं जातं.
सिझेरियन शस्त्रक्रिया करून बाळाला बाहेर काढताच अवघ्या 5 तासांत ते मृत्यूमुखी पडलं. पण त्यानंतरचे 81 दिवस बीट्रिझला रुग्णालयातच राहावं लागलं.
डेल्मी म्हणते, “एका छोट्याशा खोलीत गुदमरल्यासारखे झालं होतं. पहिल्या मुलाला पाहणंही शक्य नव्हते. त्याच्यापासून दूर गेल्याचे वेगळं दुःखही तिला जाणवत होतं. पहिल्या बाळाची काळजी घेण्यासाठी तिचा नवरा घरीच असायचा. कधी-कधी तो दवाखान्यात याचचा.
“81 दिवसांनी माझी मुलगी घरी आली. हळूहळू सगळं सावरलं.
रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर बीट्रिझने आपल्या गरोदरपणा आणि गर्भपातासंदर्भातील बातम्या माध्यमांवर पाहिल्या.
आपल्याला गर्भपात करू न दिल्याने भेदभाव केला जात असल्याचं तिला त्यावेळी वाटलं.”
स्वर्गातील मूल
बाळाच्या जन्मानंतर तिने आपल्या बाळाविषयी खूप साऱ्या बातम्या वाचल्या. या बातम्यांमुळे ती प्रचंड भावनिक झाली होती.
खरं तर तिने बाळाला पाहिलंही नव्हतं. पण तिने आपल्या मृत बाळाचं काहीतरी नाव ठेवायचं ठरवलं.
आम्ही इंटरनेटवर शोधून बाळाचं नाव लेलानी बीट्रिझ असं ठेवलं. लेलानी शब्दाचा अर्थ होतो स्वर्गातील मूल.
बीट्रिझचा मृत्यू आणि कायदेशीर लढाई
यानंतर, 2017 मध्ये बीट्रिझला रस्ता अपघातात आपला जीव गमवावा लागला. तेव्हापासून बीट्रिझचं पहिलं मूल डेल्मी याच सांभाळत आहेत. आता तो मुलगा आता 11 वर्षांचा आहे.
बीट्रिझ दुसऱ्या वेळी गरोदर राहिली होती, तेव्हापासून तिचा न्यायायलीन लढा सुरूच होता. पुढची चार वर्षे ही लढाई तिच्यामार्फत सुरू राहिली.
त्यावेळी काही लोकांनी आम्हाला खूप काही बोललं.
आम्ही गर्भपाताचं समर्थन करत नाहीत. मुलांचा जीव घेणं तुम्हाला मान्य आहे का, हे चुकीचं आणि पाप आहे, असं ते मला म्हणायचे.
पण, आम्ही काय भोगलं ते आम्हाला स्वतःला माहीत होतं. पण, बीट्रिझचा संघर्ष निष्फळ ठरला. आम्ही कोर्टात लढत थकून गेलो. अखेर, तिचा एका रस्ते अपघातात मृत्यू झाला.
पण, माझ्या मुलीच्या मृत्यूनंतरही मी लढा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
माझ्या मुलीच्या संदर्भात जे घडलं, ते या देशात पुन्हा घडू नये. त्यासाठी मी कायदेशीर लढाई सुरू ठेवली आहे.
या लढाईदरम्यान मला ते मृत बाळ खूप आठवतं. बीट्रिझने लेलानी नाव ठेवलेलं मूल आता तिच्यासोबत असेल का असा मी विचार करत असते..
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)