आव्हाडांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या विधानावर चंद्रकांत पाटील म्हणाले... #5मोठ्याबातम्या

आज सकाळी वेगवेगळी वृत्तपत्रं आणि वेबसाईट यांच्यावर प्रकाशित झालेल्या बातम्याचा थोडक्यात आढावा.
1. जितेंद्र आव्हाडांनी औरंगजेबाबद्दल केलेल्या विधानावर चंद्रकांत पाटील म्हणाले...
विधानसभेतील विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी अधिवेशनात बोलताना केलेल्या विधानावर आता जोरदार चर्चा, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.
छ. संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक म्हणा, ते धर्मवीर नव्हते अशा आशयाचं विधान त्यांनी सभागृहात केलं होतं. त्याविरोधात भाजपा आणि काही संघटनांनी विरोध करणारी निदर्शनंही केली आहेत.
अजित पवार यांच्या बाजूने राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बाजू मांडली आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले की, "छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेऊन ज्याठिकाणी त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे."
"औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं, अशा आशयाचं विधान केलं आहे", आव्हाड यांच्या या विधानामुळे त्यांच्यावर टीका सुरू झाली आहे.
भाजपाचे नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या विधानाचा समाचार घेतला आहे.
ते म्हणाले, “जितेंद्र आव्हाड आता नवीन इतिहास लिहित आहेत. पण तुम्ही म्हणाल तो इतिहास, असं चालणार नाही. जो इतिहास आहे, तोच इतिहास राहील. तुम्ही काहीही म्हटलं तरी तुमच्याशी सहमत असणारे फार कमी आहेत. पण तुम्ही जे म्हणत आहात, त्याला चूक म्हणणारे कोट्यवधी लोक आहेत. त्यामुळे तुम्ही मूर्ख कसे आहात… तुम्ही चुकीचे कसे आहात… तुम्ही इतिहास कसा बदलवायला बसला आहात, हे हजारो-कोट्यवधी लोक मतदानातून दाखवत असतात.” ही बातमी लोकसत्ताच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाली आहे.
2. कोयता गँगच्या गुंडाची पोलिसांनी काढली धिंड
पुण्यामध्ये दहशत पसरवणाऱ्या कोयता गँगची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे.
गेल्याच आठवड्यात या गँगमधील काही तरुणांनी सिंहगड रोडवर दहशत पसरवली होती. त्यातील एका तरुणाला पोलिसांनी जागीच पकडून चोप दिला होता.
मात्र यातील मुख्य आरोपी करण दळवी फरार झाला होता. त्याला आता पकडून पोलिसांनी त्याच परिसरात फिरवले आहे.
पुणे पोलिसांनी तपास करत आरोपी करण दळवीला पुणे पोलिसांनी बीडमधून अटक केली. ही बातमी सकाळने प्रसिद्ध केली आहे.
3. तरुणीला फरपटत नेण्याच्या घटनेचा गृहमंत्र्यांनी मागवला अहवाल
दिल्लीमध्ये तरुणीला धडक देऊन तिला 10 ते 12 किमी फरपटत नेणाऱ्या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.
या घटनेत तरुणीचा मृत्यू झाला असून तिच्या शरीरावर अनेक जखमा दिसून आल्या. पोलिसांनी या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेतलं आहे. या तरुणीच्या शरीराचे अनेक अवयव तुटल्याचंही पोलिसांनी म्हटलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
शवविच्छेदनाच्या अहवालानंतर अधिक माहिती समोर येईल. या प्रकरणाची दखल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी घेतली असून याचा सविस्तर अहवाल त्यांनी मागवला आहे. ही बातमी लोकमतने दिली आहे.
4. राज्यात थंडीच्या लाटेची शक्यता
महाराष्ट्रात येत्या दोन ते तीन दिवसांत काही भागात थंडीची लाट येण्याचा अंदाज आहे. पुणे वेधशाळेने हा इशारा दिला आहे.
सध्या मुंबईसह बहुतांश जिल्ह्यातलं तापमान 15 अंशांच्या खाली गेलं आहे. मात्र, 5 किंवा 6 जानेवारी नंतर राज्यामध्ये थंडीचा जोर आणखी वाढणार असल्याचा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे.
काही ठिकाणी शीतलहरदेखील अनुभवायला मिळेल असा अंदाजही पुणे वेधशाळेनं वर्तवला आहे.

फोटो स्रोत, Getty Images
उत्तर मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा आणि विदर्भातल्या काही जिल्ह्यात कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. ही बातमी झी 24 तासने दिली आहे.
5. महाराष्ट्र सरकारने मिळवले दारूतून 9 महिन्यात 14, 480 कोटी
महाराष्ट्रातील लोकांनी गेल्या वर्षाच्या शेवटच्या 9 महिन्यात एक वेगळीच ‘कामगिरी’ केली आहे. राज्यातील लोकांनी दारूमधून सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल दिला आहे.
महाराष्ट्र शासनाने दारू विकून 9 महिन्यात 14 हजार 480 कोटी रुपयांचा महसूल कमावला आहे. ही आकडेवारी 1 एप्रिल 2022 ते 26 डिसेंबर 2022 या कालावधीतील आहे.
राज्याला दारू विक्रीतून आधी मिळालेल्या महसुलाच्या तुलनेत यंदा 30 टक्के जास्त महसुली उत्पन्न झाले. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ही माहिती दिली. महाराष्ट्रात 2021-22 या आर्थिक वर्षात एप्रिल ते नोव्हेंबर दरम्यान 25 कोटी लिटर देशी दारू आणि 23.5 कोटी लिटर विदेशी दारू विकण्यात आली. या उलट एप्रिल 2022 ते नोव्हेंबर 2022
महाराष्ट्रात 34.5 कोटी लिटर देशी दारू आणि 17.5 कोटी लिटर विदेशी दारू विकण्यात आली. ही बातमी टाईम्स नाऊ मराठीने दिली आहे.
एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या आठ महिन्यांत 23 कोटी लिटर बीअर विकण्यात आली. याआधी एप्रिल ते नोव्हेंबर 2021 मध्ये 21 कोटी लिटर बीअर विकण्यात आली.
एप्रिल ते नोव्हेंबर 2022 या काळात महाराष्ट्रात 88 लाख लिटर वाईनची विक्री झाली. याआधी एप्रिल ते नोव्हेंबर 2021 या काळात महाराष्ट्रात 66 लाख लिटर वाईनची विक्री झाली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








