'या' व्यक्तीच्या घरी जन्मलं 60 वं बाळ, बेगम म्हणतात, ‘आणखी मुलं हवीत...’

फोटो स्रोत, JAN MOHAMMAD
- Author, मोहम्मद काजिम
- Role, बीबीसी उर्दू, क्वेटाहून
पाकिस्तानमधील बलुचिस्तान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेटामधील सरदार हाजी जान मोहम्मद यांनी दावा केलाय की, रविवारी (1 जानेवारी) त्यांना 60 वं बाळ झालं.
बीबीसीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, “माझी पाच मुलं दगावली. इतर 55 मुलं जिवंत आहेत.”
“इतकी मुलं जन्माला घालून मी थांबणार नाहीय. जर अल्लाहाची इच्छा असेल, तर आणखी मुलं होतील. यासाठी चौथं लग्न करण्याची योजना आखत आहे,” असं ते म्हणाले.
50 वर्षीय सरदार हाजी जान मोहम्मद क्वेटा शहराच्या ईस्टर्न बायपासच्या जवळ राहतात. ते पेशानं डॉक्टर आहेत आणि त्याच भागात त्यांचं क्लिनिक आहे.
सरदार हाजी जान मोहम्मदने सांगितलं की, आता जन्मलेल्या मुलाच्या रुपानं मी 60 व्या मुलाला जन्म दिला.
या 60 व्या मुलाचं नाव ‘खुशहार खान’ असं ठेवलं आहे.
जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, तुम्हाला इतक्या साऱ्या मुलांची नावं पाठ आहेत? तेव्हा ते म्हणाले, “का नाही?”
आपण इथे हेही लक्षात घेतलं पाहिजे, पाकिस्तानचा अशा 8 देशांमध्ये समावेश होतो, जे देश 2050 पर्यंत जगाच्या लोकसंख्या वाढीत 50 टक्के योगदान देतील.
संयुक्त राष्ट्रानं जारी केलेल्या आकड्यांनुसार, 1960 च्या दशकापासून जगभरातील लोकसंख्या वाढीचा दर घटत जात आहे. 2020 मध्ये हा दर एक टक्क्यांहून कमी राहिला. मात्र, पाकिस्तानात हा दर 1.9 टक्के नोंदवला गेला होता.
चौथ्या लग्नासाठी मुलीचा शोध

फोटो स्रोत, JAN MOHAMMAD
सरदार जान मोहम्मद यांनी म्हटलं की, “मी चौथं लग्न करू इच्छित आहे आणि त्यासाठी मुलीचा शोधही सुरू आहे.”
ते पुढे म्हणाले की, “लग्नासाठी मुलगी शोधण्यास माझ्या सर्व मित्रांना सांगितलंय. आयुष्य हातून सुटत चाललंय, त्यामुळे इच्छा आहे की, लवकरात लवकर चौथं लग्न व्हावं.”
सरदार जान मोहम्मद यांच्या पत्नींनाही वाटतं की, घरात मुलांपेक्षा मुली अधिक असाव्यात.
जान मोहम्मद यांनी म्हटलं की, “काही मुला-मुलींचं वय 20 वर्षांहून अधिक आहे. मात्र, त्यातील कुणाचंच अद्याप लग्न झालं नाहीय. कारण ते सर्व शिक्षण घेतायत.”
‘जास्त मुलं असल्यानं मला भत्ता मिळाला तर बरं होईल’

फोटो स्रोत, JAN MOHAMMAD
हाजी जान मोहम्मद यांनी सांगितलं की, माझा कुठलाही मोठा व्यवसाय नाहीय. क्लिनिकमधून मिळणाऱ्या पैशांवरच घर चालतं.
ते पुढे म्हणाले की, “पूर्वी मुलांचा सांभाळ करण्यास त्रासदायक ठरत नव्हतं. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून महागाई वाढत चाललीय. त्यामुळे अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय. सर्व व्यवसाय ठप्प आहेत.
पीठ आणि साखरेसह इतर अनेक जीवनावश्यक वस्तंच्या किंमती तिप्पट वाढल्यात. गेल्या तीन वर्षात जगातल्या इतरांसारखंच पाकिस्तानी नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागतोय. त्यात मीही आहे.”
मुलांना आनंदी ठेवण्यासाठी आपण कुणाकडूनही मदत मागितली नसल्याचं ते सांगतात. मेहनतीच्या पैशातूनच सगळा खर्च पूर्ण करत असल्याचंही ते सांगतात.
हाजी जान पुढे म्हणतात की, सर्व मुलांना मी शिकवत आहे आणि मुलांच्या शिक्षणावरच अधिक खर्च करतोय.
“जास्त मुलं असल्यानं मला एखादा भत्ता देता आला, तर सरकारनं दिला पाहिजे. जेणेकरून मी माझ्या मुलांचं उच्चशिक्षण पुढे सुरू ठेवीन,” असंही सरदार हाजी जान मोहम्मद म्हणतात.
‘मुलांना कारमधून फिरायला नेणंही कठीण झालंय’
सरदार जान मोहम्मद यांनी म्हटलं की, मला फिरायला आवडतं आणि माझ्या मुलांनीही संपूर्ण पाकिस्तान फिरावं असं वाटतं.
ते म्हणतात, “जेव्हा मुलं लहान होती, तेव्हा त्यांना फिरायला नेणं शक्य होतं. आता कारमध्ये घेऊन जाणं शक्य होत नाही. सरकारनं माझ्या मुलांना फिरवण्यासाठी मदत करावी. सरकारनं जर मला एक बस दिली, तर माझ्या सर्व मुलांना एकत्रित फिरायला नेता येईल.”
मुलांमुळे प्रसिद्धीस येणारे सरदार जान मोहम्मद हे बलुचिस्तानमधील दुसरे व्यक्ती आहेत.
याआधी बलुचिस्तानमधील नुश्की जिल्ह्यातील अब्दुल मजीद मेंगल नामक व्यक्तीने 6 लग्न करून, 54 मुलं जन्माला घातली होती.
अब्दुल मजीज मेंगल यांचा गेल्या महिन्यातच 75 व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या दोन पत्नी आणि 12 मुलं ते हयात असतानाच निधन पावले.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








