You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अमेरिकेला नेणाऱ्या एका रॅकेटच्या विळख्यात अडकले, ते 7 जण भयंकर बर्फवृष्टीत 11 तास चालत राहिले....
- Author, भार्गव पारीख
- Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी
गुजराती माणसांना कॅनडाच्या माध्यमातून बेकायदेशीर पद्धतीने अमेरिकाला पाठवण्यासंदर्भात पोलिसांनी एक बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर आणि दोन एजंटांना अटक केली आहे.
गुजरात पोलिसांच्या बरोबरीने अमेरिकेतील होमलँड सेक्युरिटी आणि कॅनडा पोलीस हे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
जानेवारी 2022मध्ये गुजरातच्या एका कुटुंबातील चार सदस्य अवैध पद्धतीने अमेरिकेत प्रवेश करत असताना त्यांचा मृत्यू झाला होता.
या लोकांना अमेरिकेत पाठवण्यासाठी कथित आरोपींनी 75 लाख ते 1 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे.
तपास यंत्रणांना व्हीडी नावाच्या माणसाची मदत मिळाली. या माणसाने पोलिसांना महत्त्वपूर्ण माहिती दिली.
पोलिसांना कसे मिळाले पुरावे?
जानेवारी 2022मध्ये गुजरातमधल्या मेहसाणा जिल्ह्यातील डिंगुचा या छोट्या गावातल्या पटेल कुटुंबीयांनी कॅनडामार्गे अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी पटेल दांपत्य आणि दोन मुलांचा मृत्यू झाला होता. मृत्यू झाल्यामुळे हे प्रकरण आंतरराष्ट्रीय पातळीवर चर्चेत आलं.
गुजरातचे डीजीपी आशिष भाटिया यांनी बीबीसी गुजरातीला सांगितलं की, “जेव्हा गुजरात पोलीस डिंगुचा गावातील पटेल कुटुंबीयांच्या मृत्यूची चौकशी करत होते त्यावेळी गुन्हे शाखा सीआयडी क्राईम ब्रँचने बनावट पॅनकार्ड, पासपोर्ट आणि आधार कार्ड तयार करुन देणाऱ्या व्यक्तीला अटक केली होती”.
अमेरिका आणि कॅनडाचे दूतावास तसंच अमेरिकेच्या होमलँड विभागाने काही तपशील पुरवले. या आधारावर अहमदाबाद क्राईम ब्रँच आणि गांधीनगर सीआयडी क्राईम ब्राँचने चौकशी केली.
नऊ महिन्यांच्या चौकशीनंतर गुजरात पोलिसांनी या रॅकेटमधल्या दोन एजंटांना अटक केली आहे. अजूनही बाकी चौकशी सुरुच आहे.
अमेरिकेतल्या अंतर्गत सुरक्षेसाठी जबाबदार होमलँड सेक्युरिटी या तपास यंत्रणेने गुजरात पोलीस आणि कॅनडा पोलीस यांच्याबरोबरीने चौकशी करत अमेरिकेत बेकायदेशीर पद्धतीने प्रवेश करणाऱ्यांविरोध तपास केला.
इमेल आणि व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून तपाय यंत्रणा एकमेकांच्या संपर्कात होत्या. त्यांनी वैयक्तिक पातळीवर गुजरातला भेटही दिली होती.
कारस्थान कसं झालं उघड?
प्रकरणाचा तपास करणारे अहमदाबाद क्राईम ब्रँचचे पोलीस उपायुक्त चैतन्य मांडलिक यांनी सांगितलं की, “चौकशीच्या सुरुवातीला आम्हाला नकली आधार कार्ड मिळालं. त्याआधारे एक पॅन कार्ड तयार करण्यात आलं होतं. आणखी खोलात गेल्यावर कळलं की, तेव्हा हरीश पटेल नावाच्या माणसाचं नाव समोर आलं”.
“हरीश बनावट आधार कार्डाच्या माध्यमातून अमेरिकेत बेकायदेशीर पद्धतीने पासपोर्ट बनवून देत असल्याचं कळलं होतं. सीआयडी क्राईम ब्रँचने हरीश पटेलकडून 87 पासपोर्ट जप्त केले. मेक्सिको आणि कॅनडाहून मानवी तस्करी करुन अमेरिकेला आणणाऱ्या एजंटांशी त्यांचे लागेबांधे होते”.
मांडलिक यांनी हेही सांगितलं की अमेरिका आणि कॅनडाच्या पोलिसांनी आम्ही महत्त्वाचे तपशील दिले. त्याआधारे कॅनडाहून अवैधरीत्या अमेरिकेत प्रवेश पाठवणाऱ्या पाच एजंटांची नावं शॉर्टलिस्ट करण्यात आली. तंत्रज्ञानाच्या साह्याने या पाचजणांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं.
मांडलिक सांगतात, “विद्यार्थी तसंच अन्य काही लोकांना परदेशात पाठवण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू होते. बहुतांश कुटुंब बेकायदेशीर पद्धतीने विदेशात रवाना झाली होती. त्यामुळे माहिती असूनही आम्हाला कोणतीही मदत मिळत नव्हती”.
“बेकायदेशीर पद्धतीने विदेशात घेऊन जाण्याची जबाबदारी ज्या लोकांवर टाकण्यात आली होती त्यापैकी एकाशी आम्ही संपर्क केला. त्याने आम्हाला सांगितलं की फेनिल पटेल नावाचा एजंट 66 ते 75 लाख रुपये घेऊन लोकांना अमेरिकेत नेत होता. फेनिलबाबत आमच्याकडे आधीही माहिती होती. अमेरिकेच्या तपासयंत्रणांनी आम्हाला फेनिलबद्दल आणखी माहिती मिळाली”.
जोखमीचा मार्ग
डिंगुचाच्या पटेल कुटुंबीयांच्या बरोबरीने 11 जण कॅनडाहून अमेरिकेला रवाना झाले होते. 2500 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर त्यांनी अमेरिकेची सीमा पार केली. तिथून फेनिल पटेल आणि बिट्टू त्यांना व्हँकोव्हर इथे घेऊन गेले.
जी माणसं व्हँकोव्हरमार्गे अमेरिकेत जाऊ इच्छित होते त्यांना दोन गाड्यांमधून नेण्यात आलं. एक गाडी फेनिल तर दुसरी गाडी बिट्टू चालवत होता. या मार्गे जाण्यासाठी प्रत्येकाला 11500 अमेरिकन डॉलर एवढा खर्च करावा लागला.
विनिपेगमार्गे जाण्यासाठी त्यांना 7500 अमेरिकन डॉलर एवढाच खर्च करावा लागला असता. त्यामुळे एजंटांनी हा रस्ता निवडला. फेनेलने सगळ्यांना व्हँकोव्हरहून विनिपेगपर्यंत गाडीने नेलं. पैसे वाचवण्यासाठी त्याने असं केलं.
तिथे विदेशात जाण्यासाठी उत्सुक लोकांच्या मोबाईलमध्ये एक अप्लीकेशन डाऊनलोड करण्यात आलं. अमेरिकेत स्टीव्ह सँड्स नावाच्या माणसाला भेटा, तो तुम्हाला फ्लोरिडाला घेऊन जाईल असं सांगण्यात आलं.
डीसीपी मांडलिक यांनी सांगितल्याप्रमाणे फेनिलने आणखी पैसे उकळण्यासाठी गाडीने 2500 किलोमीटरचा प्रवास केला. विनिपेग आणि व्हँकोव्हर दरम्यान 4000 डॉलर कमी खर्च होत होते. एकूणात 11 लोकांसाठी मिळून 44 हजार अमेरिकन डॉलरची बचत झाली. यासाठी त्यांना जीव धोक्यात घालावा लागला.
या 11 लोकांना विनिपेग सोडा असं सांगण्यात आलं. अमेरिकेच्या सीमेपर्यंत पायी जा, असंही सांगण्यात आलं. यादरम्यान चार लोकांचा मृत्यू झाला. सातजणच अमेरिकेच्या सीमेपर्यंत पोहोचू शकले.
12 जानेवारी 2022 रोजी प्रचंड प्रमाणात बर्फवृष्टी झाली. साडेअकरा तास ही सात माणसं भयंकर अशी बर्फवृष्टीतून चालत अमेरिकेत आली. फ्लोरिडात स्टीव्ह सँड्स त्यांना घ्यायला पोहोचले. त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था केली. सीमेपासून त्यांना अंतर्गत भागात नेण्याची व्यवस्था करण्यात आली.
या 7 लोकांमध्ये व्हीडी नावाचा माणूसही होता. त्यांच्याकडे डायपर आणि लहान मुलांचे कपडे होते. चौकशीत बाकी चार लोकांच्या मृत्यूबद्दल कळलं, हे या गटाबरोबर नव्हते. खूप शोध घेतल्यानंतर दोन मुलं आणि त्यांच्या पालकांचा शोध लागला.
साडेअकरा तास भयंकर बर्फवृष्टीत चालल्यानंतर एका महिलेच्या बोटांमधलं चैतन्य हरपलं. तिला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. एका माणसाला पायाच्या बोटांना थंडीचा त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करावं लागलं.
गुजरात पोलिसांनी जेव्हा अहमदाबाद शहरात फेनिल पटेलच्या कार्यालयात येणाऱ्या लोकांच्या चौकशीतून काही गोष्टी समोर आल्या. मेमनगर भागातल्या योगेश पटेल नावाचा माणूस व्यवसायाशी निगडीत आहे. 66 ते 75 लाख रुपये घेऊन हा माणूस फेनिलच्या मदतीने बेकायदेशीरपणे लोकांना अमेरिकेत पोहोचवत असे.
कोरोनानंतर सक्रिय झाले एजंट
बेकायदेशीरपद्धतीने अमेरिकेत जाणाऱ्या लोकांमध्ये प्रियंका चौधरीही होत्या. प्रियंका यांचे नातेवाईक एमएम पटेल अहमदाबादमधल्या राणीप परिसरात राहतात. एमएम पटेल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “प्रियांका आमची नातेवाईक आहे. माणसा नावाच्या भागात राहते. प्रिन्स चौधरीच्या सांगण्यावरुन ती योगेश पटेलांना भेटली”.
“अमेरिकेत पोहोचल्यानंतर काही पैसे देणं होतं. यावर व्हीडिओ कॉलवर चर्चाही झाली होती. जानेवारी महिन्याच्या शेवटी आम्ही बोललो, तेव्हा ती रुग्णालयात होती. त्यांच्या बोटांमध्ये रक्त साकळल्याने शस्त्रक्रिया करावी लागली. रुग्णालयात नेलं जात असताना तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. तिला बाह्य पद्धतीने ऑक्सिजनही पुरवावा लागला”.
याआधी बेकायदेशीर पद्धतीने लोकांना सबएजंट बनवून अमेरिकेला पाठवण्याचं काम करणाऱ्या एका माणसाने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितलं की, “जानेवारी 2022 मध्ये कोरोना संकट हळूहळू कमी झालं तेव्हा योगेश पटेल पुन्हा सक्रिय झाला. गेल्या दहा वर्षांपासून तो बिल्डिंग कॉन्ट्रॅक्टर म्हणून कॅनडामार्गे तो अमेरिकेत जातो आहे. लोकांना बेकायदेशीर पद्धतीने अमेरिकेला पाठवण्यातही तो सक्रिय आहे”.
योगेशच्या शेजाऱ्यांची अळीमिळी गुपचिळी
अहमदाबाद शहरातल्या मेमनगर भागात राहणाऱ्या योगेशचे शेजारी याबाबत बोलायला तयार नाहीत. त्यांच्याबरोबर काम करणारे इलेक्ट्रिशन जयेश ठाकोर यांनी सांगितलं की, “आम्ही योगेश पटेलला एक ठेकेदार म्हणून ओळखतो. लोकांना बेकायदेशीर पद्धतीने परदेशी पाठवण्याचं तो काम करतो का नाही याबाबत आम्हाला माहिती नाही”.
कलोलजवळच्या पलसाना इथे राहणारे भावेश पटेल यांचे मित्र जिग्नेश यांनी बीबीसीशी टेलिफोनवर बोलताना सांगितलं की, “भावेश छोट्या पातळीवर पैसे गोळा करत असे. पण तो लोकांना बेकायदेशीर पद्धतीने परदेशात पाठवत असे का नाही याबाबत आम्हाला माहिती नाही”.
बीएच राठोड यांनी मेहसाणा लोकल क्राईम ब्रांचमध्ये काम केलं आहे. हे सगळं घडलं तेव्हा ते अहमदाबाद (ग्रामीण) पोलीस इन्सपेक्टरपदी कार्यरत आहेत.
त्यांनी बीबीसीला सांगितलं की, “उत्तर गुजरातहून मेक्सिको आणि कॅनडामार्गे लोकांना बेकायदेशीर पद्धतीने अमेरिकेला नेण्याचं रीतसर रॅकेटच आहे. हे मेक्सिकन रॅकेट अतुल चौधरी आणि बॉबी पटेल चालवतात”.
“ज्या लोकांना इंग्रजी येत नाही त्यांच्यासाठी आयएलटीएस (इंटरनॅशनल इंग्लिश लँग्वेज टेस्टिंग सिस्टम) परीक्षेत डमी उमेदवार बसवून परीक्षा उत्तीर्ण केली जाते. यात दिल्लीतली एक संस्था त्यांना मदत करते”.
थोड्या दिवसांपूर्वी अमेरिकेत काही गुजराती मुलं बेकायदेशीर पद्धतीने प्रवेश करताना पकडले गेले. जेव्हा त्यांना न्यायालयात सादर केलं तेव्हा लक्षात आलं की आयएलईएस परीक्षेत चांगले गुण असूनही त्यांना इंग्रजी येत नाही.
याप्रकरणाच्या चौकशीदरम्यान ज्या रॅकेटचं नाव समोर आलं त्याचा संबंध डिंगुचा गावातल्या एकाच कुटुंबातल्या चार जणांच्या मृत्यूशी आहे.
लवकरात लवकर प्रकरण मार्गी लावू असा पोलिसांचा दावा
तपासादरम्यान हे समजलं की उत्तर गुजरातमधल्या ग्रामीण तालुक्यात काम करणारे एजंट अहमदाबादमधल्या एजंटांना संपर्क करतात. व्हिजिटर व्हिसाच्या माध्यमातून कॅनडा आणि मेक्सिकोला त्यांना पाठवलं जातं. बेकायदेशीर पद्धतीने मेक्सिकोची सीमा पार करणाऱ्या लोकांना शरणार्थी शिबिरांमध्ये ठेवलं जातं.
त्यांच्या मोबाईलवर एक अप्लीकेशन डाऊनलोड केलं जातं. त्यांना रस्त्यावाटे पाठवलं जातं. गुजरातमध्ये एजंट आपलं काम चोख बजावतात. त्यानंतर मेक्सिकोमध्ये या लोकांना अमेरिकेच्या एजंटकडे सोपवलं जातं. त्या माणसांना कामावर ठेवलं जात नाही तोवर एजंट काम करत राहतात.
जी माणसं कॅनडातून अमेरिकेत प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात त्यांना मोटेलच्या खोल्यांमध्ये ठेवलं जातं. कॅनडा आणि अमेरिकेतले एजंट वेगवेगळे असतात. अमेरिकेत कोणत्याही घुसखोराला पकडलं जातं तेव्हा त्यांची हालचाल टिपण्यासाठी त्यांच्या मनगटावर एक जीपीएस बँड लावला जातो.
जर ही माणसं कोणत्याही अवैध कामांमध्ये नसतील तर त्यांना कोणताही त्रास दिला जात नाही. अमेरिकेतील एजंटांचे वकील अशा लोकांचे खटले लढतात. बहुतांश लोक जर बेकायदेशीर काम करत नसतील तर तिथेच स्थायिक होतात. 66 ते 75 लाख रुपये घेणारा एजंट त्यांना स्थायिक करुन देऊन काम मिळवून देण्याची जबाबदारी उचलतो.
बॉबी पटेलला अलीकडेच अटक करण्यात आली आहे. अतुल चौधरीने रशियाच्या मुलीशी लग्न केलं आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यादरम्यान युद्ध सुरु झाल्यानंतर अतुल पत्नीसह कॅनडाला असल्याची चर्चा आहे.
डीजीपी भाटिया यांच्या मते, “गुजरातहून अमेरिकेला लोकांना बेकायदेशीर पद्धतीने पाठवण्याच्या रॅकेटचा आम्ही कधीही गौप्यस्फोट करु शकतो. दोन एजंटांना अटक करण्यात आली आहे. विदेशी तपास यंत्रणांच्या आम्ही संपर्कात आहोत. विदेशात कार्यरत एजंटांनाही आम्ही लवकरच पकडू”.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)