जंगल, डोंगर, लूटमार : अमेरिकेत पोहोचण्यासाठी जीव धोक्यात टाकतात हे लोक

    • Author, बर्न्ड डेबुसमन ज्युनिअर
    • Role, बीबीसी प्रतिनिधी
    • Reporting from, एल पासो, टेक्सस

अमेरिकेत अवैधरित्या प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना गुजरातचे बृजकुमार यादव यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. मेक्सिको आणि अमेरिकेच्या सीमेवर असलेली मोठी भिंत ओलांडण्याचा ते प्रयत्न करत होते.

भारतच नाही, जगभरातून अनेकांना वाटतं की अमेरिका मायानगरी आहे, तिथे त्यांचं प्रत्येक स्वप्न पूर्ण होईल. त्यामुळेच अमेरिकेत पोचण्यासाठी ते वाट्टेल ते करायला तयार असतात.

जीव धोक्यात घालतात, अवैधरित्या प्रवास करतात. काही लोक यशस्वी होतात, काहींचा जीव जातो तर काहींना कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागतं.

पण अमेरिकेच्या सीमेपर्यंत पोचणंही सोपं नसतं. अनेक देशांमधून प्रवास करत, हजारो किलोमीटरचा रस्ता कापत, जंगल, डोंगर, नद्या ओलांडत स्थलांतरित सीमेवर पोहचतात.

अमेरिकेच्या सीमेवर टेक्सस राज्यात एल पासो शहर या स्थलांतरितांचा शेवटचा स्टॉप आहे. बीबीसीने इथल्या स्थलांतरितांची कहाणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

विलमॅरी कमाचो आपलं चार महिन्यांचं बाळ आणि तीन वर्षांची मुलगी घेऊन जंगलाचा रस्ता तुडवत, डोंगर पार करून, आजारपणांशी लढत, रस्त्यात झालेल्या हिंसक लुटीचा सामना करत अमेरिकेच्या सीमेवर पोचल्या आहेत.

व्हेनेझुएलात राहाणाऱ्या विलमॅरी यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं की, “सगळ्या प्रवासात जंगलाचा प्रवास सर्वात अवघड होता. लोक मरून पडलेले दिसायचे. जंगली जनावरांची भीती असायची. खूप धोकादायक रस्ता होता हा.”

त्या पुढे म्हणतात, “आमच्यासोबत लहान मुलं होती. मुलांसोबत रोज अडचणी वाढत जात होत्या.”

अमेरिकेच्या सीमेवर पोचल्यावर काय होतं?

विलमॅरी आपली मोठी मुलगी मियाबरोबर शहरातल्या डाऊनटाऊन भागातल्या एका फुटपाथवर बसल्या आहेत. त्यांच्याजवळ पांघरूणांचा ढीग पडलाय.

त्यांचे पती थोडं लांब सिगरेट ओढताना दिसतात आणि बरोबरीने आता पुढे काय करायचं याची योजना बनवत आहेत.

त्या कुटुंबाचा प्रवास अजून संपलेला नाही. विलमॅरीचे पती म्हणतात, “अजून तर अर्धा प्रवासही झाला नाहीये. आम्ही डेनव्हरच्या दिशेने जाणार होतो. आम्ही तिकिटंही काढली आहेत.”

23 वर्षांच्या विलमॅरी त्या 20 लाख स्थलांतरितांपैकी एक आहेत जे मागच्या वर्षी इथे पोचले. पुढच्या वर्षी हा आकडा आणखी वाढेल असा अंदाज आहे.

एल पासो एक असं शहर आहे जिथे गेल्या काही आठवड्यांत स्थलांतरितांची गर्दी खूपच वाढली आहे, त्यामुळे स्थानिक प्रशासनावर ताण आला आहे.

स्थानिक प्रशासनाची गरजेच्या गोष्टी जमवताना दमछाक होतेय.

अमेरिकेत आश्रय मागणाऱ्या अनेक कुटुंबांपैकी एक कमाचो कुटुंब आहे. आश्रय मागितल्यानंतर त्यांच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू होतो. त्यांना अमेरिकन बॉर्डरवर असणाऱ्या कस्टम्स अँड बॉर्डर पेट्रोल (सीबीपी)समोर स्वतःला सादर करावं लागतं.

एल पासो शहरात दर दिवशी 1500 स्थलांतरित पोचतात.

इथे स्वयंसेवी संस्था स्थलांतरित लोकांना पुढच्या प्रवासाच्या योजना बनवायला मदत करतात. यानंतर त्यांना कोर्टाच्या निर्णयाची वाट पाहावी लागते.

इथे कोर्ट ठरवतं की, स्थलांतरितांचं या देशात स्थान काय असेल.

या काळात स्थलांतरित लोक अमेरिकत राहाणाऱ्या आपल्या नातेवाईकांना भेटायची किंवा काम शोधण्याची योजना बनवतात.

एल पासोच्या रस्त्यांवर बीबीसीने अनेक स्थलांतरितांना त्यांच्या पुढच्या योजनांविषयी विचारलं.

यात काही ‘स्पॉन्सर्ड’ प्रवासी असतात. ‘स्पॉन्सर्ड’ म्हणजे ज्यांच्या नातेवाईकांनी किंवा मित्रमैत्रिणींनी या स्थलांतरितांचा खर्च उचलण्याचा शब्द दिला आहे. याखेरीज असेही लोक असतात जे कोणत्याही ओळखीशिवाय प्रवास करत असतात. या लोकांकडे कपडे आणि थोडंसं सामान असतं.

चांगल्या भविष्याच्या शोधात खडतर रस्ता

निकाराग्वाच्या राहाणाऱ्या एलोईज एसीवीदो म्हणतात, “मी न्यूयॉर्कला जातेय, तिथे माझे एक नातेवाईक आहे.”

त्या म्हणतात, “प्रवासात माझे सगळे पैसै लुटले गेले. मी आता एकटीच आहे, आता माझ्याकडे एक पैसा नाहीये. एक मुलगा आला होता शहरातून, त्याने वचन दिलं होतं की तो मदत करेल. पण नंतर कोणीच आलं नाही.”

एसीवीदो यांना काहीही करून न्यूयॉर्कपर्यंत पोचायचं आहे. आपल्या तीन मुलांना, ज्यात एक वर्षाचा एक लहानगाही आहे, त्या घरीच सोडून आल्यात.

त्या म्हणतात, “मी ही तडजोड केलीये कारण मी गुलामासारखं काम करूनही आठवड्याला जवळपास 2500 रुपये कमवू शकत होते. अन्न महाग होतं. आता इथे काम करून जे पैसै वाचतील ते मी घरी पाठवेन.”

डोमिनिक रिपब्लिकच्या रहिवासी एलियानी रोड्रिगेज यांनी बीबीसीला सांगितलं की या प्रवासाचा सगळ्यात अवघड टप्पा वाट पाहणं आहे.

एलियानीला न्यू जर्सीला जायचं आहे. तिथे त्यांचे मित्रमैत्रिणी आणि नातेवाईक आहेत. न्यू जर्सी राज्यात डोमिनिकन मूळ असलेल्या लोकांची संख्या बरीच आहे.

त्या पुढे म्हणतात, “आता कोर्टाच्या तारखेची वाट पाहावी लागेल. कोणतीही चूक चालणार नाही. मला फक्त साधं आयुष्य जगायचं.”

एलियानीला कदाचित खूप वाट पाहावी लागणार नाही. आम्ही तिथे असतानाच कळलं की शहर प्रशासनाने त्यांच्यासाठी न्यूयॉर्कसाठी तिकिटाची व्यवस्था केली आहे.

एलियानी म्हणतात, “त्यांनी मला सांगितलं की सरकार लोकांना न्यूयॉर्कला जाण्यासाठी मदत करत आहे. आम्ही त्यांचे अत्यंत आभारी आहे.”

प्रतीक्षा, प्रतीक्षा आणि प्रतीक्षा

वाट पाहणं एल पासोतल्या स्थलांतरित प्रवाशांच्या जगण्याचा एक हिस्सा बनून गेलंय. मग भले त्यांचा पुढचा प्रवास असो नाहीतर एकवेळेचं जेवण मिळवणं असो.

52 वर्षांचे लष्करी अधिकारी रोड्रिगो एन्तोनियो हर्नान्डेज यांनी सांगितलं सरकारी एजंटांनी त्यांना सतत टॉर्चर केल्यामुळे ते व्हेनझुएलातून पळून आले.

ते म्हणतात की इथले बहुतांश स्थलांतरित प्रवासी इथल्या स्थानिक लोकांसाठी कोणतीही अडचणी निर्माण करू इच्छित नाहीत. त्यांना इथे काही काळ थांबून शांततेत आपल्या रस्त्याने निघून जायचं आहे.

एकेदिवशी सकाळी आम्हाला हर्नान्डेज स्थानिक फूड बँकेच्या बाहेर जेवणाची वाट पाहात होते. त्याच वेळी ते इतर लोकांना साफसफाई करायला, आणि कचरा डस्टबिनमध्ये टाकायला सांगत होते.

त्यांनी बीबीसीला सांगितलं, “आम्हाला इथे शिस्तीने राहायचं आहे.”

सिटी पार्क भागात व्यवस्थित घड्या केलेली अंथरूणं-पांघरूणं, नीट रचून ठेवलेल्या पिशव्यांकडे बोट दाखवत ते म्हणतात, “इथल्या लोकांच्या मनात आमच्याबद्दल अढी बसावी असं मला वाटत नाही. जर आम्ही या भागात घाण केली तर इथल्या लोकांच्या मनात इथे येणाऱ्या स्थलांतरितांविषयी तिटकारा निर्माण होईल.”

‘कुठे जाणार, काय करणार काहीच माहिती नाही’

इथे येणाऱ्या प्रत्येकाला एक नवीन आयुष्य सुरू करायचं आहे पण ते काय करणार, कुठे जाणार याबदद्ल अनेकांना कल्पना नाहीये.

यातल्याच एक आहेत चिलीच्या नागरिक केनिया काँट्रेरास आणि त्यांचे व्हेनेझुएलन पती अँथनी वाब्रा. त्यांच्याबरोबर त्यांचा चार वर्षांचा मुलगाही आहे.

अमेरिकेपर्यंत पोचण्यासाठी त्यांना 9 देशांमधून प्रवास करावा लागला.

अँथनी म्हणतात, “आम्ही इथे अटलांटामध्ये आहोत आणि ह्युस्टनमध्ये आमचे नातेवाईक आहेत. पण आम्हाला कोणाच्या आयुष्यात बाधा आणायची नाहीये. जर इतर लोक कोणाच्या मदतीशिवाय इथे नवं आयुष्य सुरू करू शकतात तर आम्हीही करू शकतो. आम्ही इथे काम करायला आलोय, मदत मागायला नाही.”

पण पुढे कुठे जायचं आणि काय काम करायचं याची त्यांना कल्पना नाहीये.

काँट्रेरास म्हणतात, “मी माझ्या मुलाला एक चांगलं आयुष्य देऊ इच्छिते. जिथे देव नेईल, तिथे आम्ही जाऊ.”

“आम्ही पडेल ते काम करू. बस एकदा काम मिळालं की जीव ओतून करू.”

(अलेक्झांडर ओस्टासीविच यांनी दिलेल्या अधिक माहितीसह)

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTubeFacebookInstagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)