You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
गुजरातहून अमेरिकेला व्हिसाशिवाय जीव धोक्यात घालून जाणाऱ्या माणसांची कहाणी
- Author, रॉक्सी गागडेकर छारा
- Role, बीबीसी गुजराती
जानेवारी 2022 मध्ये अमेरिकेमध्ये बेकायदेशीर मार्गाने शिरकाव करण्याचा प्रयत्न करताना एका गुजराती कुटुंबातल्या चौघांचा थंडीने गारठून मृत्यू झाला होता. या चौघांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी दोघा जणांना अटक केली आहे.
हे पटेल कुटुंब गुजरातच्या कलोल शहराजवळच्या डिंगुचा गावात राहणारं होतं. अमेरिकेच्या सीमेपासून 12 मीटर अंतरावर असलेल्या कॅनडाच्या मॅनिटोबा येथील एका शेतात त्यांचे मृतदेह आढळले होते.
गुजरात मधील पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, अटक करण्यात आलेल्या व्यक्ती या "बेकायदेशीर इमिग्रेशन" एजंट म्हणून काम करायच्या.
अमेरिका आणि कॅनडा येथील दोन एजंटना अटक करण्याचाही पोलिसांचा प्रयत्न आहे.
मृतांमध्ये 39 वर्षीय जगदीश पटेल, 37 वर्षीय वैशालीबेन, 11 वर्षांची मुलगी विहांगी आणि 3 वर्षांचा धार्मिक अशा चौघांचा समावेश होता.
हे कुटुंब कॅनडाद्वारे अमेरिकेत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतं. मात्र -35C तापमानात तासंतास चालल्याने या चौघांचा मृत्यू झाला आणि जगभरात हेडलाईन्स छापून आल्या.
अमेरिकेमध्ये बेकायदेशीर मार्गाने शिरकाव करण्याचा प्रयत्न करणाऱ्या गुजरातमधील 11 लोकांच्या ग्रुपमध्ये पटेल यांचा समावेश होता. या ग्रुपमधील इतर सात जणांना अमेरिकन अधिकाऱ्यांनी सीमा ओलांडल्यानंतर ताब्यात घेतलं होतं.
या घटनेसंबंधी अहमदाबादमधील वरिष्ठ पोलीस अधिकारी चैतन्य मंडलिक यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, "जगदीश पटेल आणि त्यांच्या सोबत असणाऱ्या इतर 11 लोकांना अमेरिकेच्या सीमेजवळच्या एका गोठलेल्या तळ्यावरून चालावं लागलं. यासाठी ज्या एजंटने मदत केली होती, त्याच्यावर शहर गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केलाय."
द कॅनेडियन प्रेस या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, अटक केलेल्या व्यक्तींवर "इमिग्रेशन एजंट म्हणून काम करणे, कुटुंबातील सदस्यांना कागदपत्रे पुरवणे आणि बेकायदेशररित्या अमेरिकेला जाण्यास मदत करणे" असा आरोप आहे.
शिवाय त्यांच्यावर मानवी तस्करी, गुन्हेगारी कट रचणे आदी आरोपही ठेवण्यात आले आहेत.
पीटीआयने या वृत्तसंस्थेने वरिष्ठ पोलीस अधिकारी चैतन्य मंडलिक यांच्या हवाल्याने म्हटलंय की, "पटेल कुटुंब आणि इतरांना कॅनडामधील टोरंटो आणि नंतर व्हँकुव्हरला नेण्यात आलं. इथे गेल्यावर त्यांनी त्यांच्या एजंटशी संपर्क साधला आणि मग हे सगळे मानिटोबा नावाच्या गावी पोहोचले. हे कुटुंब भारतातून टोरांटोला आलं आणि नंतर त्यांनी ओंटारियोमधून अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न केला."
मॅनिटोबा पोलिसांनी द कॅनेडियन प्रेसशी बोलताना सांगितलं की, "पटेल कुटुंबाने व्हँकुव्हर इथून प्रवास केलाय अशी माहिती देणारा कोणताही पुरावा अद्याप सापडलेला नाही."
कॅनेडियन पोलिस पुढे म्हणाले की, "या घटनेचा तपास करण्यासाठी आम्ही इंटरनॅशनल लॉ इन्फोर्समेंट सोबत काम करत आहोत."
पटेल कुटुंबियांप्रमाणेच गुजरातमधील अनेक जण जीव धोक्यात घालून अमेरिकेला जात आहेत. ते असं का करतात? त्यांना कोणत्या अपेष्टांमधून जावं लागतं? याचा एक रिपोर्ट बीबीसी गुजरातीने केला होता. तो पुन्हा प्रसिद्ध करत होता.
अमेरिकेमध्ये बेकायदेशीर मार्गाने शिरकाव करण्याचा प्रयत्न करताना एका गुजराती कुटुंबातल्या चौघांचा थंडीने गारठून मृत्यू झाला होता. हे कुटुंब गुजरातच्या कलोल शहराजवळच्या डिंगुचा गावात राहणारं होतं.
गुजरातमधून अमेरिकेला अवैधरित्या जाणाऱ्या प्रवाशांचा मुद्दा या दुर्दैवी घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आलाय. अमेरिकेमध्ये ज्या बेकायदेशीर मार्गांनी शिरण्याचा प्रयत्न लोक करतात, त्याविषयीही चर्चा होतेय.
अमेरिकेत पोहोचण्याचा प्रयत्न करणारे लोक कॅनडातून जाऊनच अमेरिकेत शिरतात, असं नाही. शिवाय हेही लक्षात घ्यायला हवं की गुजरातहून अमेरिकेला जाणारी प्रत्येक व्यक्ती बेकायदेशीर मार्गानेच जाते, असंही नाही.
हे कुटुंब कॅनडाद्वारे अमेरिकेत कसं पोहोचण्याचा प्रयत्न करत होतं, याविषयीचा तपशील अमेरिकन पोलिसांनी अजून दिलेला नाही. कारण बेकायदेशीरपणे पोहोचण्याचे अनेक मार्ग अवैध प्रवासी वापरतात.
शिवाय अमेरिकेत आधीपासूनच विविध समुदायांतले गुजराती लोक मोठ्या प्रमाणात आहेत.
या लोकांचा अजूनही त्यांच्या गावांशी संपर्क आहे. म्हणून मग या समाजातले लोक अमेरिकेत पोहोचल्यानंतर आधीपासूनच तिथे असणाऱ्या या लोकांची मदत घेतात किंवा काही महिने त्यांच्यावर अवलंबून राहू शकतात.
प्रवासाला लागणारी कागदपत्रं तयार करून देणाऱ्या काही ट्रॅव्हल एजंट्ससोबत बीबीसी गुजरातीने संवाद साधला.
पण याविषयी बोलायला ते फारसे उत्सुक नव्हते आणि या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू असल्याने त्यांनी आपली ओळख जाहीर न करण्याची अट घातली.
या सगळ्याची सुरुवात कुठून होते?
परदेशी प्रवास करायचा असेल तर तुमच्याकडे पासपोर्ट असावा लागतो.
कॅनडामध्ये ज्या पटेल कुटुंबाचा मृत्यू झाला त्या कुटुंबाचे प्रमुख जगदीशभाई पटेल यांच्याकडेही एक पासपोर्ट होता. आणि त्याच पासपोर्टच्या आधारे त्यांना कॅनडाकडून 'व्हिजीटर्स व्हिसा' देण्यात आला होता.
नाव न सांगण्याच्या अटीवर एका एजंटने सांगितलं, "अमेरिकेच्या आसपासच्या एखाद्या देशाचा ट्रॅव्हल व्हिसा घ्या, असं आम्ही सामान्यपणे आमच्या क्लायंट्सना सांगतो."
प्रवासी म्हणून किंवा इतर कोणत्याही प्रकारे व्हिसा मिळाल्यानंतर ते भारत सोडून अमेरिकेच्या शेजारच्या देशांत आरामात पोहोचू शकतात.
"पण अशा प्रकारे अमेरिकेला पोहोचणाऱ्या लोकांना खूप पैसे खर्च करावे लागतात. कुटुंबातल्या प्रत्येकासाठी त्यांना मोठी रक्कम भरावी लागते."
डिंगुचा गावातल्या एका स्थानिकाने सांगितलं, "अमेरिकेला पोहोचण्यासाठी कोट्यवधींचा खर्च करण्याची इथे लोकांची तयारी आहे. साधारणपणे एका कुटुंबाला अमेरिकेत पोहोचण्यासाठी एक कोटी रुपयांपर्यंतचा खर्च करावा लागतो."
खर्चाच्या या आकड्याला दुजोरा देत एका ट्रॅव्हल एजंटने सांगितलं, "हो, यासाठी खूप पैसे लागतात. कारण आम्हाला एजंट्सना पैसे द्यावे लागतात, जे लोक तिथे असतात त्यांनाही पैसे द्यावे लागतात. यासोबतच आम्हाला ट्रांझिट कंट्रीमधल्या एजंट्सनाही पैसे द्यावे लागतात."
अमेरिकेत घुसण्याचे मुख्य मार्ग कोणते?
बेकायदेशीरपणे अमेरिकेत शिरण्याचा सगळ्यात मोठा मार्ग दक्षिणेला आहे.
अमेरिकेच्या कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन विभागाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार गेल्या वर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यांत सुमारे 5 लाख लोकांनी अमेरिकेत अवैध मार्गांनी घुसण्याचा प्रयत्न केला होता.
अशा प्रकारे घुसण्यासाठी मेक्सिको, ग्वाटेमाला, होंडुरस आणि एल साल्वाडोरद्वारे अमेरिकत शिरण्याचा मार्ग सर्वात मोठा आहे. तर उत्तरेला कॅनडाकडून येणारे लोक हे अल्बर्टामार्गे येतात.
15 वर्षं अमेरिकेमध्ये बेकायदेशीररित्या राहिलेल्या एका गृहस्थांशी बीबीसी गुजरातीने चर्चा केली. ते आता गुजरातमध्ये राहतात.
नाव जाहीर न करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितलं, "तेव्हापासून आजवर गुजरातींसाठी अमेरिकेत घुसखोरी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणे मेक्सिकोची सीमा. मी स्वतःदेखील तीच बॉर्डर पार करून गेलो होतो. पण काही कारणांमुळे मला परतावं लागलं."
हे गृहस्थ 15 वर्षांपूर्वी व्हिसा ऑन अरायव्हल (दाखल झाल्यावर मिळणारा व्हिसा) ने मेक्सिकोला गेले. त्या काळी भारतीयांसाठी मेक्सिकोमध्ये ऑन-अराव्हल व्हिसा उपलब्ध होता.
ऑन अरायव्हल व्हिसा घेऊन हा गट मेक्सिकोला पोहोचला. यानंतर या गटाने मेक्सिको बॉर्डर पार करत अमेरिकेत प्रवेश केला. मेक्सिकोने आता त्यांचे व्हिसासाठीचे नियम बदलले आहेत आणि मेक्सिकोला जाण्यासाठी भारतीयांना आता आधी व्हिसा घ्यावा लागतो.
एका ट्रॅव्हल एजंटनुसार, "कॅनडाशिवाय अमेरिकेच्या इतर शेजारी देशांचा व्हिसा मिळवण्यासाठी फार खर्च करावा लागत नाही. पण खरं काम या देशांमध्ये पोहोचल्यानंतर सुरू होतं. या लोकांना सीमेपर्यंत नेण्यासाठी एखाद्या स्थानिक व्यक्तीसोबत करार केला जातो. हे लोकल एजंट सीमा पार करण्यासाठी लागणाऱ्या गरम कपडे, जेवण - पाण्यासारख्या गोष्टी उपलब्ध करून देतात."
या बेकायदेशीर प्रवाशांना हे लोकल एजंट्स सीमेपर्यंत घेऊन जातात. जंगलं आणि वाळवंटांमधून जाणाऱ्या रस्त्यांची माहिती पुरवतात.
गोठलेल्या तळ्यावरून चालत गेलं पटेल कुटुंब
जगदीश पटेल आणि त्यांच्या कुटुंबासाठी स्टीव्ह शाँड नावाचा माणूस लोकल एजंट म्हणून काम करत होता. त्याला या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. आणि पोलिसांच्या मते मानवी तस्करी करणाऱ्या मोठ्या नेटवर्कचा तो एक भाग आहे.
याच एजंटने पटेल कुटुंबाला खाण्यापिण्याच्या आणि इतर आवश्यक गोष्टी पुरवल्याचं पोलिसांना तपासात आढळलंय.
डिंगुचा गावातलं हे पटेल कुटुंब सगळ्यात आधी कॅनडाला पोहोचलं. इथे गेल्यावर त्यांनी त्यांच्या एजंटशी संपर्क साधला आणि मग हे सगळे मानिटोबा नावाच्या गावी पोहोचले. या गावची लोकसंख्या आहे 300 च्या आसपास.
हे कुटुंब भारतातून टोरांटोला आलं आणि नंतर त्यांनी ओंटारियोमधून अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न केल्याचं बीबीसी अमेरिकाने म्हटलंय. या कुटुंबाला दक्षिण ओंटारियोमधल्या अमेरिकेच्या सीमेजवळच्या एका गोठलेल्या तळ्यावरून चालावं लागलं. पण हे कुटुंब सीमा ओलांडू शकलं नाही आणि सीमेजवळ त्यांचे मृतदेह आढळले.
या लोकांनी बूट आणि गरम कपडे घातलेले होते. पण उणे 35 तापमानासाठी हे गरम कपडे पुरेसे नव्हते.
यापूर्वी 2019 साली 6 वर्षांची एक मुलगी गुरुप्रीत कौर अमेरिकेच्या सीमेलगतच्या अॅरिझोना राज्यातून गायब झाली होती.
ही मुलगी कुटुंबासोबत होती आणि आई आणि बहिणीसोबत अमेरिकेत घुसण्याचा प्रयत्न करत होती असं सीएनएनच्या बातमीत म्हटलंय. या सगळ्या प्रवासात ती हरवली आणि नंतर सीमा पोलिसांना या मुलीचा मृतदेह सापडला.
अमेरिकेच्या कस्टम्स अँड बॉर्डर प्रोटेक्शन विभागाने 2019मध्ये प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार (पान 39) भारत, क्युबा आणि इक्वेडोरमधून मोठ्या संख्येने लोक अमेरिकेत येतायत.
2019 सप्टेंबरपर्यंत सुमारे 8000 भारतीय नागरिकांनी बेकायदेशीरपणे अमेरिकेत शिरण्याचा प्रयत्न केला होता. यामधले 7500 दक्षिण सीमेमार्गे तर 339 लोक उत्तर सीमेद्वारे घुसले होते.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)