You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मुंबईतला पैसा जेव्हा उत्तर प्रदेशातल्या निवडणुकांमध्ये खेळवला जातो
- Author, अनघा पाठक
- Role, बीबीसी मराठी, सारनाथहून
"अरे उनका मुकाबला हम कैसे करेंगे, उनके पास तो मुंबईवाला पैसा हैं. पर ना ये मुंबईवाला पैसा यहा टिकेगा, ना आदमी, इसलिये व्होट हमे ही दे."
काही काळापूर्वी उत्तर प्रदेशात ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या होत्या, त्यात गावागावात हेच वाक्य ऐकू यायचं.
आता विधानसभांच्या निवडणुकांमध्येही 'मुंबईवाल्या पैशांचा' जोर दिसतोय.
पण आहे काय हा 'मुंबईवाला पैसा'?
वाराणसी ते सारनाथ फारसं अंतर नाही. हे तेच सारनाथ जिथे सम्राट अशोकाने बांधलेला स्तंभ आहे. इथेच सारंगनाथ मंदिर आहे, बौद्ध स्तूप आहेत पण तरी गाव निवांत आहे.
तिथेच आम्हाला भेटले वाराणसीचे जेष्ठ पत्रकार पवन सिंह. त्यांनी या 'मुंबईवाल्या पैशां'ची कथा आम्हाला उलगडून सांगितली.
"काय झालंय की गेली कित्येक दशकं उत्तर प्रदेशातून, विशेषतः पूर्वांचलमधून (उत्तर प्रदेशचा पूर्व भाग) माणसं मुंबईत कामाला गेलीत, जात राहिलीत. इथल्या अनेकांच्या आता दुसऱ्या-तिसऱ्या पिढ्या मुंबईत आहेत. साहजिक आहे त्यांच्या हातात पैसाही खुळखुळतोय."
ते पुढे म्हणतात, "जी माणसं मुंबईत गेली त्यांनी कधीच आपल्या गावांशी संबंध कमी केला नाही. उलट हातात पैसा आल्यावर इथल्या राजकारणात थेट हस्तक्षेप केला. पण तुम्हाला अशी शेकडो उदाहरणं सापडतील की एक माणूस मुंबईत काम करतोय, बऱ्यापैकी पैसा कमवतोय तर त्याने गावात आपला भाऊ किंवा वडिलांना सरपंचपदाच्या निवडणुकीत उभं केलं आणि पैशाच्या बळावर जिंकून आणलं."
पूर्वांचलच्या या भागात कुठेही फिरा, जौनपूर, प्रतापगड, भदोई, मिर्झापूर (हो, तेच वेबसीरिजवालं) तुम्हाला मुंबईच्या खुणा जागोजागी दिसतात.
म्हणूनच कदाचित मुळचे उत्तर प्रदेशचे असणारे पण आता मुंबई कर्मभूमी असलेले अनेक नेते इथे प्रचारासाठी तळ ठोकून बसलेले दिसतील. इतकंच कशाला अनेक मराठी नेतेही इथे प्रचारासाठी आलेत.
19 फेब्रुवारीला जेव्हा आम्ही मुंबईहून वाराणसीत येत होतो तेव्हा आमच्याच विमानात राष्ट्रवादीचे नवाब मलिकही होते. ते भदोईला प्रचारासाठी जात होते. 20 तारखेला त्यांची प्रचारसभा होती.
भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे गोरखपूरमध्ये आहेत.
शिवसेनेचे आदित्य ठाकरे पूर्व उत्तर प्रदेशमधल्याच सिद्धार्थनगर आणि प्रयागराज जिल्ह्यांमधल्या गावांमध्ये सभा घेणार आहेत.
मुंबईला कामाच्या शोधासाठी कोण जातं, या प्रश्नाचे उत्तर देताना मला एक स्थानिक पत्रकार म्हणाले होते की ते लोक 'जे जातीभेदभावाने पिचले आहेत किंवा ज्यांना गुन्हेगारीकडे वळायचं नाहीये. बाकी इथे कोणत्याही रोजगाराच्या संधी नाहीत. शेतीतही फारसं उत्पन्न नाही त्यामुळे त्यांना मोठ्या शहरांमध्ये जावंच लागतं.'
पूर्वांचलमध्ये फिरताना पेट्रोल पंप, चहाची टपरी, हॉटेलमध्ये काम करणारी मुलं कोणाशी गप्पा मारताना एकच साम्य जाणवतं. एकतर यातली अनेक जण मुंबईला जाऊन आलेली असतात, त्यांनी तिथे काम केलेलं असतं, कोणाला पुन्हा जायचं असतं.
यापैकीच एक होता वसीम. हा आम्हाला वाराणसीत भेटला पण मुळचा गोइथहा गावचा. त्याला मुंबईत जाऊन चार पैसे जोडायचे आहेत आणि मग गावी घराची पुर्नबांधणी करायची आहे, थोडी शेती घ्यायची आहे. त्याचा मोठा भाऊ मुंबईत एक कपड्यांच्या कंपनीत काम करतो.
वसीमही मुंबईत जाऊन आला आहे. "कोव्हिडच्या काळात इकडे परत आलो. सध्या घरच्या अडचणींमुळे इथेच थांबलो आहे."
इथले जे कामगार मुंबईत जातात त्यांच्या वाटेचे भोग चुकलेले नाहीत. तिथेही अडचणी आहेत, राहायला जागा नाही, अनेकांची बायकामुलं गावी असतात. पण तरीही चार पैसे कमवायच्या ओढीने ते या महानगराची वाट धरतात.
आता या सगळ्यांचा उत्तर प्रदेशच्या निवडणुकांशी काय संबंध म्हणाल तर सोपंय.. जो पैसा मुंबईत कमवला जातो, तो या निवडणुकीत खेळतो.
मुंबईत स्थायिक असलेले कोणकोणत्या उमेदवारांनी इथून कोणकोणत्या निवडणुका लढवल्या आहेत याबद्दल सांगताना पवन सिंह म्हणतात, "गेल्या लोकसभा निवडणुकीत निवडून आलेले मिर्झापूर-भदोईचे खासदार रमेश बिंद यांचा बेस मुंबईच आहे. तिथे ते बांधकाम क्षेत्रात कार्यरत आहेत. सुभाष पासी यंदा भाजपच्या तिकीटावरून लढत आहेत, गेल्या निवडणुकीतही ते आमदार होते, तेही मुंबईतच असतात, तिथेच त्यांचा व्यवसाय आहे."
"जौनपूरचं उदाहरण घ्या, तिथे तुम्हाला असे अनेक उमेदवार सापडतील जे मुंबईत स्थायिक आहेत. लीना तिवारी असतील, हरबन्स सिंह असतील, कृपाशंकर सिंह असतील. ते मुंबईच्या राजकारणातही सक्रिय आहेत आणि इथल्याही. इथलं म्हणाल तर मुंबईला स्थायिक झालेल्या यूपीच्या लोकांचा सरपंच ते खासदार अशा सगळ्या निवडणुकांमध्ये सरळ सरळ हस्तक्षेप आहे."
उत्पल पाठक वाराणसीतले जेष्ठ पत्रकार आहेत. ते म्हणतात, "मुंबईत स्थानिक झालेल्या उत्तर भारतीय लोकांपैकी सर्वाधिक लोक जौनपूरमध्ये येऊन निवडणुका लढवतात. मग त्या स्थानिक असो किंवा विधानसभा-लोकसभेच्या."
ज्या प्रमाणात उत्तर प्रदेशातून मुंबईत येऊन स्थायिक झालेल्या लोकांचा उत्तर प्रदेशच्या राजकारणात दबदबा आहे, त्या प्रमाणात बिहारमध्ये मात्र तिथले स्थानिक लोक मुंबई किंवा महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या लोकांना महत्त्व देत नाहीत.
कोणताही पक्ष तिकीट देताना एखादा उमेदवार किती खर्च करू शकतो, त्याची आर्थिक कुवत किती हे पाहून तिकीट देतात असं पवन सिंह व्यक्त करतात.
"आता जे लोक मुंबईत स्थायिक असतात, त्याची आर्थिक परिस्थिती मुंबईत काम केल्यामुळे चांगली झालेली असते. काही उमेदवार मुंबईत स्थायिक नसले तरी त्यांचे नातेवाईक मुंबईत असतात, जे त्यांना पैसा पुरवतात."
इथल्या कोणत्याही निवडणुकीत एक शब्द परवलीचा आहे. उमेदवार 'जिताऊ' आहे की नाही, म्हणजे त्या उमेदवाराची जिंकण्याची क्षमता आहे की नाही.
"मुंबईचा पैसा त्यांना जिताऊ बनवतो. ग्रामपंचायत निवडणुकीत तर स्थानिक उमेदवार सरळ सरळ म्हणतात की, 'मुंबय्या पैसा की मुकाबले हम नाही.'
विरोधी उमेदवार अनेकदा हे सांगून गावकऱ्यांची मतं मिळवण्याचा प्रयत्न करतो की मुंबईचा उमेदवार हरला तरी निघून जाणार आहे, आणि जिंकला तरी. आम्ही इथेच राहाणार आहोत.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)