पंतप्रधान मोदींनी जिल बायडन यांना दिलेला कृत्रिम हिरा कसा बनवतात?

ग्रीन डायमंड

फोटो स्रोत, ANI

    • Author, जय शुक्ल
    • Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर आहेत. बुधवारी त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांची भेट घेताना त्यांना अनेक भेटवस्तू दिल्या. पण यात सर्वात जास्त चर्चा झाली ती ग्रीन डायमंडची.

पंतप्रधान मोदींनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन यांना 7.5 कॅरेटचा पर्यावरणपूरक हिरा भेट म्हणून दिलाय.

पंतप्रधानांनी दिलेला हा हिरा अनमोल भेट असून प्रयोगशाळेत अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून याची निर्मिती करण्यात आली आहे.

या हिऱ्याच्या निर्मितीसाठी अक्षय ऊर्जेचा वापर करण्यात आला आहे.

भलेही या हिऱ्याची निर्मिती प्रयोगशाळेत झाली असेल, मात्र यात असणारे रासायनिक आणि ऑप्टिकल गुणधर्म भूगर्भातून काढलेल्या हिऱ्याप्रमाणेच आहेत.

प्रयोगशाळेत बनवलेला हिरा म्हणजे काय, तो कसा बनवला जातो, त्यात काय विशेष असतं, सामान्य हिऱ्यांपेक्षा तो कसा वेगळा ठरतो?

या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी बीबीसीने हिरे उद्योगातील लोकांशी संवाद साधला आहे.

ग्रीन डायमंडची निर्मिती कोणी केली?

अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन यांना जो हिरा भेट म्हणून देण्यात आलाय त्याची निर्मिती गुजरातच्या सुरतमध्ये झाली आहे.

सुरतला भारतातील हिरे उद्योगाचे केंद्र म्हटलं जातं. जगातील 11 हिऱ्यांपैकी 9 हिरे सुरत कट-पॉलिश केले जातात.

जिल बायडन यांना गिफ्ट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

फोटो स्रोत, ANI

फोटो कॅप्शन, जिल बायडन यांना गिफ्ट देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी

जिल बायडन यांना जो हिरा देण्यात आला आहे तो मुकेश पटेल यांच्या मालकीच्या 'ग्रीनलॅब' कंपनीत तयार करण्यात आलाय.

1960 साली ग्रीनलॅबची स्थापना करण्यात आली. सध्याच्या घडीला प्रयोगशाळेत तयार करण्यात येणाऱ्या हिरे उत्पादनात ही कंपनी आघाडीवर आहे.

कंपनीने आपल्या उत्पादन युनिटमध्ये 90 एकरवर 25 मेगावॅटचा सौरऊर्जा प्रकल्प देखील सुरू केला आहे.

ग्रीनलॅबमध्ये दोन हजारांहून अधिक कर्मचारी काम करतात. तर या कंपनीत महिन्याला 1 लाख 25 हजार कॅरेट किंमतीचे हिरे तयार केले जातात.

मुकेश पटेल यांचा मुलगा स्मित पटेल यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, बायडन यांना भारतातील सर्व हिरे उद्योगांच्या वतीने हा हिरा भेट स्वरूप देण्यात आला आहे.

स्मित पटेल पुढे सांगतात की, "हा हिरा अनमोल आहे. शिवाय सुरतच्या प्रयोगशाळेत नव्याने विकसित होत असलेल्या हिरे उद्योगाचे प्रतीक आहे."

आज ग्रीनलॅबची उलाढाल एक हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. हिऱ्यांच्या कट पॉलिशिंग व्यतिरिक्त, या प्रयोगशाळेत हिऱ्यांचे दागिने देखील बनवले जातात.

प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेला ग्रीन डायमंड म्हणजे काय?

एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, पंतप्रधान मोदींनी भेट स्वरूप दिलेला हिरा, प्रति कॅरेट 0.028 ग्रॅम कार्बन उत्सर्जित करण्यात येणाऱ्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवला आहे.

हा हिरा पर्यावरणपूरक असून त्याच्या निर्मितीसाठी सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यासारख्या संसाधनांचा वापर करण्यात आला आहे.

ग्रीन डायमंड

फोटो स्रोत, Getty Images

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

हा हिरा जेमोलॉजिकल लॅब, आयजीआय (इंटरनॅशनल जेमोलॉजिकल इन्स्टिट्यूट) द्वारे प्रमाणित करण्यात आला आहे.

हा हिरा कट, रंग, कॅरेट आणि स्पष्टतेचे सर्व मापदंड पूर्ण करतो. उच्च तापमान आणि उच्च दाब तयार करून याची निर्मिती केली जाते.

भौतिक-रासायनिक गुणधर्मांपासून ते पोतापर्यंत हा हिरा अगदी नैसर्गिक हिऱ्यासारखा दिसतो.

एखादी व्यक्ती पहिल्यांदाच हा हिरा पाहत असेल तर प्रयोगशाळेत बनवलेला हिरा आणि नैसर्गिक हिरा यांच्यात फरक करणं त्यांच्यासाठी अवघड ठरेल.

हिरे उद्योगाशी संबंधित तज्ञांच्या मते, या हिऱ्याची किंमत 17 हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे 15 लाख रुपयांच्या आसपास असावी.

जर 7.5 कॅरेटचा निसर्गनिर्मित हिरा खरेदी करायचा असेल तर मात्र याची किंमत सुमारे 5 कोटी रुपयांच्या आसपास जाते. 7.5 कॅरेटचा हिरा बनविण्यासाठी प्रयोगशाळेत 40 दिवस लागतात.

सुरतच्या हिरे उद्योगातील व्यापारी सांगतात की, आजकाल प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांची बाजारात मागणी वाढली आहे. शिवाय उद्योगही तेजीत आहे.

पूर्वी कृत्रिम हिऱ्यांमध्ये अमेरिकन हिरा, क्यूबिक झिरकोनिया, मोझोनाइट आणि सफेद पुष्कराज आदी हिरे लोकप्रिय होते.

पण त्यांची चमक नैसर्गिक हिऱ्यांच्या तुलनेत वेगळी होती. पण प्रयोगशाळेत तयार झालेल्या हिऱ्यांबाबत असं होत नाही.

प्रयोगशाळेत हिरे तयार करण्याचे विविध मार्ग आहेत. पण उच्च दाब आणि उच्च तापमानात त्याची निर्मिती करणं एक सामान्य पद्धत आहे. याला एचपीएचटी (हाय प्रेशर, हाय टेम्परेचर) पद्धत म्हणतात.

या प्रक्रियेत सात लाख तीस हजार चौरस इंच इतका दाब दिला जातो तर सुमारे 1500 अंश सेल्सिअस तापमान ठेवले जाते.

हिरा

फोटो स्रोत, Getty Images

हिऱ्याचे बीज म्हणून साधारणपणे ग्रेफाइटचा वापर केला जातो. ग्रेफाइटला 1500 अंश सेल्सिअस तापमान दिलं की एका विशेष पद्धतीद्वारे त्याचं हिऱ्यात रूपांतर केलं जातं.

कृत्रिम हिरे बनवण्याची दुसरी पद्धत म्हणजे केमिकल व्हेपर डिपॉजिशन (सीव्हीडी) होय. यात मिथेन आणि हायड्रोजनवर दाब तयार करून 800 डिग्री सेल्सिअस तापमान असलेल्या चेंबरमध्ये सोडलं जातं.

नंतर चेंबरमध्ये मायक्रोवेव्ह, लेसर किंवा इलेक्ट्रॉन बीमद्वारे रासायनिक अभिक्रिया केली जाते.

यात हायड्रोकार्बन वायू आणि मिथेनमध्ये असलेल्या कार्बनचं हिऱ्यात रूपांतर होतं.

प्रयोगशाळेत तयार झालेल्या हिऱ्याचं भविष्य काय?

जाणकारांच्या मते, प्रयोगशाळानिर्मित हा हिरे उद्योग भविष्यात नैसर्गिक हिरे उद्योगाला मागे टाकू शकतो.

हिरा

फोटो स्रोत, Getty Images

सुरत डायमंड असोसिएशनचे सचिव दामजीभाई मावानी बीबीसीला सांगतात की, "जर भारतात प्रयोगशाळेतील हिरे उद्योगाची भरभराट झाली तर सुरतच्या हिरे उद्योगाला नक्कीच सोन्याचे दिवस येतील. कारण प्रयोगशाळेत तयार झालेले हिरे नैसर्गिक हिऱ्यांच्या एक तृतीयांश किंमतीत उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्यांना नैसर्गिक हिरे खरेदी करता येणं शक्य नाही ते प्रयोगशाळेत तयार झालेले हिरे खरेदी करतील आणि एकूणच भारताच्या हिरे उद्योगाला फायदा होईल."

प्रयोगशाळेत तयार झालेले हिरे नैसर्गिक हिऱ्यांपेक्षा स्वस्त आहेत का?

तर होय ते स्वस्त आहेत. हे हिरे नैसर्गिक हिऱ्यांपेक्षा 30 टक्क्यांनी स्वस्त आहेत पण त्यांना कसलंही पुनर्विक्री मूल्य नाही.

मात्र सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अर्थसंकल्पातील घोषणेनंतर जर भारतात प्रयोगशाळेत बनवलेल्या हिऱ्यांचं उत्पादन सुरू झालं तर त्यांच्या किमती आणखी खाली येण्याची शक्यता आहे. मात्र, काही लोकांनी हे साफ नाकारलं आहे.

काही हिरे व्यापाऱ्यांच्या मते, प्रयोगशाळेत तयार झालेल्या हिऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास नैसर्गिक हिरे उद्योग संकटात सापडू शकतो.

हिरे उद्योगतील निर्यातदार कीर्ती शाह बीबीसीशी बोलताना सांगतात की, प्रयोगशाळेतील हिऱ्यांची पुनर्विक्री करायला गेल्यास त्याला कोणतंच मूल्य मिळत नाही. त्यामुळे भलेही ते स्वस्त असतील तरी त्याची तुलना नैसर्गिक हिऱ्यांशी करता येणार नाही.

सुरतच्या हिरे उद्योगाचं यावर काय मत आहे?

बीबीसीशी बोलताना सुरतस्थित हिरे उत्पादन आणि निर्यात कंपनी हरिकृष्णा एक्सपोर्ट्सचे संस्थापक आणि अध्यक्ष सावजीभाई ढोलकिया म्हणतात की, पंतप्रधान मोदींनी जिल बायडन यांना ग्रीन डायमंड देऊन सुरतच्या हिरे उद्योगाचा गौरव केलाय.

सावजीभाई ढोलकिया म्हणतात, "प्रयोगशाळेत तयार झालेले हे हिरे उद्योगचं भविष्य आहेत. पूर्वी हिऱ्यासाठी कच्चा माल आयात करावा लागत होता. परंतु प्रयोगशाळेत विकसित हिरे आता भारतात तयार केले जातील आणि याचा देशाच्या अर्थव्यवस्थेलाच फायदा होईल."

हिरा

फोटो स्रोत, Getty Images

सावजीभाई ढोलकिया म्हणतात, "सुरतचे अनेक उद्योगपती आता प्रयोगशाळेत हिरे तयार करण्याच्या व्यवसायाकडे वळत आहेत. शिवाय या हिऱ्यांची मागणीही वाढते आहे."

सूरत डायमंड असोसिएशनचे सचिव दामजीभाई मावानी बीबीसीशी बोलताना सांगतात, "जर सुरतच्या हिरे उद्योगाने त्याच्या प्रोसेसिंग युनिटमध्ये सौरऊर्जेचा वापर केला तर सुरतच्या हिऱ्यांना चांगला भाव मिळेल. आणि अशा प्रकारच्या वाढत्या हिऱ्यांची मागणी पूर्ण करण्यास सुरतचा हिरा सक्षम आहे."

इंडियन डायमंड इन्स्टिट्यूटचे कार्यकारी सदस्य दिनेशभाई नावडिया यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, "सुरतमधील काही लोकांनी सीव्हीडी तंत्राने प्रयोगशाळेत हिरे तयार करण्यासाठी सौर आणि पवन ऊर्जेचा वापर सुरू केला आहे. हे हिरे पर्यावरण पूरक आहेत."

त्यांनी मोदींचं कौतुक करताना म्हटलंय की, "स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सुरू आहे. म्हणजेच भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष पूर्ण झाल्याचं प्रतीक म्हणून, मोदींनी अमेरिकेच्या फर्स्ट लेडीला सूरतमध्ये बनवलेला 7.5 कॅरेटचा पर्यावरण पूरक हिरा दिला. त्यांनी याच्या माध्यमातून मेक इन इंडियाचे स्वप्न साकार केलं आहे."

हिरे उद्योगातील सूत्रांच्या मते, मोदींनी लेडी बायडन यांना सुरतचा हिरा भेट देऊन गुजरातच्या प्रयोगशाळेत बनवलेले हिरे अमेरिकेत आणखीन लोकप्रिय करण्याचा प्रयत्न केलाय.

श्री रामकृष्ण एक्सपोर्ट्सचे संचालक जयंतभाई नरोला यांनी बीबीसीला सांगितलं की, "नैसर्गिक हिऱ्यांना नॉन ब्लड हिरे म्हणून प्रमाणित करावं लागतं. पण प्रयोगशाळेत विकसित हिऱ्यांच्या बाबतीत तसं नसतं. हव्या तेवढ्या प्रमाणात याचं उत्पादन करता येतं. आणि मागणी वाढल्यास त्याची किंमतही आणखी कमी होऊ शकते."

भारतातील प्रयोगशाळेत तयार झालेल्या हिऱ्यांची मागणी?

भारतीय डायमंड संस्थेचे कार्यकारी सदस्य दिनेशभाई नवाडिया बीबीसीशी बोलताना सांगतात, "भारतात प्रयोगशाळेत तयार झालेल्या हिऱ्यांना प्रोत्साहन दिल्यास सुरतच्या हिरे उद्योगाचं मूल्य वाढेल."

दिनेशभाई पुढे सांगतात, "पूर्वी आम्ही हिऱ्यांचं कट-पॉलिश आणि त्याचे दागिने बनवायचो. आता आम्ही प्रयोगशाळेत तयार होणारे हिरे, त्यांचं कट पॉलिश आणि दागिने देखील बनवू."

"आम्ही दरवर्षी 24 अब्ज डॉलरचे नैसर्गिक हिरे निर्यात करतो. प्रयोगशाळेत बनवलेल्या हिऱ्यांची निर्यात केवळ 1.25 अब्ज डॉलर इतकीच आहे. पण भारतात प्रयोगशाळेतील हिऱ्यांची निर्मिती मोठ्या प्रमाणावर होऊ लागली तर त्याची निर्यात चार अब्ज डॉलरपर्यंत पोहोचू शकते."

भारताने या वर्षीच्या अर्थसंकल्पात सिंथेटिक हिरे बीजांवर सीमाशुल्क लावलं आहे. सरकारच्या या निर्णयाचं कौतुक करताना दिनेशभाई म्हणतात, "याचा भारतातील सिंथेटिक हिरे उत्पादकांना मोठा फायदा होईल."

सुरतच्या हिरे उद्योगाचं असंही म्हणणं आहे की, सिंथेटिक हिऱ्यांची वाढलेली जागतिक मागणी लक्षात घेता, भारताच्या हिरे उद्योगाचं वर्चस्व टिकवून ठेवलं पाहिजे. यासाठी प्रयोगशाळेतील हिऱ्यांच्या पायाभूत सुविधांना सहाय्यता देण्याची आवश्यकता आहे.

प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या हिऱ्यांच्या निर्यातीबद्दल माहिती देताना दिनेशभाई म्हणतात, "भारतात प्रयोगशाळेत तयार करण्यात आलेल्या 15,000 कोटी रुपयांच्या हिऱ्यांची किंवा दागिन्यांची निर्यात केली जाते. या हिऱ्यांसाठी देशांतर्गत बाजारपेठ लहान असली तरी भारतात ज्या पद्धतीने उत्पादन सुरू आहे ते पाहता येत्या काही दिवसांत देशांतर्गत मागणी वाढेल आणि निर्यातही वाढेल."

बीबीसीशी बोलताना सुरत डायमंड असोसिएशनचे सचिव दामजीभाई मावानी सांगतात, "प्रयोगशाळेत तयार होणाऱ्या हिऱ्यांसाठी आम्हाला बीजांची गरज असते. हे बीज चीनमधून आयात केलं जातं. पण जर हे बीज भारतात तयार केलं तर हे हिरे आणखीनच स्वस्त दरात तयार करता येतील."

दामजीभाई पुढे सांगतात, "प्रयोगशाळेतील हिरे दोन प्रकारे बनवले जातात. एक म्हणजे एचपीएचटी आणि दुसरं म्हणजे सीव्हीडी. एचपीएचटी प्रकारचे सिंथेटिक डायमंड सीड्स चीनमधून आयात केले जातात. तर सीव्हीडी सीड्स भारतात बनवले जातात. पण जर आपण एचपीएचटी प्रकारचे सिंथेटिक सीड्सही भारतात बनवले तर आपल्याला चीनवर अवलंबून राहावं लागणार नाही. याचा हिरे उद्योगालाच फायदा होईल, शिवाय भारताचं परकीय चलनही वाचेल."

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: अन्य वेबसाईट्सवरील मजकुरासाठी बीबीसी जबाबदार नाही. YouTube मजुकरात जाहिरातींचा समावेश असू शकतो.

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)