डिओडरंट वापरत असाल, तर 'या' आहेत योग्य पद्धती

    • Author, प्रीती राजेश्वरी
    • Role, बीबीसी तेलुगु

सकाळ सकाळी आंघोळ झाली की पहिल्यांदा आपण डिओड्रंट हाती घेतो. कपडे घालून तयार होण्याआधी अनेक जण सर्वप्रथम शरीरावर डिओड्रंट फवारतात. त्यानंतरच आपल्या दैनंदिन कार्याची सुरुवात होते.

डिओड्रंट हे दिवसभर शरीराला दुर्गंधीपासून दूर ठेवण्याचं काम करतात. डिओड्रंटमध्ये असलेली काही रसायने ही घामातून तयार होणाऱ्या बॅक्टेरियाची वाढ रोखतात. त्यामुळे घामावाटे पसरणारी दुर्गंध आटोक्यात येण्यास त्यामुळे मदत होते.

सध्या वेगवेगळ्या सुवासाचे डिओड्रंट बाजारात उपलब्ध आहेत. त्यामध्ये स्प्रे, लिक्विड, रोल-ऑन किंवा स्टिक अशा प्रकारच्या डिओड्रंट्सचा समावेश होतो.

पण, डिओड्रंट्स वापरणं जीवावर बेतू शकतं, असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का?

कारण, नुकतेच युकेमध्ये एका 14 वर्षीय मुलीचा डिओड्रंट फवारल्याने मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं.

त्या निमित्ताने डिओड्रंट वापरण्यासंदर्भात अनेक चर्चा केल्या जात आहेत. आज याच प्रश्नाचं उत्तर आपण शोधू –

नेमकं काय घडलं?

डिओड्रंटचा फवारा श्वासातून फुप्फुसात गेल्याने एका 14 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.

जॉर्जिया ग्रीन या यूकेत राहाणाऱ्या मुलीने तिच्या बेडरूममध्ये डिओड्रंटचा स्प्रे मारला आणि त्यामुळे तिला हार्टअॅटॅक आला.

जॉर्जिया ऑटिस्टिक होती आणि तिच्या वडिलांचं म्हणणं आहे की तिला डिओड्रंटचा फवारा मारायला आवडायचं. ती तिच्या ब्लँकेटवर फवारा मारायची, त्यामुळे तिला बरं वाटायचं.

तिचे वडील पॉल ग्रीन म्हणतात, “त्या वासाने तिला शांत वाटायचं. जर ती हळवी झाली असेल किंवा तिला कसली भीती वाटत असेल तर ती हा डिओड्रंट मारायची. मग तिला बरं वाटायचं कारण माझी पत्नी पण हाच डिओड्रंट वापरायची.”

गेल्या वर्षी मे महिन्यात जॉर्जिया तिच्या खोलीत बेशुद्धावस्थेत आढळली होती.

“तिच्या खोलीचं दार उघडं होतं. ती बंदिस्त वातावरणात नव्हती. तिने नक्की किती फवारा मारला होता हे स्पष्ट नाहीये पण तुम्ही नेहमी मारता त्यापेक्षा नक्कीच जास्त होता,” तिचे वडील म्हणतात.

“सतत त्या डिओड्रंटमध्ये श्वासोच्छावास केल्याने तिच्या हृदयाने काम करणं बंद केलं आणि तिच्या दृदयाचे ठोके थांबले.”

तिच्या मृत्यूच्या दाखल्यावर तिच्या मृत्यूचं कारण लिहिलं होतं. त्यात म्हटलं होतं, “तिच्या मृत्यूचं कारण स्पष्ट नाही पण द्रवपदार्थाचा खूप सारा फवारा फुप्फुसात गेल्याने असं होऊ शकतं.”

डिओड्रंटचा वापर कसा करावा?

तुम्ही स्टिक किंवा रोल-ऑन डिओड्रंट वापरत असाल, तर आंघोळ झाल्यानंतर ओल्या शरीरावर ते 2-3 वेळा फिरवा.

जर तुम्ही स्प्रे डिओड्रंट वापरत असाल, तर जास्त काळ सुगंधित राहण्यासाठी ते 10 ते 15 सेंटिमीटरवरून शरीरावर फवारावं, असं कॉस्मेटिक्स तज्ज्ञ सांगतात.

खूप जवळून किंवा खूप लांबून डिओड्रंट फवारल्यानंतर त्याचा जास्त उपयोग होत नाही, असं त्यांनी सांगितलं.

डिओड्रंट कसा वापरू नये?

डिओड्रंट हे कपड्यांवर कधीही फवारू नये.

तसंच डिओड्रंट मारून लगेच बिछान्यावर झोपायला जाणंही योग्य नाही. कधीतरी ठिक आहे, पण वारंवार असं केल्यास डिओड्रंटमधील केमिकलचा तुम्हाला त्रास होऊ शकतो.

सर्वात महत्त्वाचं म्हणजे, डिओड्रंट आणि बॉडी स्प्रे यांच्यात फरक आहे, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे.

त्यामुळे डिओड्रंटचा वापर काळजीपूर्वक करायला हवा, असं तज्ज्ञ सांगतात.

डिओड्रंट आणि बॉडी स्प्रे यांच्यातील फरक

डिओड्रंट हे अँटी-मायक्रोबायल (जिवाणूरोधक) असतात. ते शरीराच्या घामातून तयार होणारे बॅक्टेरिया नष्ट करण्याचं काम करतात.

तर बॉडी स्प्रे हे सुगंधी तेलापासून बनलेलं असतं. परफ्यूमसाठीचा पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.

डिओड्रंट हे थेट शरीरावर विशिष्ट भागात वापरण्यासाठी असतात. तर बॉडी स्प्रे हे कपड्यांवरही फवारता येऊ शकतात.

डिओड्रंट जीवघेणे असतात का?

बातमीत वर उल्लेख केल्याप्रमाणे एका 14 वर्षीय मुलीचा डिओड्रंट वापरल्यानंतर हृदयविकाराचा झटका येऊन मृत्यू झाला.

एकट्या यूकेचीच गोष्ट करायची म्हटली तर ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिकनुसार 2001 ते 2020 या काळात 11 मृत्यू ‘डिओड्रंटमुळे’ झालेत.

2000 ते 2008 या कालावधीत डिओड्रंट, ग्लू यांच्यासारखे एअरोसोल श्वासावाटे शरीरात गेल्यामुळे होणाऱ्या लोकांच्या मृत्यूचं प्रमाण हे ड्रग्जमुळे झालेल्या मृत्यूंपेक्षाही जास्त आहे, असं युकेच्या टॉक टू फ्रँक या औषध सल्लागार संस्थेच्या अहवालात म्हटलेलं आहे. त्यातही बहुतांश मृत्यू हे 10 ते 15 वर्षीय मुलांचे होते.

मायो क्लिनिकच्या मते, अमेरिकेत दरवर्षी जीवघेणी रसायने श्वासावाटे शरीरात गेल्याने 100 ते 200 मुलांचा मृत्यू होतो.

पण कदाचित खरा आकडा याहून जास्त असू शकतो कारण डिओड्रंटमध्ये असणाऱ्या काही विशिष्ट पदार्थांचा उल्लेख मृत्यूच्या दाखल्यावर केलेला नसतो.

जॉर्जियाच्या मृत्यूच्या दाखल्यावरही ‘द्रवपदार्थाचा फवारा’ असा उल्लेख होता, ‘डिओड्रंट’ असा नाही.

ब्युटेन – जॉर्जियाच्या डिओड्रंटमध्ये जो मुख्य घटक होता तो 2001 ते 2020 या काळात 324 मृत्यूंना कारणीभूत ठरल्याची नोंद आहे.

प्रोपेन आणि आयसोब्युटेनमुळे प्रत्येकी 123 आणि 38 मृत्यू झालेले आहेत. हे दोन्ही घटक जॉर्जियाच्या डिओड्रंटमध्ये होते.

ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिकचं म्हणणं आहे की ब्युटेन किंवा प्रोपेन अनेक मृत्यूंना कारणीभूत ठरले आहेत. “श्वासातून हे घटक शरीरात गेले तर हृदय बंद पडू शकतं.”

द रॉयल सोसायटी ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ अॅक्सिडेंट्स या संस्थेने म्हटलंय की डिओड्रंटचा अतिवापर केल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.

भारतातील डिओड्रंटचा व्यवसाय

भारतातील डिओड्रंट व्यवसायात गॅस आणि नॉन-गॅस उत्पादने वापरण्यात येतात. (उदा. स्प्रे, स्टिक्स किंवा रोल-ऑन)

डिओड्रंट स्प्रे हे गॅस स्वरुपात मिळतात.

GII च्या एका अहवालानुसार येत्या पाच वर्षांत डिओड्रंटचा व्यवसाय 15 टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.

गेल्या काही वर्षांत महिलांचं कॉर्पोरेट क्षेत्रातील कामाचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढलं आहे. त्यामुळे महिलांसाठी विशेष असलेल्या डिओड्रंटचा व्यवसायही गेल्या काही वर्षांत वधारला आहे.

सद्यस्थितीत भारतात दरवर्षी 130 कोटी रुपयांचे डिओड्रंट विकले जातात, असा अंदाज आहे.

डिओड्रंट्स वापरणं चांगलं की वाईट?

डिओड्रंट्स वापरल्यानंतर काही जणांना अलर्जीचा त्रास उद्भवतो. तर काही जणांना डिओड्रंटमुळे श्वास घेण्यास त्रास होतो.

हैदराबादच्या उस्मानिया हॉस्पिटलमध्ये सहायक प्राध्यापक असलेल्या डॉ. प्रतिभा लक्ष्मी यांच्या मते, “काही लोकांना डिओड्रंट वापरल्यानंतर खाज सुटणे, पुरळ आदी प्रकारचे त्रास होतात. याची सुरुवात स्किन अलर्जीसारख्या लहान गोष्टींपासून होऊ शकते. तर कधी कधी हे प्रकरण पुढे धोकादायक अशा कॅन्सरपर्यंत बळावू शकतं.”

डिओड्रंटमध्ये पॅराबेन, अल्कोहोल आणि सुगंधित तेल असतात. त्यामध्ये प्रोपिलीन ग्लायकॉल नावाचं एक धोकादायक रसायनही वापरलं जातं. त्याचं प्रमाण काही डिओड्रंट्समध्ये 50 टक्क्यांपर्यंत असू शकतं.

प्रोपिलीन ग्लायकॉल हे मज्जासंस्थेवर परिणाम करू शकतं. तसंच हृदय आणि यकृतावरही त्यांचा परिणाम होऊ शकतो. संवेदनशील त्वचा असलेल्या लोकांसाठी ते सर्वात घातक ठरू शकतं.

त्यामुळे प्रोपिलीन ग्लायकॉलचं प्रमाण 2 टक्क्यांपेक्षा कमी असलेलं डिओड्रंट वापरणंच कधीही चांगलं.

तसंच डिओड्रंटसाठी अल्युमिनिय वापरलं जातं. महिलांच्या स्तनांसाठी ते धोकादायक असल्याचं काही जणांचं मत आहे, पण त्यासाठीचा सबळ पुरावा अद्याप कोणत्याही संशोधनातून पुढे आलेला नाही.

डिओड्रंट मुलांपासून दूर ठेवा

वरील सर्व कारणांमुळे अशा प्रकारची रसायने असलेली डिओड्रंट्स लहान मुलांपासून दूर ठेवणं हेच योग्य असतं. कारण, त्यांच्यावर याचे दुष्परिणाम होण्याची जास्त शक्यता असते.

लहान मुलांना डिओड्रंट श्वासावाटे शरीरात गेल्यास शुद्ध हरपणे, चक्कर येणे, डोकेदुखी, उलटी, श्वसनप्रक्रियेत समस्या अशा समस्या उद्भवू शकतात. काही प्रकरणात मृत्यूही ओढावू शकतो. त्यामुळे लहान मुलांपासून डिओड्रंड दूर ठेवणं, त्यांचा वापर काळजीपूर्वक करणं, ही आपली जबाबदारी आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)