डिओड्रंट फवारल्यामुळे आला हार्ट अटॅक, 14 वर्षांच्या मुलीचा मृत्यू

    • Author, कॅरोलिन लोब्रिज
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

डिओड्रंटचा फवारा श्वासातून फुप्फुसात गेल्याने एका 14 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.

जॉर्जिया ग्रीन या यूकेत राहाणाऱ्या मुलीने तिच्या बेडरूममध्ये डिओड्रंटचा स्प्रे मारला आणि त्यामुळे तिला हार्टअॅटॅक आला.

जॉर्जिया ऑटिस्टिक होती आणि तिच्या वडिलांचं म्हणणं आहे की तिला डिओड्रंटचा फवारा मारायला आवडायचं. ती तिच्या ब्लँकेटवर फवारा मारायची, त्यामुळे तिला बरं वाटायचं.

तिचे वडील पॉल ग्रीन म्हणतात, “त्या वासाने तिला शांत वाटायचं. जर ती हळवी झाली असेल किंवा तिला कसली भीती वाटत असेल तर ती हा डिओड्रंट मारायची. मग तिला बरं वाटायचं कारण माझी पत्नी पण हाच डिओड्रंट वापरायची.”

गेल्या वर्षी मे महिन्यात जॉर्जिया तिच्या खोलीत बेशुद्धावस्थेत आढळली होती.

“तिच्या खोलीचं दार उघडं होतं. ती बंदिस्त वातावरणात नव्हती. तिने नक्की किती फवारा मारला होता हे स्पष्ट नाहीये पण तुम्ही नेहमी मारता त्यापेक्षा नक्कीच जास्त होता,” तिचे वडील म्हणतात.

“सतत त्या डिओड्रंटमध्ये श्वासोच्छावास केल्याने तिच्या हृदयाने काम करणं बंद केलं आणि तिच्या दृदयाचे ठोके थांबले.”

तिच्या मृत्यूच्या दाखल्यावर तिच्या मृत्यूचं कारण लिहिलं होतं. त्यात म्हटलं होतं, “तिच्या मृत्यूचं कारण स्पष्ट नाही पण द्रवपदार्थाचा खूप सारा फवारा फुप्फुसात गेल्याने असं होऊ शकतं.”

एकट्या यूकेचीच गोष्ट करायची म्हटली तर ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिकनुसार 2001 ते 2020 या काळात 11 मृत्यू ‘डिओड्रंटमुळे’ झालेत.

पण कदाचित खरा आकडा याहून जास्त असू शकतो कारण डिओड्रंटमध्ये असणाऱ्या काही विशिष्ट पदार्थांचा उल्लेख मृत्यूच्या दाखल्यावर केलेला नसतो.

जॉर्जियाच्या मृत्यूच्या दाखल्यावरही ‘द्रवपदार्थाचा फवारा’ असा उल्लेख होता, ‘डिओड्रंट’ असा नाही.

ब्युटेन – जॉर्जियाच्या डिओड्रंटमध्ये जो मुख्य घटक होता तो 2001 ते 2020 या काळात 324 मृत्यूंना कारणीभूत ठरल्याची नोंद आहे.

प्रोपेन आणि आयसोब्युटेनमुळे प्रत्येकी 123 आणि 38 मृत्यू झालेले आहेत. हे दोन्ही घटक जॉर्जियाच्या डिओड्रंटमध्ये होते.

ऑफिस ऑफ नॅशनल स्टॅटिस्टिकचं म्हणणं आहे की ब्युटेन किंवा प्रोपेन अनेक मृत्यूंना कारणीभूत ठरले आहेत. “श्वासातून हे घटक शरीरात गेले तर हृदय बंद पडू शकतं.”

द रॉयल सोसायटी ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ अॅक्सिडेंट्स या संस्थेने म्हटलंय की डिओड्रंटचा अतिवापर केल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे.

‘आमच्या मुलीचा मृत्यू वाया जायला नको’

जॉर्जियाच्या आईवडिलांना आता डिओड्रंटबद्दल जागरूकता पसरवायची आहे. त्यांचं म्हणणं आहे की या बाटल्यांवर त्याबद्दलचे धोके स्पष्टपणे लिहिलेले असावेत.

यावर प्रतिक्रिया देताना ब्रिटिश एरोसोल मॅनिफॅक्चुरर्स असोसिएशन यांनी म्हटलंय की डिओड्रंटच्या बाटल्यांवर ‘स्पष्ट शब्दात इशारा लिहिलेला असतो.’

डिओड्रंट स्प्रेच्या बाटल्यांवर कायद्याने ‘लहान मुलांच्या संपर्कात येऊ देऊ नका’ असं स्पष्ट लिहिलेलं असणं गरजेचं आहे.

पण जॉर्जियाच्या पालकांच्या मते हा इशारा खूप लहान अक्षरात लिहिलेला असतो.

त्यांच्या मते अनेक पालक आपल्या पाल्यांसाठी इशारा न वाचताच डिओड्रंट घेतात.

“त्या पत्र्याच्या बाटल्यांमधला द्रव किती घातक असू शकतो हे अनेक पालकांना माहिती नसतं,” जॉर्जियाचे वडील पॉल ग्रीन म्हणतात.

“याचे धोके स्पष्ट व्हावेत अशी माझी इच्छा आहे कारण मला वाटतं की या देशात, या जगात कोणालाही ते दुःख अनुभवायला लागू नये जे आम्हाला भोगावं लागलं.”

‘मोठा गैरसमज’

द रॉयल सोसायटी ऑफ प्रिव्हेन्शन ऑफ अॅक्सिडेंट्सच्या सार्वजनिक आरोग्य सल्लागार अॅशली मार्टीन म्हणतात की, “डिओड्रंट सुरक्षित आहेत आणि त्यापासून काही धोका नाही असं वाटणं साहाजिक आहे, पण ते सत्य नाही.”

“फवाऱ्याच्या स्वरूपात वापरले जाणारे द्रवपदार्थ, मग ते कोणतेही असतो हानिकारकच असतात. त्यातून अनेकदा जीवाला धोका उत्पन्न होऊ शकतो. तुम्हाला चक्कर येऊ शकते, डोळ्यापुढे अंधारी येऊ शकते, श्वास घ्यायला त्रास होऊ शकतो, हृदयाची धडधड वाढू शकते, प्रसंगी मृत्यूही ओढावू शकतो.”

त्या पुढे म्हणतात, “अजून एक मोठा गैरसमज म्हणजे लोकांना वाटतं अशा प्रकारच्या स्प्रेपासून तेव्हाच धोका आहे जेव्हा याचा अतिप्रचंड प्रमाणात वापर केला जातो. हे खरं नाही. गेल्या काही वर्षांत आम्ही लहान मुलं आणि किशोरवयीन मुलांचे अशा प्रकारच्या स्प्रेमुळे मृत्यू झालेले पाहिले आहेत.”

जॉर्जियाच्या पालकांनी सांगितलं की त्यांनाही रिसर्च केल्यानंतर अशा अनेक केसेसबद्दल कळलं.

यात एका 12 वर्षांच्या डॅनियल हर्ली नावाच्या मुलाचीही केस होती. त्याने बाथरूममध्ये स्वतःवर स्प्रे फवारला आणि तो कोसळला. त्यानंतर तो मृत्यूमुखी पडला.

“ही घटना 2008 ची होती, पण माझी मुलगी तर 2022 साली वारली. म्हणजेच ज्याप्रमाणात जनजागृती व्हायला हवी, त्या प्रमाणात ती झालेली नाही,” पॉल ग्रीन म्हणतात.

अलिकडच्या काळात घडलेली घटना म्हणजे 13 वर्षांचा मुलगा जॅक वॅपल याचा झालेला मृत्यू. त्याचा मृत्यूही जॉर्जियासारख्याच परिस्थितीत झाला. त्या प्रकरणाच्या चौकशीत लक्षात आलं की त्याची आई घराबाहेर गेल्यानंतर तो घाबरला त्यामुळे आई मारते तो स्प्रे त्याने मारला आणि त्यात त्याचा मृत्यू झाला.

अशा प्रकारच्या स्प्रेच्या बाटल्यांवर काय लिहिलेलं असतं?

डिओड्रंटच्या स्प्रेवर कायद्याने ‘लहान मुलांचा संपर्क येणार याची काळजी घ्या’ असं लिहिणं गरजेचं असतं.

‘अतिप्रमाणत शरीरात गेलं तर तात्काळ मृत्यू होऊ शकतो’ असंही अनेक स्प्रेवर लिहिलेलं असतं. कायद्याने असं लिहिण्याचं बंधन नाही पण ब्रिटिश एरोसोल मॅनिफॅक्चुरर्स असोसिएशन यांचं म्हणणं आहे की असं लिहिणं गरजेचं आहे कारण लोक नशेसाठी स्प्रे नाकात मारण्याची शक्यता असते.

पण जॉर्जिया पालकांचं म्हणणं आहे की यावर “स्प्रे नाकात गेला तर तात्काळ मृत्यू होऊ शकतो असं लिहायला हवं कारण जॉर्जिया नशा करत नव्हती किंवा तिने प्रचंड प्रमाणात वापर केला नव्हता.”

स्प्रे डिओड्रंटच्या बाटलीवर तो किती वापरायचा, कसा वापरायचा याबद्दलही माहिती द्यायला हवी. उदाहरणार्थ त्यावर असं लिहायला हवं की – “हवा खेळती असेल अशा ठिकाणी छोटे छोटे स्प्रे उडवा.”

जर डिओड्रंट ज्वलनशील असेल तर त्याबद्दलही इशारा द्यायला हवा.

ब्रिटिश एरोसोल मॅनिफॅक्चुरर्सचं म्हणणं आहे की, “हवेत मारायचे स्प्रे सुरक्षित असावेत यासाठी आम्ही उत्पादकांसोबत काम करतो. आम्ही सुरक्षिततेचे सर्व नियम पाळतो तसंच बाटल्यांवर स्पष्ट शब्दात इशारे लिहिलेले असतात.”

ते पुढे म्हणतात, “आम्ही असं सुचवतो की कायद्याने जेवढं सांगितलं आहे त्यापेक्षा पुढे जाऊन अधिकचे वैधानिक इशारे तसंच वापराच्या सुचना द्यायला हव्यात. डिओड्रंटच्या वापरकर्त्यांच्या सुरक्षेसाठी शक्य ते सगळं करायला हवं.”

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)