ब्रेस्ट कॅन्सरवरील जाहिरातीमुळे युवराज सिंहची संस्था वादात का अडकली आहे?

भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंहची कॅन्सर जनजागृती करणारी संस्था सध्या एका वादात अडकला आहे. त्याच्या 'यू वी कॅन' नावाच्या संस्थेनं केलेली एक जाहिरात या वादाचा केंद्रबिंदू आहे.

युवराज सिंहच्या या संस्थेने दिल्ली मेट्रोमध्ये 'ब्रेस्ट कॅन्सर' अर्थात स्तनांच्या कर्करोगाशी निगडीत ही जाहिरात केली आहे. या जाहिरातीवरुन सोशल मीडियावरील अनेक युझर्सनी प्रश्न उपस्थित केले आहेत.

जाहिरातीवरुन झालेल्या वादानंतर ही जाहिरात हटवण्यात आल्याची माहिती 'दिल्ली मेट्रो'ने दिली आहे.

एका युझरनं या जाहिरातीवरुन विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना 'यू वी कॅन' संस्थेनं म्हटलं की, "या जाहिरातीच्या माध्यमातून ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागृती करणं, हाच आमचा उद्देश होता. कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नव्हता."

ही जाहिरात नेमकी काय आहे आणि त्यावरून वाद होण्याची कारणं काय आहेत? याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत.

वादाला कशी झाली सुरुवात?

बुधवारी 23 ऑक्टोबर रोजी दिल्ली मेट्रोमध्ये ब्रेस्ट कॅन्सरशी निगडीत एक जाहिरात प्रसिद्ध झाली. या जाहिरातीमध्ये स्तनांची तुलना संत्र्यांसोबत करण्यात आली होती.

ब्रेस्ट कॅन्सरबाबत लोकांमध्ये जागृती निर्माण करण्याचा दावा करणाऱ्या या जाहिरातीमध्ये 'चेक यूअर ऑरेंजेस वन्स इन मंथ' अशी ओळ लिहण्यात आली होती. जाहिरातीमध्ये लिहिलेला हाच मजकूर वादाचं कारण ठरलं.

या मजकुरावरुन सोशल मीडियावर अनेक यूझर्सनी प्रश्न उपस्थित केले.

बुधवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर (आधीचे ट्विटर) पत्रकार रितुपर्णा चॅटर्जी यांनी दिल्ली मेट्रोमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या या जाहिरातीचा फोटो शेअर केला.

त्यांनी लिहिलं की, "युवराज सिंहच्या संस्थेने ब्रेस्ट कॅन्सरशी निगडीत 'चेक यूअर ऑरेंजेस' या जाहिरातीमध्ये स्तनांची तुलना संत्र्यांशी केली.

माझ्या लिंक्डइनवरील पोस्टवर प्रत्युत्तर देताना संस्थेनं या गोष्टीला 'बोल्ड क्रिएटीव्ह चॉईस' म्हटलं आहे. मी या गोष्टीशी अजिबात सहमत नाही."

दुसऱ्या एका युझरनं एक्सवर पोस्ट करत लिहिलं की, "ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागृती करण्यासाठी दिल्ली मेट्रोमध्ये हे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. हे पोस्टर्स युवराज सिंहच्या संस्थेने लावले आहेत आणि त्यामध्ये महिलांच्या स्तनांची तुलना संत्र्यांसोबत करण्यात आली आहे. ही जाहिरात महिलांसंदर्भात असंवेदनशील आहे, असंच कुणालाही वाटेल."

दुसऱ्या एका युझरने म्हटलं की, "तुमचं डोकं ठिकाणावर आहे का? या जाहिरातीसाठी कोण जबाबदार आहे? ही जाहिरात पूर्णपणे असंवेदनशील आहे."

"तुमचा कॅन्सरविरुद्धचा लढा इतरांना प्रेरणादायी नक्कीच आहे. मात्र, ही जाहिरात देणारी कंपनी बदला. स्तनांची तुलना संत्र्यांसोबत करणं योग्य नाहीये."

दिल्ली मेट्रोने काय म्हटलं?

दिल्ली मेट्रोनं म्हटलं आहे की, बुधवारी (23 ऑक्टोबर) रात्री पावणेआठ वाजता ही जाहिरात हटवण्यात आली आहे.

'एक्स'वर दिल्ली मेट्रोने दिलेल्या माहितीनुसार, "दिल्ली मेट्रोने ब्रेस्ट कॅन्सरबाबत जागृती करण्यासाठी ही जाहिरात लावण्यात आली होती. डिएमआरसीला ही जाहिरात योग्य वाटली नाही आणि त्यांनी त्वरित कारवाई केली."

"ही जाहिरात 23 ऑक्टोबर 2024 रोजी एकदाच एका मेट्रोमध्ये दाखवण्यात आली आणि त्याच रात्री पावणेआठ वाजता ती हटवण्यात आली. डीएमआरसी लोकांच्या भावनांबाबत अत्यंत संवेदनशील आहे. या प्रकारच्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याचा आमचा उद्देश नाही."

"ही जाहिरात योग्य नव्हती. तसेच सार्वजनिक ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यासाठीचे आवश्यक निकषही ती पूर्ण करत नाही. या प्रकारच्या जाहिराती पुन्हा प्रसिद्ध होणार नाहीत, याची खबरदारी दिल्ली मेट्रोकडून यापुढेही घेतली जाईल," असंही दिल्ली मेट्रोनं म्हटलं.

युवराज सिंहच्या संस्थेनं काय म्हटलं?

एकीकडे, दिल्ली मेट्रोने ही जाहिरात अयोग्य असल्याचं म्हटलं तर दुसरीकडे युवराज सिंहच्या 'यू वी कॅन' संस्थेनं या जाहिरातीचं समर्थन केलं.

सोशल मीडियावर पत्रकार रितुपर्णा चॅटर्जी यांनी विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना या संस्थेनं म्हटलं की, "लोकांशी ब्रेस्ट कॅन्सरबाबत उघडपणे संवाद साधणं किती अवघड आहे, हे आम्ही जाणतो. जोवर आपल्या जवळच्या व्यक्तीला यातून जावं लागत नाही, तोवर कुणीही या विषयावर बोलण्यासाठी तयार नसतं."

"जाहिरातीमध्ये संत्र्यांचा वापर करणं ही आमची बोल्ड चॉईस होती आणि त्याबाबत फार गांभीर्याने विचार करण्यात आला होता. ब्रेस्ट कॅन्सरबाबत असलेलं मौन तोडनं, हेच आमचं ध्येय होतं."

"कुणालाही दु:ख होईल, अशाप्रकारची कोणतीही जाहिरात करणं हा आमचा उद्देश नाही. या जाहिरातीने आवश्यक ते यश मिळवलं असून याबाबत अधिकाधिक लोक बोलत आहेत. लोकांचा जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करणं, हा आमचा उद्देश आहे आणि आम्ही त्या दिशेने काम करणं सुरुच ठेवू," असंही यात म्हटलं आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.