कोका-कोलाची जाहिरात सोशल मीडियावर दिसणार नाही, हे आहे कारण

कोका-कोला कंपनी पुढील किमान 30 दिवस सोशल मीडियावर कुठलीच जाहिरात देणार नाहीय. द्वेष पसरवणाऱ्या पोस्टविरोधात दबाव वाढवण्यासाठी कोका-कोला कंपनीनं हा निर्णय घेतलाय.

जगात वंशवादाला काहीच स्थान नाहीय आणि सोशल मीडियावरही वंशवादाला स्थान नसावं, असं कोका-कोलाचे चेअरमन आणि CEO जेम्स क्विन्सी यांनी म्हटलंय.

सोशल मीडिया कंपन्यांनी अधिक जबाबदार आणि पारदर्शक असायला हवं, अशी अपेक्षा जेम्स क्विन्सी यांनी व्यक्त केलीय.

फेसबुकनं 'हार्मफुल'चं फीचर आणल्यानंतर काही अवधीतच कोका-कोलानं पुढचे 30 दिवस सोशल मीडियावर जाहिरात न देण्याचा निर्णय घेतल्यानं, या घोषणेला आणखी महत्त्व आलं. तसंच, सोशल मीडियावरही कोका-कोलाच्या या निर्णयाची भरपूर चर्चा झाली.

फेसबुकचं नवं फीचर काय आहे?

फेसबुकवर एखाद्या पोस्टवरून जर कुणासाठीही धोका ओढवू शकतो, तर त्या पोस्टला यापुढे 'हार्मफुल' असं लेबल लावण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यासह अनेक पोस्टबाबत जगभरातून दबाव आल्यानंतर फेसबुकने हा निर्णय घेतला आहे.

शुक्रवारी फेसबुक आणि ट्विटर या दोन्हींचे शेअर्स 7 टक्क्यांहून कोसळले आहेत. 'द प्रिंट' या वेबसाईटच्या बातमीनुसार फेसबुकचे शेअर्स 8.3 टक्क्यांनी कोसळले आणि फेसबुकला 7.2 अब्ज डॉलर्सचे नुकसान झाले आहे.

फेसबुकवरील आक्षेपार्ह पोस्ट्समुळे 90 जाहिरातदारांनी फेसबुककडे पाठ वळवली आहे. अमेरिकेतली एक मोठी कंपनी युनिलिव्हरनेही फेसबुक जाहिराती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. डव्ह साबण, बेन अँड जेरी आईस्क्रीम कंपनीने किमान 2020 या वर्षभरासाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामवरील जाहिराती थांबवत असल्याचा निर्णय जाहीर केला आहे.

सध्या या माध्यमांवर जाहिरात करून व्यक्ती आणि समाजमुल्यात कोणतीही भर पडत नसल्याचं दिसून येतं. गरज पडली तर आम्ही आमची भूमिका पुन्हा एकदा तपासून पाहू, असं मत या कंपनीने व्यक्त केलं आहे.

द्वेष पसरवणाऱ्या वक्तव्यांबाबत फेसबुकचे प्रमुख मार्क झुकरबर्ग यांनी शुक्रवारी एक भाषण केलं. त्यामध्ये त्यांनी फेसबुकने गेल्या वर्षी 86 टक्के द्वेषमूलक पोस्ट्स काढून टाकल्याचे युरोपियन कमिशनच्या अहवालाने स्पष्ट केल्याकडे लक्ष वेधलं.

मार्क झुकरबर्ग काय म्हणाले?

स्थलांतरित लोकांना धोकादायक ठरवणं, वंशावरून भेद करणारे गट यांच्या जाहिराती थांबवण्यात येतील, असं झुकरबर्ग यांनी सांगितलं. मतदानावर प्रभाव टाकणाऱ्या तसेच हिंसा भडकवणाऱ्या गोष्टी काढून टाकण्यात येतील अगदी त्या राजकारण्यांच्या असल्या तरीही त्या फेसबुकवरून काढून टाकल्या जातील, असं मार्क यांनी सांगितलं.

याप्रकारात मोडणाऱ्या पोस्ट्सना टॅग लावला जाईल, असंही ते म्हणाले. "यापूर्वी आमच्या नियमांचा भंग करणाऱ्या आणि अशा पोस्टपासून असणाऱ्या धोक्यापेक्षा लोकभावना जास्त प्रबळ असेल तर आम्ही असा काही कंटेट फेसबुकवर राहू दिला होता. राजकारण्यांचं भाषण हे लोकांच्या भल्यासाठी असतं असं मानलं जातं. त्यामुळेच राजकीय नेते काय बोलतात ते वर्तमानपत्रंही बातम्यांमधून सांगत असतात. त्यामुळेच ते आमच्या माध्यमावरही राहू दिलं जात असे. मात्र आता यापुढे यातील काही पोस्टना आम्ही धोकादायक असं लेबल लावणं सुरू करणार आहे."

ट्विटरने याबाबत आधीच पावले उचलली आहेत राजकारण्यांच्या जाहिरातींवर बंदी घातली असून लहान मुलांनी पाहाण्यास योग्य नसलेल्या पोस्टला लेबल लावण्यासही सुरुवात केली आहे. यामध्ये ट्रंप यांच्या ट्वीट्सचाही समावेश आहे.

काही जाहिरातदार फेसबुकच्या आश्वासनावर अजूनही खूश नाहीत. जाहिरात बंद करणाऱ्या कंपन्यांपैकी काहींनी झुकरबर्ग यांचं आश्वासन अपुरं असल्याचं सांगितलं आहे.

कलर ऑफ चेंजचे राशाद रॉबिन्सन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं, फेसबुकमुळे लोकशाही आणि नागरी अधिकारांचं जे नुकसान झालं आहे त्याविरोधातल्या लढ्यात आलेल्या अपयशाचं दर्शन झुकरबर्ग यांच्या भाषणात दिसलं.

रॉबिन्सन यांनी ट्विटरवर लिहिलं आहे, "जर इतक्या मोठ्या कंपनीच्या जाहिराती बंद करण्यावर झुकरबर्ग असे व्यक्त होणार असतील तर मी त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवू शकत नाही."

कंपन्या फेसबुक जाहिराती का थांबवत आहेत?

जॉर्ज फ्लॉइडच्या मृत्यूनंतर अमेरिकेतली नागरी हक्क संघटना 'स्टॉप हेट फॉर प्रॉफिट' ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेच्या संघटकांमध्ये 'कलर ऑफ चेंज', 'नॅशनल असोसिएशन फॉर द अॅडव्हान्समेंट ऑफ कलर्ड पीपल' सारख्या संघटनांचा समावेश आहे. त्यांनी फेसबुक वंशभेदाच्या, हिंसक आणि खोटी माहिती असलेल्या पोस्टना मुक्तद्वार देतं, असं म्हटलं होतं. त्या मोहिमेत 90 हून अधिक कंपन्या सहभागी झाल्या. कोरोनाव्हायरसंदर्भातील चुकीची माहिती फेसबुकवरुन हटवू, असं झुकरबर्ग यांनी बीबीसीच्या सायमन जॅक यांना सांगितलं होतं.

'इमार्केटर'च्या निकोल पेरिन यांनी सांगितलं, सध्याच्या कोरोनासाथीमुळे जाहिरातींवर परिणाम झाला असल्यामुळे नक्की या मोहिमेचा फेसबुकच्या आर्थिक स्थितीवर किती परिणाम झाला हे सांगणं कठीण आहे.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)