कर्करोगामुळे महिलेला काढावे लागले आठ अवयव, स्वत:च्या अंत्यविधीची केली होती तयारी

फोटो स्रोत, Faye Louise
- Author, क्रिस्टियन फुलर
- Role, बीबीसी न्यूज
एका दुर्मीळ कर्करोगाच्या निदानानंतर उपचारात महिलेला तिचे जवळपास आठ अवयव काढून टाकावे लागेल. पण आता ही महिला उपचारानंतर पुन्हा कामावर परतली आहे.
वेस्ट ससेक्सच्या होर्शाममधील फे लुईस यांच्या ॲपेंडिक्समध्ये ट्युमर असल्याचं 2023 मध्ये समोर आलं होतं. त्यानंतर त्यांची प्रकृती एवढी ढासळली की, त्यांनी स्वतःच्या अंत्यविधीची तयारीही सुरू केली होती.
पण नंतर शस्त्रक्रिया केल्यानंतर आता पुन्हा कॅन्सरमुक्त होऊन कामावर परतल्या असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गॅटविक विमानतळावर त्या फ्लाईट डिस्पॅचर म्हणून काम करतात.
"माझ्या शरीरातून हा आजार पूर्णपणे निघाला असून शरीरात कॅन्सरच्या पेशी नसल्याचं ऐकणं हे माझ्यासाठी सर्वांत मोठं ख्रिसमस गिफ्ट होतं," असं त्या म्हणाल्या.
लुईस यांना गेल्या वर्षीपर्यंत आपण पुन्हा कामावर परत येऊ की नाहीत ही शंका वाटत होती, असं त्यांनी सांगितलं.
"माझ्या कामामध्ये खूप शारीरिक हालचाली कराव्या लागतात. पण मला माझं काम आवडतं आणि पुन्हा काम करता येत असल्याचा मला आनंद आहे," असं त्यांनी बीबीसी रेडिओ ससेक्सशी बोलताना सांगितलं.


पूर्वाश्रमीच्या मॉडेल असलेल्या लुईस यांना 2023 मध्ये वेदना व्हायला सुरुवात झाली होती. आधी त्यांनी मासिक पाळीमध्ये त्रास सुरू झाला. पण अल्ट्रासाऊंड केल्यानंतर त्यांना अंडाशयाला गाठ असल्याचं समोर आलं.
यावर उपचारासाठी त्यांनी शस्त्रक्रिया केली. पण त्यानंतरही त्यांना समस्या कायम राहिल्या. त्यानंतर त्यांना स्यूडोमायक्सोमा पेरिटोनी हा दुर्मिळ ट्युमर असल्याची धक्कादायक माहिती मिळाली. या ट्यूमरमुळं पोटात एक जेलीसारखा पदार्थ तयार होत असतो.

फोटो स्रोत, Cancer Research UK
हा ट्युमर फाटल्यामुळं कॅन्सरच्या पेशी त्यांच्या शरिरात पसरायला सुरुवात झाली होती. त्यामुळं लुईस यांना त्यांचे आठ अवयव काढून टाकण्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागणार होती.
या शस्त्रक्रियेत लुईस यांचे प्लीहा (spleen), पित्ताशय (gallbladder), ॲपेंडिक्स (appendix), अंडाशय (ovaries), गर्भाशय (uterus), बीज वाहिन्या (fallopian tubes), बेंबी (belly button) आणि जठरपटलं (Greater Omentum, Lesser Omentum) काढण्यात आले.
यातले काही अवयव इतर अवयवांना पोटाशी जोडणारेही होते. त्यांच्या इतरही दोन अवयवांचे काही भाग कापावे लागले.

फोटो स्रोत, Cancer Research UK
दरवर्षी लुईस यांना नोव्हेंबर महिन्यामध्ये स्कॅन करावे लागणार आहेत.
"दरवर्षी या स्कॅनमध्ये काय समोर येते यावर ख्रिसमस कसा साजरा होणार हे अवलंबून असेल. पण तुम्ही माघार न घेता सतत पुढं जात राहायला हवं," असं त्यांनी म्हटलं.
"काही दिवस मला प्रचंड नैराश्य आलं होतं. पण त्यानंतर तसं झालं नाही. आता मला सकारात्मक दिवसच अधिक चांगले वाटतात."
त्यानंतर लुईस कामावर परतल्या आणि कॅन्सर रिसर्च युकेसाठी त्यांनी निधी उभारण्यासाठी काम केलं. तसंच इतर सामाजिक कामातही त्या कायम अग्रेसर असतात.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











