थायरॉईडचा कर्करोग झाला आणि 'या' तरुणीनं कर्करोगग्रस्तांच्या मदतीचा वसा हाती घेतला

- Author, क्रिस कॅडॉक
- Role, बीबीसी जर्सी, कम्युनिटीज रिपोर्टर
कर्करोगाच्या रुग्णांची संख्या जगभरात वेगानं वाढते आहे. तरुणांना सुद्धा मोठ्या प्रमाणात कर्करोग होतो आहे. अशावेळी कर्करोगाशी लढा देण्यासाठी या रुग्णांना वैद्यकीय उपचारांबरोबरच मानसिक धैर्याची देखील आवश्यकता असते. कर्करोगाच्या रुग्णांना मदत करण्यासाठी जगभरात अनेक संस्था, व्यक्ती कार्यरत आहेत.
अॅंटोनिया रुबिओ ही देखील अशीच तरुणी आहे. स्वत: कर्करोगावर मात करून ती आता इतरांना यासाठी मदत करते आहे, तिचीच ही प्रेरणादायी कहाणी.
कर्करोगाचं निदान झालेल्या जगभरातील तरुणांना एक जर्सी तरुणी (अशी तरुणी जी वेगवेगळ्या परिस्थितीला तोंड देऊ शकते, जी कणखर आहे, लढाऊ बाण्याची आहे आणि इतरांना मदत करते) मदत करते आहे.
अॅंटोनिया रुबिओ 2020 मध्ये आजारी पडली होती. त्यावेळेस तिला थायरॉईडचा कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. तेव्हा अॅंटोनिया 24 वर्षांची होती.
कर्करोगावर आपण कोणते उपचार केले आणि त्याचा आपल्यावर कसा परिणाम झाला ही बाब तिने सोशल मीडियावर शेअर केली. त्यातून तिला टिकटॉकवर 18,000 पेक्षा जास्त फॉलोअर्स मिळाले.
बीबीसीच्या 'जर्सी मेक अ डिफरन्स अवार्ड्स'साठी रुबिओला नामांकन मिळालं आहे. अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशांमध्ये तरुणांमध्ये कर्करोगाबद्दल जागरुकता वाढवणे आणि इतरांना मदत करणे या कामासाठी तिला हे नामांकन मिळालं आहे.
मॉली रॅल्सटनवर अमेरिकेत हॉजकिन्स लिम्फोमावर उपचार करण्यात येत आहेत. मॉलीचा रुबिओशी सोशल मीडियावर परिचय झाला.
(हॉजकिन्स लिम्फोमा हा शरीरातील रोगप्रतिकार व्यवस्थेशी निगडीत कर्करोग असतो.)
मॉली म्हणाली, "हा एक खूप मोठा, कठीण प्रवास होता. मात्र रुबिओच्या पोस्टमुळे लोकांना धीर मिळतो, मदत होते. त्यांचा एकटेपणा दूर होतो. खासकरून माझ्यासारख्या तरुण मुलींना तिच्या पोस्टमुळे मदत होते."
मॉली रॅल्सटननं पुढे सांगितलं, "माझ्याच वयाच्या एखाद्या व्यक्तीला अशाच प्रकारच्या आजाराला तोंड देताना पाहणं खूप प्रेरणादायी आहे. कारण जर ती या आजाराला तोंड देत असेल तर मीसुद्धा तसं करू शकते हा विश्वास त्यातून मिळतो."
मॉली रॅल्सटन तिच्या कर्करोगावरील उपचार पूर्ण करण्यासाठी अस्थिमज्जा प्रत्यारोपणासाठी (bone marrow transplant) हॉस्पिटलमध्ये दाखल झाली आहे.

फोटो स्रोत, Molly Ralston
सहा महिन्यांहून अधिक काळापासून अॅंटोनिया रुबिओच्या कर्करोगाची लक्षणं कमी झाल्याचं किंवा कर्करोग बरा झाल्याचं दिसतं आहे. कर्करोग झालेल्या इतर तरुणांना मदत करण्यासाठी रुबिओ टीनेज कॅन्सर ट्रस्ट (Teenage Cancer Trust) आणि सीएलआयसी सार्जंट (Cancer and Leukaemia in Childhood (CLIC) and Sargent Cancer Care) या स्वयंसेवी संस्थे बरोबर काम करते आहे.
ती सांगते की, बीबीसीच्या जर्सी मेक अ डिफरन्स अवार्ड्ससाठी मिळालेलं नामांकन हे माझ्यासाठी खूपच धक्कादायक होतं. कर्करोगावर उपचार घेण्याच्या माझ्या प्रवासात मला मदत करणाऱ्यांच्या कामाचीसुद्धा यात दखल घेण्यात आली होती.

"ऑस्ट्रेलिया आणि अमेरिकेत असे लोक आहेत ज्यांच्याशी मी दररोज बोलत असते. कर्करोगाशी लढा देत असलेल्या लोकांचा मी एक समुदाय तयार केला आहे," असं रुबिओ सांगते.
"कर्करोगाच्या निदानाबद्दल बोलत असताना त्या व्हीडिओंमधून संभाव्यपणे इतरांचं आयुष्य वाचवलं, या अशा प्रतिक्रिया ऐकल्या की मला आनंद होतो."

कॅरोन रुबिओ यांनी मेक अ डिफरन्स पुरस्कारांसाठी त्यांच्या मुलीला नामांकित केलं आहे.
कॅरोन म्हणाल्या की, "त्यांच्या मुलीच्या कामाने त्या खूप प्रेरित झाल्या. तिनं (अॅंटोनिया रुबिओ) हजारो लोकांच्या आयुष्यात मोठा बदल घडवला आहे आणि तिचं हे काम सुरूच आहे."
त्या पुढे म्हणाल्या, "आपल्या मुलीला कर्करोग झाला आहे हे ऐकण्याची वेळ कोणावरही येऊ नये असं मला वाटतं आणि अॅंटोनियाचा दररोज मला अभिमान वाटतो."
सप्टेंबर महिन्यात बीबीसी रेडिओ जर्सी मेक अ डिफरन्स अवार्ड्सच्या विजेत्याची घोषणा केली जाणार आहे.











