64 वर्षांनंतर गुजरातमध्ये अधिवेशन भरवणाऱ्या काँग्रेससमोर 'ही' आहेत आव्हानं

    • Author, आर्जव पारेख
    • Role, बीबीसी गुजराती प्रतिनिधी

आज आणि उद्या म्हणजे 8 आणि 9 एप्रिलला गुजरातमध्ये काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन होतं आहे. तब्बल 64 वर्षांनी काँग्रेसचं अधिवेशन गुजरातमध्ये होणार असल्यामुळे या अधिवेशनाला एक वेगळंच महत्व आहे.

"गुजरात काँग्रेसमध्ये दोन प्रकारचे लोक आहेत. पहिला प्रकार म्हणजे, असे लोक, जे मनापासून आणि प्रामाणिकपणे काँग्रेससाठी संघर्ष करतात आणि ते जनतेशी जोडलेले आहेत."

"दुसऱ्या प्रकारचे लोक म्हणजे ज्यांचा जनतेशी संपर्क तुटला आहे आणि ज्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली आहे. गरज पडल्यास, अशा 5 ते 25 नेत्यांची काँग्रेसमधून हकालपट्टी केली पाहिजे."

असं, गेल्या महिन्यात गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना उद्देशून भाषण करताना राहुल गांधी म्हणाले होते.

याआधी, राहुल गांधी संसदेत म्हणाले होते, "आम्ही तुम्हाला (भाजपा) अयोध्येत हरवलं आहे आणि 2027 मध्ये आम्ही गुजरातमध्ये तुमचा पराभव करू."

लोकसभा निवडणुकीनंतर राहुल गांधींनी दोन वेळा गुजरातचा दौरा केला आहे. 8 आणि 9 एप्रिलला गुजरातमध्येच काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन होतं आहे.

गुजरातमध्ये काँग्रेसचे शेवटचं अधिवेशन 1961 साली भावनगरमध्ये झालं होतं. आता 64 वर्षांनंतर काँग्रेसनं पुन्हा एकदा गुजरातकडे मोर्चा वळवला आहे.

या पार्श्वभूमीवर काही प्रश्न उपस्थित होतात. गुजरातमध्ये अधिवेशनाचं आयोजन करण्याचा निर्णय काँग्रेसनं का घेतला? यामुळे पक्षाला मोठा फायदा होईल का? काँग्रेसची गुजरातमध्ये प्रत्यक्षात स्थिती काय आहे?

गुजरातमध्ये पक्षाचं पुनरुज्जीवन करणं काँग्रेससाठी किती अवघड आहे आणि पक्षासमोर कोणती आव्हानं आहेत? राहुल गांधी वारंवार गुजरातमध्ये का जात आहेत आणि ते अशी वक्तव्यं का करत आहेत?

या लेखात आम्ही याच प्रश्नांची उत्तर शोधण्याचा प्रयत्न केला आहे.

गुजरातमध्ये अधिवेशन घेण्यामागचा काँग्रेसचा उद्देश?

काँग्रेस पक्षाचं गुजरातमध्ये दोन दिवसांचं राष्ट्रीय अधिवेशन होतं आहे. या अधिवेशनाअंतर्गत अनेक कार्यक्रमांची घोषणा करण्यात आली आहे. यात काँग्रेसचं राष्ट्रीय नेतृत्व गुजरातमधील पक्षाच्या स्थितीवर विचार-मंथन करणार आहे.

शक्तिसिंह गोहिल, या अधिवेशनाच्या स्वागत समितीचे अध्यक्ष आहेत. तर अमित चावडा संयोजक आहेत. शक्तिसिंह गोहिल सध्या गुजरातमध्ये काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत.

डॉ. विद्युत जोशी, वरिष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि महाराजा कृष्ण कुमार सिंहजी भावनगर विद्यापीठाचे माजी कुलगुरू आहेत. ते म्हणतात, "काँग्रेसच्या नेतृत्त्वाला या गोष्टीची जाणीव आहे की देशात कधीही जेव्हा नव्या राजकीय संस्कृतीची सुरुवात होते, तेव्हा ती गुजरातमधूनच होते."

"त्यामुळेच, जर गुजरात मॉडेल तोडता आलं, तर त्याचा परिणाम संपूर्ण देशभरात होईल. म्हणूनच, गुजरातमधून एक नवीन मॉडेल तयार करणं आणि ते लोकांसमोर आणणं या गुजरातमध्ये अधिवेशन भरवण्यामागचा मूळ विचार असू शकतो."

अर्थात ते म्हणतात की गुजरातमध्ये काँग्रेसकडे असा कोणीही नेता नाही, जो हे सर्व करू शकेल.

या मुद्द्याबाबत बीबीसीनं गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता यांच्याशी संवाद साधला.

ते म्हणतात, "असं वाटतं की काँग्रेसच्या नव्या पिढीला आतून असं वाटतं आहे की त्यांना काहीतरी करून दाखवायचं आहे."

प्राध्यापक अमित ढोलकिया, बडोद्याच्या महाराजा सयाजीराव विद्यापीठात राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहेत. गुजरातमध्ये अधिवेशन भरवण्याची बाब प्रतीकात्मक असल्याचं ते मानतात.

ते म्हणतात, "या अधिवेशनामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये भलेही उत्साह निर्माण होवो, मात्र त्याचा कोणताही मोठा राजकीय परिणाम होताना दिसत नाही. गेल्या सहा दशकांमध्ये गुजरातमध्ये काँग्रेस पक्ष पूर्णपणे बदलला आहे. गुजरातमध्ये काँग्रेस खूपच कमकुवत झाली आहे."

वरिष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक हरेश झाला यांना वाटतं की या अधिवेशनाचं मुख्य उद्दिष्टं पक्षाच्या कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याचं आहे.

ते म्हणतात, "काँग्रेसच्या अधिवेशनाला प्रसारमाध्यमातून प्रसिद्धी मिळो की न मिळो, मात्र यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संदेश जाईल की आता पक्ष गुजरातमध्ये सक्रिय झाला आहे. पक्षाच्या राष्ट्रीय नेतृत्वाला गुजरातमध्ये रस आहे."

या अधिवेशनामुळे गुजरातमध्ये काँग्रेसला गांभीर्यानं न घेणाऱ्यांची मानसिकता देखील बदलू शकते.

गांधीवादी प्रकाश शाह म्हणतात, "1924 मध्ये गांधीजींची निवड काँग्रेसच्या अध्यक्षपदी झाली होती. त्याचं हे शताब्दी वर्ष आहे. त्यामुळेच काँग्रेसच्या नेतृत्वाला बहुधा असं वाटलं असावं की गांधीजीच्या जन्मभूमीत गुजरातमध्ये गेलं पाहिजे."

'राहुल गांधींचा कार्यकर्त्यांना संदेश देण्याचा प्रयत्न'

प्राध्यापक विद्युत जोशी म्हणतात, "गुजरातमधून भाजपादेखील एक मॉडेल म्हणून वाढली आहे. बहुसंख्याकवाद, नवउदारमतवाद आणि प्रभावशाली जातींचा पाठिंबा असा या मॉडेलचा आधार आहे."

"याच्या मदतीनंच 'गुजरात मॉडेल' अस्तित्वात आलं आहे. मला वाटतं की इतक्या वर्षांपासून जे मॉडेल चाललं आहे, आता त्याला आव्हान देण्याची वेळ आली आहे."

विद्युत जोशी हा मुद्दा लक्षात घेत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या 75 वर्षांच्या कालखंडाची विभागणी तीन भागांमध्ये करतात.

ते म्हणतात, "पहिल्या 25 वर्षात संस्था आणि उद्योगांची निर्मिती झाली. देशाची व्यवस्था उभी राहिली. हा काळ व्यवस्था निर्मितीचा होता. त्यामुळे राजकारण स्थिर राहिलं."

"पहिल्या 25 वर्षांमध्ये देशानं तीन पंतप्रधान आणि एकाच पक्षाचं सरकार पाहिलं."

यानंतरच्या वर्षांमध्ये या सर्व व्यवस्थेच्या आधारावर नवं नेतृत्व निर्माण झालं. लोक राजकारणात सहभागी होऊ लागले. नेतृत्व करण्यासाठी पुढे सरसावू लागले आणि एक मिश्र अर्थव्यवस्थेचा काळ आला.

त्यातून पुढील 25 वर्षांमध्ये देशात 11 पंतप्रधान झाले, सात राजकीय पक्ष उभे राहिले आणि 14 मोठी आंदोलनं झाली.

प्राध्यापक जोशी म्हणतात की याच्या विरोधात जी प्रतिक्रिया निर्माण झाली, ती हिंदुत्व आणि बहुसंख्यांकवादाची होती. 1999 नंतर ते देशानं पाहिलं.

बहुसंख्यांकवादाबरोबरच कन्झ्युमरिझम किंवा उपभोक्तावाद आला आणि मग देशानं फक्त तीन पंतप्रधान आणि दोन राजकीय पक्ष पाहिले.

आता ही 25 वर्षे संपत आहेत आणि पुन्हा वातावरण बदलण्याची वेळ येते आहे. काँग्रेसच्या नेतृत्वाला या गोष्टीची जाणीव आहे.

वरिष्ठ पत्रकार हरेश झाला म्हणतात, "2017 मध्ये आपण पाहिलं आहे की भाजपाचा पराभव करणं कठीण नाही. लोकांनाही तसं वाटतं, मात्र काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते त्यासाठी सक्षम नाहीत."

ते पुढे म्हणतात, "अहमदाबादला राहुल गांधींनी ही बाब उघडपणे मान्य केली. कारण त्यांना कार्यकर्त्यांना हा संदेश देखील द्यायचा होता की पक्षाचं नेतृत्व अंधारात नाही. त्यांना सर्व कल्पना आहे. काँग्रेसमधील ज्या नेत्यांनी भाजपाशी हातमिळवणी केली आहे, त्यांच्याबद्दल नेतृत्वाला माहित आहे."

काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं काय म्हणणं आहे?

दाहोद हा आदिवासी भाग आहे. तिथल्या काँग्रेसच्या माजी खासदार डॉ. प्रभाबेन तावियाड यांच्याशी देखील बीबीसीनं संवाद साधला.

70 वर्षांच्या प्रभाबेन यांचं म्हणणं आहे की त्या जन्मापासून काँग्रेसमध्ये आहेत. कारण स्वातंत्र्यपूर्व काळात त्यांचे वडीलदेखील काँग्रेसमध्ये होते.

त्या म्हणतात, "गुजरातमध्ये होणाऱ्या काँग्रेसच्या अधिवेशनाचा सकारात्मक परिणाम होईल. गुजरातमधील जनता द्वेष आणि धमकीच्या राजकारणाला कंटाळली आहे. त्याउलट काँग्रेसची विचारधारा नेहमीच समाजातील तळागाळातील, शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची राहिली आहे."

गुजरातमधील काँग्रेसच्या राजवटीची आठवण करत त्या म्हणतात, "असं म्हणता येऊ शकतं की काँग्रेसनंच आम्हाला शिकवलं आहे. आदिवासी भागामध्ये आज जे शिक्षण पोहोचलं आहे, शिक्षणाची स्थिती आहे, ते काँग्रेसमुळेच झालं आहे."

"साम, दाम, दंड, भेद याचं राजकारण करून आदिवासी भागामध्ये पाय पसरवण्यात भाजपाला यश आलं. आजदेखील शिक्षण आणि आरोग्य या गुजरातमधील आदिवासी भागातील मुख्य समस्या आहेत."

1946 पासून काँग्रेसशी जोडले गेलेले 91 वर्षांचे बालू भाई काँग्रेसच्या अधिवेशनाच्या सभास्थळाच्या समितीचे संयोजक आहेत.

त्यांना वाटतं की राहुल गांधी जे करत आहेत, ती योग्य दिशा आहे.

ते म्हणाले, "अधिवेशन स्वयंमूल्यांकनासाठी भरवलं जातं. मी मान्य करतो की काँग्रेसवर परिस्थितीचा परिणाम झाला आहे. गेल्या काही दशकांमध्ये समाजात बदल झाला आहे. राजकारणावर देखील याचा प्रभाव पडला आहे."

"मात्र एक कार्यकर्ता म्हणून मला सांगायचं आहे की काँग्रेसनं निराश होण्याची गरज नाही."

सात दशकांहून अधिक काळापासून काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले रमणिक भाई बीबीसीला म्हणाले, "काँग्रेसचं राष्ट्रीय अधिवेशन गुजरातमध्ये होतं आहे ही आनंदाची गोष्ट आहे. मला आशा आहे की गुजरातमधील लोक मोठ्या संख्येनं त्यात सहभागी होतील."

ते पुढे म्हणतात, "गुजरातच्या लोकांच्या मनात आजदेखील काँग्रेसबद्दल आदर आहे. जुने कार्यकर्ते निष्क्रिय झाले आहे. जर तरुण पिढीला पक्षाबरोबर जोडलं गेलं, तर काँग्रेस पुन्हा उभी राहू शकते."

"काँग्रेस पक्षानं जनसंपर्क वाढवण्याची आणि लोकापर्यंत त्यांची विचारधारा पोहोचण्याची आवश्यकता आहे."

राहुल गांधींचं भाषण : मोठा निर्णय की निराशा?

गुजरातमधील काँग्रेस पक्षाच्या गटबाजीवर, राहुल गांधींनी केलेल्या भाषणावर काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया संमिश्र स्वरुपाची आहे.

काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले सतीश चावडा म्हणतात, "गुजरातमधील काँग्रेसच्या नेत्यांमध्ये असलेली गटबाजी ही काही नवीन गोष्ट नाही. किंबहुना ती चार दशकांहून अधिक जुनी आहे. तुम्ही गुजरातमध्ये कॉंग्रेसमधून किती नेत्यांना बाहेर काढाल?"

"सद्यस्थितीत पक्षानं या गोष्टीचा विचार केला पाहिजे की पक्षाशी वैचारिकदृष्ट्या जोडलेल्या लोकांना कसं सांभाळायचं आणि त्यांना पुन्हा कामाला कसं लावायचं. जर असं झालं तर काँग्रेसचं पुनरुज्जीवन होऊ शकतं."

प्राध्यापक अमित ढोलकिया म्हणतात, "राहुल गांधी सार्वजनिकरित्या काही नेत्यांना पक्षातून काढून टाकण्याबद्दल बोलले. ही गोष्ट सार्वजनिकरित्या मान्य करणं हे एक धाडसी पाऊल होतं. मात्र यातून त्यांचं अपयश आणि हताशपणा देखील दिसून येतो."

ते पुढे म्हणाले, "जर त्यांनी या नेत्यांना पक्षातून काढलं तर त्यांच्याकडे नवीन नेतृत्व आहे का? गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाची अवस्था खूपच दयनीय आहे."

त्यांचं म्हणणं आहे की विरोधी पक्ष म्हणून गुजरातमध्ये काँग्रेस पक्षानं प्रभावीपणे काम केलेलं नाही.

काँग्रेसच्या माजी खासदार डॉ. प्रभाबेन तावियाड या राहुल गांधींच्या भाषणाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून पाहतात. त्या म्हणाल्या, "जे लोक काँग्रेस पक्षात आहेत आणि ज्यांचे भाजपाबरोबर संबंध आहेत, त्यांचं पितळ आता उघडं पडेल."

वरिष्ठ पत्रकार हरेश झाला म्हणतात, "जर राहुल गांधींनी नेत्यांना काढलं तर त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठा संदेश जाईल आणि पक्षाच्या हिताच्या दृष्टीनं त्याचा मोठा परिणाम होईल."

"मात्र जर आता बोलल्यानंतर देखील त्यांनी कोणतीही कारवाई केली नाही, तर आधीच निराश असलेले कार्यकर्ते आणखी जास्त निराश होऊ शकतात."

काँग्रेसचे कार्यकर्ते बालू भाई पटेल, राहुल गांधी यांच्या भाषणाबद्दल बोलले, "त्यांनी काँग्रेसमधील उणीवा मान्य केल्या आहेत. आत्मपरीक्षण हा गांधीजींनी दिलेला मंत्र आहे. आम्ही आधी हे पाहिलं पाहिजे की आम्ही कुठे चुकत आहोत आणि आम्ही काय केलं पाहिजे?"

काँग्रेसपुढे समस्यांचा डोंगर

गुजरातमध्ये सातत्यानं चर्चा होत असते की काँग्रेसमध्ये गटबाजी आहे आणि त्याला नव्या नेतृत्वाची आवश्यकता आहे.

माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता म्हणतात, "गुजरातच्या राजकारणातील दोन्ही राजकीय पक्षांची तुलना केली तर काँग्रेसला सुधारणा करण्यासाठी वाव आहे. मात्र जर पक्ष लोकांपर्यंत पोहोचू शकला नाही तर काहीही शक्य होणार नाही."

वरिष्ठ पत्रकार हरेश झाला म्हणतात, "राहुल गांधी यांना वाटतं की गुजरातमध्ये काँग्रेस भक्कम व्हावी. मात्र यासाठी तुमच्याकडे मजबूत सैन्य आणि मजबूत सेनापती असला पाहिजे. दुर्दैवानं गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाकडे या दोन्हीही गोष्टी नाहीत."

ते म्हणतात, "गुजरातमध्ये काँग्रेस पक्षाला लढवय्या नेत्याची आवश्यकता आहे. एक वास्तव हे देखील आहे की काँग्रेस पक्षाकडे संघटना चालवण्यासाठी पैसा नाही."

"गुजराती लोकांच्या मनात फक्त एकच गोष्ट आहे की मुस्लिमांपासून आमचं रक्षण कोण करेल. विकासाचे मुद्दे गुजराती लोकांच्या मनात ठाण मांडून बसले आहेत. मोदी यांच्या नेतृत्वामुळे गुजरातमध्ये भाजपाला फायदा होतो आहे."

ते पुढे म्हणतात, "अशा परिस्थितीत काँग्रेसला या आव्हानांना यशस्वीरित्या तोंड देता येणं कठीण आहे."

काँग्रेसचे कार्यकर्ते बालू भाई पटेल म्हणतात, "काँग्रेसला गुजरातमध्ये जनसंपर्काद्वारेच यश मिळेल. गुजरातमधील एका संपूर्ण पिढीला हे माहितच नाही की काँग्रेसचं नेतृत्व कसं होतं? काँग्रेसला नव्या पिढीपर्यंत पोहोचण्याची आवश्यकता आहे."

डॉ. प्रभाबेन तावियाड म्हणतात, "काँग्रेसला मोठ्या संख्येनं महिला आणि तरुणांना सोबत घ्यावं लागेल. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही. लोकांना भाजपाला पर्याय हवा आहे. मात्र तो पर्याय देण्यास काँग्रेस सक्षम नाही."

"जिल्हा पातळीवर काँग्रेसच्या सर्व पदाधिकाऱ्यांना वेळोवेळी बदललं गेलं पाहिजे आणि आता प्रामाणिक कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली पाहिजे."

काँग्रेसचे कार्यकर्ते असलेले सतीश चावडा म्हणतात, "गुजरातमध्ये 30 वर्षांपासून काँग्रेस सत्तेपासून दूर आहे. भाजपाकडे प्रचंड पैसा आणि प्रसारमाध्यमांची ताकद आहे. अशा परिस्थितीत काँग्रेसला लढण्यायोग्य बनवणं हे खूप कठीण काम आहे."

सेवा दलाची वाईट अवस्था, तरुणांची उणीव

एक काळ असा होता की सेवा दलाला काँग्रेसचं मजबूत अंग मानलं जायचं. विद्यार्थी संघटनादेखील मजबूत होती. मात्र आता गुजरातमध्ये त्यांची स्थिती खूपच वाईट आहे.

काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष लालजी देसाई यांच्यादेखील बीबीसी बोललं.

लालजी देसाई म्हणतात, "2018 पासून सेवा दलाला पुन्हा स्वायत्त आणि क्रांतीकारक बनवण्याचा निर्णय घेण्यात आला. सेवा दलाचा पुन्हा उभं करण्याच्या दिशेनं आम्ही पावलं टाकली आहेत."

ते म्हणतात, "अलीकडेच काँग्रेसनं अनेक राज्यांमध्ये ज्या पदयात्रा सुरू केल्या आहेत, त्यामागे सेवा दलच आहे. 2019 मध्ये 35 वर्षांनी सेवा दलाचं अधिवेशन झालं होतं."

"गुजरातमध्ये लोकांच्या संघर्षात देखील सेवा दलाची सक्रियता वाढली आहे. सेवा दल 'नेता सेवा'च्या भूमिकेत गेलं होतं, ते आता पुन्हा 'जन सेवे'कडे परतत आहे."

ते म्हणाले, "आम्ही 'गार्ड ऑफ ऑनर' हटवून तिरंगा फडकावण्याची प्रथा सुरू केली आहे. आम्ही सेवा दलाचा ड्रेस कोड देखील बदलला आहे. आता जीन्सला परवानगी देण्यात आली आहे."

"तरुणांना आकृष्ट करण्यासाठी आम्ही प्रत्येक तालुक्यात कार्यक्रम सुरू केले आहेत. प्रत्येक तालुक्यात सेवा दलाची एक नवी भक्कम टीम तयार करण्याचा प्रयत्न आहे."

लालजी देसाई म्हणतात, "सध्या गुजरातमध्ये सेवा दलाचे दोन हजार कार्यकर्ते आहेत. त्यातील 500 कार्यकर्ते विचारधारेसाठी अतिशय कटिबद्ध आहेत."

"आमचं पहिलं उद्दिष्टं ही संख्या 500 वरून 5,000 पर्यंत नेण्याचं आहे. प्रत्येक बूथवर त्यांची संख्या उत्तम असावी यासाठी आम्ही प्रयत्न करू."

वरिष्ठ पत्रकार हरेश झाला म्हणतात, "फ्रंटल संघटनांना मजबूत कठीण नाही. मात्र निधीची कमतरता आहे. विद्यार्थी संघटना आणि सेवा दलावर देखील याचा परिणाम होतो."

प्राध्यापक विद्युत जोशी म्हणतात, "जेव्हा 1980 मध्ये इंदिरा गांधी पुन्हा सत्ते आल्या, तेव्हा त्यांना वाटलं की सेवा दलाचा त्यांना नाही तर मोरारजी देसाईंना पाठिंबा आहे. त्यामुळे त्यांनी सेवा दल विसर्जित केलं होतं."

"सेवा दल विसर्जित झाल्यामुळे हळूहळू काँग्रेस पक्षातील तरुणांचा सहभाग कमी होत गेला. त्याचा परिणाम असा झाला की काँग्रेसकडे आता कार्यकर्ते राहिले नाहीत, फक्त नेत्यांची मुलंच आहेत."

प्राध्यापक ढोलकिया म्हणतात, "गुजरातमधील तरुण मतदारांना काँग्रेसचं नेतृत्व आणि काँग्रेसच्या धोरणांबद्दल काहीही माहित नाही. त्यांनी नेहमीच मोदी किंवा भाजपाचं सरकार पाहिलं आहे."

"तरुणांना पक्षाशी जोडून घेण्यासाठी काँग्रेसनं कोणतेही प्रयत्न केले नाहीत. काँग्रेसला गावोगावी जाऊन जनसंपर्क करावा लागेल. मला वाटतं की गुजरातमध्ये काँग्रेसला पुन्हा एकदा उभं करणं खूप कठीण आहे."

गुजरातमध्ये काँग्रेसची स्थिती किती वाईट आहे?

1985 मध्ये काँग्रेसनं गुजरातमध्ये सर्वाधिक जागा जिंकण्याचा विक्रम केला होता. त्यावेळेस काँग्रेसनं 182 पैकी 149 जागा जिंकल्या होत्या.

1990 च्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिमण भाई पटेल यांनी जनता दल तयार करून निवडणूक लढवली आणि काँग्रेसला फक्त 33 जागा मिळाल्या. या निवडणुकीत गुजरातमध्ये भाजपाला मोठं यश मिळालं. त्यांनी 67 जागा जिंकल्या होत्या.

त्याआधी 1980 आणि 1985 मध्ये भाजपाला गुजरातमध्ये मोठं यश मिळालं नव्हतं.

1995 मध्ये पहिल्यांदा भाजपाला गुजरातमध्ये बहुमत मिळालं होतं. त्यांनी 121 जागा जिंकत सरकार स्थापन केलं होतं.

त्यानंतर गुजरातमध्ये हळूहळू काँग्रेस पक्ष कमकुवत होत गेला. 1998 मध्ये काँग्रेस 53 जागा जिंकली. तर 2002 मध्ये 51, 2007 मध्ये 59 आणि 2012 मध्ये काँग्रेस 61 जागा जिंकली होती.

2017 च्या निवडणुकीआधी गुजरातमध्ये पाटीदार आंदोलन झालं होतं. त्यानंतर हार्दिक पटेल, जिग्नेश मेवाणी आणि अल्पेश ठाकोर या त्रिकुटानं गुजरातमध्ये भाजपाच्या विरोधात सत्ताधाऱ्यांच्या विरोधाची लाट निर्माण केली होती.

त्यावेळेस काँग्रेसला 77 जागा मिळाल्या होत्या, मात्र काँग्रेसला सरकार स्थापन करता आलं नाही. तर भाजपानं 99 जागां जिंकत कसंबसं सरकार स्थापन केलं.

त्या निवडणुकीत भले ही काँग्रेस एक भक्कम विरोधी पक्ष म्हणून पुढे आला. मात्र पक्षामधील गटबाजी वाढतच गेली. हार्दिक पटेल आणि अल्पेश ठाकोर सारख्या नेत्यांनी काँग्रेस पक्ष सोडला.

2012 पासून 2023 पर्यंत काँग्रेस पक्षाच्या 45 हून अधिक आमदार किंवा खासदारांनी पक्ष सोडला आहे. काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष अर्जुन मोढावाडिया 40 वर्षे काँग्रेसमध्ये होते. त्यांनीदेखील पक्ष सोडला.

2022 च्या निवडणुकीत याचा इतका वाईट परिणाम झाला की काँग्रेसला फक्त 17 जागा जिंकता आल्या. गुजरातच्या इतिहासात काँग्रेसला मिळालेल्या या सर्वात कमी जागा होत्या.

गुजरातमध्ये आम आदमी पार्टी हा तिसरा पक्ष म्हणून उदयाला आला. त्यांनी पाच जागा जिंकत काँग्रेसचं मोठं नुकसान केलं.

काँग्रेसच्या 17 आमदारांपैकी पाच आमदार पक्ष सोडून गेले आणि आता त्यांच्याकडे फक्त 12 आमदार राहिले आहेत.

2009 मध्ये लोकसभेत गुजरातमधील 26 खासदारांपैकी काँग्रेस पक्षाचे 11 खासदार होते. 2014 आणि 2019 मध्ये ही संख्या शून्यावर आली. तर 2024 मध्ये काँग्रेसला फक्त एकच जागा जिंकता आली.

गेल्या महिन्यात 68 नगरपालिकांमध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त एकच नगरपालिका जिंकता आली. आता गुजरातमध्ये काँग्रेसला आम आदमी पार्टीच्या आव्हानाला देखील तोंड द्यावं लागतं आहे.

गुजरातमधील भाजपाचे प्रवक्ते यज्ञेश दवे यांनी बीबीसीला सांगितलं की अधिवेशनाचं आयोजन करून गुजरातमधील काँग्रेसच्या स्थितीत काहीही सुधारणा होणार नाही.

ते म्हणतात, "गुजरातमध्ये अधिवेशन घ्यायचं हा काँग्रेसचा अंतर्गत प्रश्न आहे. आपण सर्वांनी गुजरातमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अलीकडेच झालेल्या निवडणुकांच्या निकाल पाहिले आहेत. काँग्रेसला फक्त एकच नगरपालिका जिंकता आली आहे."

काँग्रेससमोर आता काय मार्ग आहे?

गांधीवादी प्रकाश शाह म्हणतात, "जर काँग्रेसला पुनरुज्जीवन करायचं असेल तर त्यांनी फक्त भावनगरचं अधिवेशनचं लक्षात ठेवता कामा नये, तर त्यांनी 1969 मध्ये काँग्रेसमधून वेगळं होत अधिवेशन भरवणाऱ्या लोकांना देखील लक्षात ठेवलं पाहिजे. त्या सर्व नेत्यांची विचारधारा आणि संयुक्त वारसा घेऊन काँग्रेसनं पुढे गेलं पाहिजे."

शाह म्हणतात, या संयुक्त वारशामध्ये गांधी, नेहरू आणि पटेल यांच्याबरोबरच जयप्रकाश नारायण, कृपलानी आणि लोहिया यांच्या विचारधारेचा देखील समावेश आहे.

वरिष्ठ कार्यकर्ते बालूभाई पटेल म्हणतात, "राहुल गांधी यांनी जो मुद्दा मांडला आहे, त्याच दिशेनं आम्ही वाटचाल केली पाहिजे. असं होऊ शकतं की त्या दिशेनं वाटचाल केल्यावर आम्हाला उशीरानं सत्ता मिळेल."

माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता म्हणतात, "गुजरातमधील जनता नेहमीच तीन गोष्टींबद्दल संवेदनशील राहिली आहे. ते म्हणजे भावना, मोह आणि भीती. सध्याच्या भाजपा सरकारनं खूपच खालची पातळी गाठली आहे."

"असं वाटतं की सरकारला जनतेची पर्वा नाही."

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)