अमेरिकेत गुन्हा दाखल झालेले सागर अदानी कोण आहेत?

अदानी समूहाचं नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. कंपनीचे संस्थापक गौतम अदानी, त्यांचा पुतण्या सागर अदानी यांच्यासह आठ जणांविरुद्ध अमेरिकेच्या कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे.

अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडचं कंत्राट मिळवण्यासाठी भारतीय अधिकाऱ्यांना 2100 कोटी रुपयांची लाच देण्याचा आरोप गौतम अदानी आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर झाला आहे.

तसंच ही सगळी माहिती लपवून ठेवून अमेरिकन बाजारपेठेतून दोन अब्ज डॉलर्स जमा केल्याचा आणि न्यायदानाच्या कामात अडथळा आणण्याचाही आरोप आहे.

सागर अदानी हे अदानी ग्रीन्सबरोबर त्यांच्या करिअरच्या सुरुवातीपासूनच काम करत आहेत. अदानी समुहातील आणि कुटुंबातील नवीन पिढी म्हणून सागर यांच्याकडे पाहिलं जातं.

याशिवाय विनीत जैनसुद्धा या कंपनीशी दीर्घकाळापासून संबंधित आहेत. ते AGL मध्ये सीईओ होते आणि आता ते व्यवस्थापकीय संचालक आहेत.

अमेरिकन न्यायालयाच्या या कारवाईमुळे अदानी समुहाच्या शेअर्सच्या किमती 20 टक्क्यांपर्यंत घसरल्या.

AGEL ने डॉलर या चलनाच्या बाँडद्वारे 60 कोटी अमेरिकन डॉलर्स उभारण्याचा निर्णय रद्द केला आहे. संचालकांविरुद्ध असलेले सगळे आरोप निराधार असल्याचं कंपनीने म्हटलं.

जानेवारी 2023 मध्ये अमेरिकेतील हिंडनबर्ग संस्थेने अदानी समुहाविरुद्ध एक अहवाल प्रकाशित केला होता. तेव्हाही अदानी समुहाचे शेअर्स कोसळले होते.

'गौतम अदानींबद्दल कोडवर्डमध्ये बोला'

गौतम अदानी आणि इतरांविरुद्ध बुधवारी न्यूयॉर्कमधील कोर्टात आरोपपत्र दाखल करण्यात आलं आहे. यात भारतीय अधिकाऱ्यांना 25 कोटी डॉलर्स (सुमारे 2 हजार 100 कोटी रुपये) लाच देण्याचा कट रचल्याचा आरोप ठेवला आहे.

यामुळे कंपनीला पुढील 20 वर्षांत दोन अब्ज डॉलर्स (सध्याच्या किमतीनुसार 169 अब्ज रुपये) नफा होणार आहे.

अदानी यांच्यावर लावलेल्या आरोपानुसार, गौतम अदानी यांनी स्वत: भारतीय अधिकाऱ्यांशी बोलून लाचेच्या रकमेची चर्चा केली.

याशिवाय या संभाषणात गौतम अदानी यांचं नाव कोडवर्डमध्ये घेतल्याचा आरोपही आहे. आरोपपत्राच्या पान 20 नुसार गौतम अदानी यांचा उल्लेख ‘SAG’,’ नंबर उनो’, ‘द बिग मॅन’ असा करण्यात आला होता.

आरोपपत्रानुसार हे सगळे व्यवहार गौतम अदानी, सागर अदानी, विनीत जैन आणि इतर आरोपींच्या उपस्थितीत अदानी ग्रुपच्या अहमदाबाद येथील कॉर्पोरेट ऑफिसमध्ये एप्रिल 2022 मध्ये पार पडले.

गौतम अदानी हे भारतातील दिग्गज उद्योगपती म्हणून ओळखले जातात. फोर्ब्सच्या माहितीनुसार अदानी यांचं गुरुवारी (21 नोव्हेंबर) 11 बिलियन डॉलरचं नुकसान झालं आणि संपत्ती 60 बिलियन डॉलरपर्यंत आली. जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींमध्ये त्याचा 25 वा क्रमांक आहे.

सागर अदानी कोण आहे?

सागर अदानी हे अदानी ग्रीन एनर्जीचे कार्यकारी संचालक आहेत. ते गौतम अदानी यांचे भाऊ राजेश अदानी यांचे पूत्र आहेत.

कंपनीच्या वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, सागर यांनी अमेरिकेतील ब्राऊन विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदवी घेतली आहे. 2015 पासून ते अदानी समुहाचा भाग आहेत.

अदानी एनर्जीच्या सौर ऊर्जा आणि पवनऊर्जा प्रकल्पाचं श्रेय सागर अदानी यांना जातं. ते कंपनीची आर्थिक बाजू सांभाळतात आणि कंपनीचे रणनितीकार आहेत. तसंच परदेशातील व्यवसायही सांभाळतात.

कंपनीच्या वार्षिक अहवालानुसार (वर्ष 2023-24) अक्षय ऊर्जा संबंधित उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात सागर अदानी यांची महत्त्वाची भूमिका आहे. कंपनीच्या स्थापनेपासून ते कार्यरत आहेत.

या अहवालानुसार सागर हे व्यवसाय, धोका व्यवस्थापन, अर्थ, जागतिक अनुभव, विलिनीकरण, तंत्रज्ञान संशोधन आणि सायबर सुरक्षा आणि कॉर्पोरेट गव्हर्नंस या विषयातले तज्ज्ञ आहेत.

लिस्टेड कंपन्या आणि त्यांच्या संचालकाची माहिती गोळा करणाऱ्या ट्रेडलाईन या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सागर अदानी AGEL चे कार्यकारी संचालक असताना त्यांना 50 लाख वार्षिक पगार मिळत होता.

2020 मध्ये, हा आकडा वाढून एक कोटीच्या वर पोहोचला होता. 2022 मध्ये हा आकडा तीन कोटींवर गेला होता. वर उल्लेख केलेल्या वार्षिक अहवालानुसार, सागर यांना चार कोटी वार्षिक पगार मिळतो. याशिवाय त्यांना 40 लाख रुपये भत्ता मिळतो.

कार्यकारी संचालक म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ ऑक्टोबर-2023 मध्ये संपणार होता. मात्र त्यापूर्वी त्यांची या पदावर आणखी पाच वर्षांसाठी नियुक्ती करण्यात आली होती.

आरोपपत्रानुसार (पान 34) 17 मार्च 2023 ला सागर अदानी अमेरिकेत असताना, एफबीआयने (फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन) त्यांच्याविरुद्ध वॉरंट काढलं आणि त्यांच्याकडून इलेक्ट्रॉनिक गॅजेट जप्त केले होते.

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, सागर कोणत्या अधिकाऱ्याला लाच म्हणून किती रक्कम द्यायची, एकूण किती रक्कम द्यायची, प्रत्येक राज्य (किंवा केंद्रशासित प्रदेश) किती लाच देऊन किती वीज विकत घेणार यासारखे तपशील त्यांच्या मोबाइल फोनचा वापर करून मिळवायचे.

सरकारी अधिकाऱ्यांच्या नावांची लघुरुपं तयार करण्यात आली होती आणि काही प्रकरणांमध्ये प्रति मेगावॅट किती लाच द्यायची हे निश्चित करण्यात आली होती.

त्यांच्यावर गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा, सत्य परिस्थिती लपवल्याचा आणि गुंतवणूकदारांबरोबर दुजाभाव केल्याचा आरोप आहे.

सागर अदानी यांच्यावर (पान क्र 25) चॅट्स, कागदपत्रं, पीपीटी नष्ट करून पुरावे मिटवल्याचा आरोप करण्यात आला आहे.

इंडिया फायलिंग्स ही संस्था कंपनीचे संचालक आणि त्यांच्या कंपनीत त्यांचं असलेलं स्थान याबद्दल माहिती देते. या कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, अदानी कॅपिटल प्रा. लिमिटेड, अदानी फिनसर्व्ह प्रा. लिमिटेड, अदानी डिजिटल लॅब्स प्रा. लिमिटेड, तसंच अदानी हाऊसिंग फायनान्स प्रा. लिमिटेड, अदानी ग्रीन एनर्जी ट्वेंटी थ्री लि. अदानी हेल्थ व्हेंचर्स या कंपन्यांशी ते निगडीत आहेत.

याशिवाय ते अदानी व्हेंचर्स, अदानी रिन्युबल पॉवर, अदानी ट्रेड अँड लॉजिस्टिक्स या मर्यादित भागीदारी असलेल्या कंपनीत ते संचालक आहेत.

विनीत जैन कोण आहेत?

अमेरिकन सरकारने दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, 2020 ते 2024 दरम्यान हा भ्रष्टाचार घडला आहे. आरोपपत्रातील पान नं 54 वर अदानी यांच्याव्यतिरिक्त विनीत जैन यांचा वारंवार उल्लेख आला आहे.

AGEL च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, विनीत जैन अदानी ग्रीन एनर्जी लिमिटेडमध्ये व्यवस्थापकीय संचालक आहेत.

विनीत हे अदानी समूहाशी 15 वर्षांहून अधिक काळ जोडले गेले आहेत. मे-2023 मध्ये कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक होण्यापूर्वी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणूनही भूमिका सांभाळली होती.

अदानी समूहाच्या ऊर्जा आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये विनीत यांचा सक्रिय सहभाग आहे. अक्षय ऊर्जा, उर्जा निर्मिती, वीज पारेषण आणि वीज वितरण क्षेत्रात त्यांना सखोल ज्ञान आहे.

कंपनीच्या वेबसाइटवरील माहितीनुसार, अदानी समुहाने तामिळनाडूमधील कामुठी येथे सौर उर्जा प्रकल्प सुरू केला होता. तो एकेकाळी जगातील सर्वात मोठा सिंगल-लोकेशन प्रकल्प होता. तो प्रकल्प कार्यान्वित करण्यात विनीत जैन यांनी मोलाची भूमिका बजावली होती.

याशिवाय, त्यांनी देशातील पहिली आणि सर्वात लांब खासगी हाय-व्होल्टेज डायरेक्ट करंट लाईन टाकण्यात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचंही सांगितलं जातं.

अदानी समूहाचा दावा आहे की, ते देशातील सर्वात मोठ्या सौर मॉड्यूल उत्पादन युनिटवर काम करत आहेत. त्यातही जैन यांची सक्रिय भूमिका आहे.

एप्रिल-2022 मध्ये नवी दिल्लीत गौतम अदानी आणि इतर आरोपींमध्ये बैठक होणार होती. त्यात लाचेची रक्कम किती द्यायची याची चर्चा होणार होती. यापूर्वी विनीत जैन यांनी त्यांच्या मोबाईलवरून एक छायाचित्र पाठवले होते.

त्यात परकीय गुंतवणूकदार 55 कोटी रुपयांच्या लाचेच्या बदल्यात 650 मेगावॅट वीज खरेदी करार करण्यात येईल, असं आश्वासन देण्यात आलं होतं. याशिवाय सुमारे 583 कोटी रुपयांच्या बदल्यात 2.3 गिगावॅट वीज खरेदी करार केला जाईल, असंही आश्वासनही देण्यात आलं.

वार्षिक अहवालानुसार (2023-24), विनीत यांचा पगार कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या सरासरी पगाराच्या सुमारे 106 पट आहे. तर सागर यांच्यापेक्षा त्यांचा पगार 41.5 पट आहे.

अदानी ग्रीन एनर्जी

अदानी ग्रीन एनर्जीची स्थापना अदानी एंटरप्रायझेसचा एक भाग म्हणून करण्यात आली. AGEL ही कंपनी जून 2018 मध्ये शेअर बाजारात सूचिबद्ध झाली होती. त्यावेळी 10 रुपये किंमत असलेले 1 अब्ज 58 कोटीपेक्षा जास्त शेअर्स जारी करण्यात आले होते.

ही कंपनी सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, सौर आणि पवन उर्जा प्रकल्प चालवण्याबरोबरच सोलर पार्कचेही व्यवस्थापन करत असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे.

कंपनीच्या वेबसाइटनुसार, 2030 पर्यंत 50 GW अक्षय ऊर्जा निर्माण करण्याचं त्यांचं उद्दिष्ट आहे. सध्या ते 11,184 मेगावॅट वीजेचं उत्पादन करतात.

त्यात 7 हजार 400 मेगावॅट सौर, 1650 मेगावॅट पवन आणि 2140 मेगावॅट (हायब्रीड) उत्पादन होतं. कंपनी राजस्थानमध्ये सोलर पार्कचंही व्यवस्थापन करते.

याशिवाय, कंपनीने गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील खवडा येथे ओसाड जमिनीवर 30 मेगावॅटच्या अक्षय ऊर्जा प्रकल्पाचा प्रकल्प हाती घेतला आहे . हा जगातला सर्वात मोठा प्रकल्प असेल, असा दावा कंपनीने केला आहे.

AGEL ने 60 कोटी डॉलर्स किमतीचे रोखे जारी करण्याची योजना आखली होती, परंतु अलीकडच्या घडामोडींनंतर आता त्यातून माघार घेण्यात आली आहे. याआधीही ही योजना पुढे ढकलण्यात आली होती.

कंपनीने अमेरिकन न्यायालयीन यंत्रणा आणि सिक्युरिटी अँड एक्सचेंज कमिशनचे आरोप बिनबुडाचे ठरवून फेटाळले आहेत. तसेच या प्रकरणी सर्व शक्य कायदेशीर उपाययोजना करणार असल्याचं सांगितलं आहे.

व्यवस्थापनातील सर्वोच्च तत्त्वांचं पालन करण्यासाठी अदानी समूह बांधील आहे आणि कंपनी जिथे काम करते तिथे कायद्याचे पालन होतं आणि पारदर्शकता राहते, असं अदानी समुहानं म्हटलं आहे.

कंपनी पूर्णपणे कायद्याचं पालन करत असल्याचा पुनरुच्चारही करण्यात आला आहे.

तरीही आरोप झाल्यानंतर कंपनीच्या शेअरच्या किमती 20 टक्क्यांपर्यंत घसरल्या आहेत.

स्टॉक मार्केट डेटा गोळा करणाऱ्या स्टॉकएज या वेबसाइटनुसार, अदानी समूहाच्या तब्बल 11 कंपन्या सूचिबद्ध आहेत. गुरुवारी बाजार बंद झाला तेव्हा सर्व शेअरच्या किमती घसरल्या होत्या. टक्केवारीनुसार बघायचं झाल्यास अदानी एंटरप्रायझेस, अदानी ग्रीन एनर्जी सोल्युशन्स, अदानी एनर्जी, अदानी विल्मर, अदानी टोटल गॅस, अदानी पोर्ट्स, अदानी पॉवर आणि अंबुजा सिमेंट्स या कंपन्यांना लक्षणीय तोटा सहन करावा लागला.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)