You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या सर्वोच्च नेत्याचे सल्लागार थोडक्यात बचावले; जखमी झाल्यानंतर काय म्हणाले?
इराणच्या सरकारी माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलने तेहरानवर केलेल्या सुरुवातीच्या हल्ल्यांमधून अली शामखानी मारले जाण्यापासून बचावले आहेत.
अली शामखानी हे इराणचे सर्वोच्च नेते असलेल्या अली खामेनी यांचे सल्लागार आणि इराणचे माजी संरक्षण प्रमुख आहेत.
13 जून रोजी झालेल्या एका इस्रायली हल्ल्यामध्ये ते जखमी झाले होते.
आयआरएनए या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सध्या शामखानी रुग्णालयात असून त्यांची तब्येत स्थिर असल्याचं सांगण्यात आलंय.
आज (21 जून) सकाळी त्यांच्या 'एक्स' अकाऊंटवरुन एक पोस्ट करत त्यांनी म्हटलं की, ते इस्रायलच्या हल्ल्यात जखमी तर झाले आहेत, मात्र, त्यातून ते बचावले आहेत.
पुढे त्यांनी लिहिलं, "माझं नशीब चांगलं म्हणून मी बचावलो आहे. शत्रू आजही माझा द्वेष करतात. मी इराणसाठी शंभरवेळा कुर्बान होऊ शकतो."
इराणच्या अण्वस्त्र तयारीबाबत अमेरिकेनं काय म्हटलं?
इराण अण्वस्त्रं तयार करत आहे की नाही, यावर अमेरिकेच्या गुप्तचर प्रमुख तुलसी गबार्ड यांनी आधी एक विधान केलं होतं, पण आता त्यांनी त्यांच्या जुन्या वक्तव्याच्या अगदी उलट मत व्यक्त केलं आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शुक्रवारी (20 जून) पत्रकारांशी बोलताना सांगितलं की, इराण अण्वस्त्र तयार करण्याच्या जवळ नाही, हे राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गबार्ड यांनी केलेलं मूल्यांकन चुकीचं आहे.
ट्रम्प यांच्या या वक्तव्यानंतर तुलसी गबार्ड यांनीदेखील त्यांच्या जुन्या विधानावर स्पष्टीकरण दिलं. त्या म्हणाल्या की, माध्यमांनी त्यांच्या विधानाचा चुकीचा अर्थ लावून बातम्या प्रसिद्ध केल्या.
गबार्ड यांनी एक्स (आधीचं ट्विटर) वर याबाबत लिहिलं, "काही माध्यमं माझं विधान चुकीच्या पद्धतीनं दाखवून खोट्या बातम्या पसरवत आहेत. जेणेकरुन समाजात तेढ निर्माण होईल."
"अमेरिकेकडे अशी माहिती आहे की, जर इराणनं ठरवलं तर काही आठवड्यांत किंवा महिन्यांत ते अण्वस्त्र तयार करू शकतात. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं आधीच स्पष्ट मत आहे की, असं होऊ द्यायचं नाही आणि मीही त्यांच्याशी पूर्णपणे सहमत आहे."
मात्र, गबार्ड यांनी याआधी मार्च 2025 मध्ये सेनेटच्या गुप्तचर समितीपुढे केलेल्या भाषणात म्हटलं होतं की, गुप्तचर संस्थांना वाटतं की, इराण सध्या अण्वस्त्र तयार करत नाहीये.
त्यांनी असंही म्हटलं होतं की, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांनी 2003 मध्ये स्थगित केलेला अण्वस्त्र कार्यक्रम पुन्हा सुरू करण्याची परवानगी दिलेली नाही.
'इराण - इस्रायल संघर्षात सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय ट्रम्प दोन आठवड्यात घेणार'
इस्राइल-इराण संघर्षात अमेरिका थेट सहभागी होणार की नाही याबाबतचा निर्णय अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुढील दोन आठवड्यांत घेतील अशी माहिती व्हाइट हाऊसकडून देण्यात आली आहे.
व्हाइट हाऊसच्या प्रेस सचिव कॅरोलिन लेविट यांनी म्हटलं की, या प्रकरणात 'संवादाने तोडगा' निघू शकतो असं राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांना वाटत आहे.
कॅरोलिन लेविट यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटलं की, "येत्या काळात इराणसोबत संवाद साधण्याची शक्यता आहे. ती प्रत्यक्षात येईल की नाही हे माहीत नाही. पण हे लक्षात घेऊनच अमेरिका इराणविरुद्ध थेट कारवाई करणार की नाही हे मी पुढील दोन आठवड्यांत ठरवेन."
ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळे राजनयिक चर्चेची एक संधी निर्माण झाली आहे, असं बीबीसीचे उत्तर अमेरिका प्रमुख संवाददाता गॅरी ओ'डोनोह्यू लिहितात.
ऑस्ट्रेलियाने थांबवले तेहरानमधील दूतावासाचे कामकाज
ऑस्ट्रेलियाने सांगितले आहे की इराणमधील वाढत्या असुरक्षिततेमुळे तेहरानमधील दूतावासाचे कामकाज तात्पुरते थांबवत असल्याचं ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांनी सांगितलं आहे.
ऑस्ट्रेलियाच्या परराष्ट्र मंत्री पेनी वोंग यांनी सांगितलं की, "सध्याच्या परिस्थितीत आमची सेवा देण्याची क्षमता खूपच मर्यादित आहे. हवाई मार्ग अजूनही बंद आहेत."
ऑस्ट्रेलियाने आपल्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या कुटुंबियांना इराण सोडायला सांगितले आहे.
पेनी वोंग यांनी सांगितलं की, काही अधिकारी इराणच्या शेजारील अझरबैजान देशात तैनात केले जातील.
ऑस्ट्रेलियाचे राजदूत सध्या तेहरानमध्येच राहतील.
इराणमध्ये असलेल्या सुमारे 1,500 ऑस्ट्रेलियन नागरिकांनी तिथून बाहेर पडण्यासाठी मदत मागितली आहे.
रशियाने काय दिला इशारा?
दरम्यान, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षात अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे 'एक भीषण संघर्ष उफाळून येईल,' असं रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव्ह यांनी म्हटलं आहे.
मध्य-पूर्वेतील आताच्या संघर्षात अमेरिका आणि रशिया अनुक्रमे इस्रायल आणि इराणला पाठिंबा देत आहेत.
याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणकडून बिनशर्त शरणागतीची मागणी केली आहे. तसंच वेळ आली तर इराणवर हल्ला करण्याचा विचार देखील सुरू असल्याचे म्हटले जात आहे.
दुसरीकडे, रशिया इराणला एक महत्त्वाचा मित्र देश मानतो. इराणने रशियाला शाहेद ड्रोनही पुरवले आहेत, ज्यांनी युक्रेनविरुद्धच्या युद्धात महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
इस्रायलला लष्करी मदत देऊ नये, असं रशियाने अमेरिकेला आवाहन केलं आहे.
इस्रायल आणि इराणमधील संघर्षामुळे रशिया आणि अमेरिका यांच्यातही तणाव दिसून येत आहे.
दरम्यान, इस्रायलविरुद्ध सुरू असलेल्या युद्धात, इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांनी त्यांच्या जनतेला उद्देशून एक संदेश दिला आहे.
"जर शत्रूला कळलं की तुम्ही त्यांना घाबरत आहात, तर ते तुम्हाला सोडणार नाहीत," असं खामेनी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलं आहे.
"आजपर्यंत तुम्ही जसं ताकदीने वागलात तसेच पुढेही वागा," असं खामेनी यांनी जनतेला सांगितलं.
इराणचे उप-परराष्ट्रमंत्री सईद खतीबजादेह यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, इराण अमेरिकेसोबत आण्विक कराराच्या उंबरठ्यावर होता. पण त्याआधीच इस्रायलने हल्ला सुरू केला आहे.
इराणने रविवारी 15 जून रोजी अमेरिकेसोबतच्या चर्चा रद्द केल्या होत्या. त्यानंतर आम्ही इस्रायलच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देणार अशी भूमिका घेतली होती.
'इराणने इस्रायलच्या रुग्णालयावर हल्ला केला'
याआधी बुधवारी (18 जून) इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्रायलच्या एका रुग्णालयाचे नुकसान झाले असून अनेक लोक जखमी झाले आहेत.
इराणने रुग्णालयावर थेट निशाणा साधत हल्ला केल्याचा इस्रायलचा आरोप आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी 'एक्स'वर पोस्ट करत म्हटलं आहे की, "आज सकाळी इराणच्या दहशतवादी हुकूमशहांनी बेर्शेबा येथील सोरोका रुग्णालयावर आणि सामान्य नागरिकांवर क्षेपणास्त्रे डागली."
नेतन्याहू यांनी म्हटलं, "इराणच्या हुकूमशहांना याची पूर्ण किंमत मोजावी लागेल."
इस्रायलची आपत्कालीन सेवा संस्था मॅगन डेव्हिड एडोम (एमडीए)नुसार इराणच्या या हल्ल्यामध्ये किमान 32 लोक जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
एका इस्रायली लष्करी अधिकाऱ्याने सांगितले की, इराणने आपल्या नुकत्याच केलेल्या हल्ल्यात इस्रायलवर डझनभर क्षेपणास्त्रे डागली.
इस्रायलचा आरोप आहे की, इराणने नागरी क्षेत्रांना लक्ष्य केले, ज्यामध्ये दक्षिण इस्रायलमधील बेर्शेबामधील सोरोका रुग्णालयाचा समावेश आहे.
इराणने काय स्पष्टीकरण दिलं?
इराणच्या सरकारी मिडियानुसार, त्यांच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात इस्रायलमधील बेर्शेबा येथील सोरोका हॉस्पिटल हे लक्ष्य नव्हतं.
खरा उद्देश हॉस्पिटलजवळ असलेली इस्रायली लष्कराची दोन महत्त्वाची ठिकाणं होती, असा इराणने दावा केला आहे.
इस्लामिक रिपब्लिक न्यूज एजन्सी (IRNA) च्या रिपोर्टनुसार, इराणचा हल्ला हा इस्रायली लष्कराच्या कमांड मुख्यालयावर आणि टेक्नॉलॉजी पार्कमधील एक गुप्त लष्करी तळावर केंद्रित होता.
आमचं लक्ष्य फक्त लष्करी ठिकाणं होती आणि त्यावर अचूक निशाणा होता. तर कंपनामुळे हॉस्पिटलला धक्का पोहोटल्याचं, इराणने सांगितलं आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांनी खरंच इराणवर हल्ला करण्यास मंजुरी दिली आहे का?
बीबीसीची अमेरिकेतील सहयोगी सीबीएसच्या वृत्तानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी (17 जून) रात्री इराणवर हल्ला करण्याच्या योजनेला मान्यता दिली आहे. मात्र, इराणवर हल्ला करायचा की नाही, याबद्दल ट्रम्प यांनी अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही.
एका वरिष्ठ गुप्तचर सूत्राने सीबीएसला सांगितलं की, जर इराणनं अणुकार्यक्रम रद्द करण्यास सहमती दर्शविली तर ट्रम्प हल्ल्याची योजना स्थगित करू शकतात.
वॉल स्ट्रीट जर्नलननं सर्वात आधी याबाबतचं वृत्त दिलं होतं.
बुधवारी (18 जून) ट्रम्प यांना इराणमध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपाबद्दल विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्यांनी "मी तसं करू शकतो, किंवा मी तसं नाहीही करणार" असं म्हटलं होतं.
इस्रायलने 13 जून रोजी इराणच्या 'अणु कार्यक्रमाशी' संबंधित ठिकाणांवर हल्ला केला. त्यानंतर इराणनंही प्रत्युत्तर म्हणून इस्रायलवर हल्ला केला. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संघर्ष सुरूच आहे.
दरम्यान, गुरुवारी पहाटे 110 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पहिलं विमान दिल्लीला पोहोचलं.
डोनाल्ड ट्रम्प G-7 परिषदेतून लवकर निघाले होते. कॅनडातून परतताना त्यांनी फक्त एवढंच म्हटलं की, काही 'महत्त्वाच्या कारणां'मुळे वॉशिंग्टनला परतत आहे.
व्हाईट हाऊसनं मात्र, "ट्रम्प यांच्या लवकर निघून येण्याचा संबंध मध्यपूर्वेत काय घडतं आहे याच्याशी आहे," असं म्हटलं तर नंतर 'ट्रूथ सोशल' या सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांनी म्हटलं की, "G 7 मधून लवकर परतण्याचा इस्रायल-इराणमधील शस्त्रसंधीशी काहीही संबंध नाही."
यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं होतं की, इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांबाबत अमेरिकेसोबत 'पूर्ण समन्वय साधण्यात' आला होता.
संघर्षाबद्दल ट्रम्प यांचा दृष्टिकोन कसा बदलला?
न्यू यॉर्क टाईम्सच्या वृत्तानुसार, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी सातत्यानं ट्रम्प यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळंच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या भूमिकेत बदल झाला असल्याचं म्हटलं जात आहे.
इस्रायलनं केलेल्या पहिल्या हल्ल्यात इराणचे वरिष्ठ लष्करी कमांडर मारले गेले. या हल्ल्याच्या यशामुळं ट्रम्प यांचा विश्वास वाढला आणि त्यामुळं युद्धाबाबतचा त्यांचा आत्मविश्वास वाढला, असंही या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.
ट्रम्प यांनी बुधवारी संध्याकाळी म्हटलं होतं की, "पहिल्या रात्री आणि दिवसाही झालेला हल्ला हा त्यांच्यासाठी (इराण) धक्कादायक आणि विनाशकारी होता."
नेतन्याहू यांची योजना यशस्वी होऊ शकते या विश्वासामुळं ट्रम्प यांचा युद्धाच्या समर्थनात असलेल्या गटाकडे ओढा वाढत आहे. कारण, गेल्या काही वक्तव्यांमधून त्यांचा युद्धाच्या दिशेनं पावलं टाकण्याचा वेग वाढल्याचंही जाणवत आहे.
"चर्चेला खूप उशीर झाला आहे. इराणणं पहिल्या 60 दिवसांत ऑफर स्वीकारायला हवी होती," असं ट्रम्प बैठकीच्या सुरुवातीच्या काही मिनिटांतच म्हटलं होतं.
पण तरीही त्यांनी शक्यता नाकारली नाही. अशा परिस्थितीत शेवटच्या क्षणापर्यंत गोष्टी बदलू शकतात, असं ट्रम्प म्हणाले आहेत.
'रात्री मोठ्या आवाजाची भीती वाटायची'- इराणमधून परतलेल्या भारतीय विद्यार्थ्यांचे अनुभव
इराणमधून सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलेल्या 110 भारतीय विद्यार्थ्यांना घेऊन पहिलं विमान गुरूवारी (19 जून) पहाटे दिल्लीला पोहोचलं आहे.
या विमानातून परतलेले विद्यार्थी यासिर गफ्फार यांनी ANI या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले, "मी तिथं खूप काही पाहिलं... क्षेपणास्त्र हल्ले पाहिले... रात्री मोठ्या आवाजांची भीती वाटायची. पण आता भारतात येऊन खूप आनंद झाला आहे. परिस्थिती सुधारल्यावर आम्ही पुन्हा इराणला जाऊ."
गझल नावाच्या विद्यार्थिनीने म्हटलं की, "परत आल्यावर खूप चांगलं वाटतंय. भारतीय दूतावासानं आम्हाला खूप चांगल्या प्रकारे बाहेर काढलं. आम्ही त्यांचे फार ऋणी आहोत. तेहरानमधील परिस्थिती खूपच खराब होती, पण जिथं आम्ही राहत होतो, त्या उर्मियामध्ये इतर शहरांच्या तुलनेत परिस्थिती थोडी बरी होती."
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी 'ऑपरेशन सिंधू' सुरू करण्यात आले आहे.
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी 18 जूनला सांगितले होते की, इराणच्या उत्तरेकडील भागातून 17 जूनला 110 विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांना आर्मेनिया येथे नेण्यात आलं आणि तिथून त्यांना विशेष विमानाद्वारे दिल्ली येथे आणण्यात आलं.
इराणच्या सरकारी टीव्हीचा प्रेक्षकांना इशारा; 'हॅक' झाल्याचा दावा
इराणच्या सरकारी टीव्हीने आपल्या प्रेक्षकांना एका व्हिडिओ क्लिपबद्दल इशारा दिला आहे. या क्लिपमध्ये इराणमधील लोकांनी सरकारविरोधात 'उठाव' करावा असं आवाहन करण्यात आलं आहे.
इराणच्या सरकारी टीव्हीने म्हटले आहे, "जर तुम्हाला टीव्हीवर काही विचित्र संदेश दिसले, तर ते शत्रूच्या सॅटेलाईट सिग्नल जॅमिंगमुळे आहे."
ज्या व्हिडिओबद्दल इशारा देण्यात आला आहे, तो सोशल मीडियावरही अनेक युजर्सनी शेअर केला आहे.
त्या व्हिडिओमध्ये इराणी सरकारवर लोकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप करण्यात आला आहे. लोकांना त्यांच्या भविष्यासाठी पावलं उचलण्याची विनंती केली आहे.
हा व्हिडिओ आणि कथित हॅकिंग कुठून झाले हे उद्याप स्पष्ट झालं नाही.
व्हिडिओ क्लिपच्या वरच्या-उजव्या कोपऱ्यात सिंहाचे चिन्ह दिसत आहे आणि त्यामध्ये वरिष्ठ इराणी कमांडर्सचे फोटोही दाखवले गेले आहेत, ज्यांचा मृत्यू 13 जून रोजी इस्रायलने इराणविरोधात केलेल्या 'ऑपरेशन रायझिंग लायन' दरम्यान झाला होता.
या व्हिडिओमध्ये 2022 मध्ये इराणमध्ये सुरू झालेल्या निदर्शनांच्या अनेक क्लिप्सही दाखवण्यात आल्या आहेत, ज्या पोलीस कोठडीत एका महिलेच्या मृत्यूनंतर सुरू झाल्या होत्या.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.