You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'खामेनी सोपं टार्गेट, पण आता मारणार नाही' म्हणणारे ट्रम्प पुढे काय करतील? 'या' 4 शक्यता
- Author, टॉम बेटमॅन
- Role, बीबीसी प्रतिनिधी, अमेरिकेहून
इस्रायल-इराण संघर्षाबाबत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भूमिका सतत बदलताना दिसत आहे. त्यांनी इस्रायलच्या हल्ल्यांपासून स्वत: दूर ठेवण्यापासून ते हल्ल्यांना पूर्ण पाठिंबा देण्यापर्यंतची वेगवेगळी वक्तव्यं केली आहेत.
पश्चिम आशियातल्या या संघर्षाबद्दलच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या भूमिकेत आधीच अस्पष्टता असताना, आता ते कॅनडात होत असलेल्या G-7 परिषदेतून लवकर निघाले.
कॅनडातून परतताना त्यांनी फक्त एवढंच म्हटलं आहे की, काही 'महत्त्वाच्या कारणां'मुळे वॉशिंग्टनला परतत आहे.
व्हाईट हाऊसनं मात्र याबाबत म्हटलं आहे की, "ट्रम्प यांच्या लवकर निघून येण्याचा संबंध मध्यपूर्वेत काय घडतं आहे याच्याशी आहे." मात्र, नंतर 'ट्रूथ सोशल' या सोशल मीडियावर पोस्ट करत ट्रम्प यांनी म्हटलं की, "G 7 मधून लवकर परतण्याचा इस्रायल-इराणमधील शस्त्रसंधीशी काहीही संबंध नाही."
यापूर्वी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी म्हटलं होतं की, इराणवर करण्यात आलेल्या हल्ल्यांबाबत अमेरिकेसोबत 'पूर्ण समन्वय साधण्यात' आला होता.
मग डोनाल्ड ट्रम्प यांना कोणत्या गोष्टींची चिंता वाटते आहे? आणि महत्त्वाचं म्हणजे, आता त्यांच्यासमोर कोणते पर्याय आहेत?
खामेनींबद्दल ट्रम्प काय म्हणाले?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'ट्रुथ सोशल'वर इराणबाबत अनेक पोस्ट केल्या आहेत. नुकत्याच केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे – 'बिनशर्त शरणागती.'
ट्रम्प यांनी दुसऱ्या एका पोस्टमध्ये लिहिले आहे की, "इराणचे 'सर्वोच्च नेते' कुठे आहेत हे आम्हाला माहिती आहे. पण आम्ही आताच त्यांना मारणार नाही."
ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर लिहिले, "आम्हाला अचूक माहिती आहे की तथाकथित 'सर्वोच्च नेते' कुठे लपलेले आहेत. तिथपर्यंत पोहोचणं सोपे लक्ष्य आहे, पण सध्या तरी तिथे सुरक्षित आहेत."
त्यांनी पुढं म्हटलं आहे की, "आम्ही त्यांना इतक्यात मार्गातून दूर करणार नाही (मारणे या अर्थाने), किमान सध्या तरी नाही. पण सामान्य नागरिकांवर किंवा अमेरिकन सैनिकांवर क्षेपणास्त्रे डागल्याचंही आम्ही पाहू इच्छित नाही. आमचा संयम आता संपत चालला आहे."
या पोस्टच्या काही मिनिटांपूर्वीच ट्रम्प यांनी म्हटले होते की, "आता इराणच्या हवाई क्षेत्रावर आमचा पूर्ण ताबा आहे."
त्यांनी म्हटलं, "इराणकडे चांगले स्काय ट्रॅकर्स आणि इतर संरक्षण उपकरणं होती आणि मोठ्या प्रमाणात होती. पण अमेरिकेत डिझाइन केलेल्या, निर्माण केलेल्या उपकरणांशी त्यांची तुलना होऊच शकत नाही. अमेरिकेपेक्षा चांगल्या पद्धतीने कोणताही देश हे करू शकत नाही."
1. इराणबरोबरचा संघर्ष वाढवणं
12 जून 2025 रोजी इस्रायलनं इराणची राजधानी तेहरानवर क्षेपणास्त्रांनी हल्ला केला. तेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणच्या नेत्यांना इशारा दिला की, इस्रायलकडून 'आणखी क्रूर हल्ले' होतील.
नेतन्याहूंप्रमाणेच डोनाल्ड ट्रम्प यांचं म्हणणं आहे की, इराणनं अणुबॉम्ब बनवता कामा नये.
यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, हे साध्य करण्याचा ट्रम्प यांचा पसंतीचा पर्याय असा आहे की, अमेरिका आणि इराणमध्ये करार घडवून आणणं. (या पर्यायातून 'जागतिक दर्जाचा करार घडवणारा' ही ट्रम्प यांनी स्वत:बद्दल तयार केलेली प्रतिमादेखील दिसून येते.)
मात्र, हे कसं साध्य करायचं? याबद्दल ट्रम्प नेमकं काय करू इच्छितात? याबद्दलची त्यांची वेगवेगळी वक्तव्यं गोंधळात टाकणारी, संभ्रम निर्माण करणारी दिसून आली आहेत.
कधीकधी ते बळाच्या वापराची धमकी देतात, तर कधी ते राजनयिक कारवाईचा वापर करतात.
गेल्या आठवड्यात ते याच पद्धतीनं असंही म्हणाले होते की, इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे अमेरिका आणि इराणमधील करार होण्यास मदत होईल.
ट्रम्प यांच्या या अनिश्चिततेचं चित्रण, त्यांच्या समर्थकांकडून कधीकधी तथाकथित 'मॅडमॅनचा परराष्ट्र धोरणाचा सिद्धांत' असं केलं जातं. पूर्वी हा सिद्धांत ट्रम्प यांच्या वाटाघाटी करण्याच्या डावपेचांचं वर्णन करण्यासाठी वापरला गेला आहे.
हा सिद्धांत असं सूचित करतो की, वाढत्या तणावाबद्दल जाणूनबुजून अनिश्चितता निर्माण केल्यास किंवा त्यासंदर्भात अंदाज येऊ न दिल्यास विरोधक किंवा शत्रूला (किंवा ट्रम्प यांच्या बाबतीत त्यांच्या मित्रांनादेखील) शरण येण्यास भाग पाडलं जातं.
या प्रकारच्या डावपेचाचं श्रेय अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांच्या शीतयुद्धाच्या काळातील पद्धतींना दिलं जातं.
डोनाल्ड ट्रम्प यांचे काही सल्लागार आणि समर्थक इराणसंदर्भातील त्यांच्या भूमिकेच्या बाबतीत मॅडमॅन सिद्धांतानुसार 'जास्तीत जास्त दबाव' आणण्याचं समर्थन करतात.
त्यांना वाटतं की, शेवटी याप्रकारचा दबाव किंवा धमक्यांचीच सरशी होईल. इराण वाटाघाटी करण्याबाबत गंभीर नसल्यामुळे या मार्गाचा अवलंब करावा लागत असल्याचा त्यांचा युक्तिवाद आहे.
(2015 मध्ये इराणनं ओबामा यांच्या नेतृत्वाखालील अणुकरारावर सही केली होती आणि नंतर ट्रम्प सत्तेत आल्यावर त्यांनी या करारातून माघार घेतली होती. तरीही ट्रम्प समर्थकांना वाटतं की, इराण गंभीर नाही.)
इराणच्या बाबतीत डोनाल्ड ट्रम्प यांनी राजनयिक नाही तर लष्करी मार्ग अवलंबवावा, यासाठी इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी ट्रम्प यांच्यावर सातत्यानं दबाव आणला आहे.
डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार मिळवण्याची इच्छा आहे. मात्र, तरीदेखील ट्रम्प यांना शेवटी इराणच्या नेतृत्वाला युद्धाबाबतच्या अधिक धमक्या देण्याची आवश्यकता भासू शकते.
कदाचित हे उद्दिष्टं पूर्ण करण्यासाठी इस्रायलला अमेरिकेच्या पडद्यामागील सहभागासाठी अधिक प्रयत्न करावे लागतील. अमेरिकेकडे 'बंकर बस्टर बॉम्ब' आहेत. हे बॉम्ब जमिनीखाली असलेल्या लक्ष्यावर हल्ला करू शकतात.
फोर्डोमध्ये इराणचं युरेनियम शुद्धीकरण करण्याचं केंद्र आहे. ते जमिनीखाली कित्येक मीटर खोल आहे. इस्रायलला वाटतं की, अमेरिकेचे हे बॉम्ब इराणचं ते जमिनीखालील अणुकेंद्र नष्ट करू शकतात.
इस्रायल-इराणमधील संघर्ष जसजसा वाढत चालला आहे, तसतसा अमेरिकेच्या संसदेतील कट्टर रिपब्लिकन गटाकडून ट्रम्प यांच्यावरील दबाव वाढत चालला आहे. हा गट प्रदीर्घ काळापासून इराणमध्ये राजवट बदलण्याची मागणी करतो आहे.
ट्रम्प हा युक्तिवाद देखील लक्षात घेऊ शकतात की, आता इराणला कमकुवत पातळीवरून त्यांच्याशी वाटाघाटी करायला भाग पाडलं जाऊ शकतं. मात्र, वस्तुस्थिती अशी आहे की इराण आधीच अमेरिकेबरोबर वाटाघाटी करत होता.
रविवारी (15 जून) ओमानमध्ये अमेरिका-इराण चर्चेची सहावी फेरी आयोजित करण्यात आली होती. ट्रम्प यांचे दूत स्टीव्ह विटकॉफ यांच्याबरोबर ही चर्चा होणार होती.
मात्र, त्याआधीच इस्रायलनं इराणवर हल्ला केल्यामुळे ही चर्चा रद्द करण्यात आली.
2. मध्यममार्गानं पुढे जात राहणं
आतापर्यंत ट्रम्प यांनी सांगितलं आहे की, इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्यामध्ये अमेरिकेचा सहभाग नाही.
इस्रायल-इराणमधील वाढत्या संघर्षामुळे ट्रम्प यांच्यासमोर लक्षणीय आणि संभाव्य धोके निर्माण झाले आहेत.
अमेरिकन नौदलाच्या युद्धनौका आणि जमिनीवरून मारा करणारी क्षेपणास्त्र यंत्रणा आधीच इराणकडून दिल्या जाणाऱ्या प्रत्युतरापासून इस्रायलचं संरक्षण करण्यासाठी मदत करत आहेत.
राष्ट्रीय सुरक्षा परिषदेतील ट्रम्प यांचे काही सल्लागार 'पुढच्या काही दिवसांमध्ये इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यांवरील तीव्रता वाढेल असं काहीही करू नये' अशी सूचना देण्याची शक्यता आहे.
जेव्हा इराणची काही क्षेपणास्त्रं, इस्रायल आणि अमेरिकेच्या हवाई संरक्षण प्रणालीला भेदून घातक परिणाम करत असताना याची तीव्रता आणखी वाढू नये यासाठी ते ट्रम्प यांना सूचना देऊ शकतात.
नेतन्याहू आता युक्तिवाद करत आहेत की, इराणचे सर्वोच्च नेते अली खामेनी यांना लक्ष्य केल्यामुळे हा संघर्ष वाढणार नाही तर संपुष्टात येईल.
मात्र, एका अमेरिकन अधिकाऱ्यानं ओळख उघड न करता सांगितलं, की अशा प्रकारच्या कारवाईला विरोध असल्याचं ट्रम्प यांनी स्पष्ट केलं आहे.
3. 'मागा' धोरणाला पाठिंबा देणाऱ्यांचं ऐकून मागे हटणं
डोनाल्ड ट्रम्प यांच्या मनावर प्रभाव पाडणारा एक मोठा राजकीय घटक म्हणजे अमेरिकेत त्यांना असलेला पाठिंबा.
अमेरिकेच्या संसदेतील बहुतांश रिपब्लिकन अजूनही इस्रायलला ठाम पाठिंबा देत आहेत. यात अमेरिकेकडून इस्रायलला शस्त्रास्त्रांचा पुरवठा सुरू ठेवण्याचाही समावेश आहे. अनेकांनी इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्याला पाठिंबा दिला आहे.
मात्र, ट्रम्प यांच्या 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' (मागा) या धोरणातील काही प्रमुख जण आता अमेरिकेकडून इस्रायलला पारंपारिकरित्या मिळणाऱ्या 'भक्कम' पाठिंब्याला पूर्णपणे नकार देतात.
गेल्या काही दिवसांपासून ते प्रश्न विचारत आहेत की, ट्रम्प यांनी 'अमेरिका फर्स्ट' परराष्ट्र धोरणाचं आश्वासन दिलेलं असताना अमेरिका मध्य पूर्वेतील युद्धात का ओढली जाते आहे.
टकर कार्लसन हे ट्रम्प समर्थक पत्रकार आहेत. त्यांनी शुक्रवारी (13 जून) कडक टीका करत लिहिलं आहे की, अमेरिकन सरकारचे या संघर्षात सहभाग नसल्याचे दावे खरे नाहीत आणि अमेरिकेनं 'इस्रायलची बाजू घेणं थांबवलं' पाहिजे.
त्यांनी सुचवलं की, नेतन्याहू आणि त्यांचं युद्धखोर सरकार अशा प्रकारे वागत आहेत की त्यामुळे त्यांच्या वतीनं लढण्यासाठी अमेरिकन सैन्य या संघर्षात ओढलं जाईल.
कार्लसन यांनी लिहिलं आहे, "या संघर्षात सहभागी होणं, हे लाखो मतदारांचा विश्वासघात करण्यासारखं असेल. या मतदारांनी अमेरिकेला पहिलं प्राधान्य देणारं सरकार निर्माण करण्याच्या आशेनं मतदान केलं होतं."
त्याचप्रमाणे, ट्रम्प यांचे कट्टर निष्ठावंत, अमेरिकन प्रतिनिधी मार्जोरी टेलर ग्रीन यांनी 'एक्स' या सोशल मीडियावर पोस्ट केलं आहे की, "इस्रायल-इराण युद्धात अमेरिकेनं पूर्णपणे सहभागी व्हावं यासाठी जो कोणी बोलतो आहे, तो अमेरिका फर्स्ट/मागा धोरणाचा पाठीराखा नाही."
यातून ट्रम्प यांच्यासाठी मोठी असुरक्षितता दिसून येते.
या परिस्थितीमुळे इस्रायलकडून होणारे हल्ले आणि अमेरिका यांच्यात अंतर ठेवण्यासाठी ट्रम्प यांच्यावरील दबाव वाढतो. किमान सार्वजनिकरित्या तरी त्यांनी याला प्रतिसाद दिल्याची चिन्हं आहेत.
आठवड्याच्या शेवटी, 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' (मागा) मुद्द्यावरून वादविवाद झाला त्याचवेळेस ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केलं की, इस्रायल-इराण युद्ध संपवावं, या रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केलेल्या आवाहनाशी ते सहमत झाले आहेत.
रविवारी (15 जून) त्यांनी म्हटलं की, इराण आणि इस्रायलनं समझोता करावा. त्यांनी पुढे म्हटलं की, इस्रायलनं इराणवर केलेल्या हल्ल्याशी अमेरिकेचा काहीही संबंध नव्हता.
आखातातील अमेरिकेच्या तळांवर अमेरिकन लोकांचीही कोणतीही जीवितहानी होण्याच्या धोक्यामुळे 'मेक अमेरिका ग्रेट अगेन' (मागा) धोरणाला पाठिंबा मिळण्यात वेगानं वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर या संघर्षातून मागे हटण्याचा दबाव वाढण्याची शक्यता आहे. तसंच, नेतन्याहू यांच्यावरदेखील हा संघर्ष वेगानं संपवण्याचा दबाव वाढण्याची शक्यता आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)