नागपुरात शिफ्टिंग करताना घरातील सामानासोबत गांजा तस्करी, पॅकर्स अँड मूव्हर्स बूक करताना काय काळजी घ्यावी?

    • Author, भाग्यश्री राऊत
    • Role, बीबीसी मराठीसाठी

तुमची दुसऱ्या शहरात बदली झाली आणि तुम्ही पॅकर्स - मूव्हर्सचं काम करणाऱ्या ट्रान्सपोर्टकडून घरगुती सामान त्या शहरात पाठवलं.

पण, तुमचं सामान वेळेत घरी पोहोचलंच तर नाही, उलट तुमच्या सामानातून गांजाची वाहतूक झाल्याची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचली तर काय होईल?

ही काही काल्पनिक घटना नाही. तर नागपुरात असा प्रकार घडला आहे. य घटनेत तब्बल 108 किलो गांजा पोलिसांनी जप्त केला आहे.

या घटनेत नेमकं काय घडलं? पोलिसांनी तस्कारी करणाऱ्या ओडिशातील गांजा माफियाला कसं पकडलं? आणि अशा ट्रान्सपोर्टकडून सामान पाठवताना नेमकी काय काळजी घ्यावी? याबद्दल जाणून घेऊयात.

काही दिवसांपूर्वी ओडिशातील एका बँक मॅनेजरची नागपुरात बदली झाली. त्यांनी त्यांचं घरगुती सामान नागपुरात पोहोचवण्याचं काम एका पॅकर्स आणि मूव्हर्सला दिलं.

ओडिशातील संबंधित गावातून नागपुरात अशाप्रकारे सामान पोहोचण्यासाठी जवळपास 12 तास लागतात.

पण, 24 तास उलटूनही सामानाचा हा ट्रक नागपुरात पोहोचला नव्हता.

त्याचं कारण म्हणजे, हा ट्रक ठरवून दिलेला रस्ता चुकवून गांजाची तस्करी करण्यासाठी दुसरीकडेच गेला.

400 किलोमीटवर असलेल्या संबलपूर जिल्ह्यातील रेराखोल गावात हा ट्रक पोहोचला होता. तिथून गांजा घेऊन हा ट्रक नागपुरात आला.

पोलिसांनी तस्काराला कसं पकडलं?

कळमना पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोषकुमार रामलोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलपूरवरून ट्रकमध्ये गांजा येत असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती.

त्यानुसार नागपूर पोलिसांनी दोन पथकं तयार केली. एका पथकानं कळमना चौकात नाकाबंदी केली, तर दुसरं पथक गस्तीवर होतं.

पण, 24 तास उलटूनही हा ट्रक आला नाही. त्यामुळं पोलिसांनी आणखी तपास सुरू केला. तेव्हा चिखली चौकात घरगुती सामानानं भरलेल्या एका ट्रकमधून दुसऱ्या गाडीत गांजा टाकण्याचं काम सुरू असल्याचं समजलं.

ट्रक चालक अविनाश ढोके यानं घरगुती सामानाच्या नावाखाली ओडिशा ते नागपूरपर्यंतचे सर्व टोलनाके आणि नाकाबंदी चुकवून नागपूरपर्यंत गांजा पोहोचवला होता.

पोलिसांनी त्या ट्रकचा चालक अविनाश ढोके आणि त्याच्याकडून गांजा घेणारा पलाश वानखेडे अशा दोघांना ताब्यात घेतलं.

पलाश वानखेडे याच्यावर याआधी कुठलेही गुन्हे दाखल नाहीत. मित्रांनी गांजा विक्रीची माहिती दिली त्यानुसार त्यानेही गांजा मागवला होता, असी माहिती समोर आली आहे.

त्यानं याआधीही अशाच पद्धतीनं गांजा मागवला होता का? याची चौकशी पोलीस करत आहेत.

पोलिसांनी 27 लाख रुपयांचा 108 किलो गांजा जप्त केला असून त्यासोबत ट्रकसुद्धा जप्त केला आहे.

या गांजा तस्करीमध्ये फक्त ट्रक चालक अविनाश ढोके आणि गांजा विकत घेणारी व्यक्ती पलाश वानखेडे यांच्यासह मुख्य आरोपी हा ओडिशातीलही आहे.

ओडिशातील ड्रग्स माफियाला कसं पकडलं?

पोलिसांनी 108 किलो गांजा पकडल्यानंतर या प्रकरणात आरोपीचा मोबाईल आणि कॉल रेकॉर्ड तपासले.

यामध्ये ओडिशातील बुलबुल प्रधान उर्फ व्हाट्सअप भाईसोबत वारंवार संपर्क झाल्याचं दिसलं.

त्यानुसार पोलिसांनी बुलबुल प्रधानचा मोबाईल नंबर ट्रेस केला तर तो ओडिशातील संबलपूरमधील रेराखोल गावात असल्याचं समजलं.

त्यानंतर नागपूर पोलिसांची एक टीम त्या गावात पोहोचली. तोपर्यंत बुलबुल प्रधानने त्याचा मोबाईल बंद केला होता. पण, पोलिसांनी त्याचा दुसरा नंबर शोधून त्या नंबरवरून त्याचं लोकेशन ट्रेस केलं आणि सापळा रचला.

बुलबुल प्रधान या सापळ्यात अडकला आणि नागपूर पोलिसांच्या हाती लागला. त्याला अटक करून नागपूरला आणण्यात आलं.

बुलबुल प्रधान याच्या कुटुंबातील सदस्यही गांजा तस्कारीचा व्यवसाय करत असून त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. तो गांजा तस्कारीतला मोठा माफिया असल्याचं रामलोड यांनी सांगितलं.

गांजा तस्कारीसाठी सामान्य माणसांच्या घरगुती सामानांचा वापर करण्याची ही मोडस ऑपरेंडी धक्कादायक असल्याचंही, रामलोड म्हणाले.

यामुळे सामान्य माणसांना त्रास होतो. इतर राज्यातही याच मार्गानं गांजा तस्करी होत होती का? आणि याआधी नागपुरातही अशाप्रकारे गांजा आणलाय का? याची चौकशी पोलीस सध्या करत आहे.

तिन्ही आरोपींना 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

पॅकर्स अँड मूव्हर्स बूक करताना अशी घ्या काळजी?

माल वाहतूक करणाऱ्या कंपनीवर विश्वास ठेवून ग्राहक एका शहरातून दुसऱ्या शहरात सामान पाठवतात. पण त्यातून अशी तस्करी होईल याची कल्पनाही नसते.

अशावेळी घरगुती किंवा इतर कुठलंही सामान एका शहरातून दुसऱ्या शहरात पाठवण्यासाठी ट्रान्सपोर्ट बूक करताना काही काळजी घ्यायला पाहिजे, असं रामलोड यांनी सांगितलं.

त्यानुसार आपण सामान पाठवताना ट्रान्सपोर्टची पूर्ण चौकशी करावी. सामान वाहनात भरल्यानंतर त्याचं पॅकेजिंग झाल्यानंतर सीलबंद केलं जातं. ट्रकलाही सील लावलं जातं. हे सील तपासायला हवं.

सीलबंद करून सामानाची वाहतूक करणारे ट्रान्सपोर्ट बूक करावे. काही ट्रान्सपोर्ट फक्त ताडपत्री बांधतात आणि सामनाची वाहतूक करतात. त्यांच्यावर विश्वास ठेवू नये. यामधून तस्करी होऊ शकते, असंही रामलोड यांनी सांगितलं.

तसेच ठरलेल्या वेळेत सामान पोहोचत नसेल तर ट्रान्सपोर्टला लगेचच संपर्क करायला हवा.

ट्रान्सपोर्ट मालकांनीही ठरलेल्या वेळेत सामन पोहोचत नसेल तर आपला ट्रक नेमका कुठे आहे? त्यासाठी ट्रॅकर लावायला पाहिजे.

फास्टटॅगचे मेसेज येतात त्यावर लक्ष ठेवायला हवं. त्यामुळे आपला ट्रक कुठल्या मार्गानं जातो, कुठे थांबला आहे, हे लक्षात येईल, असंही रामलोड म्हणाले.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.