ड्रग्ज जप्तः दिल्लीच्या दुकानातली फरसाणची पाकिटं ते गुजरातच्या कंपन्या असं पसरलंय जाळं

    • Author, दिलनवाज पाशा
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने आणि गुजरात पोलिसांनी एका संयुक्त अभियानात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज साठा जप्त केला असून या सर्व ड्रग्जची एकत्रित किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 13,000 कोटी रुपये आहे असं पोलिसांनी म्हटलं.

भरुच जिल्ह्यातील अंकलेश्वरमधून 518 किलो हेरॉइन जप्त केलं आहे, आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत पाच हजार कोटी रुपये आहे.

गुजरात पोलीस आणि दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने यासंबंधी एक निवेदन जारी केलं आहे. हे ड्रग्ज अंकलेश्वरच्या एका फार्मा कंपनीतून जप्त केले आहे. त्यात पाच लोकांना अटक करण्यात आली आहे.

गेल्या दोन आठवड्यात दिल्ली पोलीस, आणि गुजरात पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी करत मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 1289 किलो हेरॉइन आणि उच्चप्रतीचा 40 किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला आहे.

पोलिसांच्या मते आंतरराष्ट्रीय बाजारात या एकूण ड्रग्जची किंमत 13 हजार कोटींच्या आसपास आहे.

याआधी गुरुवारी संध्याकाळी (10 ऑक्टोबर) दिल्ली पोलिसांनी पश्चिम दिल्लीतील रमेश नगर भागातल्या एका दुकानात फरसाणाच्या पाकिटांमध्ये ठेवलेलं 208 किलो कोकेन जप्त केलं होतं. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारात किंमत दोन हजार कोटी आहे.

दिल्ली पोलिसांच्या मते, हे ड्रग्ज रमेश नगरमधल्या एका चिंचोळ्या गल्लीत असलेल्या एका दुकानात वीस पाकिटांमध्ये हे ड्रग्ज ठेवले होते आणि ते पुढे एका ठिकाणी पोहोचवले जाणार होते.

एक ऑक्टोबरला दिल्ली पोलिसांनी महिपालपूर मध्ये एका वेअर हाऊसमधून 562 किलो हेरॉइन आणि 40 किलो हायड्रोपोनिक ड्रग्ज जप्त केलं होतं.

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेच्या एका अधिकाऱ्याने बीबीसीला सांगितलं, “एक ऑक्टोबर आणि 10 ऑक्टोबरला दिल्लीच्या वेगवेगळ्या भागातून जे ड्रग्ज जप्त केलेत ते एका ड्रग्ज रॅकेटशी संबंधित आहेत. गुजरातेतील भरूचमध्ये जप्त केलेले ड्रग्ज सुद्धा या रॅकेटशी संबंधित आहेत.”

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी अनेकांना अटकही केली आहे. पोलिसांच्या मते ज्या वेअरहाऊसमध्ये ड्रग्ज जप्त केले ते तुषार गोयल नावाच्या एका व्यक्तीचं आहे.

आतापर्यंत तपासात जितक्या व्यक्तींना अटक केली त्यात तुषार गोयल सर्वांत मोठा ड्रग्ज वितरक आहे अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

गुजरात पोलिसांनीही केली कारवाई

तर दुसऱ्या बाजूला गुजरात पोलिसांच्या नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या सहाय्याने भोपाळच्या एक कारखान्यातून 5 ऑक्टोबरला 907 किलो मेफेड्रोन (एमडी) हे ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्याची किंमत आंतरराष्ट्रीय बाजारात 1814 कोटी आहे. ही कारवाई दिल्ली पोलिसांच्या ड्रग्ज विरोधी कारवायांपेक्षा वेगळी आहे.

या धाडसत्रात पाच हजार किलो कच्चा माल जप्त केल्याची माहिती गुजरात पोलिसांनी दिली आहे.

गुजरात पोलिसांच्या एटीएस आणि एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) च्या टीमने एका मोठं अभियान राबवल्यानंतर ही कारवाई केली होती.

हे ड्रग्ज भोपाळ येथील बागरोडा इंडस्ट्रियल इस्टेटमध्ये असलेल्या एका कारखान्यातून जप्त करण्यात आले होते.

या छापेमारीदरम्यान पोलिसांनी 57 वर्षीय प्रकाशचंद्र चतुर्वेदी आणि 40 वर्षीय सन्याल प्रकाश यांना अटक केली होती.

गुजरात एटीएसचे अधिकारी सुनील जोशी यांनी बीबीसीला सांगितलं, “गुजरात एटीएस आणि एनसीबीजवळ गुप्त माहिती होती. एका मोठ्या मोहिमेनंतर आणि माहितीची खातरजमा केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.”

गुजरात पोलिसांच्या मते सन्याल प्रकाशला याआधी सुद्धा एमडी ड्रग्जसह 2017 मध्ये मुंबईत अटक करण्यात आली होती. तो 5 वर्षं तुरुंगात होता.

सुनील जोशी म्हणाले, “ज्या कारखान्यावर धाड टाकण्यात आली तो अर्धा एकर भागात होता. गुजरात एटीएसची ड्रग्जच्या विरोधात ही सर्वांत मोठी कारवाई आहे. या कारखान्यात रोज 25 किलो एमडीचं उत्पादन व्हायचं.”

या ड्रग्जचं उत्पादन किती काळापासून सुरू होतं याचा तपास आता गुजरात एटीएस आणि एनसीबीतर्फे करण्यात येत आहे. तसंच अवैध पद्धतीने तयार करण्यात येणारं एमडी ड्रग कुठे कुठे आणि किती लोकांना पाठवलं जायचं. त्याचप्रमाणे या कारभारातून येणारा पैसै कसा आणि कोणाला मिळायचा, या ड्रग कार्टेलमध्ये कोण कोण लोक सामील आहे याचाही तपास सुरू आहे.

आता ड्रग कार्टेलशी निगडित आणखी काही लोकांची नावं समोर येण्याची शक्यता आहे आणि त्याचे धागेदोरे अन्य राज्यांशी असण्याची शक्यता आहे असं गुजरात पोलिसांना वाटतं.

सुनील जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, “या ड्रग्जचे धागेदोरे देशाच्या बाहेरही असण्याची शक्यता आहे. आमचा तपास अजूनही सुरू आहे आणि यात पुढे कारवाई होऊ शकते.”

आतापर्यंत 13 हजार कोटींचे ड्रग्ज जप्त

दरम्यान दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेच्या ट्रान्स यमुना रेंजच्या युनिटने 1 ऑक्टोबरला महिपालपूरहून जे ड्रग्ज पकडले आहेत ते गेल्या काही वर्षांत जप्त केलेलं सर्वांत जास्त प्रमाणातलं कोकेन आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 562 किलो कोकेन आणि 40 किलो हायड्रोपोनिक गांजा थायलंडमधून आला होता.

विशेष शाखेतील एका अधिकाऱ्याच्या मते, “जे ड्रग्ज महिपालपूरहून जप्त केलं ते भारताच्या बाहेरून आणलं होतं. मात्र त्यामागे कोणतं आंतरराष्ट्रीय ड्रग कार्टेल आहे हे समजण्यास आणखी वेळ लागू शकतो.”

दिल्ली पोलिसांनी एक ऑक्टोबरला पकडलेल्या ड्रग्ज संबंधी चार लोकांना अटक करण्यात आली आहे. त्यात 40 वर्षीय तुषार गोयल, 27 वर्षीय हिमांशु कुमार, 23 वर्षीय औरंगजेब सिद्दिकी आणि 48 वर्षीय भरत कुमार यांचा समावेश आहे.

पोलिसांच्या मते, ड्रग्जच्या विरोधात कारवाई करताना ऑगस्ट महिन्यात दिल्लीत सक्रिय असलेल्या एका आंतरराष्ट्रीय ड्रग कार्टेलबद्दल पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली होती. त्या आधारावर छापेमारी करण्यात आली होती. त्यात मोठ्या संख्येने ड्रग्ज जप्त करण्यात आले होते.

दिल्ली पोलिसांनी अमृतसर विमानतळावरून जितेंद्र उर्फ जस्सीला ड्रग्ज नेटवर्कशी निगडित असल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आणि अमृतसरच्या एका गावात धाड टाकून 10 कोटी रुपये किमतीचे ड्रग्ज जप्त केले होते. हा घटनाक्रम पाच ऑक्टोबरला झाला होता.

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेच्या एका अधिकाऱ्याच्या मते, “या सर्व कारवाया आतापर्यंत एकाच ड्रग कार्टेलशी निगडित आहे आणि त्यातले काही संशयित देशाच्या बाहेर आहेत.”

दिल्ली पोलिसांनी वीरेंद्र बासोया नावाच्या एका संशयित ड्रग तस्कराविरुद्ध लूकआऊट नोटीस जारी केली आहे.

विशेष शाखेच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, “आतापर्यंत जी माहिती मिळाली आहे. त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या नेटवर्कशी निगडित आणखी काही लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे.”

पोलिसांसमोर अनेक आव्हानं

गेल्या काही दिवसांत ड्रग्ज विरोधात केलेल्या कारवाया पोलिसांचं मोठं यश मानलं जात आहे. मात्र त्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

उत्तर प्रदेशचे माजी पोलीस महासंचालक विक्रम सिंह म्हणतात, “ज्या प्रमाणात ड्रग्ज पकडले आहेत, ते अभूतपूर्व आहे. पोलिसांना नक्कीच यश मिळालं आहे. मात्र प्रश्न असा आहे की अशा प्रकारचं ड्रग नेटवर्क भारतात इतकं सहज कसं काम करत होतं. पोलिसांना आणखी बरंच काम करायचं आहे. आतापर्यंत मोठा सूत्रधार हाताशी लागलेला नाही.”

विक्रम सिंह पुढे प्रश्न उपस्थित करतात, “ड्रग्जच्या विरोधातला जो कायदा आहे त्यानुसार ड्रग्ज विकून जी मालमत्ता विकत घेतली आहे ती जप्त करण्याचा अधिकार पोलिसांना आहे मात्र आतापर्यंत ड्रग्ज जप्त केले आहेत मात्र या कार्टेलशी निगडित कोणत्याही मोठ्या गुन्हेगाराच्या विरोधात संपत्ती जप्त करण्याची कारवाई केलेली नाही. पोलिसांनी जर सक्तीने चौकशी केली तर निश्चितच नवीन नावं समोर येतील.”

भारतीय बाजारात ड्रग्जची मागणी वाढत आहे आणि त्याचा पुरवठाही वाढत आहे हे इतक्या मोठ्या जप्तीवरून दिसतं असंही विश्लेषकांना वाटतं.

विक्रम सिंह म्हणतात, “इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त झाले आहेत याचा अर्थ भारतात ड्रग्जची मागणी वाढत आहे. जर मागणी वाढली नसती तर इतक्या मोठ्या प्रमाणात पुरवठा झाला नसता. या व्यापारात पैसाही भरपूर आहे. म्हणून गुन्हेगार तिकडे आकर्षित होत आहेत. पोलिसांच्या कारवाईवरून कळतंय की ड्रग्सच्या तस्करीचं जाळं आता संघटित आहे आणि गेल्या काही वर्षांत ड्रग्जशी निगडीत गुन्ह्यांची संख्या वाढली आहे.”

इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडल्यामुळे भारतात ड्रग्ज इतक्या सहज कसे उपलब्ध होतात हाही एक प्रश्न उपस्थित होतो.

पंजाब विद्यापीठातील समाजशास्त्राचे संशोधक आणि नशाविरोधी अभियानाशी निगडीत असलेले शिशपाल शिवकंड म्हणतात, “आधीच्या तुलनेत आता बाजारात ड्रग्ज अगदी सहज मिळतात. पंजाब आणि हरियाणामध्ये अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या लोकांबरोबर काम केल्यावर बाजारात ड्रग्ज सहज उपलब्ध झाले आहेत हे आम्हाला पुरतं कळून चुकलं आहे.”

“पोलिसांनी गेल्या काही दिवसात मोठ्या प्रमाणात ड्रग्ज जप्त केले आहेत. हे अभूतपूर्व आहे. मात्र ड्रग्ज विरोधात याआधी कारवाया झाल्या प्रश्न असा आहे की या कारवाईमुळे हे जाळं समूळ नष्ट होईल का? बाजारात ड्रग्सचा तुटवडा होईल का? ज्या प्रमाणात बाजारात ड्रग्ज उपलब्ध आहे ते पाहता या कारवाईमुळे काहीही आश्चर्य वाटत नाही. फक्त तपाससंस्था आता हे प्रकरण गांभीर्याने घेत आहे आणि हे जाळं उद्धवस्त करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाई होतेय ही चांगली गोष्ट आहे,” ते पुढे म्हणतात.

जे ड्रग्ज पकडले गेले आहेत ते भारताच्या बाहेरून आले आहेत असं पोलिसांचं म्हणणं आहे. मग यात आणखी गंभीर प्रश्न असा आहे की भारताची सीमा ओलांडून ड्रग्ज पोहोचवण्यात लोक कसे यशस्वी होत आहे?

विक्रम सिंह प्रश्न उपस्थित करतात, “इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पकडले आहेत त्यावरून भारतात ड्रग्ज कार्टेलचं जाळं किती पसरलं आहे हे दिसतं. या लोकांना बाहेरून नक्कीच मदत मिळतेय हे स्पष्ट आहे. नाहीतर इतक्या मोठ्या प्रमाणात ड्रग्ज पोहोचवणं शक्य नाही. ड्रग्जचा प्रसार थांबवण्यासाठी या नेटवर्कला ज्यांचं साहाय्य आहे ती व्यवस्था पोलिसांना उद्ध्वस्त करावी लागेल.”

अंमली पदार्थांचा अंमल भारतात किती प्रमाणात आहे?

संयुक्त राष्ट्रांच्या ड्रग्ज आणि क्राइम कार्यालयाच्या एका सर्वेक्षणानुसार युवकांमध्ये ड्रग्जच्या वापराचं प्रमाण वाढतंय.

भारतातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशल डिफेन्सने दिलेल्या माहितीनुसार जवळजवळ 3.1 कोटी लोक गांजाचं सेवन करतात आणि 72 लाख लोकांना गांजाचं व्यसन आहे.

भारतात ओपिऑइडचे (अफू असलेली वेदनाशामक औषधे) एकूण युजर 2.06 टक्के आहेत. आणि 0.55 टक्के लोक (जवळजवळ 60 लाख) लोकांना अंमली पदार्थाचं सेवन केल्यामुळे उपचारांची गरज आहे.

एनआयएसडीच्या सर्वेक्षणानुसाक भारतात 1.18 कोटी लोक सिडेटिव्ह्जचा (बिगर वैद्यकीय) वापर करतात. भारतात 18 लाख मुलं कशाचातरी वास घेऊन अंमली पदार्थ सेवन करतात.

एका अंदाजानुसार भारतात 8.5 लाख लोक इंजेक्शनद्वारे नशा करतात.

शिशपाल शिवकंड म्हणतात, “ड्रग्जची उपलब्धता हे ड्रग्जचा वापर वाढण्याचं अतिशय महत्त्वाचं कारण आहे. गेल्या काही वर्षांत नशा करणं हे प्रतिष्ठेचं लक्षण मानलं जातं. त्यामुळे अनेक युवक नशा करू लागले आहेत.”

भारत सरकारच्या सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्रालयाने 2020 मध्ये नशामुक्त अभियान सुरू केलं होतं.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या माहितीनुसार भारतात अंमली पदार्थांचे सेवन करण्याच्या सवयीवर केलेल्या पहिल्या सर्वेक्षणाच्या आधारे 372 जिल्ह्यात ही मोहीम राबवली आहे.

अंमली पदार्थाच्या सेवनाच्या विरोधात जागृती करणं आणि ड्रग्जचा व्यापाराविरुद्ध कारवाई करणं हा नशामुक्त अभियानाचा उद्देश आहे.

दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार याच उपक्रमाअंतर्गत ड्रग्जच्या नेटवर्कविरुद्ध कारवाई केली जात आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)