माशाचा काटा गिळला अन् घशात किंवा पोटात अडकला तर काय होतं?

    • Author, करिकिपती उमागंत
    • Role, बीबीसीसाठी

अलीकडच्या काळात बरेच लोक मासे खाऊ लागले आहेत. हे खवय्ये असा दावा करतात की, माशांमध्ये मटण आणि चिकनपेक्षा कमी चरबी असते. मात्र, माशांच्या काट्यात अडचण आहे.

अशा लोकांना कितीही मासे खाण्याची इच्छा असली, तरी त्यात काटे असू शकतात, या भीतीने हे लोक मासे खाण्याआधी दोनदा विचार करतात.

मासे खाताना त्याचे लहान काटे घशातून पोटात जाणं ही मोठी अडचण नाही. मात्र, हेच लहानसे काटे घशात अडकले किंवा मोठे काटे पोटात गेले तर त्याचा त्रास होऊ शकतो.

यावर काही उपचार आहेत का?

आंध्र प्रदेशातील पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील पिकावोलू येथील 54 वर्षीय जांबा मंगाम्मा यांनी अलीकडेच माशाची करी खाल्ली आणि त्यांच्या हृदयाजवळील अन्ननलिकेत माशाचा काटा अडकला.

तीव्र वेदनांमुळे त्यांना काकीनाडा येथील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले. अनेक चाचण्या केल्यानंतर माशाचा काटा त्यांच्या हृदयाजवळ अडकल्याचं तेथील डॉक्टरांना आढळलं.

यानंतर त्यांच्या छातीच्या हाडांच्या पिंजऱ्यावर परिणाम होऊ न देता शस्त्रक्रिया करण्यात आली.

शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर शिवरामकृष्ण, नागेश्वर राव आणि वंशी चैतन्य यांनी माध्यमांना सांगितले की, त्यांनी ट्रॅव्हर्स नावाच्या प्रक्रियेचा वापर करून रुग्णाच्या हृदयाजवळ अडकलेला माशाचा काटा काढला.

माशाच्या काट्यामुळे तब्येत बिघडल्याची आणखी एक घटना

मेडक जिल्ह्यातही अशीच एक घटना घडली. जिल्ह्यातील टेकमल येथील सैलू नावाच्या तरुणाने माशाची करी खाताना काटा गिळला. त्याला वाटलं की काटा पचेल, पण तसं झालं नाही.

त्याने गिळलेल्या काट्यामुळं त्याला अनेक दिवसांपासून त्रास होत होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्याच्या पोटातील माशाचा काटा काढण्यासाठी मेडक येथील रुग्णालयात शस्त्रक्रिया केली.

माशाच्या काट्यामुळं वेळोवेळी अनेक लोकांना घशात आणि पोटात दुखापत होताना आपण पाहत आहोत. अशा परिस्थितीत, माशाचे काटे घशात अडकू नयेत म्हणून काय करावं? मासे कसे खावेत?

विजयवाडा येथील सरकारी रुग्णालयातील सर्जन कल्याणी यांनी बीबीसीशी बोलताना सांगितले की, जर चुकून माशाचा काटा गिळल्यानं त्रास होत असेल तर काय करावं.

"मासे खाण्यापूर्वी माशातील मोठा काटा (मणका) पूर्णपणे काढून टाकणं चांगलं. डॉक्टर म्हणून, आम्ही देखील याची शिफारस करतो. जर माशाचा मोठा काटा घशात अडकला असेल, तर तो एंडोस्कोपीद्वारे काढला जातो. जर तो घशातून आणखी खाली गेला तर तो कुठे अडकला आहे हे ठरवण्यासाठी एक्स-रे वापरला जातो. तसेच शस्त्रक्रियेने काढला जातो," अशी माहिती डॉ. कल्याणी यांनी दिली.

डॉ. कल्याणी पुढे म्हणाल्या, "जर माशाचा काटा अन्ननलिकेत अडकसा आणि अन्ननलिकेच्या बाहेर आला, तर ते खूप धोकादायक आहे. त्यामुळे संपूर्ण हृदयात संसर्ग होण्याचा धोका असतो. याला मेडियास्टिनाइटिस म्हणतात."

माशाचा काटा शरीरात विरघळतो का?

"जर माशाचा काटा घशात अडकला, तर काळजी करण्याची गरज नाही, तो सहजपणे काढता येतो. तो अन्ननलिकेत गेला, तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण पोटातील आम्ल (अॅसिड्स) माशाचे काटे सहजपणे विरघळवतील. जर ते अन्ननलिकेतून बाहेर आले तरच खरी अडचण आहे," असं डॉ. एमआरएस हरिहरन यांनी बीबीसीशी बोलताना म्हटलं.

त्यांनी सांगितलं की, एका तरुणीच्या घशात माशाचा काटा अडकला होता. त्यानंतर एंडोस्कोपीचा वापर करून तो काढून टाकण्यात आला.

संसर्ग होण्याची शक्यता आहे का?

डॉ. हरिहरन यांनी याबाबत काही सूचना देतात. ते म्हणाले, "जर तुमच्या घशात माशाचा काटा अडकला असेल, तर तुम्ही तुमच्या पोटावर जोरात दाब द्यावा. यामुळे तो काटा हवेसह बाहेर पडण्यास मदत होईल. वेळोवेळी सोडा पिणं देखील चांगलं आहे. सोड्यातील वायू घशावर दाब देईल. त्यामुळं काटा बाहेर पडण्यास मदत होईल."

त्यांनी असंही सांगितलं की, जर या घरगुती उपायांनी मदत केली नाही, तर तुम्ही ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

"कधीकधी, माशांच्या काट्यांना संसर्ग झालेला असू शकतो. माशाच्या त्वचेला बॅक्टेरियाचा संसर्ग किंवा ऑस्टियोमायलाईटिस (हाडांचा संसर्ग) किंवा सेप्टिसीमिया (रक्ताचा संसर्ग) झालेला असू शकतो. हे गुंतागुंतीचं ठरू शकतं. मात्र हे दुर्मिळ प्रकरण आहेत," हरिहरन यांनी नमूद केलं.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)