राज्यमासा पापलेट, मत्स्यप्रेमी आणि तुम्ही-आम्ही

    • Author, प्रवीण दशरथ बांदेकर
    • Role, लेखक

पापलेट महाराष्ट्राचा राज्यमासा म्हणून घोषित झाला, त्याच्या दुसऱ्या दिवशी मासळी मार्केटमध्ये गेलो होतो. नेहमीच्या मासेवालीकडे गेल्यावर ती म्हणाली, ‘सर, पापलेट आताच काय तां खाव्न घ्या. श्रावण आसां, म्हणान् स्वस्त आसत. पण आता ह्याच्यानंतर पापलेट दृष्टीस सुद्धा पडूचां नाय.’

‘असं का?’ म्हणून विचारल्यावर ती म्हणाली, ‘म्हंजे वो काय, मास्तरानुं? तुमकां काय्येकच कसां म्हायती नाय? काल आपल्या सरकारान् पापलेटाक् राज्यमासो का काय म्हंतत तां झाईर केल्यान् ना? मगे आता तेकां संरक्शन दितले. आता पापलेट मारूक बंदी येतली म्हंतत. जाल्यांनी गावले तरी सोडूचे लागतले.‘

मला गंमत वाटली. पण एका अर्थी तिचंही बरोबरच होतं. काल ही राज्यमाशाची घोषणा झाल्यापासून सोशल मेडियावर अशाच प्रकारच्या उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या.

मुळात राज्यमासा ही नक्की काय भानगड आहे, हेच अनेकांच्या लक्षात येत नव्हतं. काही जणांच्या मते, पापलेट हा काही सर्वसामान्यांना परवडणारा मासा नाही; तो श्रीमंतांच्या जिभेचे चोचले पुरवणारा मासा.

शिवाय, जे अस्सल मासेखाऊ आहेत त्यांना माहीत होतं, महाराष्ट्र राज्याच्या किनारपट्टीवर पापलेटशिवायही अनेक असे मासे सापडतात, जे चवीच्या बाबतीत तरी पापलेटपेक्षाही अधिक रुचकर होते. आरोग्याचा विचार करता अधिक जीवनसत्त्व असलेले होते.

विपूल प्रमाणात सापडणाऱ्या आणि मासळी हेच ज्यांच्या रोजच्या अन्नाचा भाग आहे अशा गरिबांना परवडू शकणाऱ्या बांगडा, बोंबिल, मांदेली, सौंदाळे अशा एखाद्या चविष्ट माशाला राज्यमाशाचा दर्जा का दिला गेला नाही, असे अनेकांना वाटत होते.

पण त्याहूनही गोंधळात टाकणारी गोष्ट अशी होती की, एखादा मासा राज्यमासा झाल्यामुळे सामान्यांच्या जगण्यामध्ये वा जैवसृष्टीमध्ये नेमका असा काय फरक पडणार होता? म्हणजे उदाहरणार्थ, शेकरूसारखा खारूताईच्या जातीचा वन्यप्राण्याला राज्यप्राण्याचा दर्जा दिला गेला आहे, कबुतराच्या जातीचा हरियल पक्षी आपला राज्यपक्षी आहे. हे सगळे वन्यजीव एक तर दुर्मीळ प्रजातीमध्ये मोडत आहेत. त्यांची संख्या फार वेगाने कमी होऊ लागली आहे.

अर्थात, त्यामागेही वेगवेगळी कारणे आहेत. पण, म्हणूनच त्यांना संरक्षण देणे, त्यांचे महत्त्व या निमित्ताने लोकांच्या नजरेत आणून देणे, त्यांचा निसर्गदत्त दर्जा वाढवणे, हा यामागचा उद्देश आहे, हे समजण्यासारखे आहे.

पण या वन्यजीवांच्या बरोबरीने दर्जा देण्यात आलेल्या पापलेटाचं काय? मुळात समुद्र, नदी यांसारख्या नैसर्गिक जलस्त्रोतामध्ये मिळणारी बहुसंख्य मत्स्यप्रजाती हे किनारपट्टीवर राहणाऱ्या लाखो लोकांचे पिढ्यान् पिढ्यांचे अन्न आहे. त्यात अमुक एक मासा इतरांपेक्षा वेगळा, म्हणून त्याला अन्नातून वगळा, असं काही नसतं.

शेकरू वा हरियल हे काही आपल्या रोजच्या अन्नाचा भाग होऊ शकत नाहीत. तरीही त्यांची शिकार केली जात असेल, त्यांच्या जीवाला धोका निर्माण होईल अशी परिस्थिती निर्माण केली जात असेल, तर त्यांना अशा प्रकारे संरक्षण देऊन त्यांचे महत्त्व जनमानसामध्ये ठसवणे आवश्यकच असते. पण आपले अन्नच असलेल्या माशांच्या बाबतीतही असं काही म्हणता येईल का? लोकांच्या मनातील संभ्रम याच गोष्टीमुळे होता.

आमची मासेवाली त्यामुळेच तर सांगत होती ना, यापुढे आता पापलेट मासा मारण्यावर आणि खाण्यावर बंदी येणार आहे, म्हणून. म्हणजे अगदी अन्य माशांसोबत चुकून जरी पापलेट जाळ्यात आलं तरी त्याला पुन्हा सुखरूपपणे दर्यात सोडून द्यावं लागणार होतं. किंवा असंही होऊ शकतं, पापलेटची मासेखाऊंमधील लोकप्रियता लक्षात घेता तथाकथित उच्चभ्रू पापलेटप्रेमींसाठी भविष्यात खास पापलेटची तस्करीही सुरू होऊ शकते.

जाहीरपणे मार्केटमध्ये वा अन्यत्र या माशाच्या खरेदीविक्रीवर बंदी असेल, पण काही गुप्त अड्ड्यांमध्ये, ठरावीक हॉटेल्समध्ये पापलेट उपलब्ध होऊ आहे, असंही होऊ शकते.

अन्य माशांच्या तुलनेत पापलेट इतकं लोकप्रिय का असावं? मासे हे बहुसंख्यांच्या दैनंदिन अन्नाचा भाग असलेल्या कोकणासारख्या प्रदेशात डोकावलं, तर काय चित्र दिसतं?

इथे सरंगे, पेडवे, कर्ली, इरडं, मांदेली, सुळे, मुडदुशे, तांबोशी, कालुंदरं, दोडकारे, बोंबिल, बांगडे, सुंगटं वा चिंगळं, शेगटं, पातसळी, लेपी, कापी, इनगं, पातसाळी, चणाक, सुरमई असे असंख्य चवदार मासे लोकांच्या आहारात दिसतील. या प्रत्येक माशाची चव वेगळी, वैशिष्ट्य वेगळं. यांतले अनेक मासे काटेरी आहेत. खाताना विशेष काळजी घेतली नाही तर, काटा घशात अडकून अक्षरशः जीव जायची पाळी येऊ शकते.

यासंदर्भात कर्लीसारख्या चवदार तरीही काटेरी माशाचं उदाहरण सर्वश्रूत आहे. शिवाय, यातल्या अन्य काही माशांना उग्र हिंगुस असा विशिष्ट वास असतो. त्यामुळे नीट साफसुफ करून व्यवस्थित धुतल्याशिवाय ते खाण्यायोग्य बनू शकत नाहीत.

रावस, प्रॉन्स, पापलेट यांसारखे मासे तुलनेने कमी किंवा जवळपास नसल्यात जमा काटा असलेले. खातानाही बिलकूल हिंगूस वास नसलेले. मऊ आणि मांसल.

त्यामुळे, क्वचितच मासे खाणाऱ्यांमध्ये, हौशी आणि नवशा पर्यटक मासेखाऊंमध्ये पापलेटसारख्या माशालाच जास्त मागणी असते. पापलेटची ही लोकप्रियता वाढवण्यामागे हॉटेल आणि बारवाल्यांनीही मोठा हातभार लावला आहे.

जगात जणू दुसरे काही मासेच उपलब्ध नसल्यासारखे हे ठराविक प्रकारांतले मासेच मासे खाऊ इच्छिणाऱ्यांच्या समोर आणले गेल्यावर दुसरं तरी काय होणार?

पण बहुधा याच कारणांमुळे पापलेटची प्रजाती हळूहळू कमी कमी होऊ लागलेली दिसते आहे. एकीकडे

वाढती हॉटेल संस्कृती, मत्स्यहारी लोकांच्या संख्येत होणारी वाढ आणि दुसरीकडे आधुनिक तंत्रज्ञानाने पुरवलेली समुद्राचा तळ खरवडून काढणारी जाळी, ट्रॉलर्ससारख्या ऐन पावसाळ्यातही खोल समुद्रात मासेमारी करण्याची क्षमता असलेल्या यांत्रिक बोटी, यांमुळे या लोकप्रिय माशांवर आफत ओढवली आहे, असेच म्हणावे लागेल.

ठाणे, पालघर परिसरात सिल्व्हर पापलेट जास्त प्रमाणात आढळतात. मात्र या माशांच्या अतिरेकी मागणीमुळे या परिसरामध्येही या माशांचं प्रमाण झपाट्याने घटू लागल्याची आकडेवारी समोर आली आहे.

पावसाळ्यातल्या मासेमारीमुळे माशांच्या जननदरावर परिणाम होऊन त्यांचे एकूणच जीवनचक्र बिघडून गेले आहे. यामुळेच बहुधा, पालघर परिसरातील मच्छीमार संघटनांनी गेल्या काही वर्षांपासून सातत्याने सिल्व्हर पापलेटच्या संरक्षणासाठी सरकारने पावले उचलावीत, अशी मागणी करायला सुरुवात केलेली आहे.

पापलेटची प्रजाती टिकवण्यासाठीच हा राज्यमाशाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला गेला असावा का? यामागची कारणं काही सरकारकडून स्पष्ट केली गेल्याचे कुठे वाचनात आलेले नाही. त्यासंबंधीची तशा स्वरूपाची चर्चाही कुठे आढळली नाही.

अर्थात कारणं काहीही असली तरी, माशांच्या चवींच्या संपन्न विविधतेचा अनुभव असलेल्या मत्स्यप्रेमींकडून मात्र या निर्णयावर नाराजीच व्यक्त केली जात आहे. केवळ राज्यमाशाचा दर्जा देऊन पापलेटचं संरक्षण केलं जाऊ शकतं असं समजणं हा भाबडेपणाच आहे.

महाराष्ट्राला जवळपास 720 किलोमिटरचा समुद्रकिनारा लाभलेला असला आणि खवय्यांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या माशांच्या या बहुसंख्य वैशिष्ट्यपूर्ण प्रजाती समुद्रामध्येच आढळत असल्या तरी, महाराष्ट्राच्या विविध नद्या आणि तलावांमधून होणारी गोड्या पाण्यातील मासळीही तितकीच लोकप्रिय आहे. यामध्ये विशेषतः मरळ, वाम, कथला, मिरगळ, मुऱ्या, पालू, यांसारखे अनेक माशे उल्लेखनीय आहेत.

विशेषतः एखाद्या भूपरिसरामध्ये आढळणारी काही विशिष्ट प्रजातीची मासळी तिथल्या स्थानिक लोकांमध्ये विशेष लोकप्रिय असते, असेही दिसून येते.

रायगड परिसरात आढळणारा जिताडा जातीचा मासा किंवा सिंधुदुर्ग आणि गोव्याच्या किनारपट्टीवर सापडणारा चणाक सारखा मासा तिथल्या अट्टल मासेखाऊंसाठी अन्य कुठल्याही माशांपेक्षा जास्त रुचकर असतो.

कोकणातील अनेक घरांमध्ये सणासुदीचे वा देवादिकांशी जोडलेले एकादशी, संकष्टी, सोमवार, गुरुवार यांसारखे काही दिवस वगळता आठवड्यातील जवळपास चार-पाच दिवस रोजच्या आहारात माशांचा समावेश असतो.

हे मासे आमटी किंवा हुमण, तिखले, सार, पोपटी, तवाफ्राय, आंबटतिखट, गोलम्याची चटणी, जवल्याचं डांगार, तिसऱ्यांचं मसालेदार सुकं, चुलीतल्या निखाऱ्यांवर मिठ लावून भाजणे, हळदीच्या पानांत लपेटून मिठमसाला लावून उकडणे अशा अनेक स्वरूपांत खाल्ले जातात. साहजिकच, रोज मासे खाणाऱ्यांना त्यामुळे खिशाला परवडतील आणि चवीढवीत विविधता येईल अशा माशांना पसंती द्यावी लागते.

चवीनं खाणाऱ्या मत्स्यखवय्यांना किनाऱ्यावर रापण वा अन्य तत्सम पारंपरिक पद्धतीने मासेमारी करून मिळालेले ताजे फडफडीत मासे आणि यांत्रिक होड्यांतून बर्फात घालून आणलेले मासे यांतील फरक लगेचच ओळखू येतो.

पावसाळ्यात खाडीतून मिळणाऱ्या तांबोशी, पालू, काळुंदरे, मुडदुशे, गुंजले, शेतकं यांसारख्या माशांची चवही केवळ त्याच दिवसांत अनुभवता येते. कोकणात तर जातिपातीनिहाय माशांच्या पाककृतींची चव बदललेली दिसून येईल.

सारस्वतांच्या मच्छीमसाल्याच्या आमटीची चव आणि एखाद्या भंडारी, वाणी, गाबीत वा सोनारीण सुगरणीच्या हुमणाची चव, यांतला फरकही जातीच्या खवय्यांनाच कळू शकतो.

आमसुलं, कोकमाचा आगळ, चिंचेचा कोळ, ओल्या ताज्या नारळाचं भरपूर खोबरं, ओल्या हिरव्या मिरच्या, सुक्या मिरच्या, हिरवा गोडा मसाला, धणे, कोथिंबीर अशी सामुग्री तीच, पण चवीत मात्र सुगरणीगणिक फरक.

बांगड्याचं भुजणं, तारल्या वा पेडव्यांचं हळदीची पानं नि तिरफळं घालून केलेलं तिखलं, कोळंबीचं सार, खाडीतल्या काळ्या खेकड्यांचा गरम मसाल्याचा रस्सा, मुशी वा मोरीचं मटण, शिनाने, तिस-यांची भाजी... यांसारखं मत्स्यखाद्य कोकण नि गोमंतकातच ओरपावं. हे अन्नब्रह्म ज्याने एकदा खाल्लं तो आयुष्यभर त्याची जीभेवर रेंगाळणारी चव नाही विसरू शकत.

मालवणच्या नितिन वाळकेंच्या चैतन्यमधले मासे खायला खास कोल्हापूर, बेळगावहून लोक निमित्तं शोधून यायचे. दादरला चैतन्य हॉटेलची शाखा सुरू झाल्यावर तिथंही मासेखाऊंनी गर्दी करायला सुरुवात केली. मासे तेच, रेसिपी तीच, तरीही या माशांच्या आमटीची चव वेगळी कशी? अनेकांना प्रश्न पडत असे.

शेवटी, एकदा वाळकेंनीच आपलं गुपीत उघड केलं. माशांच्या आमटीसाठी आम्ही जे पाणी वापरतो ते खास मालवणातून आणलेलं असतं, ही चव त्या पाण्याची आहे, असं त्यांचं म्हणणं अनेकांना बुचकळ्यात पाडणारं होतं.

यामागचा खोडकरपणा सोडून देऊ, पण सुगरणीच्या मायेइतकंच त्या त्या प्रदेशाच्या मातीची, पाण्याची चव तिथल्या तिथल्या पारंपरिक खाद्यपदार्थांमध्ये उतरलेली असते, हेही खरंच म्हणावं लागेल. जयवंत दळवींसारख्या लेखकांने कोकणातील मत्स्यखाद्यसंस्कृतीच्या अशा विविधतेविषयी फार रसिकतेने लिहिले आहे.

बाकी काहीही असो, या निमित्ताने घटत जाणाऱ्या मत्स्यप्रजाती, भविष्यातील खुणावणारा मत्स्यदुष्काळ आणि एकूणच सागरी पर्यावरणाची होणारी लुट यांविषयीची चर्चा नव्याने होऊ लागली आहे, हेही काही कमी म्हणता येणार नाही.

पुरेशी खबरदारी घेतली तरी आजही आपला समुद्र लाखो लोकांची मत्स्यअन्नाची गरज पुरवण्याची क्षमता राखून आहे. पण गांभीर्याने विचार न करता समुद्र असाच खरवडून काढत राहिलो तर मात्र – समुद्री चहुकडे पाणी, पिण्याला थेंबही नाही, याप्रमाणे म्हणावं लागेल - समुद्री चहुकडे पाणी, तरीही मत्स्यजीव का नाही?

(प्रवीण बांदेकर हे मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार विजेते लेखक आणि संपादक असून त्यांची उजव्या साेंडेच्या बाहुल्या, चाळेगत, घुंगुरकाठी यांसारखी अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. या लेखात मांडलेली निरीक्षणं त्यांची स्वतःची आहेत.)

हे वाचलंत का?

हा व्हीडिओ पाहिलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)