तुम्ही दात कशाने घासता, यानंही पर्यावरणाला होऊ शकते हानी? इलेक्ट्रिक की बांबूचा, कोणता टूथब्रश वापरावा?

दरवर्षी अब्जावधी टूथब्रश वापरून फेकले जातात.

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दरवर्षी अब्जावधी टूथब्रश वापरून फेकले जातात.
    • Author, अ‍ॅना सँटी
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

जगभरात पर्यावरणाचा प्रश्न गंभीर झाला आहे. हवामान बदलाचे परिणाम जगभर दिसत आहेत. त्यावर सातत्यानं चर्चादेखील होते आहे. पर्यावरणाच्या हानीमध्ये प्लास्टिकची भूमिका महत्त्वाची आहे.

आपल्या दैनंदिन जीवनात आपण मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर करत असतो. एक साधा प्लास्टिकचा टूथब्रश जो आपण काही दिवस वापरून नंतर फेकून देतो, तो देखील पर्यावरणाच्या हानीमध्ये मोठी भूमिका बजावतो आहे.

त्यामुळेच अलीकडच्या काळात बांबूचे, इलेक्ट्रिक आणि झाडापासून बनवलेल्या पर्यावरण पूरक टूथब्रशचे पर्याय समोर येऊ लागले आहेत, त्याविषयी जाणून घेऊयात.

दरवर्षी अब्जावधी टूथब्रश कचऱ्यात टाकले जातात. टूथब्रश मुख्यत: प्लास्टिकचे बनलेले असतात. त्यातून मग पर्यावरणाच्या हानीचा प्रश्नही निर्माण होतो. अशावेळी आपण दात अधिक पर्यावरणपूरक पद्धतीनं कसे घासू शकतो? म्हणजेच आपला टूथब्रश अधिक पर्यावरणपूरक कसा होऊ शकतो?

मी ऑफिसमध्ये काम करायचे तेव्हा माझ्या डेस्कच्या ड्रॉवरमध्ये एक प्लास्टिकचा टूथब्रश ठेवला होता. दुपारचं जेवण केल्यानंतर जेव्हा तो टूथब्रश हातात घेऊन बाथरूमकडे जायचे तेव्हा माझे सहकारी हसायचे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

घरी माझ्याकडे एक इलेक्ट्रिक टूथब्रश होता. मी नेहमीच माझ्या दातांची काळजी घेत आली आहे. मात्र माझ्या टूथब्रशच्या ब्रँडबद्दल, तो कोणत्या पदार्थापासून बनला आहे याबद्दल किंवा त्याचा पर्यावरणावर काय परिणाम होणार आहे याबद्दल विचारलं असतं, तर मला सांगता आलं नसतं.

माझ्या टूथब्रशशी असलेलं माझं नातं म्हणजे त्याचा वापर करायचा आणि जुना झाला की फेकून द्यायचा असंच तात्पुरत्या स्वरुपाचं होतं. माझे दात साफ करण्याच्या माझ्या टूथब्रशच्या क्षमतेपुरतंच ते मर्यादित होतं. पण असा विचार करणारी मी एकटीच नसेल असं मला वाटतं.

द अमेरिकन डेन्टल असोसिएशननुसार, लोकांनी दर तीन किंवा चार महिन्यांनी किंवा जास्त वापरामुळे जर टूथब्रश खराब झाला असेल तर तो नियमितपणे बदलला पाहिजेत.

टूथब्रश आणि पर्यावरण

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

टूथब्रश सर्वत्र आढळतात (दरवर्षी अब्जावधी टूथब्रश वापरले जातात आणि फेकले जातात).

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) इस्टमन डेन्टल इन्स्टिट्यूट आणि ट्रिनिटी कॉलेज डब्लिनमधील संशोधकांच्या एका गटानं अलीकडेच संयुक्तरित्या एक अहवाल प्रकाशित केला.

यात त्यांनी विविध प्रकारच्या टूथब्रशच्या पर्यावरणपूरकतेविषयी तुलनात्मक अभ्यास केला होता. यात त्यांनी प्लास्टिकचे साधे टूथब्रश, ब्रशचं डोकं किंवा वरचा भाग बदलता येणारे प्लास्टिकचे टूथब्रश, बांबूचे टूथब्रश आणि इलेक्ट्रिक टूथब्रश यांची तुलना केली.

या अभ्यासात संशोधकांनी टूथब्रशच्या उत्पादनापासून तर ते कचऱ्यात जाईपर्यंतच्या टूथब्रशच्या जीवनचक्रातील सर्व अंगांना लक्षात घेतलं होतं.

प्लास्टिकचे दोन्ही प्रकारचे टूथब्रश तयार करण्यासाठी पॉलीप्रॉपिलीनचा वापर केला जातो. पॉलीप्रॉपिलीन पृथ्वीच्या गर्भातून मिळणाऱ्या खनिज इंधनापासून किंवा कच्च्या तेलाचं शुद्धीकरण करताना त्यातून मिळतं. टूथब्रशच्या जीवनचक्राचा विचार केला असता या प्लास्टिकच्या टूथब्रशचा पर्यावरणावर मोठा परिणाम होतो.

ऑर्गनायझेशन फॉर इकॉनॉमिक कोऑपरेशन अँड डेव्हलपमेंट (OECD) या संस्थेनं जगभरातील प्लास्टिकचा आढावा घेणाऱ्या त्यांच्या ग्लोबल प्लास्टिक्स आऊटलूक या अहवालात अंदाज व्यक्त केला आहे की जगभरात दरवर्षी जवळपास 38 कोटी टन प्लास्टिकचा कचरा तयार होतो.

दरवर्षी अब्जावधी टूथब्रश वापरून फेकले जातात

फोटो स्रोत, Getty Images

त्यातील 4.3 कोटी टन प्लास्टिक कचरा हा ज्या वस्तू लोक त्यांच्या दैनंदिन जीवनात वापरात, त्यातून निर्माण होतो. यातील जवळपास 1.4 कोटी टन प्लास्टिक कचरा, म्हणजे जगातील एकूण प्लास्टिक कचऱ्याच्या 3.7 टक्के कचरा पॉलीप्रॉपीलीनपासून बनलेला असतो.

टूथब्रशच्या जीवनचक्राच्या अभ्यासानुसार, इलेक्ट्रिक टूथब्रशचा पर्यावरणावर होणारा परिणाम बांबूच्या टूथब्रशच्या तुलनेत 11 पट अधिक असतो. पाणी टंचाई ही एक श्रेणी सोडून इतर सर्व श्रेणीत त्याची कामगिरी खराब होती.

शिवाय, त्याच्या पर्यावरणावर होणाऱ्या एकूण परिणामांमध्ये वाहतुकीचा सर्वात मोठा वाटा होता. कारण ते तुलनेनं जड असतं.

मात्र, पर्यावरणाचा विचार करता इलेक्ट्रिक टूथब्रशचा नंबर शेवटचा आहे. मग पहिल्या क्रमांकावर कोणता टूथब्रश येतो? याबाबत अभ्यास करताना तोंडाच्या स्वच्छतेचा मुद्दा यात बाजूला ठेवण्यात आला होता.

कारण, दोन्ही अहवालामधून आणि नॅशनल हेल्थ सर्व्हिस (NHS)च्या दाव्यानुसार दातांची स्वच्छता, दात सडणं किंवा दातांची झीज यासंदर्भात कोणत्या एका प्रकारचा टूथब्रश फारच प्रभावी असल्याचं दिसून आलं नाही.

अर्थात दातांवर जमा होणारी घाण साफ करण्यासंदर्भात इलेक्ट्रिक टूथब्रश अधिक प्रभावी असतात. कारण या टूथब्रश मध्ये असणाऱ्या इन-बिल्ट टायमिंग उपकरणामुळे, अशंत: त्यातील तंत्रामुळे आणि या टूथब्रशचं डोकं (वरचा भाग) अधिक लवचिक असल्यामुळे ते प्रभावी ठरतात.

बांबूचे टूथब्रश

युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) आणि ट्रिनिटी कॉलेजच्या अभ्यासात दिसून आलं की प्लास्टिकचे साधे टूथब्रश ज्यांचं डोकं (ब्रश असलेला भाग) बदलता येतं, त्याच्या खालोखाल बांबूच्या टूथब्रशनचा नंबर आहे.

तुम्हाला कदाचित ही गोष्ट आश्चर्यकारक वाटेल की, प्लास्टिक टूथब्रश (ज्यात ब्रशचं डोक बदलता येतं) हे बांबूच्या टूथब्रश पेक्षा अधिक पर्यावरण पूरक असतात. एऱ्हवी आव्हानात्मक वातावरणात बांबूची झपाट्यानं वाढ होते आणि बांबूमध्ये वातावरणातील कार्बन साठवला जातो.

"जैवविविधता वाढवणं किंवा कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी झाडांची लागवड करणं यासारख्या अधिक चांगल्या कामांसाठी जमिनीचा वापर बांबूमुळे थांबू शकतो," असं पॉल अ‍ॅश्ले म्हणतात.

ते या शोधनिबंधाचे सहलेखक आहेत, तसंच युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL)मध्ये बालरोग दंतचिकित्सा विभागातील (paediatric dentistry) प्राध्यापक आहेत.

ते पुढं म्हणतात की, "त्यामुळंच सर्वसाधारपणे प्रचलित आहे तसा बांबूचा टूथब्रश पर्यावरणाच्या दृष्टीनं सर्वोत्तम असेलच असं नाही. अर्थात इथं लक्षात घेण्यासारखी महत्त्वाची बाब म्हणजे नेहमीच्या वापरातले प्लास्टिकचे टूथब्रश आणि इलेक्ट्रिक टूथब्रश यापेक्षा बांबूच्या टूथब्रशचा पर्यावरणावर होणारा परिणाम फार कमी आहे."

वैज्ञानिकांच्या मते, अनेकांना वाटतं तसे बांबूचे टूथब्रश पर्यावरणपूरक नाहीत

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, वैज्ञानिकांच्या मते, अनेकांना वाटतं तसे बांबूचे टूथब्रश पर्यावरणपूरक नाहीत.

पॅट्रिक वर्कलँड द हम्बल कॉर्पोरेशन या एका स्वीडीश कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. ही कंपनी बांबू आणि झाडापासून टूथब्रश बनवते.

पॅट्रिक वर्कलँड म्हणतात की ते बांबूच्या पुरवठ्याबाबत सजगपणे काम करतात. त्यांच्याकडं येणाऱ्या बांबूच्या लागवडीनं पर्यावरणाला हानी पोहोचू नये आणि जैवविविधतेसाठी किंवा अन्नधान्याच्या उत्पादनासाठी महत्त्वाच्या असलेल्या जमिनीवर बांबूच्या लागवडीचं अतिक्रमण होऊ नये याची ते काळजी घेतात.

"बांबूचं नैसर्गिकरित्या विघटन होतं. या वैशिष्ट्यामुळं टूथब्रशसाठीच्या त्याच्या वापरात तो वेगळा ठरतो. कारण बांबूची योग्यरित्या विल्हेवाट लावल्यास त्याचं नैसर्गिकरित्या विघटन होतं," असं वर्कलँड म्हणतात.

याच मुद्द्याबाबत ते पुढे म्हणतात की, "त्याउलट, जर प्लास्टिकच्या टूथब्रशवर पुनर्प्रक्रिया केली नाही तर त्यातील बहुतांश टूथब्रश पर्यावरणात शतकानुशतकं तसेच पडून राहतात. अर्थात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकच्या टूथब्रशवर पुनर्प्रक्रिया करणं हे एक प्रचंड आव्हान आहे."

वर्कलँड यांच्या मते, द हंबल कॉर्पोरेशनच्या जवळपास 60 टक्के टूथब्रशचे हँडल 100 टक्के झाडापासून बनवलेले असतात (पुढील 12 महिन्यांमध्ये टूथब्रशचे सर्व हँडल पूर्णपणे झाडापासून बनवण्याची कंपनीची योजना आहे). तर टूथब्रशच्या उर्वरित भागापैकी छोटासा भाग प्लास्टिकचा असतो.

टूथब्रशचे ब्रिसल्स नायलॉनपासून बनलेले असतात. नायलॉन हेदेखील प्लास्टिकच असतं. त्यामुळे कंपनी त्यासाठी पर्याय शोधतं आहे. त्यावर संध्या कंपनीचं संशोधन सुरू आहे.

पर्यावरणपूरक टूथब्रशचे पर्याय

पर्यावरणपूरक इलेक्ट्रिक टूथब्रशचं डिझाईन तयार करत असताना गाइव्ह सफावी यांच्यासमोर एक समस्या निर्माण झाली. सुरी या इलेक्ट्रिक टूथब्रश बनवणाऱ्या युकेमधील कंपनीचे ते मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत.

ज्या प्लास्टिक टूथब्रशचं डोकं म्हणजे वरचा भाग बदलता येतो, त्याच्या या बदलता येणाऱ्या भागावर पुनर्प्रक्रिया करण्याबाबत ते संशोधन करत होते. त्यासंदर्भात ते युकेमधील पुनर्प्रक्रिया करणाऱ्या विविध संस्था किंवा व्यावसायिकांशी बोलले.

त्यांनी सफावी यांना सांगितलं की, "प्लास्टिक टूथब्रशचं डोकं किंवा वरच्या भागावर पुनर्प्रक्रिया करता येऊ शकते. मात्र पुनर्प्रक्रिया करण्यासाठी तो भाग फारच छोटा असतो. त्यामुळे ते तसं करत नाहीत."

ग्राहकांनाच उघडता येतील असं टूथब्रशचे हँडल बनवू शकणाऱ्या उत्पादकांना शोधताना, सफावी यांच्यासमोर हीच अडचण आली.

सुरुवातीला ते उत्पादक साशंक होते.दुरुस्त करता येईल किंवा वरचा भाग बदलून पुन्हा वापरता येईल असा टूथब्रश सफावी यांना का हवा? या गोष्टीबाबत ते गोंधळलेले होते.

ग्राहक त्यांच्या टूथब्रशच्या वरच्या म्हणजे डोक्याच्या भागाचा वापर झाल्यानंतर ते सुरी कंपनीला प्रिप्रेड लिलाफ्यामधून पुनर्प्रक्रियेसाठी पाठवू शकतात.

फोटो स्रोत, Suri

फोटो कॅप्शन, ग्राहक त्यांच्या टूथब्रशच्या वरच्या म्हणजे डोक्याच्या भागाचा वापर झाल्यानंतर ते सुरी कंपनीला प्रिप्रेड लिलाफ्यामधून पुनर्प्रक्रियेसाठी पाठवू शकतात.

मात्र सफावी यांना या दोन्ही समस्यांवर उत्तरं मिळाली. सुरी कंपनीच्या टूथब्रशचं डोकं किंवा वरचा भाग कॉर्नस्टार्च (मक्यापासून तयार करण्यात आलेलं स्टार्च) पासून बनलेला असतो. तर टूथब्रशचे ब्रिसल्स एरंडेल तेलापासून बनलेले असतात.

पुनर्प्रक्रिया करण्यासाठी एका प्रीपेड लिफाफ्यात ग्राहक टूथब्रशचा वरचा, डोक्याचा भाग सुरी कंपनीला परत पाठवू शकतात. त्याचबरोबर टूथब्रश पूर्ण खराब झाल्यावर किंवा पुढे वापरता येण्याजोगा न राहिल्यावर ही कंपनी सर्व टूथब्रश परतही घेणार आहे.

"आमच्या टूथब्रशचं डिझाईन (बॅटरीसह) आम्ही असं तयार केलं आहे की, तो एकदा चार्ज केल्यानंतर नेहमीच्या वापरातील इलेक्ट्रिक टूथब्रश जितका वेळ चालतात त्यापेक्षा दुप्पट किंवा तिप्पट वेळ अधिक चालतो. याचाच अर्थ आमच्या टूथब्रशला कमी वेळा चार्ज करावं लागतं. यामुळे त्याची बॅटरी अधिक काळ टिकते आणि त्यामुळे टूथब्रशदेखील अधिक दिवस टिकतो," असं सफावी म्हणतात.

"आम्ही ते सर्व वेगळं करतो आणि शक्य तितकं साहित्य वाचवतो. बॅटरींचा वापर पुन्हा करता येत नाही. मात्र त्यावर पुनर्प्रक्रिया करून त्यातून शक्य असेल तितका कच्चा माल तयार केला जाऊ शकतो," असं ते पुढे म्हणतात.

टूथब्रशवर पुनर्प्रक्रिया आणि त्यातील अडचणी

विच (Which?) हे युके मधील ग्राहक संरक्षणासाठी कार्यरत संस्थेचं मासिक आहे.

या मासिकातील अहवालानुसार, "पर्यावरणपूरक उत्पादनांचा विचार करता सुरी ही कंपनी बाजारपेठेतील इतर कंपन्यांपेक्षा कितीतरी पावलं पुढे आहे."

सोफी थॉमस या सर्क्युलर डिझाईन तज्ज्ञ आहेत आणि युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL)च्या रॉयल अकॅडमी ऑफ इंजिनीअरिंग मध्ये अभ्यागत प्राध्यापक आहेत.

त्या म्हणतात की, "अधिक चार्जिंग क्षमता आणि दुरुस्तीची सेवानिशी सुरी या कंपनीचे रिचार्जेबल इलेक्ट्रिक टूथब्रश हे नक्कीच योग्य दिशेत असलेलं एक पाऊल आहे. सर्वसाधारणपणे याप्रकारच्या उत्पादनांचं अपयश समजून घेण्यासाठी हा एक चांगला मार्ग आहे. त्याचबरोबर टूथब्रशच्या वरच्या भागावर पुनर्प्रक्रिया करण्याची योजना देखील अधिक चांगली आहे."

"इलेक्ट्रिक टूथब्रशच्या बाबतीत पर्यावरणावर होणारे परिणाम किंवा कार्बन उत्सर्जन हे मुख्यत: त्यातील मोटर आणि बॅटरीसाठी वापरण्यात आलेल्या साहित्याशी निगडीत असतात.

त्यामुळे हे भाग जितके अधिक काळ कार्यरत राहतील आणि दुरुस्त करता येतील तितकं ते चांगलं ठरतं," असं सोफी म्हणतात.

सध्याच्या प्लास्टिक टूथब्रशवर मोठ्या प्रमाणात कधीच पुनर्प्रक्रिया होत नाही. सरासरी प्लास्टिकचा एक टूथब्रश चार प्रकारच्या को-मोल्डेड पॉलीमर्स पासून बनलेला असतो. त्यावर पुनर्प्रक्रिया केली जाऊ शकत नाही, असं सोफी थॉमस पुढे म्हणतात.

टूथब्रश

फोटो स्रोत, Getty Images

पुनर्प्रक्रिया आणि प्लास्टिकसंदर्भात बोलताना सोफी म्हणतात की, "पुनर्प्रक्रियेचा संबंध नेहमीच अर्थशास्त्राशी असतो. टूथब्रशचे हँडल एचडीपीई (HDPE)म्हणजे हाय डेन्सिटी पॉलीइथिलीनपासून बनलेले असतात. हे एचडीपीई इतकं स्वस्त असतं की त्याची किंमत फारच नगण्य असते."

"प्लास्टिकवरील आपलं अवलंबित्व कमी करून त्याऐवजी एकदाच वापरता येईल अशी आणि कमी कालावधीसाठीची पर्यायी उत्पादनं शोधण्याची आवश्यकता आहे. बांबू आणि झाडांपासून बनवण्यात आलेले टूथब्रश हे प्लास्टिकला पर्याय शोधण्यासंदर्भातील एक सकारात्मक पाऊल आहे."

"कचरा किंवा टाकून दिलेल्या वस्तूंपासून नवीन साहित्य किंवा वस्तू तयार करण्याच्या शक्यतांकडे आपण लक्ष दिलं पाहिजे."

ब्रेट ड्युएन हे ट्रिनिटी कॉलेजच्या पब्लिक डेन्टल हेल्थमध्ये सहाय्यक प्राध्यापक आहेत. ते या अहवालाचे प्रमुख संशोधक आहेत. त्यांच्या मते, पुनर्प्रक्रिया केलेलं प्लास्टिक हीदेखिल एक समस्या आहे.

यासाठी ते 2023 मध्ये झालेल्या एका अभ्यासाकडं ते लक्ष वेधतात. त्या अभ्यासात आढळून आलं होतं की, 13 टक्के प्लास्टिक पुनर्प्रक्रिया केल्यानंतर सांडपाण्यात मायक्रोप्लास्टिक म्हणजे सूक्ष्म स्वरुपातील प्लास्टिक म्हणून शिल्लक राहतं.

ब्रेट म्हणतात की, "आपल्याला एका अशा उत्पादनाची आवश्यकता आहे जे नैसर्गिकरित्या वाढलेल्या साहित्यापासून तयार करण्यात आलेले असेल आणि त्यावर वारंवार पुनर्प्रक्रिया करता येईल."

"जेणेकरून जमिनीचा वापर इतर कामांसाठी करता येईल. त्यामुळेच बिगर जीवश्म इंधन (बिगर फॉसिल फ्युएल) उत्पादनांवर पुनर्प्रक्रिया करणं हाच पुढचा मार्ग आहे. मला वाटतं प्लास्टिकवर पुनर्प्रक्रिया करण्यासंदर्भात इतरही महत्त्वाच्या समस्या आहेत."

टूथब्रश

फोटो स्रोत, Getty Images

माझ्या जवळच्या सुपरमार्केटमध्ये टूथब्रशनं भरलेल्या कप्प्यांकडे पाहत असताना तिथे पर्यावरणपूरकतेचे दावे करणारी इलेक्ट्रिक टूथब्रश नव्हते आणि फक्त डिझाईनच्या बाबतीत सुरी कंपनीबरोबर (75 पौंड, 97 डॉलर) (जवळपास 8193 रुपये) फक्त ऑर्डो सॉनिक लाईटचीच (35 पौंड, 45 डॉलर) (जवळपास 3801 रुपये) स्पर्धा होती.

नेहमीच्या साध्या टूथब्रशच्या बाबतीत इतर ब्रँडच्या तुलनेत दोनच ब्रँड पुढे होते. ते म्हणजे द हंबल कॉर्पोरेशन आणि टेपे चॉईस.

द हंबल कॉर्पोरेशनचे 3 पौंड (3.9 डॉलर) मध्ये दोन टूथब्रश होते. हे टूथब्रश झाडापासून मिळालेलं साहित्य आणि पॉलीप्रॉपीलीन यांच्या मिश्रणातून बनवण्यात आले होते. त्यात नायलॉनचे ब्रिसल्स होते. आणखी एक टूथब्रश "100 टक्के नैसर्गिक विघटन होणारा पर्यावरणपूरक बांबूपासून बनवलेला" हँडल आणि नायलॉन ब्रिसल्स असलेला होता.

त्याची किंमत 4 पौंड (5.20 डॉलर) होती. तर टेपे चॉईसचा नेहमीचा टूथब्रश होता. तो पुनर्वापर करता येणारं लाकडी हँडल, बदलता येणारा टूथब्रशनचा वरचा भाग आणि एरंडेल तेलापासून बनवलेले ब्रिसल्सपासून बनवलेला होता. त्याची किंमत 6.95 पौंड (9 डॉलर). यात "प्लास्टिक तयार होणारा कचरा 80 टक्के कमी " होता.

मी टेपे चॉईसचा टूथब्रश विकत घ्यायचं ठरवलं, कारण त्यात पुनर्वापर करता येणारं हँडल आणि टूथब्रशचा बदलता येणारा डोक्याचा भाग होता (याच प्रकारच्या टूथब्रशला अभ्यासात सर्वात वरचा क्रमांक मिळाला होता). त्यात प्लास्टिक नव्हतं. त्या टूथब्रशच्या वापरानं मी खूश होतो.

टूथब्रशचे नवे डिझाईन आणि नवे पर्याय

आता बाजारात टूथब्रशचे अधिक चांगले पर्याय उपलब्ध असताना, कोणताही प्लास्टिक टूथब्रश विकत घेण्याची बाब योग्य ठरवणं मला कठीण जाईल. अगदी वरचा डोक्याचा भाग बदलता येणारा टूथब्रश असला तरी.

अर्थात ही बाबही मान्य आहे की, ग्राहक म्हणून टूथब्रशबाबत काही गोष्टींची छाननी करणं आवश्यक आहे.

उदाहरणार्थ ज्या बांबूचा वापर टूथब्रशसाठी करण्यात आला आहे, त्या बांबूविषयी माहिती घेणं किंवा टूथब्रश बनवण्यासाठी केलेला बिगर-जीवाश्म इंधन साहित्याचा वापर इत्यादी.

अगदी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL)आणि ट्रिनिटी कॉलेच्या अहवालात संशोधकांनी नमूद केलं आहे की, त्यांनी अभ्यासाला सुरूवात केल्यापासून आता बाजारात नवीन साहित्य किंवा कच्च्या मालाचा वापर करून बनवण्यात आलेले टूथब्रथ आले आहेत.

त्यामुळं आता यासंदर्भात आणखी नवीन संशोधनाची आवश्यकता आहे. त्यांनी प्लास्टिकऐवजी अ‍ॅल्युमिनियम हँडल असलेले इलेक्ट्रिक टूथब्रश हे इलेक्ट्रिक टूथब्रशचं भविष्यातील स्वरूप असेल ही बाब ठळकपणे मांडली.

इलेक्ट्रिक टूथब्रश

फोटो स्रोत, Getty Images

टूथब्रशच्या निर्मितीसाठी अपारंपरिक साहित्याचा वापर आणि पुनर्प्रक्रिया करण्याच्या क्षमतेव्यतिरिक्त सुरी कंपनीच्या टूथब्रशच्या बाबतीत जी गोष्ट मला आवडली ती म्हणजे, त्यांच्या टूथब्रशचं विचारपूर्वक केलेलं डिझाईन.

त्यांचा अ‍ॅल्युमिनियमचा बारीक टूथब्रश, स्टँडर्ड इलेक्ट्रिक टूथब्रशपेक्षा आकारानं एक तृतियांशच आहे. अगदी बांबूचे टूथब्रशदेखील नेहमीच्या प्लास्टिक टूथब्रशपेक्षा छान दिसतात.

कदाचित जर आणखी ब्रँड किंवा कंपन्यांनी त्यांच्या टूथब्रशबाबत अधिक काळजी घेतली (जीवाश्म इंधनातून निर्माण होणाऱ्या साहित्याचा किंवा कच्च्या मालाचा वापर करण्याऐवजी अधिक पर्यावरणपूरक साहित्याचा वापर केला) तर अधिक ग्राहक त्यांच्या डिझाईनला स्वीकारतील, त्याप्रकारच्या टूथब्रशचा वापर करतील.

टूथब्रशचं डिझाईन अनेकदा वापरून फेकायची वस्तू म्हणून केलेलं असतं. नवीन डिझाईनमध्ये ग्राहक टूथब्रशकडे या दृष्टीकोनातून पाहणार नाहीत. मी तरी नक्कीच त्या दृष्टीनं पाहणार नाही.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.