सीरियामध्ये 'कलमा' लिहिलेला एक झेंडा दिसल्यामुळे लोकांमध्ये अस्वस्थता का पसरली?

फोटो स्रोत, Reuters
- Author, अमीरा मधाबी आणि हफीजुल्लाह मारूफ
- Role, बीबीसी न्यूज
सशस्त्र इस्लामी बंडखोर गटांमुळे सीरियात इस्लामी राजवटीची स्थापना होण्याची भीती निर्माण झाली आहे. सीरियातील समाज इस्लामी राजवटीला अनुकूल नाही. त्यामुळे हयात तहरीर अल-शाम (एचटीएस)चे प्रमुख अल-जुलानी यांनी देखील सीरियातील सर्व समुदायांना सामावून राज्यकारभार करण्याचं आश्वासन दिलं आहे.
पण हंगामी पंतप्रधानांच्या बैठकीत इस्लामी झेंडा दिसल्यामुळं सीरियातील नवी राजवट नेमकी कोणत्या दिशेनं जाणार याबद्दल प्रश्नचिन्हं निर्माण झालं आहे.
या पार्श्वभूमीवर सीरियातील नेमकी परिस्थिती काय आहे, सीरियातील लोकांच्या भावना काय आहेत आणि तज्ज्ञांना काय वाटतं आहे याचा उहापोह करणारा हा लेख.
सीरियाच्या नव्या हंगामी सरकारचे पंतप्रधान मोहम्मद अल-बशीर यांच्या अध्यक्षतेखाली 10 डिसेंबरला पहिली बैठक झाली.
बैठकीनंतर मोहम्मद अल-बशीर यांचा एक फोटो समोर आला. या फोटोमध्ये मोहम्मद अल-बशीर यांच्या मागे दोन झेंडे दिसत आहेत. यातील एक सीरियाचा 'क्रांतीकारक झेंडा' होता.
या झेंड्यात हिरव्या-पांढऱ्या आणि काळ्या रंगाच्या पट्ट्या होत्या. तर झेंड्याच्या मधोमध पांढऱ्या भागात लाल रंगाच्या तीन चांदण्या होत्या.
मात्र, या झेंड्याबरोबरच आणखी एक झेंडा होता. हा झेंडा पांढऱ्या रंगाचा होता. त्यावर काळ्या रंगात मुस्लीमांच्या मूलभूत विश्वासाची शपथ लिहिण्यात आली होती. त्या शपथेला 'कलमा तैयबा' म्हटलं जातं.
पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली अधिकृत बैठकीत दिसलेल्या या पांढऱ्या झेंड्याचा वापर हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) हा सीरियातील महत्त्वाचा बंडखोर गट करतो. या बंडखोर गटाच्याच ताब्यात सीरियातील अनेक महत्त्वाची शहरं आहेत.
विशेष महत्त्वाची बाब म्हणजे हा झेंडा तालिबानच्या झेंड्यासारखाच दिसतो. 2021 मध्ये अफगाणिस्तान ताब्यात गेल्यानंतर तालिबाननं फडकावला होता, त्या झेंड्याशी याचं साधर्म्य आहे.

फोटो स्रोत, Getty Images
सीरियाचे माजी राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांची राजवट हटवून हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) आणि इतर सशस्त्र बंडखोर गटांनी 8 डिसेंबरला सीरियावर नियंत्रण मिळवलं होतं.
या बंडखोर गटांनी नोव्हेंबरच्या शेवटी वायव्य सीरियामधील इदलिब प्रांतातील आपल्या बालेकिल्ल्यातून सीरियाची राजधानी असलेल्या दमास्कस च्या दिशेनं आगेकूच केली होती.
दमास्कस बंडखोरांच्या हाती आल्यापासून हयात तहरीर अल-शाम (एचटीएस) चे प्रमुख अबू मोहम्मद अल-जुलानी हे सीरियातील नागरिकांनी घाबरण्याचं कारण नाही, असा विश्वास देण्याचा प्रयत्न करत आहेत. नागरिकांनी भवितव्याबद्दल निर्धास्त राहण्यास ते सांगत आहेत.


अबू मोहम्मद अल-जुलानी यांना अहमद अल-शरा या नावानं देखील ओळखलं जातं.
त्यांनी लोकांना आश्वासन दिलं आहे की सीरियातील सरकार देशातील विविध अल्पसंख्यांक समुदायांना सामावून घेत काम करेल. तसंच सीरियातील नवं सरकार कोणत्याही विरोधी गटावर अत्याचार करणार नाही.
सीरियामध्ये इस्लामिक नियम लागू करणारं सरकार येण्याची म्हणजे सीरियामध्ये इस्लामी व्यवस्था लागू होण्याची भीती सीरियातील नागरिकांनी बाळगण्याची गरज नाही, असं सांगण्याचा प्रयत्न अबू मोहम्मद अल-जुलानी करत आहेत. ते याबाबतीत लोकांना निर्धास्त करण्याचा प्रयत्न करत आहेत.
मात्र, आता हंगामी पंतप्रधानांच्या पहिल्याच बैठकीत पांढऱ्या रंगाच्या झेंड्याच्या उपस्थितीमुळे सीरियातील लोकांमध्ये एक नवीन चर्चा सुरू झाली आहे. ती म्हणजे हा पांढरा झेंडा सीरियाच्या राजकीय भवितव्याबद्दल काय सांगतो?

फोटो स्रोत, Reuters
सीरियामध्ये राग आणि भीती
फरास केलानी सीरियातील बीबीसी प्रतिनिधी आहेत. त्यांनी सांगितलं की, या घटनेमुळे म्हणजे पंतप्रधानांच्या अधिकृत बैठकीत पांढऱ्या रंगाचा झेंडा दिसल्यानं सीरियातील 'अनेक लोकांना धक्का बसला आहे.'
केलानी म्हणतात, "यातून लक्षात येतं की, सीरियातील नवं सरकार तालिबान मॉडेलनुसार काम करू शकतं आणि शरिया कायद्याच्या आधारे सीरियाला एक इस्लामी देश बनवू शकतं."
काही लोकांनी याबद्दलची आपली निराशा सोशल मीडियावर व्यक्त केली.
सीरियातील राजकीय कार्यकर्ते आणि पत्रकार रामी जर्राह म्हणाले की "हंगामी पंतप्रधान मोहम्म्द अल-बशीर सीरियातील नागरिकांना उद्देशून भाषण करत होते, तेव्हा त्यांच्या मागे इस्लामी झेंडा दिसणं ही बाब अपमानास्पद आहे."
त्यांनी एक्स या सोशल मीडिया व्यासपीठावर लिहिलं, "हंगामी सरकारचे प्रमुख इस्लामी झेंड्यासोबत सीरियातील लोकांना उद्देशून भाषण का करत आहेत? त्यांनी सीरियातील सर्व धर्माच्या समुदायाच्या नागरिकांचं प्रतिनिधित्व केलं पाहिजे. हा आम्हा सर्वांचाच अपमान आहे."
पत्रकार निदाल अल-अम्मारी यांनी एक्सवर लिहिलं, "आम्ही बाथ पार्टीकडून बरंच काही शिकलो आहोत आणि आता आम्हाला अराजकतेच्या दुसऱ्या पर्वात प्रवेश करायचा नाही."
मात्र, त्याचबरोबर सीरियातील अनेक लोक असे देखील आहेत, ज्यांना तो पांढऱ्या रंगाचा झेंडा फडकावण्यात येण्यामध्ये 'काहीही वावगं' वाटत नाही.
अशा लोकांना वाटतं की सीरियातील नवं सरकार अफगाणिस्तानमधील तालिबानी मॉडेलनुसार काम करणार आहे, असा या झेंड्याचा अर्थ होत नाही.
तालिबानी झेंडा आणि त्याच्याशी निगडीत चिंता
अफगाणिस्तानची सत्ता हाती असणारा तालिबान, कट्टरतावादी सुन्नी आणि जिहादी विचारसरणीला मानतं. 1996 पासून तालिबान अधिकृतपणे आणि औपचारिकपणे कलमा तैयबासोबत एका पांढऱ्या झेंड्याचा वापर करत आलं आहे.
सीरियातील एचटीएस हा बंडखोर गट देखील काही काळापासून या झेंड्याचा वापर करतो आहे. इदलिबमधील सरकारी इमारतींवर हा झेंडा फटकताना दिसतो आहे. इदलिब बऱ्याच काळापासून एचटीएसच्या नियंत्रणाखाली होतं.
मात्र एचटीएस आणि तालिबान यांचा झेंडा एकच आहे. तालिबान सरकारमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं बीबीसीला सांगितलं की, दोन्ही संघटनांनी या झेंड्याचा स्वीकार केला आहे. कोणीही एकमेकांची नक्कल केलेली नाही.
सीरियामध्ये हयात तहरीर अल-शाम या बंडखोर गटाला मिळालेल्या राजकीय आणि लष्करी यशाबद्दल अफगाणिस्तानातील तालिबान सरकार आनंद व्यक्त करतं आहे. तालिबानच्या अधिकाऱ्यांनी आशा व्यक्त केली आहे की आता सीरियामध्ये 'इस्लामी सरकार' स्थापन होईल.
अफगाणिस्तानात तालिबान आणि त्यांच्या काही सहकाऱ्यांच्या समर्थकांनी सीरियाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना सत्तेतून हटवल्याचा आनंद साजरा करण्यासाठी अनेक मोर्चे काढले आणि मिठाईचं वाटप केलं.
तालिबान आणि एचटीएस यांच्यात एकप्रकारची 'वैचारिक समानता' आहे. या कारणामुळेच बहुधा अफगाणिस्तान तालिबान सीरियातील बंडखोर गटांना पाठिंबा देताना दिसतं आहे.

फोटो स्रोत, AFP
अफगाणिस्तानच्या राष्ट्राध्यक्ष कार्यालयात काम करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं एक्स अकाऊंटवर लिहिलं आहे की, "काबूल (अफगाणिस्तान) आणि दमास्कस (सीरिया) या दोन्हींची कहाणी एकच आहे. दोन्ही देशांमधील सरकार उलथवून टाकण्यात आलं. दोन्ही देशांमध्ये बंडखोरांनी सत्ता हस्तगत केली. शिवाय दोन्ही देशातील सत्ताधीश देश सोडून पळून गेले."
गेल्या आठवड्यात अल-जुलानी यांनी सीएनएनला एक मुलाखत दिली होती. त्यावेळेस देखील त्यांच्यामागे हाच पांढरा झेंडा दिसला होता.
या मुलाखतीत त्यांनी सांगितलं की, सीरियातील लोकांनी इस्लामिक व्यवस्थेची भीती बाळगू नये. त्यांनी आश्वासन दिलं की सीरियातील सर्व समुदायांना नव्या सरकारमध्ये प्रतिनिधित्व दिलं जाईल.
ताहम अल तमिमी, सीरियात लढत असलेल्या इस्लामिक बंडखोर गटांचे तज्ज्ञ आहेत. त्यांनी बीबीसीला सांगितलं की, पांढऱ्या झेंड्याच्या वापरातून लक्षात येतं की एचटीएसला सीरियातील इस्लामी राजवटीचं प्रतिनिधित्व करायचं आहे.
त्यांनी सांगितलं की, "हा झेंडा एचटीएसच्या दीर्घकाळापासून असलेल्या भूमिकेशी अनुरूप आहे. एचटीएस स्वत:ला सीरियातील सुन्नी लोकांचं प्रतिनिधी मानतं."
मात्र तमिमी म्हणतात, "ज्याप्रमाणे अफगाणिस्तानात तालिबान मॉडेल आहे, तसं मॉडेल किंवा तशी राज्यव्यवस्था सीरियामध्ये लागू करणं एचटीएस साठी कठीण असेल. कारण सीरियन समाज, मुलींना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवणं किंवा इस्लामी व्यवस्थेनुसार सरकार स्थापन करण्यासारख्या गोष्टींचा स्वीकार करत नाही. असे निर्बंध निवडणूक प्रक्रियेत अडथळा निर्माण करतात."
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन)











