सीरियन बंडखोरांनी उद्ध्वस्त केली बशर असद यांच्या वडिलांची कबर

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जारोस्लाव लुकिव्ह आणि सेहर असफ
- Role, बीबीसी न्यूज
सीरियन बंडखोरांनी परागंदा झालेले राष्ट्राध्यक्ष बशर अल असद यांचे वडील हाफेज अल असद यांची कबर उद्ध्वस्त केली आहे. ही घडामोड बशर यांच्या मूळगावात झाली आहे.
हे गाव सीरियाच्या वायव्येस लॅटकिया प्रांतात किनारपट्टीवर असून त्याचं नाव करदाहा असं आहे. या गावातल्या बशर यांच्या कुटुंबाच्या स्मशानभूमीत लोक घोषणा देत घुसल्याचं आणि तिथं जाळपोळ केल्याचं व्हीडिओत समोर आलं आहे. या व्हीडिओची सत्यता बीबीसीनं पडताळली आहे.
बंडखोरांच्या हयात तहरिर अल शाम म्हणजेच एचटीएस गटानं संपूर्ण सीरियात विद्युतगतीनं हालचाली करत गेली 54 वर्षं सीरियावर राज्य करणाऱ्या असदशाहीला उलथवून टाकलं. त्यामुळे राष्ट्राध्यक्षांना त्यांच्या कुटुंबासह रशियात आश्रय घ्यावा लागला आहे.
सीरियामध्ये या घडामोडीनंतर आनंद व्यक्त केला जात आहे. बशर आणि त्यांचे वडील हाफेज यांची चित्रं देशभरात जाळली जात आहेत.
इतर प्रमुख घटना
इराणचे सर्वोच्च नेते अयातोल्ला अली खामेनी यांनी असद सरकार पडण्यामागे अमेरिका आणि इस्रायल असल्याचा आरोप केला असून सीरियाचा एक अनामिक शेजारी देशही यामागे असल्याचं म्हटलं आहे.
इस्रायलने सीरियाच्या लष्करी तळांवर हल्ले सुरू ठेवले असून, रविवारपासून इस्रायलने 350 हवाई हल्ले केले आहेत.

फोटो स्रोत, Getty Images
जे बंडखोर सीरियाचा बहुतांश ताबा घेऊन बसले आहेत त्यांना इस्रायलवर हल्ला करण्याचं कोणतंही साधन उपलब्ध असता कामा नये अशी भूमिका इस्रायलने मांडली आहे आणि अरब देशांनी इस्रायलच्या या भूमिकेवर टीका केली आहे.
सीरियन बंडखोरांनी आपण तेलसमृद्ध प्रांतातील देर अल झोर शहर कुर्दिश बंडखोरांच्या ताब्यातून मिळवल्याचा दावा केला आहे.
2011 साली सीरियात झालेल्या गृहयुद्धसदृश बंडाला बशर अल असद यांनी अतिशय क्रौर्यानं चिरडून टाकलं होतं. तेव्हा जवळपास पाच लाख लोकांचे प्राण गेले होते आणि 1 कोटी 20 लाख लोकांना आपली घरं सोडून पळून जावं लागलं होतं.
हाफेज अल असद यांनी सीरियावर अशाच क्रुरपणे 1971 पासून आपल्या मृत्यूपर्यंत राज्य केलं होतं. 2000 सालापासून त्यांचा मुलगा सीरियावर राज्य करू लागला.
असद कुटुंब ज्या अलावाइट समुदायातील आहे, तो सीरियातील सर्वात वंचित समुदायांपैकी एक होता. आर्थिक स्थिती बिकट असल्यामुळे त्या समुदायातील अनेकजण सीरियन सैन्यात भरती झाले होते.
एक लष्करी अधिकारी आणि बाथ पार्टीचे कट्टर समर्थक म्हणून हाफिझ अल-असद नावलौकिकाला आले. 1966 मध्ये ते सीरियाचे संरक्षण मंत्री झाले.
त्यानंतर हाफिझ अल-असद यांनी आपलं स्थान अधिक बळकट केलं आणि 1971 मध्ये ते सीरियाचे राष्ट्राध्यक्ष झाले. तेव्हापासून 2000 मध्ये त्यांचा मृत्यू होईपर्यंत ते सीरियाच्या राष्ट्राध्यक्षपदी होते.
हाफिझ अल-असद इतका काळ सत्तेत राहणं ही एक उल्लेखनीय बाब होती. कारण सीरियाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरच्या काळात अनेक लष्करी उठाव झाले होते. इतका प्रदीर्घ काळ कोणालाही सत्तेत राहता आलं नव्हतं.
सीरियाच्या सत्तेवर त्यांची पोलादी पकड होती. त्यांनी विरोध दडपून टाकला आणि लोकशाही मार्गानं निवडणुका नाकारल्या.
परराष्ट्र धोरणात मात्र त्यांनी व्यावहारिकता दाखवली. एका बाजूला सोविएत युनियनबरोबर मैत्री करत ते दुसऱ्या बाजूला 1991 च्या आखाती युद्धाच्या वेळेस अमेरिकेच्या नेतृत्वाखालील आघाडीमध्ये देखील सहभागी झाले.


एचटीएसचे प्रमुख अबू मोहम्मद अल जुलानी (यांनी आता मूळ नाव अहमद अल शारा नाव वापरायला सुरुवात केली आहे) हे पूर्वाश्रमीचे जिहादी होते. मात्र त्यांनी 2016 साली अल कायदाशी असलेले संबंध तोडले. सीरियातल्या विविध गटांचं, धार्मिक पंथांना आपण सामावून घेऊ असा शब्द त्यांनी दिला आहे.
हा शब्द बंडखोरांनी सत्यात आणावा अशी अपेक्षा संयुक्त राष्ट्राच्या सीरियातल्या चमूने व्यक्त केली आहे.
जोपर्यंत अल्पसंख्यांकांचा सन्मान होतोय असं दिसतंय आणि सुयोग्य पद्धतीनं अस्तित्व राखलं जाताना दिसतंय तोपर्यंत आपण सीरियाच्या नव्या सरकारला पूर्ण पाठिंबा देत राहू असं अमेरिकेच्या गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.
एचटीएसने मोहम्मद अल बशीर यांना काळजीवाहू सरकारचं प्रमुख बनवलं आहे.
मंगळवार 10 डिसेंबररोजी दमास्कस येथे झालेल्या बैठकीचं अध्यक्षपद त्यांनी भूषवलं. त्यामध्ये असद यांच्या मंत्रिमंडळातील लोक आणि नव्या मंत्रिमंडळातील लोक होते, त्यात कार्यभार सोपवण्याबद्दल चर्चा झाली.
असदशाही संपल्यावर लोकांनी आता 'स्थैर्य आणि शांतता' अनुभवण्याचा काळ आला आहे असं ते म्हणाले.
दमास्कसमध्ये परिस्थिती मूळ पदावर येत असल्याचं बीबीसी वार्ताहरानं सांगितलं आहे. दुकानं उघडली जात असून लोक आपापल्या कामावर परतत आहेत.
दमास्कसच्या एका चॉकलेट दुकानात काम करणाऱ्या जाऊद इन्सानी हिने बीबीसीशी बोलताना, "आपण कोणत्याही भयाविना दुकान सुरू करत आहोत", असं सांगितलं आणि दुकानात येणाऱ्या ग्राहकांतही बदल तिला जाणवल्याचं ती सांगते.
'आता कोणाचीही दहशत नसल्यामुळे', आम्ही दुकान सुरू केलं असं ती सांगते.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.











