सीरियाच्या सत्तेचे अनेक दावेदार, असद यांच्यानंतर कोणाच्या हाती येणार सत्ता

सीरिया

फोटो स्रोत, Reuters

फोटो कॅप्शन, बशर अल-असद यांनी रशियात पलायन केल्यानंतर सीरियातील अनेक शहरांमध्ये लोकांनी आनंद व्यक्त केला
    • Author, लीज डुसेट
    • Role, प्रमुख आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी, बीबीसी न्यूज

'इस्लामिक कट्टरतावाद्यांच्या हाती सीरियाची सत्ता आल्यामुळे ते चिंताग्रस्त आहेत.'

शनिवारी (7 डिसेंबर) संध्याकाळी दोहामध्ये अरब देशांचे परराष्ट्र मंत्री जमले होते. एका सूत्रानं त्यांच्या मन:स्थितीबद्दल हे वक्तव्य केलं होतं. सीरियामध्ये अराजकता निर्माण होऊ नये आणि हिंसाचाराचं सत्र सुरू होऊ नये, यावर चर्चा करण्यासाठी हे मंत्री जमले होते.

याच्या काही तासांनंतरच सीरियाचं सरकार उलथवून टाकणाऱ्या बंडखोरांच्या गटांचं नेतृत्व करणाऱ्या शक्तिशाली इस्लामिक गटानं जाहीर केलं होतं की बंडखोरांनी सीरियाच्या राजधानीवर नियंत्रण मिळवलं आहे.

हयात तहरीर अल-शाम (एचटीएस)चे नेते अबू मोहम्मद अल जुलानी यांनी 'दमास्कस ताब्यात' घेतल्याचं जाहीर केलं.

आता ते आपल्या टोपणनावाऐवजी अहमद अल-शारा या आपल्या खऱ्या नावाचा वापर करत आहेत. राष्ट्रीय पातळीवर त्यांची प्रतिमा उंचावल्याचं आणि ते मोठी भूमिका बजावत असल्याचं ते एक चिन्ह आहे.

ग्राफिक्स
ग्राफिक्स

एचटीएस एकटीच सत्तेची दावेदार नाही

अर्ध्या शतकाहून अधिक काळ सीरियात असलेल्या असद कुटुंबाच्या हुकुमशाही राजवटीचा शेवट झाल्यानंतर, आता ही बाब निश्चित झाली आहे की सीरियातील नव्या परिस्थितीत एचटीएसचे प्रमुख जुलानी यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

मात्र संयुक्त राष्ट्रसंघ आणि पाश्चात्य देशांनी एचटीएसवर निर्बंध लादलेले आहेत. अशा स्थितीत सीरियातील वेगानं बदलणाऱ्या परिस्थितीत जुलानी हे एकटेच दावेदार नाहीत.

युरोपियन इन्स्टिट्यूट ऑफ पीस मध्ये काम करणाऱ्या वरिष्ठ सीरियन सल्लागार मेरी फोरेस्टियर यांनी सीरियातील परिस्थितीबाबत सावध भूमिका घेत सांगितलं की, "अद्याप सर्व कहाणी संपलेली नाही."

दरवर्षी होणाऱ्या दोहा फोरमध्ये भाग घेणाऱ्या मेरी आणि सीरियावर लक्ष ठेवून असलेल्या इतर जाणकारांचं म्हणणं आहे की दमास्कसमध्ये आणखी एक बंडखोर गट शिरला होता आणि शहरातील लोकांबरोबर त्यांचा चांगला ताळमेळ होता.

अलीकडेच या गटाला सदर्न ऑपरेशन्स रूम असं नाव देण्यात आलं होतं.

दमास्कस

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, रविवारी (8 डिसेंबर) असद सरकार हटवलं गेल्यानंतर दमास्कसमध्ये जल्लोष सुरू झाला

या बंडखोर गटातील बहुतांश सैनिक फ्री सीरियन आर्मी (एफएसए) चे माजी सदस्य आहेत. 2011 मध्ये झालेल्या आंदोलनाच्या वेळेस त्यांनी पाश्चात्य देशांसोबत काम केलं होतं.

फोरेस्टियर म्हणतात की, "हा खेळ आता सुरू झाला आहे."

सीरियामध्ये मोठ्या वेगानं घटना घडल्यानंतर रस्त्यांवर जल्लोष झाला होता आणि त्याचबरोबर पुढे काय होणार हा गंभीर प्रश्न देखील निर्माण झाला होता, त्या वातावरणाला पुष्टी देणारा त्यांचा मुद्दा आहे.

हयात तहरीर अल-शाम हा इस्लामिक कट्टरतावादी गट आश्चर्यकारक वेगानं एकेक भाग ताब्यात घेत पुढे सरकला. त्यांना फारशा विरोधाला तोंड द्यावं लागलं नाही.

यामुळे सीरियातील इतर भागांमध्ये इतर उर्वरित बंडखोर गट आणि स्थानिक सशस्त्र गटांची संख्या देखील वाढली. या गटांना त्यांच्या भागात सत्तेत वाटा मिळण्याची आशा आहे.

बंडखोरांसमोर एकजूट राखण्याचं आव्हान

थॉमस जूनोव्ह कॅनडातील ओटावा विद्यापीठात पश्चिम आशियाचे तज्ज्ञ आहेत. ते देखील दोहामधील बैठकीला उपस्थित होते.

जूनोव्ह म्हणतात, "असद सरकारच्या विरोधातील लढाईनं या बंडखोर गटांना एकत्र ठेवण्यासाठी गोंद किंवा डिंकाचं काम केलं. मात्र आता बशर अल-असद यांनी सीरियातून पलायन केलं आहे, त्यांची राजवट संपली आहे."

"त्यामुळे सद्यस्थितीत असद सरकार उलथवून टाकताना बंडखोरांची जी एकजूट महत्त्वाची ठरली ती एकजूट कायम राखण्याचं आव्हान आता सीरियातील बंडखोर गटांसमोर आहे."

सीरियातील बंडखोर गटांमध्ये तुर्कीचा पाठिंबा असलेल्या गटांची आघाडी देखील आहे. या आघाडीला सीरियन नॅशनल आर्मी म्हणून ओळखलं जातं.

सीरिया

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, एचटीएसप्रमाणेच काही बंडखोर गटांनी सीरियाचा वेगवेगळा प्रदेश आपापल्या ताब्यात घेतला आहे

एचटीएस प्रमाणेच वायव्य सीरियातील एक भाग त्यांच्या नियंत्रणाखाली आहे.

सीरियाच्या ईशान्य भागात कुर्दिश सीरियन डेमोक्रॅटिक फोर्स (एसडीएफ) चं वर्चस्व आहे. या बंडखोर गटानं अलीकडच्या काळात आपल्या वर्चस्वाखालील भाग वाढवला आहे.

अबू मोहम्मद जुलानीबाबत सावध प्रतिक्रिया

सीरियात सत्ताबदल होत असताना एचटीएसचा महत्वाकांक्षी आणि हाय प्रोफाईल प्रमुख सर्वाधिक चर्चेत आला आहे. त्यांची विधानं आणि इतिहास यावर आता सीरियातील लोक, शेजारील देश आणि इतर लोकांचं लक्ष आहे.

ज्या बंडखोर गटाचे ते प्रमुख आहेत, तो गट सर्वात आधी अल-कायदाचा सहकारी गट म्हणून समोर आला होता.

मात्रत 2016 मध्ये त्यांनी अल-कायदाची साथ सोडली आणि तेव्हापासूनच एचटीएसच्या प्रमुखाचे स्वत:ची प्रतिमा सुधारण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

अनेक वर्षांपासून ते परदेशात तडजोडीचे संदेश पाठवत आहेत. आता ते सीरियातील अनेक अल्पसंख्यांक समुदायांना हा विश्वास देत आहेत की या परिस्थितीत त्यांनी चिंता करण्याची आवश्यकता नाही.

फोरेस्टियर म्हणतात, "त्यांच्या या संदेशाचं सावधपणेच स्वागत होतं आहे. मात्र त्यांची आठ वर्षांची निरंकुश सत्ता आणि त्यांची पार्श्वभूमी आपल्याला विसरता येणार नाही."

अबू मोहम्मद जुलानी

फोटो स्रोत, AREF TAMMAWI/AFP VIA GETTY IMAGES

फोटो कॅप्शन, अबू मोहम्मद जुलानी सीरियातील हयात तहरीर अल-शाम संघटनेचे नेते आहेत
Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

एचटीएसनं सीरियाच्या उत्तरेकडील इदलिब मध्ये आपला अंमल प्रस्थापित केला होता आणि त्याला त्यांनी साल्वेशन गव्हर्नमेंट असं नाव दिलं होतं. या शासनाअंतर्गत मर्यादित धर्म स्वातंत्र्य होतं. तसंच या कालावधीत दडपशाहीचे मार्ग देखील अवलंबण्यात आले.

अलेप्पो हे सीरियातील दुसरं सर्वात मोठं शहर आहे. अचानक हल्ला चढवून एचटीएसनं हे शहर अतिशय वेगानं ताब्यात घेतलं होतं. तिथे एचटीएसचे सैनिक हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत की राज्य करण्यासाठी ते सर्वात योग्य आहेत.

हा गट इराकसारख्या शेजारी देशांना, त्यांच्या सीमेपर्यंत हे युद्ध विस्तारणार नाही याचं आश्वासन देणारे संदेश पाठवतो आहे.

जॉर्डनसह इतर शेजारी देशांना या गोष्टीची चिंता वाटते आहे की शेजारच्या सीरियामध्ये इस्लामिक कट्टरतावाद्यांना मिळालेल्या यशामुळे, त्यांच्या देशातील असंतुष्ट कट्टरतावादी गटांना प्रोत्साहन मिळू शकतं.

तुर्की सीरियामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार हे निश्चित आहे. मात्र तुर्कीला देखील या परिस्थितीची चिंता वाटते आहे. तुर्की एसडीएफ या गटाला दहशतवादी संघटना मानतो. या गटाचा संबंध तुर्कीमध्ये बंदी असलेल्या पीकेके कुर्दिश गटाशी आहे.

जर तुर्कीच्या राष्ट्रीय हितांना बाधा निर्माण झाली तर ते लष्करी आणि राजकीय दृष्ट्या सीरियामध्ये हस्तक्षेप करण्यास संकोच करणार नाहीत. अनेक वर्षांपासून ते असं करत आले आहेत.

रशियाचे परराष्ट्र मंत्री सेर्गेई लावरोव यांनी शनिवारी (7 डिसेंबर) दोहा फोरममध्ये सांगितलं होतं की त्यांनी ज्या गटाला (एचटीएस) दहशतवादी घोषीत केलं आहे, त्या गटानं सीरियाची सत्ता हस्तगत करणं त्यांना 'मान्य नाही'.

मात्र संध्याकाळी सीरियासाठीचे संयुक्त राष्ट्रसंघाचे विशेष दूत गेर पेडरसन यांनी मला सांगितलं की दोहा फोरममध्ये सीरियातील 'बदललेल्या वास्तवाबद्दल नवीन आकलन होतं.'

दमास्कस

फोटो स्रोत, EPA

फोटो कॅप्शन, राष्ट्राध्यक्ष बशर अल-असद यांना सत्तेतून हटवल्यानंतर दमास्कसमध्ये आनंदाचं वातावरण आहे, मात्र त्याचबरोबर भविष्यासंदर्भात चिंता देखील आहे

सीरियातील ताज्या घडामोडींमुळे निराश झालेले, इराण आणि रशिया हे राष्ट्राध्यक्ष असद यांचे माजी खंदे पाठीराखे देश देखील आता एक सर्वसमावेशक राजकीय प्रक्रिया सुरू करण्याचं आवाहन करत आहेत.

पेडरसन यांच्या बोलण्यातून असंच वाटलं.

दोहा मधील बैठकीनंतर ते म्हणाले, "या काळ्या प्रकरणानं खोल जखमा झाल्या आहेत. मात्र आज आम्ही, सीरियातील सर्व लोकांसाठी शांतता, सलोखा आणि सन्मानाच्या एका नव्या अध्यायाची आशा करत आहोत."

जेव्हा ते बोलत होते तेव्हा सीरियाशी संबंधित ताजी बातमी मिळण्याच्या आशेनं वरिष्ठ मुत्सद्दी, विद्वान आणि जगभरातील अधिकाऱ्यांची बैठकीच्या हॉलमध्ये गर्दी झालेली होती.

सीरियात भविष्यात कशाप्रकारचं सरकार सत्तेत येईल याबद्दल कोणत्याही तज्ज्ञाला घाईघाईनं काहीही बोलायचं नाही.

एका पाश्चात्य मुत्सद्द्याला जेव्हा विचारण्यात आलं की इस्लामिक कट्टरतावादी सीरियात प्रमुख भूमिकेत आहेत. त्याबद्दल काही चिंता आहे का, त्यावर त्यांनी उत्तर दिलं की, "सध्या आम्हाला त्याबाबत विचार करायचा नाही. ज्या एचटीएसनं आतापर्यंत रक्तपात न करता सत्तांतर केलं आहे, त्यांच्याशी आम्ही आताच चर्चा करण्यास सुरूवात केली आहे."

जुनोव्ह या मुद्द्याशी सहमत आहेत. ते म्हणाले, "सध्या पुरतं, गेल्या काही दशकांमधील सर्वात क्रूर सरकारांपैकी एका सरकारच्या ऐतिहासिक पतनाचं फक्त कौतुक करणंच योग्य आहे."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.