बिहारमध्ये आता ‘मुघल’ पुस्तकांसोबतच जातीच्या यादीतूनही बाहेर

मुघल, बिहार

फोटो स्रोत, SEETU TIWARI/BBC

    • Author, सीटू तिवारी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी

राष्ट्रीय शिक्षण संशोधन आणि प्रशिक्षण (NCRT) परिषदेच्या बारावी इयत्तेच्या पुस्तकांमधून मुघलांचा इतिहास हटवल्यानंतर आता बिहारच्या जातनिहाय जनगणनेतूनही ‘मुघल’ गायब झालेत.

‘मुघल’ बिहारमधील मुस्लिमांमधील प्रमुख जातीत मोडतात. 15 एप्रिलपासून सुरू होणाऱ्या जातनिहाय जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्यातून ‘मुघल’ गायब झालेत.

बिहारच्या दरभंगातील बेनीपूर विधानसभा मतदारसंघातील जदयूचे आमदार विनय कुमार चौधरी यांनी या संदर्भात बिहार विधानसभा सचिवांना पत्रही लिहिलंय.

बीबीसीशी बोलताना जदयूचे आमदार विनय कुमार म्हणतात की, “दरभंगातील जाले गावातच यांची लोकसंख्या जवळपास 10 हजार आहे. यांना मुघल जातीच्या नावानेच जातप्रमाणपत्र, खतियान (एखाद्याची वैयक्तिक, तसंच संपत्ती इत्यादी गोष्टींची सगळी माहिती असलेलं प्रमाणपत्र) मिळत आहे.”

ते म्हणतात की, “जाले ब्लॉकच्या पदाधिकाऱ्यांनी मुघल जातीचं नाव जातनिहाय जनगणनेच्या यादीत समावेश करण्याबाबत कुठलंही निवेदन संबंधित विभागाला दिलं नाही. त्यामुळे मी बिहार विधानसभेत निवेदन दिलं होतं, जे स्वीकारलं गेलं आणि निवेदन समितीकडे पाठवण्यात आलंय.”

दरभंगाचे जिल्हाधिकारी राजीव रोशन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं की, “या प्रकरणाची मला कल्पना आहे आणि सध्या संबंधित विभागासोबत हे निश्चित झालंय की, जातनिहाय जनगणनेत ‘अन्य’ कॅटेगरीत ‘मुघल’ जातीचा उल्लेख केला जाईल आणि नंतर त्याआधारे त्यांच्या संख्येची गणती होईल.”

अतहर इमाम बेग

फोटो स्रोत, ATHAR IMAM BEG

फोटो कॅप्शन, अतहर इमाम बेग

हे प्रकरण काय आहे?

बिहारमध्ये जातनिहाय जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू होतंय. या टप्प्यात सरकार जातीय कोडिंग करेल, ज्यासाठी सामान्य प्रशासन विभागाने राज्याच्या 214 जातींचे कोड जारी केले आहेत, तर ‘अन्य’साठी कोड संख्या 215 आहे.

जातींच्या या कोडिंगमध्ये ‘मुघल’ जातीचा समावेश केला गेला नाही.

जाणाकारांच्या माहितीनुसार, दरभंगा, समस्तीपूर, सीतामढी, सिवानसोबत सीमांचलच्या अनेक भागात मुघल जातीच्या लोकांची वस्ती आहे.

मुघल जातीचे लोक आपलं आडनाव ‘बेग’ असं लावतात.

दरभंगाच्या जाले भागात मुघल समाजाची मोठी संख्या आहे आणि तिथे अतहर इमाम बेग मुघल आहेत. ते जदयूच्या जाले यूनिटचे प्रखंड अध्यक्ष आहेत.

बीबीसीशी बोलताना अतहर इमाम बेग म्हणतात की, “आमचे खतियान, जात प्रमाणपत्र अशा सर्व कागदपत्रांवर मुघल लिहिलंय, मात्र सरकारनंचे त्याचा समावेश केला नाहीय.”

“अशावेळी आम्हाला भीती आहे की, आर्थिकदृष्ट्या मागास असल्यानं 10 टक्के आरक्षण मिळतं, तेही धोक्यात येईल की काय!”

मुघल, बिहार

फोटो स्रोत, SEETU TIWARI/BBC

‘विनाकारण राईचा पर्वत करतायेत...’

या लोकांकडे जे जुने कागदपत्रं आहेत, त्यांवर जात ‘मुघल’ लिहिलीय. जातप्रमाणपत्रांवरही ‘मुघल’ लिहिलंय.

बिहारच्या मुंगेर शहरातही ‘मुघल बाजार’ आहे. मुंगेरच्या अनेक मोहल्ले आणि बाजारांची नावं ऐतिहासिक आहेत. तोपखाना, बेलन बाजार, चुआ बाग इत्यादी.

जाणकार सांगतात की, पूर्वी यांचा संबंध महाजनी प्रथेशीही होता. म्हणजे हे लोक एका निश्चित व्याजावर कर्ज देत असत. मात्र, नंतर बँकिंग व्यवस्था सक्षम झाल्यानंतर त्यांनी आपला व्यवसाय बदलला आणि वेगवेगळ्या व्यवसायात गेले.

मात्र, मुघल समाजातील काही लोक या सगळ्याला उगाचच तयार केलेला वाद म्हणत आहेत. काही निवृत्त सरकारी अधिकारी नाव न छापण्याच्या अटीवर म्हणाले की, “हे विनाकारण सुरू आहे. सरकारनं सांगितलंय ना की, ‘अन्य’मध्ये मुघलांना समाविष्ट केले जाईल. मग राईचा पर्वत करण्याचं कारण काय?”

मुघल जातीचं मूळ

Skip podcast promotion and continue reading
बीबीसी न्यूज मराठी आता व्हॉट्सॲपवर

तुमच्या कामाच्या गोष्टी आणि बातम्या आता थेट तुमच्या फोनवर

फॉलो करा

End of podcast promotion

प्रसिद्ध इतिहासकार इम्तियाज अहमद म्हणतात, “मध्ययुगीन काळात ताजिकिस्तान आणि उझबेकिस्तानमधून स्थायिक झालेल्या लोकांना मुघल म्हटले जाऊ लागले. बाबर त्यांच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा होता.”

ते म्हणतात, जे स्वत:ला या लोकांशी संबंधित समजत होते, त्यांनाही मुघल म्हटले जाऊ लागले. म्हणजेच पूर्वी मुघल ही जात नसून कालांतराने त्यांची जात बनली.”

जातीय जनगणनेत मुघल जातीचा समावेश न केल्याबद्दल संताप व्यक्त करणाऱ्या दरभंगाचा इतिहास मुघल साम्राज्याच्या संदर्भातही महत्त्वाचा आहे.

शेवटचा मुघल सम्राट बहादूर शाह जफरचा नातू मिर्झा मोहम्मद रईस बख्त जुबैरुद्दीन 'गोर्गन' याची कबर आहे. झुबैरुद्दीन हा बहादूर शाह जफरचा मोठा मुलगा मिर्झा मुहम्मद दारा बख्त यांचा मुलगा होता.

झुबैरुद्दीनने देशाच्या विविध भागात प्रवास केला, परंतु दरभंगाचे महाराजा लक्ष्मीश्‍वर सिंग यांच्या नम्रतेने आणि आदरातिथ्याने प्रभावित होऊन त्यांनी दरभंगामध्येच राहण्याचा निर्णय घेतला. या सर्व गोष्टींचा उल्लेख झुबैरुद्दीनने आपल्या 'मौज-ए-सुलतानी' या पुस्तकात केला आहे.

दरभंगाच्या इतिहासावर संशोधन करणारे मंझर सुलेमान म्हणतात, "हे लोक दोन टप्प्यांत बिहारमध्ये आले. पहिला प्लासीच्या लढाईनंतर आणि दुसरा 1857 च्या क्रांतीमध्ये मुघल साम्राज्याच्या पतनानंतर."

सुलेमान म्हणतात, "लोक येथे आले आणि समस्तीपूरच्या जुन्या दरभंगा, भालपट्टी, बेगमपूरच्या आसपास स्थायिक झाले. मी स्वतः या लोकांच्या घरात 80 च्या दशकापर्यंत तलवारी, भाले इत्यादी पाहिले आहेत. पण या योद्ध्यांनी या लोकांनी त्यांचा इतिहास लिहून ठेवला नाही.”

तृतीयपंथीय

फोटो स्रोत, Getty Images

तृतीयपंथीयही नाराज

मुस्लिम समाजातील ही नाराजी केवळ मुघल जातीपुरता मर्यादित आहे असे नाही.

'भारतातील दलित मुस्लिम'चे लेखक मोहम्मद. अयुब राईन म्हणतात की, "सच्चर समितीमध्ये नमूद केलेल्या मुस्लिमांच्या अनेक ओबीसी जातींनाही जात जनगणनेच्या यादीत ठेवण्यात आलेले नाही."

दुसरीकडे, या जात जनगणनेतील जात कोडिंगमुळे ट्रान्सजेंडरही संतापले आहेत. सरकारने किन्नर/कोठी/हिजडा/ट्रान्सजेंडर यांना जातीनुसार वर्गीकरण केले आहे, ज्यांना 22 कोड दिले आहेत.

ट्रान्सजेंडर्सच्या मुद्द्यावर काम करणाऱ्या रेश्मा प्रसाद म्हणतात, "सरकारने लिंग ओळख ही जातीय ओळख बनवली आहे, हे आर्टिकल 14, नाल्सा व्हर्सेस यूनियन ऑफ इंडिया 2014, ट्रान्सजेंडर प्रोटेक्शन राईट अॅक्ट 2019 चं उल्लंघन आहे. जर महिला आणि पुरूष या जाती नाहीत, मग ट्रान्सजेंडर जात कशी?”

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)