अमेझॉनच्या जंगलात हरवलेली व्यक्ती 31 दिवसांनी परतली; अन्नाशिवाय कसा जिवंत राहिला?

फोटो स्रोत, Reuters
- Author, व्हेनेसा बुशश्चल्युटर
- Role, बीबीसी न्यूज
आपल्या चार मित्रांसोबत अॅमेझॉनच्या जंगलात शिकारीला गेलेली एक व्यक्ती हरवते.
31 दिवसांनी जंगलातून सुखरूप परतलेल्या या व्यक्तीने नुकताच आपला वेदनादायक अनुभव शेअर केलाय. जोनाथन अकोस्टा असं या व्यक्तीचं नाव आहे.
30 वर्षीय जोनाथन अकोस्टा आपल्या 4 मित्रांसह उत्तर बोलिव्हियातील जंगलात शिकारीसाठी गेले होते. याच दरम्यान ते रस्ता चुकले आणि मित्रांपासून वेगळे झाले.
त्यांनी सांगितलं की, हरवलेल्या दिवसापासून माझा संघर्ष सुरू झाला. कधी बुटात पावसाचं पाणी जमा करून तहान भागवली तर कधी किडे मुंग्या खाऊन पोट भरलं.
अकोस्टा ज्या दिवशी बेपत्ता झाले त्या दिवसापासून सलग एक महिना मित्रमंडळी आणि नातेवाईक त्यांचा शोध घेत होते.
जवळपास एक महिन्यानंतर जोनाथन त्यांच्या मित्रांना सापडले. जोनाथनने स्वतः देखील कबूल केलंय की, लोक त्याला शोधत असतील यावर त्यांचा विश्वास नव्हता. आणि हे सांगतानाच त्यांना अश्रू अनावर झाले.
युनिटेल टीव्हीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, "या काळात मी अळ्या खाल्ल्या, किडे खाल्ले. मला जगण्यासाठी ज्या गोष्टी कराव्या लागल्या त्या सर्व गोष्टी मी केल्या. गार्गेटस म्हणून ओळखली जाणारी पपईसारखी जंगली फळे खावी लागली."
आपला जीव वाचवल्याबद्दल त्यांनी देवाचे आभार मानले.
अकोस्टा यांचे कुटुंबीय सांगतात की, अकोस्टा यांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतू जावं लागलंय. या परिस्थितीमुळे ते मानसिकदृष्ट्या खचलेले आहेत. त्यामुळे जसा वेळ सरेल तसा त्यांना त्यांचा अनुभव विचारता येतील.
31 दिवसांनी जंगलातून परतलेल्या अकोस्टांचं वजन 17 किलोने कमी झालं होतं, त्यांचा घोटाही निखळला होता. शरीरातील पाण्याची पातळी कमी झाली होती, तरीही त्यांनी धीर सोडला नाही.
होरासिओ अकोस्टा यांनी बोलिव्हियाच्या एका स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना सांगितलं की, "माझ्या भावाने चौथ्या दिवशी घोटा निखळल्याचं सांगितलं होतं. या घटनेनंतर त्याला त्याच्या जीवाची भीती वाटू लागली,"
"त्याच्या शॉटगनमध्ये फक्त एकच काडतूस शिल्लक होतं. घोटा निखळल्यामुळे त्याला नीट चालताही येत नव्हतं. त्यामुळे आता कोणीच माझा शोध घेणार नाही असं त्याला वाटलं."
जंगलात हरवलेल्या जोनाथन अकोस्टांकडे माचिस टॉर्च अशा गरजेच्या कोणत्याच गोष्टी नव्हत्या. पिण्याचं पाणी गोळा करण्यासाठी त्यांना बूट वापरावा लागला.
जॅग्वारसारख्या हिंस्त्र श्वापदांशी त्यांनी सामना केला.
त्यांचा धाकटा भाऊ सांगतो की, जंगलात हरवल्यानंतर त्याला वन्य प्राण्यांची सतत भीती वाटत होती. या जंगलात जग्वार, पेकारिस (डुकरांसारखे प्राणी) सारखे हिंस्त्र प्राणी होते. पेकारिसच्या कळपाला घाबरवण्यासाठी जोनाथनने आपलं शेवटचं काडतूस वापरलं.
सलग 31 दिवस शोध मोहीम राबविल्यानंतर जोनाथन सापडला.
300 मीटर अंतरावरून एकाने त्याला पहिलं, त्याचं लक्ष वेधून घेण्यासाठी त्याच्या दिशेने एक काटेरी झुडप फेकण्यात आलं.
होरासिओ अकोस्टा सांगतात की, तेथील चार स्थानिक लोकांनी माझ्या भावाचा शोध घेतला. यातलाच एक जण पळत पळत आमच्याकडे आला आणि आम्हाला ही माहिती दिली.
होरासिओ अकोस्टाच्या म्हणण्यानुसार, आपल्यावर ओढवलेल्या या प्रसंगानंतर जोनाथनने शिकारीचा नाद सोडण्याचा निर्णय घेतलाय. त्याने मला वचन दिलंय की, तो आता गाण्यावर लक्ष केंद्रित करेल. आणि मला वाटतं की तो हे वचन पाळेल.
दरम्यान, जोनाथन नेमका कसा वेगळा पडला याबाबत त्याच्या चारही मित्रांची चौकशी करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.











