काश्मीरमध्ये सापडलं 'व्हाईट गोल्ड', भारत आता चीनला टक्कर देईल?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, जान्हवी मुळे
- Role, बीबीसी प्रतिनिधी
काश्मीरमध्ये एका अशा खनिजाचे साठे सापडले आहेत जे येत्या काही दशकात भारताच्या विकासाला नवी गती देऊ शकतं, देशात ऊर्जा क्रांती घडवू शकतं. ते खनिज आहे लिथियम.
लाकडापेक्षाही कमी वजनाचं आणि धातूंमध्ये सगळ्यात हलकं असलेलं लिथियम तुमच्या आमच्या रोजच्या वापरातल्या काही वस्तूंमधला महत्त्वाचा भाग आहे.
फोन, लॅपटॉप्स पासून ते इलेक्ट्रिक वाहनांपर्यंत, अनेक ठिकाणी रिचार्जेबल बॅटरीमध्ये लिथियमचा वापर होतो.
मग काश्मीरमध्ये नेमकं किती लिथियम सापडलंय? त्याचा भारताला खरंच काय फायदा होईल? जाणून घेऊयात.
लिथियम आहे नव्या युगातलं 'व्हाईट गोल्ड'
लिथियमला अनेक जण नव्या जमान्यातलं सोनं किंवा व्हाईट गोल्ड असंही म्हणतात. याचं कारण आहे इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिथियम आयन बॅटरीज.
साहजिकच 2019 मध्ये लिथियम आयन बॅटरीला रसायनशास्त्राचं नोबेल मिळालं होतं.

फोटो स्रोत, Getty Images
लेड ॲसिडसारख्या धोकादायक पदार्थांनी बनलेल्या बॅटरीपेक्षा लिथियम आयन बॅटरी तुलनेनं सुरक्षित मानल्या जातात.
पुन्हा पुन्हा चार्ज करता येणाऱ्या या बॅटरींमुळे कमी वजनाच्या स्मार्टफोन्स सारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू बनवणं सोपं झालंय.
सौरऊर्जा साठवून ठेवण्यासाठीही लिथियम आयन बॅटरीज वापरल्या जातात.
पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमती आणि या जीवाश्म इंधनांमुळे वाढलेला हवामान बदलाचा धोका, यावरचा उपाय म्हणून लोक आणि जगभरातली सरकारंही इलेक्ट्रिक गाड्यांकडे वळत आहेत.
पण अशा गाड्यांची मोठ्या प्रमाणात निर्मिती करण्यासाठी तेवढं लिथियमही लागतं.
लिथियमच्या पुरवठ्यासाठी भारत सध्या ऑस्ट्रेलिया, चिली आणि अर्जेंटिनावर अवलंबून आहे. पण काश्मीरमध्ये लागलेल्या शोधांमुळे हे चित्र बदलू शकतं.
काश्मीरमधलं लिथियम किती महत्त्वाचं?
भारत सरकारने 9 फेब्रुवारीला जाहीर केलं होतं की जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाला जम्मू-काश्मीरमध्ये लिथियमचे 59 लाख टनांचे साठे सापडले आहेत.
रियासी जिल्ह्यातील सलाल हैमाना परिसरात हे साठे असल्याची माहिती भारताच्या केंद्रीय खाणकाम मंत्रालयाने दिली आहे.
द टेलिग्राफनं मात्र यासंदर्भात एक वेगळी माहिती दिली आहे. त्यांच्या वृत्तानुसार 1990च्या दशकातच जिऑलॉजिकल सर्व्हे ऑफ इंडियानं या साठ्यांचा शोध लावला होता, आणि 1999 च्या एका अहवालातही ती माहिती जाहीर केली होती. पण त्यावर पुढे संशोधन झालं नाही.

फोटो स्रोत, Getty Images
पण भारतात केवळ काश्मीरमध्येच लिथियमचे साठे आहेत, असं मात्र नाही.
2021 साली कर्नाटकमध्येही लिथियमचे छोटे साठे सापडले होते. पण आता काश्मीरमधल्या साठ्यांमुळे त्यात मोठीच भर पडली आहे.
तज्ज्ञांच्या मते या साठ्यांमुळे भारताला 2030 सालापर्यंत देशातील इलेक्ट्रिक गाड्यांची संख्या 30 टक्क्यांनी वाढवणं शक्य होणार आहे.
त्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या बाबतीत भारताने पुढे ठेवलेली उद्दिष्टं गाठणंही शक्य होऊ शकतं.
लिथियमच्या साठ्यांच्या बाबतीत आता भारत जगात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

जगात लिथियमचं सर्वातमोठं भांडार चिली मध्ये आहे जिथे 92 लाख टन लिथियमचे साठे आहेत. मग भारताखालोखाल ऑस्ट्रेलिया, अर्जेंटिना, चीन, आणि अमेरिका यांचा नंबर लागतो.
तर उत्पादन आणि पुरवठ्याच्या बाबतीत सध्या ऑस्ट्रेलिया पहिल्या स्थानावर असून त्याखालोखाल चिली, चीन, अर्जेंटिना आणि ब्राझीलचा नंबर लागतो.

भारत चीनला टक्कर देणार?
अधिकाधिक देश ‘ग्रीन एनर्जी’कडे वळत आहेत तसा लिथियमची मागणीही वाढते आहे. वर्ल्ड बँकच्या अंदाजानुसार लिथियमसारख्या खनिजांचा वापर 2050 सालापर्यंत 500 टक्क्यांनी वाढू शकतो.
याबाबतीत चीन जगात सध्या सगळ्यात पुढे आहे.
सध्या जगातील एकूण लिथियम बॅटरी उत्पादनात चीनचा वाटा 77 टक्के आहे आणि जगात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक दहा लिथियम बॅटरींपैकी चार चीनमध्ये वापरल्या जातात.
2023मध्ये चीनने बोलिवियासोबत त्यांच्या देशातील लिथियम साठ्यांचा वापर करण्यासाठी एक अब्ज अमेरिकन डॉलर्सचा करारही केला होता.
एका अंदाजानुसार बोलिव्हियातल्या 2.1 कोटी टन लिथियमचे साठे आहेत आणि ते जागतले सर्वात मोठे साठे ठरू शकतात.

फोटो स्रोत, Getty Images
आता काश्मीरमधल्या नवीन खजिन्यामुळे भारत लिथियम बॅटरी उत्पादनाच्या बाबतीत चीनला टक्कर देऊ शकतो, अशी आशा निर्माण झाली आहे.
त्यामुळेच अनेकजण काश्मीरमध्ये सापडलेल्या लिथियमला गेमचेंजर असं म्हणत आहेत.
लिथियमच्या पर्यावरणावरील परिणामाचं काय?
काश्मीर खोरं भौगोलिक, पर्यावरणीय आणि राजकीयदृष्ट्या अतिशय संवेदनशील असल्यानं या केंद्रशासित प्रदेशात खाणकामाचे वेगवेगळे पडसाद उमटू शकतात.
लिथियमच्या खाणींमुळे जम्मू काश्मीरमध्ये स्थानिकांसाठीही रोजगाराच्या नव्या संधी तयार होतील आणि बराच काळ तणावात राहिलेल्या इथल्या अर्थव्यवस्थेतही सुधारणा होईल, अशी आशा जम्मू-काश्मीरच्या खाणकाम विभागाचे प्रमुख अमित शर्मा व्यक्त करतात.
पण हे पाऊल सरकारने जरा जपूनच टाकावं, असं मत पर्यावरण प्रेमी मांडतात, कारण तज्ञांच्या इशाऱ्यानुसार लिथियम उत्खननाची प्रक्रिया पर्यावरणाला अनुकूल नाही.

फोटो स्रोत, Getty Images
भूगर्भातील खारे जलाशय आणि खडकांमधून लिथियम खनिज काढलं जातं. खाणकामामुळे आसपासच्या निसर्गाचं नुकसान होऊ शकतं.
खाणीमधून लिथियम काढण्याच्या प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात पाणीही वापरलं जातं. त्यामुळेच अर्जेंटिनातल्या लिथियम खाणींना स्थानिक रहिवाशांनी विरोध केला आहे.
त्याशिवाय खनिजातून लिथियम वेगळं करण्यासाठी ते तापवावं लागतं आणि त्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भट्ट्यांमध्ये कोळसा, तेल अशा जीवाश्म इंधनाचा वापर होतो. म्हणजे लिथियमची बॅटरी वापरणं कार्बन उत्सर्जन कमी करत असलं, तरी हे खनिज पूर्णत: ‘ग्रीन’ नाही.
सध्यातरी काश्मीरमधल्या लिथियमसंदर्भातला अहवाल प्राथमिक स्वरुपाचा असल्याचं अधिकारी सांगतत आहेत. भारत सरकार आता त्याविषयी काय निर्णय घेतं हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता. 'गोष्ट दुनियेची', 'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








