भारतीय स्वातंत्र्य दिन : जंगल वाचवताना ब्रिटिशांच्या बंदुकीसमोर न झुकलेले 'नाग्या' कातकरी

नाग्या कातकरी, चिरनेर आंदोलन, रायगड, स्वातंत्र्य दिन
फोटो कॅप्शन, नाग्या कातकरी
    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी

भारतीय स्वातंत्र्याला यंदा 75 वर्षे पूर्ण होतायेत. स्वातंत्र्यलढ्यात असंख्य जणांचं योगदान आहे. यातल्या काहीजणांची नोंद इतिहासानं घेतली, तर काहीजणांची नावं काळाच्या उदरात गुडूप झाली. यातल्या एका स्वातंत्र्यवीराची ओळख बीबीसी मराठी तुम्हाला करून देणार आहे.

महात्मा गांधीजींच्या खांद्यावर भारतीय स्वातंत्र्य लढ्याची धुरा येऊन जवळपास दशक लोटला होता. म्हणजे 1930 चं हे वर्ष होतं. विविध आंदोलनांच्या माध्यमातून गांधीजी भारतीय जनमानसांना स्वातंत्र्य चळवळीच्या प्रवाहात आणू पाहत होते.

12 मार्च 1930 रोजी मीठाचा कायदा मोडून गांधींनी सत्याग्रहाची हाक देत दांडी यात्रेला सुरुवात केली. देशभरात सत्याग्रह आणि कायदेभंगाच्या हाका देण्यात आल्या आणि त्या हाकांना अभूतपूर्व सादही मिळाली.

गांधीबाबा करतोय म्हणजे काहीतरी चांगलंच करत असेल, असं मानून 'स्वातंत्र्य म्हणजे काय' हे माहित नसणारेही असंख्यजण यात सहभागी झाले. महात्मा गांधींवरील गाढ विश्वासाचा हा परिणाम होता.

कायदेभंगाच्या आंदोलनाचे लोण देशभर विविध रूपात पसरलं. कुठे साराबंदी, तर कुठे परदेशी कपड्यांवर बहिष्कार, तर कुठे आणखी कल्पक आंदोलनं. यात बॉम्बे प्रांत गाजला तो जंगल सत्याग्रहामुळे.

तेव्हाच्या बॉम्बे प्रांतातल्या कुलाबा जिल्ह्यात आणि आताच्या महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातल्या चिरनेरमध्ये झालेल्या जंगल सत्याग्रहानं देशभर खळबळ उडवली. केवळ मुख्य प्रवाहातलेच लोक स्वातंत्र्य चळवळीत नव्हते, तर कातकरी समाजासारखा वंचित समाजही या सत्याग्रहात सहभागी झाला होता.

'मोटला राजा, येडा किसा हिल ती?' असं म्हणत कातकरी समाज महात्मा गांधींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीच्या पाठीमागे ठामपणे उभा राहिला. कातकरी समाजातील या क्रांतिकारी पावलाचं प्रतीक बनले ते रायगड जिल्ह्यातल्या चिरनेर जंगलाच्या आंदोलनातील हुतात्मा 'नाग्या कातकरी.'

इतिहासाच्या पानांनी म्हणावी तितकी ना या चिरनेर जंगल सत्याग्रहाची दखल घेतली, ना या सत्याग्रहातल्या नायकाची अर्थात नाग्या कातकरी यांची.

इतिहासाच्या पानांनी दखल न घेतलेल्या या सत्याग्रहाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे.

ब्रिटिशांच्या बंदुकीनं आठ जणांना ज्या सत्याग्रहात धारतीर्थी केलं, ते चिरनेर जंगल सत्याग्रह 25 सप्टेंबर 1930 रोजी झालं होतं. पण त्यापूर्वीही दोन आंदोलनं झाली होती. सुरुवात तिथून करू.

चिरनेर आंदोलनाआधीची दोन आंदोलनं

महात्मा गांधीजींनी सविनय कायदेभंगाची हाक दिल्यानंतर देशभरातील काँग्रेस कमिट्या सक्रिय झाल्या.

कुलाबा जिल्ह्यात (आताचा रायगड जिल्हा) पनवेल काँग्रेस समितीकडून उरण तालुक्यातल्या चिरनेर इथं तीन आंदोलनं झाली. यातली पहिली दोन आंदोलनं 8 आणि 18 सप्टेंबर रोजी झाली होती. ही दोन्ही आंदोलनं शांततेतच पार पडली.

8 सप्टेंबरचं सत्याग्रह बाबुराव आपटे यांच्या नेतृत्वात पार पडलं. आपटे हे शिरढोण गावचे जमीनदार होते.

'जंगल आमुचे असून, सरकार बसलंय टपून'

'झाडे तोडण्याची बंदी आम्हाला, मोठं नवल वाटतंय आम्हाला'

अशा घोषणा देत चिरनेरजवळील अक्कादेवीच्या डोंगराकडे शेकडो गावकरी निघाले. डोंगरावरील राखीव जंगलातला झाडोरा कुंपणासाटी तोडला, वाळकी लाकडे आणि फाटी गोळा केली. अशा पद्धतीनं सत्याग्रह शांततेत पार पडलं.

या सत्याग्रहावेळी बाबुराव आपटेंना मामलेदार जोशींनी आठ महिन्यांची शिक्षा सुनावली.

दांडी यात्रा

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, दांडी यात्रा

दुसरं सत्याग्रह 18 सप्टेंबरला झालं. हे सत्याग्रह सुद्धा शांततेत पार पडलं. मात्र, यावेळी तयारी जोरदार करण्यात आली होती.

भाईसाहेब गुप्तेंच्या नेतृत्वात दुसरा सत्याग्रह झाला. नाना बेडेकर, आप्पासाहेब वेदक, अंताजी महादेव पोवळे अशी मंडळी यात पुढे होती. डहाळी तोडण्यापर्यंतच हा दुसरं सत्याग्रह थांबला. या दुसऱ्या सत्याग्रहावेळीही अनेक कार्यकर्त्यांना अटक करून आठ महिन्यांची शिक्षा ठोठावण्यात आली होती.

मात्र, त्यानंतर 25 सप्टेंबर 1930 ला झालेल्या सत्याग्रहावेळी गोळीबार झाला आणि आंदोलन रक्तरंजित झालं. याच आंदोलनात चिरनेर सत्याग्रहाचा चेहरा आणि कातकरी समाजाच्या राष्ट्रीयत्वाचे प्रतीक बनलेले नाग्या कातकरी यांना हौतात्म्य पत्कारावं लागलं होतं.

25 सप्टेंबरच्या या जंगल सत्याग्रहाची माहिती आपण जाणून घेऊ. मग या लढ्याचे नायक बनलेल्या नाग्या कातकरी यांच्या योगदानाकडे येऊ.

जंगल सत्याग्रहाची तयारी

25 सप्टेंबर 1930 च्या सत्याग्रहाची तयारी पाच-सहा दिवस आधीपासूनच सुरू झाली होती. 20 तारखेपासूनच या आंदोलनाची तयारी सुरू झाली होती.

20 सप्टेंबरला चिरनेरच्या श्रीराम मंदिरात सभा झाली. अण्णा पोवळे हे या सभेचे अध्यक्ष होते. महात्मा गांधींजींच्या सविनय कायदेभंगाच्या चळवळीला पाठिंबा देण्यासाठी आपणही जंगलाचे जाचक कायदे मोडायचे, असं या ठिकाणी ठरलं.

या सत्याग्रहाला सगळ्यांनी कोयते, कुऱ्हाडी घेऊनच यायचं, असा प्रचार करणाऱ्या सभाही गावोगावी झाल्या. त्यामुळे हे सत्याग्रह आधीच्या दोन्ही सत्याग्रहांपेक्षा वेगळे असेल याची जाणीव गावकऱ्यांना झाली होती.

नाग्या कातकरी, चिरनेर आंदोलन, रायगड, स्वातंत्र्य दिन

फोटो स्रोत, Mayuri Prakashan

फोटो कॅप्शन, नाग्या कातकरी यांचं वसंत भाऊ पाटील यांनी लिहिलेलं चरित्र (मयुरी प्रकाशन)

अप्पासाहेब वेदक यांनी अहिंसा मार्गाने सत्याग्रह करण्याची जाणीव सातत्यानं करून देत होते.

सत्याग्रहाच्या प्रचाराची शेवटची सभा 24 सप्टेंबरच्या रात्री कोप्रोलीच्या देवळात झाली.

या सत्याग्रहाची वार्ता नाग्या कातकऱ्या यांच्यापर्यंतही पोहोचली होती. ते वयानं तरूण होते. पण आपल्या हक्क-अधिकारांबाबत जागरूक होते.

'हे सरकार आपल्याला जळूसारखं शोषून घेतंय'

नाग्या कातकरी आणि त्याचे सवंगडी म्हणजे अत्यंत धीट सत्याग्रहींचा गट. हासू बाळू खारपाटील, धनाजी जोमा म्हात्रे, बारकू अंबाजी चिर्लेकर, माया कानू पाटील, राघो माया मोकल, तुकाराम विठू मोकल, पांडू देऊ कुंभार, बाळाराम रामजी ठाकूर अशी मंडळी यात होती.

जंगलातील सुकी लाकडे तोडायची, अन् पोलिसांनी विरोध केल्यास त्यांना आपलं 'पाणी' दाखवायचं, असा हा गट होता. नाग्या या गटातलीच होते.

लहानपणापासून जंगलाशी घनिष्ट संबंध आलेल्या नाग्यांना हेही कळत होतं की, जंगल आपली संपत्ती आणि जंगलावर हक्क सांगणारे, ब्रिटिश, सावकार हे आपल्यावर वर्चस्व मिळवू पाहत आहेत.

'घरच्या बकऱ्यांचं दूध पिऊन नाग्याची प्रकृती धडधाकट झाली होती. सरळसोट उंच चण असलेल्या नाग्या सह्याद्रीच्या सुळ्यासारखाच दिसे,' असं वसंत पाटील लिहितात.

25 सप्टेंबरच्या आदल्या रात्री मंदिरातल्या सभेत एका पुढाऱ्याने केलेल्या भाषणातील आवाहनांनी नाग्या यांना सत्याग्रहात सामिल होण्याची प्रेरणा मिळाली.

त्या पुढाऱ्यानं म्हटलं होतं, 'सरकार जालीम आहे. ते आपल्याला जळूसारखे शोषून घेतंय. हे असेच चालू राहिले, तर एक दिवस शरीरातील रक्त आटून जाईल. असे मरण पत्करण्यापेक्षा चला उठा, जागे व्हा! अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आक्कादेवीच्या जंगलात जाऊन आपला हक्क बजाऊया. या जंगलातील झाडे तोडताना, हाती बेड्या पडल्या तर त्या फुलासारख्या माना. तो तुमचा सन्मान समजा. ही गांधीबाबाची हाक आहे.'

सभेच्या शेवटी केलेल्या या भाषणाअखेर त्या पुढाऱ्यानं विचारलं, 'कोण कोण येणार सत्याग्रहाला?'

मंदिरात बसलेल्या गावकऱ्यांनी मुठी आवळून आपले हात उंचावले. त्यावेळी मंदिराच्या गजापाशी नाग्या कातकरी उभे होते. त्यांनी मोठ्या आत्मविश्वासानं आपले हात उंचावत, येणार असल्याचं कबूल केलं.

आक्कादेवीच्या जंगलात

चिरनेर गावच्या लोकवस्तीपासून पूर्वेला सुमारे तीन किलोमीटर अंतरावर अक्कादेवी हे ठिकाण आहे.

टाळ-मृदंगाच्या गजरात, वंदे मातरमच्या जयघोषात हजारो लोक आक्कादेवीकडे निघाले होते. कित्येकांच्या हातात कोयते, कुऱ्हाडी होत्या.

नाग्या कातकरी, चिरनेर आंदोलन, रायगड, स्वातंत्र्य दिन

फोटो स्रोत, Mayuri Prakashan

फोटो कॅप्शन, जंगल सत्याग्रहावरील पुस्तक (मयुरी प्रकाश, उरण)

आक्कादेवीच्या माळरानावरील वटवृक्षाभोवती पार होता. इथंच सुमारे पाच हजार लोक जमा झाले. उत्तरेला शिलोत्रा टेकडीवर स्त्रिया आणि लहान मुलं जमली होती.

काही वेळानं चिरनेरची तुकडी पूर्वेच्या डोंगरावर ताडाच्या माळावर पोहोचली. या तुकडीत नाग्या कातकरी आणि त्यांचे साथीदार होते.

आक्कादेवीच्या जंगलात तणाव वाढत चालला होता.

सत्याग्रहाच्या बंदोबस्तासाठी आलेला फौजफाटा केव्हाच दाखल झाला होता. मागील सत्याग्रहाचा अनुभव जमेस धरून पोलीस इन्स्पेक्टर रामचंद्र दौलत पाटील यांच्यासोबत मामलेदार केशव महादेव जोशी हेही उपस्थित राहिले होते.

इकडे नाग्या आणि त्याचे मित्र वडाच्या झाडापाशी येऊन पोहोचले होते. तिथं काही लोकांना पकडून बेड्या घातल्याची वार्ता कानावर पडली आणि नाग्यासह सर्वजण खवळले.

झालं असं होतं की, पोलीस इन्स्पेक्टरनं सत्याग्रहींवर छडीमार सुरू केला आणि लोकांना बेड्या घातल्या. पोलिसांकडे फक्त चारच बेड्या होत्या. त्यामुळे इतर सत्याग्रही बेड्या घालून घेण्यासाठी स्वत:हून पुढे आले, तेव्हा पोलिसांची पंचाईत झाली. पोलीस इन्स्पेक्टरचा रागा पारा चढला, प्रकरण हातघाईवर आले. मात्र, मामलेदारांनी 'नो फायरिंग'चे आदेश दिले होते.

इकडे आक्कादेवीच्या जंगलात नाग्या आणि त्याच्या साथीदारांनी लाकडाचे वासे तोडले होते. हे वासे ते घरी घेऊन जाणार होते. 'वंदे मातरम्'च्या घोषणा देण्यात आल्या.

तेवढ्यात एकाएकी स्थिती बदलली. सत्याग्रहींच्या जमावानं दांडके आणि दगड मारण्यास सुरुवात केली. आवर घालण्यासाठी काय करावं असा प्रश्न पोलीस इन्स्पेक्टरला पडला आणि सहकाऱ्यास खुणेने संकेत दिले. हवालदारानं 'फायर' म्हटलं आणि बंदुकीच्या फैरी झडू लागल्या.

गोळीबाराचा आवाज ऐकताच मामलेदार जोशी धावतच वडाच्या झाडाकडे गेले. 'ऑर्डर कुणी दिली? गोळीबार थांबवा.' असे हात उंचावून ते सांगू लागले. वडाच्या झाडाजवळच उभ्या असलेल्या पोलीस इन्स्पेक्टर पाटील यांनी पाठमोऱ्या असलेल्या मामलेदार जोशींवरच दोन गोळ्या झाडल्या. मामलेदार जोशी जागेवरच कोसळले.

सर्वत्र धावपळ सुरू झाली. काही लोकांनी मिळून पोलीस इन्स्पेक्टरला पकडण्याचं धाडस केलं. समोर खवळलेला जनसमुदाय पाहून आपल्या बंदुकीतल्या गोळ्याही अपुऱ्या असल्याचं कळताच पोलीस इन्स्पेक्टरनंही शरणागतीच पत्करली होती.

सारे सत्याग्रही वडाच्या झाडापाशी जमले होते. तेवढ्यात तिथं नदीच्या दिशेनं एकजण धावत आला आणि म्हणाला, "नाग्याला गोळी लागली."

नाग्या कातकरी, चिरनेर आंदोलन, रायगड, स्वातंत्र्य दिन

नाग्याला गोळी लागल्याचं कळताच, सत्याग्रहात सहभागी झालेली त्याची बहीण ठकी तिथं धावतच गेली. नाग्या बेशुद्ध पडल्याचं तिला दिसलं. तिनं जीवाच्या आकांतानं हाका मारल्या, तेवढ्यात नाग्यानं जिवंत असल्याचं सांगण्यासाठी 'मा अठं आहा ये.' म्हटलं.

नाग्याला कातकरवाडीतल्या त्याच्या घरी नेण्यात आलं. मात्र, आधीच गोळीबारामुळे सत्याग्रहाबाबत पोलीस चौकशा सुरू झाल्यानं नाग्याला गोळीबाराच्या जखमांसह घरात लपवून ठेवण्यात आलं. त्यामुळे रक्तस्रावानं त्याचा जीवा अर्धमेला झाला आणि त्यातच त्याचा जीव गेला.

कुडाच्या भिंतीतलं आयुष्य

नाग्याच्या घरातील सर्वच कष्टाळू होते. कष्ट तर कातकरी समाजाच्या हे पाचवीला पूजलेलंच होतं.

बऱ्याच वेळा घरी हंडीत शिजवलेली तांदळाच्या कण्यांची पेज पिऊन दिवस काढावे लागत. नाग्या यांना या सगळ्याची जाणीव होती.

1910 च्या सुमारास चिरनेर गावाजवळच्या कातकरवाडीत महादू आणि जाखीबय या दाम्पत्याच्या पोटी नाग्या यांचा जन्म झाला. ठकी आणि जानक्या अशी दोन भावंडं. यातली ठकी नाग्यांपेक्षा मोठी, तर जानक्या लहान.

कुडाच्या भिंती आणि गवताच्या छप्पर असलेल्या खोपटीत नाग्या यांचं आयुष्य गेलं.

तुळशी असं नाग्याच्या पत्नीचं नाव. गणपत (सोन्या) नावाचा त्यांना लहान मुलगा होता.

नाग्याच्या बलिदानानंतर तुळशीनं दुसरं लग्न केलं. मुलगा गणपत मात्र तिने नाग्याच्या आजीकडेच ठेवला.

बॅरिस्टर अंतुलेंकडून सोन्याचा सत्कार

चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना राज्य स्तरावरून पहिल्यांदा मानवंदना मिळाली ती 1975 साली. तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणांनी चिरनेरमध्ये जाऊन मानवंदना दिली. मात्र, नाग्या कातकरी यांचा उल्लेख तेव्हाही उपेक्षितच राहिला.

पुढे बॅरिस्टर ए. आर. अंतुले जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, तेव्हा 4 मार्च 1981 रोजी चिरनेरमध्ये मानवंदना देण्यासाठी आले. तेव्हा त्यांनी नाग्या कातकरी यांचा मुलगा सोन्या याला जाहीर सभेत दहा हजार रूपये देऊन सत्कार केला.

नंतर काँग्रेस कमिटीनं चिरनेरमध्ये पहिला स्मृतिस्तंभ बांधला. त्याआधी 1939 मध्ये बांधलेल्या स्मारकावर नाग्या कातकरी यांचे नाव नव्हते. मात्र, नंतर बांधलेल्या स्मारकावर नाग्य कातकरी यांचा उल्लेख केला गेला. 23 जानेवारी 2002 रोजी त्या स्मारकावर नाग्या कातकऱ्याचं नाव कोरलं गेलं.

भारताच्या स्वातंत्र्य संग्रामाच्या इतिहासात नाग्यासारख्या कातकरी समाजातील लढवय्यांची नावं ठळकपणे समोर आली नसली, तरी त्यांचं योगदान इतिहास नाकारत नाही.

(या लेखासाठी वसंत भाऊ पाटील यांच्या 'चिरनेर जंगल सत्याग्रह 1930' आणि 'हुतात्मा नाग्या कातकरी' या पुस्तकांचा संदर्भ म्हणून वापर करण्यात आलाय. तसंच, 'रायगड जिल्ह्यातील स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास' हा भानुदास धोंडिबा शिंदे यांचा संशोधनपर ग्रंथाचाही वापर करण्यात आला आहे.)

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)